Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स आता 2025 पर्यंत अंतराळातच राहणार?

Webdunia
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (15:15 IST)
5 जूनला अमेरिकेच्या दोन अंतराळवीरांनी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहीमेसाठी पृथ्वीवरून झेप घेतली, तेव्हा ते आठच दिवसांत परतणं अपेक्षित होतं. पण तसं घडलं नाही. बॅरी 'बुच' विल्मोर आणि सुनीता विल्यम्स दोन महिने उलटल्यानंतरही अंतराळात आहेत आणि आता हे अंतराळवीर थेट 2025 पर्यंत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्येच अडकून राहण्याची शक्यता आहे.

61 वर्षांचे विल्मोर आणि 58 वर्षांच्या सुनीता विल्यम्स या बोईंग स्टारलायनरमधून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. या स्टारलायनरची ही पहिली मानवी सहभाग असणारी मोहीम होती. हे नवीन स्पेसक्राफ्ट - अंतराळयान कसं काम करतं, त्याचा नियमित वापर केला जाऊ शकतो का, याची चाचणी करण्यासाठीची ही मोहीम होती.
पण या मोहीमेच्या उड्डाणाच्या आधीपासूनच अडथळे येत गेले. उड्डाण पुढे ढकलण्यात आलं. आणि जेव्हा हे स्टारलायनर झेपावलं, तेव्हा त्याच्या प्रॉपल्शन सिस्टीम म्हणजे यानाला पुढे ढकलणाऱ्या यंत्रणेत गळती झाली, यान पुढे नेण्याचं काम करणारे काही थ्रस्टर्स (Thrusters) बंद पडले.
हे अंतराळवीर सुरक्षितपणे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पोहोचले खरे, पण स्टारलायर परतीसाठी सुरक्षित नसेल तर ते सुरक्षितपणे परत कसे येणार, याची चर्चा सुरू झाली.
अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण नासाने यापूर्वी दिलं होतं. अंतराळवीरांनाही स्पेस स्टेशनमधून संवाद साधत आपण विविध कामं - प्रयोगांमध्ये व्यग्र असल्याचं सांगितलं होतं.
नासाने या मोहिमेबद्दल काय नवी माहिती दिली?
यापुढे काय पावलं उचलायची याबद्दल ठोस ठरलं नसल्याचं बुधवारी 7 ऑगस्टला नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव्ह स्टिच म्हणाले, "बुच आणि सुनी यांना स्टारलायनरमधूनच परत आणण्याला आमचं प्राधान्य आहे. पण आमच्याकडे इतर पर्यायही खुले असतील यासाठीचं आवश्यक नियोजनही आम्ही केलेलं आहे."
 
या अंतराळवीरांना परत आणण्यासाठीचा पर्याय ठरू शकतं सप्टेंबर महिन्यात लाँच होणारं एक नवं मिशन. स्पेस एक्सचं क्रू ड्रॅगन क्राफ्ट (SpaceX Dragon Craft) हे अंतराळयान सप्टेंबर महिन्यात अवकाश मोहिमेसाठी झेपावेल. आधी या यानातून 4 अंतराळवीर पाठवण्याचं ठरलं होतं. पण आता मात्र या यानातल्या दोन जागा रिकाम्या ठेवण्यात येतील आणि फेब्रुवारी 2025 मध्ये परतताना हे यान बुच - विल्यम्स यांनाही घेऊन येईल, अशी शक्यता आहे.
याचा अर्थ 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेले हे अंतराळवीर 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये असतील.
आणि हे अंतराळवीर क्रू ड्रॅगनने परतणार असतील तर मग स्टारलायनर अंतराळयान कम्प्युटर कंट्रोलने कोणत्याही क्रू शिवाय पृथ्वीवर परत आणलं जाईल.
याबद्दलचा अंतिम निर्णय होण्यासाठी काही काळ लागणार असल्याचं नासाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
नासाच्या स्पेस ऑपरेशन्सचे संचालक केन बोवरसॉक्स यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, "गेल्या एक-दोन आठवड्यांतल्या घडामोडी पाहता, स्टारलायनर क्रू शिवाय परत आणलं जाण्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत. म्हणूनच परिस्थिती हाताळता यावी, यासाठी आम्ही बारकाईने सगळ्या पर्यायांचा विचार करतोय."
 
स्पेस एक्सच्या यानाद्वारे अंतराळवीरांना परतावं लागणं ही बोईंगसाठी नाचक्की असेल. गेली अनेक वर्षं या दोन कंपन्यांमध्ये अंतराळ प्रवासासाठीची स्पर्धा सुरू आहे.
 
गेल्याच आठवड्यात नासाने स्पेस एक्सचं रॉकेट वापरत या दोन अंतराळवीरांठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला अन्न, कपडे आणि गरजेच्या इतर गोष्टी पाठवल्या.
 
अंतराळवीर कसे आहेत?
आपण ठणठणीत असून स्टारलायनर यान हे अतिशय प्रभावी आहे, परतीच्या प्रवासाबद्दल आपल्याला विश्वास असल्याचं बुच आणि विल्यम्स यांनी महिन्याभरापूर्वी म्हटलं होतं.
सुनीता विल्यम्स या निवृत्त नेव्ही हेलिकॉप्टर पायलट आहेत तर बुच विल्मोर हे माजी फायटर जेट पायलट आहेत. या दोघांनीही यापूर्वी दोन अंतराळ मोहिमा केलेल्या आहेत.
 
महिन्याभरापूर्वीच्या या संवादादरम्यान सुनीता विल्यम्स म्हणाल्या होत्या, "आम्ही इथे वर पूर्णपणे बिझी आहेत. इथल्या क्रूमध्ये आम्ही मिसळून गेलो आहोत. हे घरी परतण्यासारखं आहे. असं तरंगत जाताना छान वाटतं. अंतराळात असणं आणि या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधल्या टीमसोबत काम करणं छान वाटतं. इथे आणखी एक-दोन आठवडे घालवण्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही."
या पहिल्या स्टारलायनर मिशननंतर या यानाच्या कॅप्सूलचा वापर अंतराळवीरांची स्पेस स्टेशनमधून ने-आण नियमितपणे करण्यासाठी करता येईल, अशी बोईंगला आशा होती. नासाने 2020 सालापासून या कामासाठी स्पेस एक्स क्रू ड्रॅगनच्या वापराला परवानगी दिलेली आहे.
 
बुच विल्मोर, सुनीता विल्यम्स हे दोन्ही अंतराळवीर आता अपेक्षेपेक्षा आणि सुरुवातीला ठरल्यापेक्षा बराच अधिक काळ अंतराळात घालवणार असले, तरी असेही काही इतर अंतराळवीर आहेत, ज्यांनी यापेक्षाही अधिक काळ अंतराळात घालवलेला आहे.
 
1990 च्या दशकाच्या मध्यामध्ये रशियन अंतराळवीर वॅलरी पोल्याकोव्ह हे सलग 437 दिवस अंतराळात मीर(Mir) स्पेस स्टेशनमध्ये होते.
 
गेल्याच वर्षी फ्रँक रुबिओ तब्बल 371 दिवस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये घालवून पृथ्वीवर परतले. ते सर्वाधिक काळ अंतराळात घालवणारे अमेरिकन अंतराळवीर ठरले आहेत.
 
अंतराळातल्या दीर्घ वास्तव्याचा शरीरावर काय परिणाम होतो?
अंतराळामध्ये दीर्घ काळ राहण्याचा अंतराळवीरांच्या शरीरातील स्नायू, मेंदू, डोळे यांवर परिणाम होतो.
 
अमेरिकेचे अंतराळवीर फ्रँक रुबिओ यांच्या अंतराळातल्या दीर्घ वास्तव्याचा त्यांच्या शरीरावर कसा परिणाम झाला, याचा सखोल अभ्यास करण्यात आला. व्यायामाची मोजकी साधनं वापरून अंतराळात व्यायाम करण्याचा शरीरावर कसा परिणाम होतोय, हे तपासण्यासाठीच्या प्रयोगामध्ये सहभागी झालेले ते पहिले अंतराळवीर होते.
 
पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडत चंद्रापेक्षाही दूर अंतरावरच्या अंतराळ मोहिमांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरेल. कारण मंगळावर मानवी अंतराळमोहीम काढायची झाल्यास सध्याच्या आकडेवारीनुसार मंगळावर जाऊन परत येण्यासाठी साधारण 1100 दिवस - 3 वर्षांपेक्षाही जास्त काळ लागण्याचा अंदाज आहे. मंगळावर हे अंतराळवीर ज्या यानाने जातील ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपेक्षा बरंच लहान असेल. याचा अर्थ अंतराळवीरांना व्यायाम करण्यासाठी लहान, कमी वजनाची उपकरणंच नेता येतील.
मग अंतराळात राहण्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होत असल्याचं आतापर्यंत लक्षात आलंय?
 
सगळ्यात मोठा परिणाम होतो - गुरुत्वाकर्षण नसल्याचा. गुरुत्वाकर्षाची ओढ नसल्याने हाता-पायाच्यां स्नायूंचं प्रमाण आणि हाडांची घनता कमी व्हायला लागते. ताठ उभं राहता येण्यासाठी - Posture नीट राखण्यासाठी ज्या स्नायूंची आपल्याला मदत होत असते, ते आपल्या पाठीचे, मानेचे, पोटऱ्या आणि मांडीचे स्नायू यांवर सगळ्यात जास्त परिणाम होतो. मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये या स्नायूंना कामच राहत नाही आणि ते कमकुवत व्हायला लागतात.
अंतराळातल्या दोन आठवड्यांच्या वास्तव्यानंतरच Muscle Mass अगदी 20% कमी होतं आणि दोन ते सहा महिन्यांच्या वास्तव्यामुळे ते 30% कमी होऊ शकतं.
यासोबतच शरीरातल्या सांगाड्यावर - हाडांवरही पृथ्वीसारखा कामाचा ताण नसतो. त्यामुळे हाडं ठिसूळ होऊ लागतात आणि त्यांच्यातली शक्ती कमी होते. सहा महिन्यांच्या काळात अंतराळवीरांच्या शरीरातलं 10 टक्क्यांपर्यंतचं Bone Mass कमी होतं. पृथ्वीवर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हेच प्रमाण दरवर्षी 0.5 - 1% असतं.
यामुळेच अंतराळवीरांना फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढतं आणि ते भरून येण्यासाठी जास्त काळ लागतो. पृथ्वीवर परतल्यानंतर शरीरातली हाडं पूर्णपणे पहिल्यासारखी व्हायला चार वर्षं लागू शकतात.
यासाठीच अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये असताना रोज अडीच तास व्यायाम करतात आणि चांगला आहार घेण्याचा प्रयत्न करतात.
अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने या अंतराळवीरांचा कणा प्रसरण पावतो आणि त्यांची उंची थोडीशी वाढतेही.
अंतराळामध्ये वजन कायम राखणं, हे देखील एक आव्हान असतं. अंतराळवीरांना विविध प्रकारे सकस आहार मिळेल याचा प्रयत्न नासाद्वारे करण्यात येतो. यासाठी अगदी अंतराळ स्थानकात सॅलडची पानं रूजवून उगवण्याचा प्रयोगही नुकताच करण्यात आला.
 
अंतराळात 340 दिवस राहून आलेल्या स्कॉट केली यांचं Body Mass हे त्यांच्या पृथ्वीवर असलेल्या जुळ्या भावापेक्षा 7% कमी झालं होतं.
 
पृथ्वीवर असताना गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरातलं रक्त खाली वाहतं आणि हृदय ते पुन्हा वर पाठवतं. पण अंतराळात ही प्रक्रिया बिघडते. आणि डोक्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त रक्त साठू लागतं. यातलं काही द्रव्य डोळ्याच्या मागच्या बाजूला आणि ऑप्टिक नर्व्हच्या भोवती साठून सूज येऊ शकते. यामुळे दृष्टीवर परिणाम होतो किंवा डोळ्यांच्या रचनेवर परिणाम होऊ शकतो. अंतराळात दोनच आठवडे राहिल्यानंतर हे घडायला सुरुवात होऊ शकते. पण वाढत्या कालावधीसोबत हा धोका वाढतो.
 
Galactic Cosmic Rays, ऊर्जा असणारे सौर कण यामुळेही डोळ्यांना इजा होऊ शकते. पृथ्वीवरचं वातावरण आपलं या सगळ्यापासून संरक्षण करतं. पण स्पेस स्टेशनमध्ये हे संरक्षक आवरण नसतं. अंतराळ केंद्र अंतराळवीरांचं रेडिएशनपासून संरक्षण करत असलं तरी कॉस्मिक किरण आणि सौर कणांचा डोळ्यांवर परिणाम होतोच.
 
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ट्रम्प सरकारमध्ये भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी निवड

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबत मोठी बातमी,अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं

LIVE: 5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार

5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार,PM मोदीही उपस्थित राहणार

LPG Price Hike: गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ,आजचे दर जाणून घ्या

पुढील लेख
Show comments