Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तालिबान : महिलांनी सार्वजनिक ठिकाणी गप्प राहायचं, पुरुषांची मूठभर दाढी, काय आहेत निर्बंध?

Webdunia
गुरूवार, 29 ऑगस्ट 2024 (13:24 IST)
अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीनं गेल्या आठवड्यात नवीन कायदे लागू केले आहेत. हे नवे कायदे, 'सदाचाराचा प्रसार करण्यासाठी आणि दुर्गुण नष्ट' करण्यासाठी असल्याचं तालिबान सरकारचं म्हणणं आहे.
 
या कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी मोठ्यानं बोलण्यास बंदी घातली आहे. तसंच घराबाहेर चेहरा झाकण्याचाही आदेश देण्यात आला आहे.
 
संयुक्त राष्ट्रसंघानं (UN)या निर्बंधांचा निषेध केला आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघानं या नवीन कायद्यांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
 
रविवारी (25 ऑगस्ट) संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं या नव्या कायद्यांमुळे अफगाणिस्तानच्या भविष्यासाठी अहितकारी धोरण अंमलात आणलं जाईल अशा इशारा दिला आहे.
 
अफगाणिस्तानातील नव्या कायद्यांना तालिबानचे सर्वोच्च नेते, हैबतुल्लाह अखुंदजादा यांनी मंजुरी दिली आहे.
 
अफगाणिस्तानच्या नैतिकता मंत्रालयानं देशातील कोणालाही या कायद्यांमधून वगळण्यात आलेलं नाही, असं म्हटलं आहे.
 
नव्या कायद्यांमुळे मोहतसाबीन म्हणजेच तालिबानातील नैतिकता पोलिसांना अफगाणिस्तानातील नागरिकांच्या सार्वजनिक जीवनात हस्तक्षेप करता येणार आहे.
 
त्यात अफगाणी नागरिकांनी कोणते कपडे परिधान करायचे, सार्वजनिक ठिकाणी कसं दिसायचं, नागरिकांनी काय खायचं-प्यायचं अशा विविध गोष्टींमध्ये मोहतसाबीनला हस्तक्षेप करण्याचे अधिकार मिळणार आहेत.
 
नव्या कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी महिलांचा आवाज आल्यास ते वाईट किंवा अशुभ मानलं जाणार आहे. म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी महिलांना मोठ्या आवाजात बोलता येणार नाही.
 
नव्या बंधनांमध्ये असंही म्हटलं आहे की, "एखादी महिला घराबाहेर पडेल तेव्हा तिचा आवाज, चेहरा आणि शरिरावरील ही बंधनं लागू होणार आहेत. म्हणजेच तिला मोठ्या आवाजात बोलता येणार नाही. चेहरा आणि शरीर झाकणं बंधनकारक असणार आहे."
 
शरिया कायद्यानुसार या प्रकारची नैतिक बंधनं मंत्रालयाकडून याआधीच लागू करण्यात येत होती. मंत्रालयानं पुढे म्हटलं आहे की, या नियमांचं पालन न केल्यामुळं हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
 
शरिया कायद्याचा जो अर्थ लावला आहे त्यानुसारच नवे नियम आहेत, असं तालिबानचं म्हणणं आहे. या नियमांची अंमलबजावणी तालिबान सरकारच्या नैतिकता मंत्रालयाकडून होणार आहे.
 
2022 मध्ये तालिबानच्या सर्वोच्च नेत्यानं दिलेल्या अधिकृत आदेशावर हे नियम आधारित होते. त्यांची आता अधिकृतपणे कायद्यामध्ये अंमलबजावणी होणार आहे.
 
महिलांवर कोणती बंधने?
महिलांनी संपूर्ण चेहऱ्यासह शरीर पूर्णपणे तसं झाकावं याबद्दल कायद्यात विस्तारानं सांगण्यात आलं आहे.
 
पुरुषांना महिलांबद्दल आकर्षण वाटून त्यांच्या हातून होणारं दुष्कृत्य टाळण्यासाठी किंवा पुरुषांमध्ये निर्माण होणारे दुर्गुण टाळण्यासाठी महिलांनी हे केलं पाहिजे, असं त्यात म्हटलं आहे.
 
कायद्यात समावेश असलेल्या इतर काही बाबी पुढीलप्रमाणे आहेत-
 
महिलेने तिचं संपूर्ण शरीर झाकलं पाहिजे.
पुरुषांनी आकर्षित होऊ नये यासाठी महिलांनी त्यांचा चेहरा झाकला पाहिजे.
महिलांचा आवाज हा 'अवराह' म्हणजे इतरांसाठी निषिद्ध मानला जाईल. त्यामुळं सार्वजनिक ठिकाणी महिलांचा आवाज ऐकू येता कामा नये. आवराह हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ शरीराचा असा भाग जो झाकला पाहिजे. पुरुष आणि महिलांच्या बाबतीत तो शरीराचा कोणताही भाग असू शकतो, जो सार्वजनिक ठिकाणी दिसता कामा नये.
 
महिलांनी गाणं गाऊ नये किंवा मोठ्यानं वाचन करू नये. अगदी घरातदेखील त्यांनी असं करता कामा नये.
महिलांचे कपडे पातळ, तोकडे किंवा घट्ट असता कामा नये.
जे पुरुष महिलांच्या रक्ताच्या नात्यातील किंवा विवाहामुळे नात्याचे नसतील अशा पुरुषांसमोर महिलांनी त्यांचं शरीर आणि चेहरा पूर्णपणे झाकला पाहिजे.
पुरुषांनी महिलांच्या शरीराकडे आणि चेहऱ्याकडे पाहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय वयस्क महिलांना देखील पुरुषांकडे पाहण्यास मनाई आहे.
पुरुषांवरील नवी बंधने
महिलांप्रमाणेच नव्या कायद्यात पुरुषांवर देखील काही बंधनं घालण्यात आली आहेत.
 
यापुढे अफगाण पुरुषांना घराबाहेर पडताना नाभीपासून ते गुडघ्यापर्यंतचं त्याचं शरीर झाकावं लागणार आहे. कारण पुरुषांच्या शरीराच्या या भागांना 'अवराह' मानलं जातं. पुरुषांना शरिया विरोधात असणारी केशरचना (hair style)करता येणार नाही.
 
तालिबाननं अनेक प्रांतातील न्हाव्यांवर दाढी करण्यास किंवा दाढीचे केस कापण्यास, दाढी छोटी करण्यास बंदी घातली आहे. हा आदेश शरियानुसार असल्याचं तालिबानचं म्हणणं आहे. नव्या नियमावलीनुसार दाढी मूठभर लांब (किमान हाताच्या मुठीत पूर्णपणे येईल एवढी लांब) असली पाहिजे.
 
या नैतिक कायद्यानुसार पुरुषांना टाय घालण्यास मनाई करण्यास आली आहे.
 
मोहतसाबीन (Mohtasabeen) कोण असतात?
नवीन कायदा, नियम यांची अफगाणिस्तानच्या सर्व प्रांतात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मोहतसाबीन यांची असणार आहे. कायद्याचं पालन होतं आहे की नाही यावर ते देखरेख ठेवतात आणि कायदा मोडणाऱ्यांना न्यायालयासमोर हजर करतात.
 
नवीन कायदा लागू झाल्यामुळे मोहतसाबीन यांचे अधिकार पूर्वीपेक्षा वाढणार आहेत. त्यांच्या हाती अधिक अधिकार, ताकद येणार आहे. विशेषकरून त्यांना तालिबानच्या नेत्याचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे मोहतसाबीन अधिक शक्तीशाली होणार आहेत.
 
महिलांना गप्प करणं, बोलू न देणं, घराबाहेर त्यांचा आवाज किंवा संगीत पडू न देणं या गोष्टी त्यांना आता करता येणार आहेत. जर पुरुषांनी नियमानुसार केशरचना ठेवली नाही तर पुरुषांचे केस कापण्याचे आदेश त्यांना देता येणार आहेत.
 
ज्या महिलांसोबत त्यांचा जवळचा पुरुष नातेवाईक नसेल, त्यांना टॅक्सीमध्ये बसू देण्यास किंवा अशांना टॅक्सीमध्ये नेण्यास अटकाव करण्याचा अधिकार नैतिक पोलिसांना असणार आहे. ते टॅक्सी ड्रायव्हरला असं वागण्यास भाग पाडू शकतात, असं कायद्यात म्हटलं आहे.
 
टॅक्सीतून प्रवास करताना महिलांसोबत त्यांचे वडील किंवा वयस्क भाऊ असला पाहिजे. त्याचबरोबर महिलांनी शरियानुसार हिजाब घालणं बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय त्यांना प्रवास करता येणार नाही. पुरुष आणि महिलांना कारमध्ये शेजारी शेजारी बसता येणार नाही.
 
जिवंत माणसांच्या फोटोंवर बंदी
नव्या कायद्यात म्हटलं आहे की, जिवंत व्यक्तींचे फोटो काढण्यास, ठेवण्यास किंवा प्रकाशित करण्यास मनाई आहे. पक्षी, प्राणी किंवा कुटुंबातील सदस्याचं चित्र रेखाटणं निषिद्ध मानलं जाणार आहे.
 
नव्या नियमांतर्गंत जिवंत व्यक्तींचे पुतळे विकत घेण्यास किंवा त्यांची विक्री करण्यास मनाई आहे. या कायद्यात नैतिक पोलिसांना टेप रेकॉर्डर, रेडिओ, संगीत वाजवणं यासारख्या गोष्टींचा गैरवापर रोखण्यास सांगण्यात आलं आहे. शरिया कायद्यानुसार या गोष्टी निषिद्ध किंवा हराम मानण्यात आल्या आहेत.
 
जिवंत व्यक्तींचे फोटो आणि चित्रपट पाहण्यास किंवा त्यांची निर्मिती करण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे.
 
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे खुद्द तालिबान सरकारच्या अधिकाऱ्यांची वर्तणूक मात्र नव्या नियमांच्या विसंगत आहे.
 
नव्या नियमांच्या विपरित तालिबानी अधिकारी कॅमेऱ्यासमोर आल्याचं आणि त्याचा व्हिडिओ तयार झाल्याचं समोर आलं आहे.
 
यात मंत्रालयाचे मंत्री मोहम्मद खालिद हनाफी यांचादेखील समावेश आहे.
 
कोणते निर्बंध लादले?
अफगाणिस्तानातील नव्या कायद्यात म्हटलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीनं उघडपणे निषिद्ध कृत्य केलं, तर त्या व्यक्तीला अनेक शिक्षा करण्यात येतील. यामध्ये परमेश्वरी क्रोधाबद्दल समज देणं, परमेश्वराकडून दैवी शिक्षेची भीती, दंड ते तीन दिवसांपर्यंतचा सार्वजनिक तुरुंगवास या गोष्टींचा समावेश असणार आहे.
 
अफगाणिस्तानात नवीन कायदा लागू करण्यात आल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे.
 
यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाचे अफगाणिस्तानातील सहाय्यता मिशनचे प्रमुख (UN Assistance Mission in Afghanistan)रोझा ओतुनबायेवा (Roza Otunbayeva)म्हणाले, "अफगाणिस्तानातील अनेक दशकांच्या युद्धानंतर आणि भयंकर अशा मानवतावादी संकटाच्या पार्श्वभूमीवर, अफगाण जनतेला अधिक चांगली वागणूक दिली जाण्याची आवश्यकता आहे.
 
"त्याऊलट नमाजला उशीर झाल्यास, कुटुंबाबाहेर च्या महिला किंवा पुरुषांचं एकमेकांकडे नुसतं लक्ष जरी गेलं किंवा जवळच्या, आवडत्या व्यक्तीचा फोटो जवळ बाळगल्यास धमकावणं किंवा तुरुंगात टाकणं या सारख्या गोष्टींना अफगाण लोकांना तोंड द्यावं लागतं आहे."
 
अद्याप पूर्ण अंमलबजावणी नाही
तालिबान सरकारनं अफगाणिस्तानातील नागरिकांवर हा कायदा लादला आहे. त्याला ते परमेश्वरी कायदाही म्हणतात. अधिकृतरित्या या कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून तालिबान सरकार मागे हटणार नाही.
 
मात्र, राजधानी काबुलसह अफगाणिस्तानमधील काही भागात या कायद्याची अद्याप पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही.
 
नैतिकता मंत्रालयातील एका सूत्रानं बीबीसी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, नवीन कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसंदर्भात आराखडा तयार करण्यासाठी ते काम करत आहेत.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आराखडा तयार झाल्यानंतर, नव्या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात अधिक स्पष्टता येईल.
 
मात्र नव्या कायद्यातील बहुतांश कलमांची अंमलबजावणी अफगाणिस्तानच्या उर्वरित भागात आधीच करण्यात येत आहे.
 
नैतिकता मंत्रालय ही अफगाणिस्तानातील सर्वात सक्रिय सरकारी यंत्रणांपैकी एक आहे.
 
या मंत्रालयानं म्हटलं आहे की, गेल्या वर्षभरात नैतिक पोलिसांनी शरिया कायद्याचं पालन न करण्याबद्दल 13,000 पेक्षा जास्त लोकांना तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतलं आहे.

Published By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

भाजपच्या विजयानंतर मराठ्यांवर हल्ले वाढले संजय राऊतांचा दावा

LIVE: भाजपच्या विजयानंतर मराठी भाषिकांवर हल्ले वाढले संजय राऊत

भारत जोडो यात्रेबाबत फडणवीसांचे आरोप केंद्र सरकारचे अपयश दर्शवणारे आहे आदित्य ठाकरे यांचे विधान

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments