Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इस्रायल या 4 कारणांमुळे गाझामध्ये घुसण्यास वेळ घेत आहे

Webdunia
शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (07:32 IST)
गेल्या काही दिवसांपासून आपलं पायदळ गाझामध्ये घुसणार असल्याचे संकेत इस्रायलकडून वारंवार दिले जातायत.हमासचा कायमचा नायनाट करणं हे इस्रायली लष्कराचं उद्दिष्ट आहे.
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात शेकडो इस्रायली ठार झालेत. तेव्हापासून इस्रायल गाझा शहरावर सातत्याने बॉम्बहल्ला करतोय.
 
इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकांना कामावर रुजू होण्यास सांगितलंय.
 
इस्रायल-गाझा सीमेवर मर्कावा रणगाडे, तोफखाना आणि आधुनिक शस्त्रास्त्रं घेऊन हजारो सैनिक युद्धसज्ज आहेत.
 
इस्रायलचं हवाई दल आणि नौदल अनेक दिवसांपासून गाझामधील हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादच्या लक्ष्यांवर सातत्याने बॉम्बहल्ला करतायत. या बॉम्बहल्ल्यात हजारो पॅलेस्टिनी ठार झाले असून मोठ्या संख्येने नागरिकही जखमी झालेत.
 
हमासचे काही कमांडरही इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात बळी पडले आहेत.
 
गाझामधील इस्पितळात झालेल्या स्फोटात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. या हल्ल्यावरून हमास आणि इस्रायल या दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत. मात्र रुग्णालयावरील हल्ल्याने हे संकट अधिकच गडद झालंय.
 
त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडलाय की इस्रायल गाझामध्ये का घुसत नाही?
 
या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी त्यामागची अनेक कारणं लक्षात घ्यावी लागतील.
 
1. अमेरिकेच्या 2 प्रमुख चिंता
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अचानक इस्रायलला भेट देणं म्हणजे व्हाईट हाऊस पश्चिम आशियातील बिघडलेल्या परिस्थितीबाबत विशेष चिंतेत असल्याचे द्योतक आहे.
 
अमेरिकेला दोन प्रमुख चिंता आहेत - अनियंत्रित मानवतावादी संकट आणि संपूर्ण मध्यपूर्वेत पसरलेल्या संघर्षाची भीती.
 
इस्रायलने गाझा पुन्हा ताब्यात घेण्यास अमेरिकेनं यापूर्वीच विरोध केलाय. 2005 मध्ये इस्रायलने गाझावरील नियंत्रण सोडलं होतं.
 
इस्रायलने गाझावर पुन्हा ताबा मिळवणं ही मोठी चूक असेल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटलंय.
 
बायडन मध्यपूर्वेतील त्यांच्या सर्वांत महत्त्वाच्या राजनैतिक मित्राला पाठिंबा देण्यासाठी अधिकृतपणे तेल अवीवमध्ये पोहोचले. गाझाबाबत इस्रायलचं धोरण काय आहे, याबाबत त्यांना स्पष्टपणे जाणून घ्यायचं होतं.
 
खरंतर अप्रत्यक्षपणे ते बिन्यामिन नेतान्याहू यांच्या कट्टर सरकारला थोडं दमानं घ्यायला सांगत आहेत. अमेरिकेला सविस्तरपणे माहिती हवी आहे की, जर इस्रायल पुन्हा गाझामध्ये घुसला तर तो तिथे किती काळ थांबेल आणि नेमकं काय करेल?
 
दरम्यान, जोपर्यंत एअर फोर्स वन (अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान) तेल अवीवमध्ये होतं, तोपर्यंत इस्रायल गाझामध्ये प्रवेश करण्याची कोणतीच शक्यता नव्हती.
 
बायडंन यांच्या इस्रायल दौऱ्यापेक्षा गाझाच्या रुग्णालयावरील हल्ल्याच्या मुद्द्याची अधिक चर्चा होतेय.
 
अध्यक्ष बायडन यांनी हॉस्पिटलवरील हल्ल्याबाबत इस्रायच्या म्हणण्याला जाहीरपणे दुजोरा दिलाय आणि विरोधी बाजूवर आरोप केले आहेत.
 
पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हा हल्ला इस्रायलने केलाय.
 
2. हिजबुल्लाहकडून उत्तरेतून दुसऱ्या हल्ल्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून इराण गाझावरील इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असल्याचं वारंवार सांगतोय. या धमक्यांचा नेमका अर्थ काय आहे?
 
इराण मध्यपूर्वेतील शिया कट्टरतावाद्यांना प्रशिक्षण, शस्त्रं आणि निधी पुरवतो. काही प्रमाणात इराणचंही या गटांवर नियंत्रण आहे.
 
यातील सर्वांत धोकादायक गट म्हणजे हिजबुल्लाह, जो इस्रायलच्या सीमेवर लेबनॉनमध्ये तैनात आहे.
 
2006 मध्ये हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात भयंकर युद्ध झाले होते ज्यात हिजबुल्लाने भूसुरुंगांच्या मदतीने अनेक रणगाडे उडवून दिलेले.
 
त्या युद्धानंतर इराणने हिजबुल्लाला आणखी मजबूत केलंय. एका अंदाजानुसार, हिजबुल्लाकडे दीड लाख रॉकेट आणि क्षेपणास्त्रं आहेत. यामध्ये काही लांब पल्ल्याच्या अचूक क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे.
 
इस्रायलने गाझामध्ये प्रवेश केल्यास इस्रायलच्या उत्तर सीमेवर हिजबुल्लाह नवी आघाडी उघडण्याची शक्यता आहे. दोन आघाड्यांवर लढल्याने इस्रायलच्या अडचणी वाढू शकतात.
 
पण या परिस्थितीत हिजबुल्ला युद्धासाठी उत्सुक असेल की नाही हे स्पष्ट झालेले नाही. कारण अमेरिकन नौदलाच्या दोन युद्धनौका भूमध्य समुद्रात तैनात आहेत आणि ते हिजबुल्लाला सहज लक्ष्य करू शकतात.
 
इस्रायललाही यामुळे काहीसा आत्मविश्वास मिळतोय. कारण त्याला माहिती आहे की हिजबुल्ला मैदानात उतरला तर अमेरिका त्याचा बीमोड करण्यासाठी तोफांचा प्रचंड मारा करू शकतं.
 
मात्र हेही लक्षात घ्यायला हवं की, 2006 च्या युद्धात भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या इस्रायली युद्धनौकांवरही हिजबुल्लाहची काही क्षेपणास्त्रं पडली होती.
 
3. मोठं मानवी संकट उभं राहाण्याची भीती
जगासाठी जी मानवतावादी संकटाची व्याख्या लागू आहे, ती इस्रायलसाठी विशेषतः गाझा आणि हमासच्या बाबतीत थोडी वेगळी आहे.
 
पॅलेस्टाईनमध्ये नागरिकांच्या मृत्यूची संख्या वाढत असताना 7 ऑक्टोबरच्या हमासच्या क्रूरतेऐवजी आता संपूर्ण लक्ष इस्रायलवर केंद्रीत झालंय.
 
जगभरातील देशांना गाझातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जास्त काळजी वाटतेय. आणि जेव्हा केव्हा इस्रायली सैन्य गाझामध्ये प्रवेश करेल तेव्हा मृतांची संख्या आणखी वाढेल.
 
गाझामध्ये सैन्य गेलं तर इस्रायली सैनिकही मरतील. त्यांच्यावर हल्ला केला जाईल, स्नायपर्सकडून त्यांना लक्ष्य केलं जाईल, भूसुरुंगांचा वापर केला जाईल.
 
आणि गाझामध्ये पसरलेली शेकडो किलोमीटर लांब भुयारं इस्रायलसाठी मृत्यूचे सापळे बनू शकतात. मात्र याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागणार यात शंका नाही.
 
4. इस्रायली गुप्तचर यंत्रणेचं अपयश
इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेसाठी मागचा एक महिना भयानक स्वप्नवत आहे.
 
इस्रायलची देशांतर्गत गुप्तचर संस्था 'शिन बेट'ला हमासच्या हल्ल्याची माहिती नसल्याबद्दल मोठ्या टीकेला सामोरं जावं लागतंय..
 
शिन बेटकडे गाझामध्ये गुप्तचर आणि हेरांचे नेटवर्क आहे. हे लोक हमासच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद नावाच्या गटावरही त्यांची नजर आहे.
 
असं असतानाही, 7 ऑक्टोबरला जे घडलं ते स्पष्टपणे इस्रायलच्या सर्वांत मोठ्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश म्हणावं लागेल.
 
गेल्या दहा दिवसांत इस्रायली गुप्तचर यंत्रणा याच चुकीची भरपाई करण्याचा प्रयत्न करत असावी.
 
गुप्तचर यंत्रणा गाझामध्ये अपहरण केलेल्या लोकांची नावं आणि ठिकाणांची माहिती इस्रायली लष्कराला पुरवत असावेत. याशिवाय हमासच्या कमांडर आणि ठिकाणांचीही माहिती गोळा केली जात असेल.
 
हे देखील शक्य आहे की गुप्तचर यंत्रणांनी माहिती गोळा करण्यासाठी वेळ मागितला आहे जेणेकरून पायदळ गाझामध्ये प्रवेश करेल तेव्हा त्यांच्या हाती पुरेशी माहिती उपलब्ध असेल.
 
गाझामध्ये घुसून हमासच्या जाळ्यात अडकण्याची लष्कराची इच्छा नक्कीच नसेल.
 
इस्रायली हल्ल्याच्या अपेक्षेने हमास आणि इस्लामिक जिहादने अनेक भूसुरुंग पेरले असतील. यामुळे इस्रायली सैन्याचा वेग कमी होऊ शकतो.
 
भूमिगत भुयारांमधील आव्हान पूर्णपणे वेगळं असेल.
 
गुप्तचर संस्थांना इस्रायली लष्कराला अचूक माहिती द्यावी लागेल जेणेकरून त्यांना घातपाताचे हल्ले टाळता येतील
 





















Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Mumbai Digital Arrest मुंबईतील सर्वात मोठी डिजिटल अटक, 1 महिना व्हॉट्सॲप कॉलवर ठेवले, 6 खात्यांमधून 3.8 कोटी लुटले

धक्कादायक : मुंबईत 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला

LIVE: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

जानेवारीत मिळू शकते मोठी भेट, 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार

पुढील लेख
Show comments