Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेख हसीना यांच्या हातून सत्ता जाणे ही बांगलादेशातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे का?

Webdunia
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (09:49 IST)
बांगलादेशातील राजकारण आणि सत्तापरिवर्तनासोबतच त्याठिकाणचे अल्पसंख्याक आणि विशेषत: हिंदुंच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील बनला आहे.
 
गेल्या चार दशकांचा राजकीय इतिहास पाहता, निवडणुकांमध्ये अवामी लीग पक्षाच्या पराभवानंतर किंवा सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर हिंदुंवर हल्ले होण्याचे आरोप वाढल्याचं दिसून आलं आहे.
 
राजकीय समीक्षक आणि विविध हिंदू संघटनांच्या नेत्यांच्या मते, 1992 मध्ये भारतात बाबरी मशीद पतनानंतर बांगलादेशात पहिल्यांदा हिंदुंवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले होते.
 
त्यावेळी खालिदा झिया यांच्या नेतृत्वात बीएनपी पक्ष सत्तेत होता.
 
त्यानंतर 2001 साली निवडणुकांमध्ये आवामी लीग पक्षाचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्यांदा हिंदुंवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले होते. तेव्हा निवडून आलेल्या बीएनपी पक्षाच्या विजयोत्सवादरम्यान विविध जिल्ह्यांत हिंदु समुदायावर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
 
त्यावेळी न्यायमूर्ती लतिफूर रहमान यांचं काळजीवाहू सरकार होतं.
 
निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यापासून बीएनपीचा सरकार स्थापनेचा शपथविधी सोहळा होईपर्यंत विविध ठिकाणी हिंदुंवर हल्ल्याच्या घटना घडल्या. बीएनपीच्या कार्यकाळात या घटना नियमित घडत राहिल्या.
 
या हल्ले प्रकरणात बीएनपीशी सलंग्न अनेक लोकांवर आरोप ठेवण्यात आले होते.
 
हिंदुंवरील हल्ल्याची शेवटची घटना 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी राजीनाम देऊन देशातून पलायन केल्यानंतर घडली.
 
बीबीसीने तथ्ये तपसली असता या हल्ल्यांसंबंधी जेवढी छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली, त्यापैकी अनेक छायाचित्रे बनावट आहेत. अर्थात हल्ले झाले नाहीत असेही नाही.
 
आतापर्यंत किती हल्ले झाले?
हिंदूंची एक संघटना जातीय हिंदू महाजोट म्हणजे राष्ट्रिय हिंदू संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार शेख हसीना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर देशात 48 जिल्ह्यांत 278 घटना घडल्या.
 
तर दुसरीकडे हिंदु बौद्ध ख्रिश्चन एकता परिषद नावाने असलेल्या एका संघटनेने केलेल्या दाव्यानुसार 52 जिल्ह्यांत अल्पसंख्याकांवर हल्ले आणि अत्याचाराच्या जवळपास 205 घटना घडल्या आहेत.
 
अल्पसंख्याक अधिकार आंदोलन या संघटनेने देशातील विविध भागात हिंदु समुदायातील लोकांच्या घरांवर आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांची चौकशी करण्यासाठी अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे.
 
अशा अनेक संघटनांनी केलेल्या दाव्यांतील तथ्य तपासून पाहणे शक्य नाही. तसेच या हल्ल्यांमधील किती हल्ले हे धार्मिक द्वेषातून झाले आणि किती हल्ले शेख हसीना यांचे समर्थक असल्यामुळे झाले आहे याची निष्पक्ष चौकशी करणंही शक्य नाही.
 
बीबीसीने तपासलेली तथ्ये आणि बीबीसी व्हेरिफाय आणि ग्लोबल डिसइन्फॉर्मेशन टीम ने समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या अनेक पोस्टची शहानिशा केली आहे. त्यावरून असे स्पष्ट होते की, बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर अल्पसंख्याकांवर हल्ले झाले आहेत हे खरं आहे, मात्र, अनेक प्रकरणांत केवळ अफवाही पसरवल्या गेल्या आहेत.
 
हिंदू दहशतीखाली का आहेत ?
शेख हसीना यांचं सरकार कोसळलं आणि त्यांनी देशातून पलायन केल्यानंतर हल्ल्याच्या घटना किती घडल्या हा चर्चेचा विषय ठरू शकतो. मात्र, देशातील विविध भागात राहणारे हिंदू समुदयाचे लोक सध्या भीतीयुक्त दहशतीखाली जगत आहेत हे स्पष्ट होतं.
 
हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेचे नेते राणा दासगुप्ता यांच्या मते, "हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे बांगलादेशात हल्ल्यांमध्ये सहभागी आरोपींना कोणत्याही प्रकारची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, एक अशी भयमुक्त संस्कृती उदयास आली आहे, त्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंध आणण्यास अडचणी येत आहेत."
 
ते सांगतात, "धार्मिक सहअस्तित्वार विश्वास न नसणारेच हिंदूंवर तुटून पडतात. ही प्रवृत्ती पाकिस्तान शासनकाळापासून चालत आलेली आहे."
 
बांगलादेशात भारत, हिंदू आणि अवामी लीग हे तीन मुद्दे एकमेकांशी सलंग्न आहेत, या मताशी दासगुप्ता सहमत आहेत.
 
दासगुप्तांच्या मते, गेल्या 15 वर्षांदरम्यान अवामी लीगने सरकारी नोकऱ्यांतील नियुक्त्या आणि पदोन्नती या विषयातील पूर्वीपासून चालत आलेला भेदभाव मिटवण्याचा प्रयत्न केला.
 
"बांगलादेशच्या एकून लोकसंख्येच्या 8 टक्के अल्पसंख्याक आहेत. मात्र तेवढ्या प्रमाणात त्यांना नोकऱ्या किंवा पदोन्नतीमध्ये स्थान नाही. सरकारने अल्पसंख्याकांच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरूवात केली तेव्हा प्रचंड गदारोळ करण्यात आला. अल्पसंख्याक समुदाय सर्वच नोकऱ्यांवर ताबा मिळवत आहेत असे चित्र उभे करण्यात आले," असंही ते म्हणाले.
 
दासगुप्ता यांच्या मते हिंदू कधीच धार्मिक राष्ट्रवादाच्या बाजूने उभे राहू शकत नाहीत.
 
लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजचे प्राध्यापक मुश्ताक खान यांनी बीबीसी बांगलासोबत बोलताना सांगितले की, "बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्यास त्याचा सर्वाधिक राजकीय फायदा अवामी लीग आणि भारताला होतो. अवामी लीगच्या अनेक लोकांवर हल्ले झाले आहेत. त्या हिंदूंचे बहुतांश प्रतिनिधी त्या पक्षात आहेत.
 
दासगुप्ता या गोष्टीचं खंडन करतात, त्यांच्या मते, "या वेळेस हिंदूंवर जे हल्ले झाले त्याचा आधार धार्मिक आहे. या हल्ल्यांना केवळ राजकीय हल्ले असं संबोधणं उचित ठरणार नाही. हा आरोपच पूर्णत: चुकीचा आहे. चित्रपट निर्माता ऋत्विक घटक याचे घर पाडण्यात आले आहे. ते तर अवामी लीगचे नेते नव्हते. मग त्यांचे घर का पाडण्यात आले?"
 
हिंदु मुस्लीम वादाचा मुख्य मुद्दा जमीन
बांगलादेशातील दोन स्थानिक संशोधन संस्थांनी अहवालात सांगितले की, देशात धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधात होणारी हिंसेची प्रकरणे 70 टक्के जमिनीच्या वादाशी संबंधीत आहेत.
 
हीच नाराजी त्यांची संपत्ती आणि प्रार्थनास्थळे तोडफोड करून व्यक्त केली जाते.
 
सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह्स (CA)च्या बांगलादेश पीस ऑब्जर्व्हेटरी (BPO) या संस्थेने 2013 ते 2022 दरम्यान अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आणि हिंसेचे स्वरूप याचे विश्लेषण करून जूनमध्ये अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 
हिंदु समुदयाच्या लोकांपैकी बहुतांश लोकांचे मत आहे की, देशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांपैकी बहुतांश हल्ले हिंदुंवरच केले जातात.
 
कुमिल्ला येथील रहिवासी राजीव हे बीबीसी बांगलाशी बोलताना म्हणाले की, "राजकीय कारणांवरून हल्ले तर होतातच, मात्र, हिंदुंच्या संपत्तीवर ताबा मिळवणे हाही या हल्ल्यांमागचा हेतू असतो. मात्र, अशा प्रकरणांची चौकशी होत नाही."
 
2001 साली सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बीएनपी आणि जमात यांचे संयुक्त सरकार सत्तेत आल्यानंतर अवामी लीग आणि त्यांच्या सहकारी संघटनांचे नेते, सदस्य आणि कार्यकर्ते तसेच अलपसंख्याक समुदयाच्या लोकांवर केलेले हल्ले, बलात्कार, हत्या आणि लुटीसह इतर मानवता विरोधी घटनांच्या चौकशीसाठी एक न्यायिक चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती.
 
सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद शहबुद्दीन हे त्या आयोगाचे अध्यक्ष होते.
 
शहाबुद्दीन आयोगाला 25 हजार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र, चौकशीनंतर त्यांनी यातील 5 हजार तक्रारी स्वीकारल्या होत्या. हिंदू नेत्यांच्या मते यातील कोणत्याही आरोपांची चौकशी करण्यात आली नाही, तसेच कुणावरही खटला चालविण्यात आला नाही.
 
राजकीय गणितं काय सांगतात ?
लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजचे प्राध्यापक मुश्ताक खान यांनी बीबीसी बांगलासोबत बोलताना याबाबत माहिती दिली.
 
त्यांच्या मते, बांगलादेशच्या राजकारणात हिंदुंचा मुद्दा संवेदनशील होण्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे बांगलादेशचा शेजारी देश भारतात धार्मिक मुद्दे अत्यंत संवेदनशील आहेत. तेथे मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे आरोप होत असतात. त्याचा परिणाम बांगलादेशवरदेखील होतो.
 
दुसरे कारण म्हणजे, बांगलादेशात गेल्या 15 वर्षांपासून अवामी लीग सत्तेत आहे. हा पक्ष आपण धर्मनिरपेक्षतेचे समर्थक आहोत आणि इस्लामिक संघटना त्यांना संपुष्टात आणू बघत आहेत असे दर्शविण्याचा प्रयत्न करतो. याच भूमिकेमुळे भारताने दीर्घकाळ अवामी लीगला सत्तेत ठेवले आहे. त्यांनी हिंदूंच्या हितासाठी अशा भूमिका घेतल्या होत्या की स्वत:च्या? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
डॉ. खान यांच्या मते या सर्व कारणांमुळेच बांगलादेशात भारत विरोध प्रचंड वाढला आणि तो रोष स्थानिक हिंदूंवर निघाला.
 
ते सांगतात, "बांगलादेशात ही भावना वाढीस लागली आहे, की भारत अवामी लीगला सत्तेत राहण्यासाठी मदत करतो. भारत हिंदुत्वावादी देश आहे आणि बांगलादेशातील हिंदू अवामी लीगला समर्थन देतात. त्यामुळेच राजकीय परिवर्तन होत असताना बहुतांश लोकांची नाराजी उघड होत आहे."
 
अवामी लीगला सत्तेतून खाली खेचण्याने किंवा त्यांचा निवडणुकीत पराभव केल्याने अर्थातच राजकीय मैदानात बीएनपीचे वर्चस्व वाढते.
 
बीएनपीची काय भूमिका?
हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे बीएनपीची नकरात्मक प्रतिमा भारताच्या नजरेत तयार झाली आहे यात शंका नाही.
 
शेख हसीना यांच्या पलायनानंतर प्राध्यापक युनूस यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करण्यासह बीएनपी राजकीय आखाड्यात सज्ज झाला आहे.
 
हिंदुंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे वारंवार बीएनपीला दोष देण्यात येतो, त्यामुळे यावेळी यात काही नवं नाही.
 
बीएनपीच्या राष्ट्रीय स्थायी समितीचे सदस्य सलाउद्दीन अहमद यांनी बीबीसी बांगलासोबत बोलताना म्हटलं की, "बीएनपीला राजकीय अडचणीत आणण्यासाठी अवामी लीग कायम अल्पसंख्याकांना पुढं करते.
 
त्यांच्या मते, " विद्यार्थी आणि सामान्य लोकांनी केलेल्या क्रांतीमुळे शेख हसीना यांना पायउतार व्हावं लागलं आणि त्यांना पळून जावं लागलं.
 
ही क्रांती मोडीत काढण्यासाठी जे मुद्दे वापरले जातात त्यामध्ये अल्पसंख्याकांचे शोषण हाही एक प्रमुख मुद्दा असतो. अवामी लीगच्या प्रचारात कायम या मुद्द्यांचा समावेश असतो."
 
बांगलादेशात अनेक हिंदू संघटना आहेत. त्यापैकी अनेक संघटनांचे एकमेकांशी मतभेद आहेत. बीबीसी बांगलासोबत बोलताना या संघटांनी एकमेकांवर प्रखर टीकादेखील केली.
 
बांगलादेश हिंदू महायुतीचे महासचिव गोविंद चंद्र प्रामाणिकपणे सांगतात की, हिंदू समुदयाचे लोक अवामी लीगचे समर्थक आहेत. त्यामुळे अवामी लीगने आम्ही आहोत म्हणून तुम्ही सुरक्षीत आहात अशी भीती घालून ठेवली आहे. आम्ही नसल्यास हिंदू टिकणारच नाहीत असे वातावरण ते निर्माण करत असतात, असंही ते म्हणाले.

Published By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह कॉमेंट्री

लोकल ट्रेनमध्ये सीटवरून वाद झाला, दुसऱ्या दिवशी अल्पवयीनने खून करून बदला घेतला

अजित पवार होणार पुढचे मुख्यमंत्री! निकालापूर्वीच पक्षाने बॅनर लावले

टोमॅटो आता महागणार नाही, लोकांना मिळणार दिलासा, सरकारने ही योजना केली

पुढील लेख
Show comments