Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तानच्या अनेक शहरात बत्ती गुल, फोनलाही नव्हते सिग्नल; नेमकं काय झालं होतं?

Webdunia
मंगळवार, 24 जानेवारी 2023 (14:15 IST)
महागाईमुळे बेहाल झालेल्या पाकिस्तानात आता बत्तीगुल झालीय. सोमवारी (23 जानेवारी) सकाळी लोक झोपेतून जागे झाले तेव्हा सगळीकडेच वीजपुरवठा खंडित असल्याचं चित्र होतं.लाईट अचानकच कशी काय गेली म्हणून लोकांनी आपले फोन हातात घेतले तर फोनला पण सिग्नल नव्हते. लोकांना कामावर जाण्यासाठी ऑनलाईन टॅक्सी बुक करणं अवघड झालं होतं.
 
परिस्थिती अशी होती की, काहींचे फोन चार्ज नव्हते तर काहींच्या फोनची बॅटरी संपली होती. संपूर्ण शहरात लाईट गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर थोड्याच वेळात न्यूज चॅनेल्सवर देखील अनेक शहरांत वीज पुरवठा खंडित झाल्याच्या बातम्या झळकू लागल्या.
 
पाकिस्तानमध्ये थोड्याफार फरकाने सगळ्याच शहरांना वीज वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागतोय. यात लाहोर, इस्लामाबाद, कराचीसह सर्वच मोठ्या शहरांचा समावेश आहे.
 
काही ठिकाणी आता वीजपुरवठा सुरळीत होऊ लागला आहे.
 
यावर पाकिस्तानचे ऊर्जा मंत्री काय म्हणाले?
पाकिस्तानचे ऊर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर म्हणाले की, "वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी देशभरात टीम सक्रिय झाल्या आहेत. रात्री 10 पर्यंत वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत."
 
एका खाजगी टीव्ही चॅनेलशी बोलताना खुर्रम दस्तगीर म्हणाले की, व्होल्टेजमधील चढ-उतारामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. आणि येत्या 12 तासांत ही अडचण दुरुस्त करण्यात येईल.
 
पण पाकिस्तानात अशा पद्धतीने ब्रेकडाऊन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. दर हिवाळ्यात लोकांना अशा ब्रेकडाऊनचा सामना करावा लागतो. आणि बऱ्याचदा ट्रान्समिशन लाईनमधील बिघाड मुख्य कारण असल्याचं सांगितलं जातं.
 
जिओ न्यूजशी बोलताना ऊर्जामंत्री म्हणाले की, तारबेला आणि वारसाकमध्ये काही ग्रीड पूर्ववत करण्यात आली असून सिस्टीम टप्याटप्याने सुरू करावी लागणार आहे.
 
एका प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, कराचीचं प्रकरण थोडं गुंतागुंतीचे आहे. कराचीची स्वतःची वीज व्यवस्था आहे. त्यामुळे येत्या काही तासांत कराचीमध्ये वीजपुरवठा पूर्ववत होईल.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे, हा ब्रेकडाऊन दक्षिणेकडून उत्तरेकडे झालाय. आणि येत्या 12 तासांत देशातील संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
 
पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलंय की, "प्राथमिक अहवालानुसार, आज सकाळी 7 वाजून 34 मिनिटांनी नॅशनल ग्रीडची सिस्टम फ्रिक्वेन्सी कमी झाली होती. त्यामुळे वीज यंत्रणेत मोठा बिघाड झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे."
 
इस्लामाबाद इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनीच्या प्रवक्त्याने माहिती देताना सांगितलं की, "ब्रेकडाऊनमुळे इस्कोचे जवळपास 117 ग्रिड स्टेशन्स प्रभावित झाले आहेत."
 
त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी थेट सेंट्रल कंट्रोल रूमद्वारे प्रयत्न सुरू असल्याचं या प्रवक्त्याने सांगितलं.
 
ब्रेकडाऊन कसं झालं?
पाकिस्तानचे ऊर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर यांच्या म्हणण्यानुसार, हे मोठं ब्रेकडाऊन नाहीये.
 
ते म्हणाले, "हिवाळ्याच्या सीझनमध्ये देशभरातील विजेची घटलेली मागणी लक्षात घेऊन आम्ही वीजनिर्मिती यंत्रणा तात्पुरती बंद केली होती. मात्र आज सकाळी जेव्हा सिस्टीम सुरू करण्यात आली तेव्हा काही ठिकाणी फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेजमध्ये चढ उतार आल्याचं दिसलं."
 
दस्तगीर म्हणाले की, पेशावर आणि इस्लामाबादमध्ये ग्रीड स्टेशन पूर्ववत झाले आहेत.
 
ते म्हणाले की, "येत्या 12 तासांत देशात वीजपुरवठा सुरळीत होईल याचं मी आश्वासन देतो."
 
अडचणी नेमक्या काय आहेत?
एनटीडीसीच्या एका अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "गुडू क्वेटा ट्रान्समिशन लाइनमध्ये फॉल्ट आलाय. त्यांच्या मते, असा फॉल्ट यायला काही सेकंद पुरेसे असतात त्यानंतर लाईन ब्रेकडाऊन व्हायला लागते. त्यांच्या मते, पाकिस्तानमधील ट्रान्समिशन सिस्टीम जुनी झाल्यामुळे ब्रेकडाऊन झालं आहे. दाट धुकं पडल्यामुळे लाईन्समध्ये ओलावा येतो, कधी कधी फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही त्यामुळे विजेचं संकट निर्माण होतं. जर वेळेतच ट्रान्समिशन लाईन मधील फॉल्ट समजला तर ती लाईन वेगळी केली जाते. पण हे करणं खूप अवघड असतं, शिवाय हे करण्यासाठी खूपच कमी वेळ उपलब्ध असतो अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. पण पाकिस्तानचे ऊर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी मात्र ब्रेकडाऊन होण्यामागे व्होल्टेजचा चढउतार हे कारण दिलंय. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, पॉवर ग्रीड फेल फक्त नोकऱ्या आणि जनजीवनच विस्कळीत होत नाही, तर त्याबरोबर उद्योगांना ही अडचणींचा सामना करावा लागतो. कारण अवजड उद्योगांना विजेचा बॅकअप सपोर्ट नसतो. त्यामुळे कारखाने बंद ठेवावे लागतात.
 
इस्लामाबादची परिस्थिती
इस्लामाबादमधील बीबीसीच्या प्रतिनिधी शुमायला जाफरी सांगतात की, मार्केटमधील दुकानदार सकाळपासून वीज येण्याची वाट पाहत होते. काही दुकानदारांनी जनरेटरचाही वापर सुरू केलाय. शुमायला जाफरी यांनी इस्लामाबादच्या जी-10 मार्केटमध्ये जाऊन काही लोकांशी चर्चा केली. मार्केट मध्ये आपल्या दुकानाबाहेर बसलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, "सकाळच्या आठ वाजल्यापासून वीजपुरवठा ठप्प आहे. दररोजची हीच अवस्था आहे. कधी तासभर लाईट येते तर कधी दोन - दोन तास लाईट गायब असते. तसं तर कस्टमर कमी झालंय आणि त्यात लाईट नसल्यामुळे तर त्रासात आणखीनच भर पडलीय." दुसरा दुकानदार सांगतो, "या सगळया परिस्थितीत आमचा खर्च दुपटीने वाढतोय. जनरेटरसाठी दिवसाला हजार रुपये मोजावे लागतायत, त्यात वीजबिल तर येणारच आहे. ज्याने दुकान भाड्याने दिलंय तो तर दुकानाचं भाडं कमी करणार नाहीये. आणि या सगळ्याचा परिणाम आमच्या कुटुंबावर होतोय." "या संपूर्ण राजकीय व्यवस्थेमुळे लोक हताश झालेत. लोक आनंदी नाहीयेत." जी-10 मार्केटमध्ये कॉस्मेटिकचं दुकान चालवणारा एक व्यक्ती सांगतो, "दररोज हेच सुरुय. आम्ही जनरेटर वापरून दिवस ढकलतोय. आणि जनरेटर वापरलं नाही तर अंधार होतोय, ग्राहक दुकानात येत नाहीयेत. या पैशातून दुकानाचं भाडं काढणं सुद्धा अवघड झालंय."
 
सोशल मीडियावर लोक काय म्हणतात?
पाकिस्तानमध्ये वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केलीय. काही ट्विटर यूजर्सने मीम्स बनवून पाकिस्तान सरकारची खिल्ली उडवलीय, तर काहींनी सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत.
पाकिस्तानी पत्रकार आरिफा नूर लिहितात की, दर हिवाळ्यात असाच प्रकार घडतोय. आणि आम्हाला अजून याचं निराकरण करणं शक्य झालेलं नाही.
 
दुसऱ्या एका ट्विटर युजरने ट्विट केलंय की, "जर सोमवार असा असेल तर पूर्ण आठवडा कसा असेल?"
हयात नावाच्या एका ट्विटर युजरने फोटो शेअर करत लिहिलंय की, "ज्या लोकांचा फोन 20 टक्के चार्ज आहे त्यांची अवस्था फोटोतल्या या मुलीसारखी आहे." 12 तासांत सर्व पूर्ववत होईल या, उर्जामंत्र्यांच्या उत्तरावर ही काही जणांनी टीका केलीय.
 
Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

कल्याणमध्ये ट्रकने आई-मुलाला चिरडले,ट्रक चालकाला अटक

कर्ज परत करण्यासाठी बँकेतून दबाव टाकल्यामुळे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

अकोल्यात मॉर्निग वॉकला गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या

ठाण्यात रोडरोलरने 25 वर्षीय मजुराचा चिरडून मृत्यू,गुन्हा दाखल

Russia–Ukraine War: युक्रेनियन लष्कराचा दावा, साराटोव्ह, रशियामध्ये ड्रोन हल्ला

पुढील लेख
Show comments