Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'क्लिक हिअर' ची भानगड काय आहे? एक्सवरचा 'हा' ट्रेंड महत्त्वाचा का आहे?

Webdunia
रविवार, 31 मार्च 2024 (15:04 IST)
शनिवारी (30 मार्च) संध्याकाळी सध्याच्या एक्स आणि आधीच्या ट्विटरवर एक फोटो व्हायरल होऊ लागला. तुम्ही हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असाल तर नक्कीच हा फोटो बघितला असेल.
 
या फोटोत पांढऱ्या बॅकग्राउंडवर 'Click Here' (क्लिक हिअर) असा मजकूर लिहिलेला आहे आणि त्यावर एक बाण दाखवण्यात आलाय. फोटोच्या खालच्या डाव्या कोपऱ्यात ALT असं लिहिलेलं आहे. या ऑल्टवर क्लिक केलं की काहीतरी मजकूर वाचायला मिळतो.
अनेकांना ऑल्टवर क्लिक करायचं असतं हे माहिती नसल्यामुळे फक्त क्लिक हिअर लिहिलेला फोटो दिसत राहतो आणि ही नेमकी काय भानगड आहे तेच कळत नाही.
 
देशातले मोठमोठे राजकीय पक्ष, नेते, अभिनेते, सोशल मीडियास्टार्स यांनी एक्सवर हा फोटो वापरून पोस्ट केल्या. जगभरात अनेक फुटबॉलचे संघ आणि इतर कॉर्पोरेट कंपन्यांनीही हा फोटो पोस्ट करून या ट्रेंडच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केलाय.
 
काय आहे ऑल्ट टेक्स्ट?
तर आल्ट म्हणजे आल्ट टेक्स्ट. इंटरनेटवर एखाद्या फोटोमध्ये नेमकं काय दाखवलं आहे याचं शब्दात केलेलं वर्णन. ज्या व्यक्तींना नीट दिसत नाही, अशांनाही इंटरनेटचा वापर सुलभपणे करता यावा यासाठीचं हे एक फिचर आहे. अशा व्यक्तींना ब्राऊझरमध्ये लिहिलेला मजकूर कंप्युटर किंवा फोन वाचून दाखवू शकतो. पण फोटो कसा वाचणार? यासाठीच फोटोचं वर्णन म्हणजे अल्टरनेट टेक्स्ट जे शॉर्ट फॉर्ममध्ये आल्ट टेक्स्ट म्हणून ओळखलं जातं.
 
खरंतर एक्सने 2016 मध्ये हे फिचर सुरू केलं होतं. कोणताही फोटो एक्सवर पोस्ट करत असताना त्या फोटोत नेमकं काय आहे हे सांगता यावं यासाठी ALT ची सुविधा देण्यात आलीय.
 
ALT हे Alternative Text (अल्टर्नेटिव्ह टेक्स्ट) या इंग्रजी शब्दांचं संक्षिप्त स्वरूप आहे. यासाठी 1000 कॅरेक्टर्सची मर्यादा घालून देण्यात आलेली असून याचा वापर करून तुमच्या पोस्टचा आकार न वाढवता फोटोचं व्यवस्थित वर्णन करता येतं.नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेनं अशा प्रकारे आल्ट टेक्स्ट मध्ये केलेली फोटोंची वर्णनं अनेकदा चर्चेत असतात. त्यात फोटोमध्ये नेमकं काय आहे, कोणत्या व्यक्ती आहेत, त्या फोटोत काय परिस्थिती दिसते आहे अशा गोष्टींचं वर्णन केलेलं असतं, ज्यामुळे अंध व्यक्तींनाही तो फोटो काय दर्शवतो याचा अंदाज लावणं शक्य होतं. तज्ज्ञांच्या मते केवळ अंध व्यक्तीच नाही तर ज्या भागात इंटरनेटचा वेग कमी असल्यानं फोटो लोड होत नाहीत तिथेही ऑल्ट टेक्स्ट उपयोगी ठरतो.
 
ऑल्ट टेक्स्ट कसा वापरतात?
एक्सवर फोटो पोस्ट करत असताना ऑल्ट टेक्स्ट देता येतो. व्हीडिओसाठी ही सुविधा सध्यातरी उपलब्ध नाहीये.
 
एक्सवर फोटो अपलोड करत असताना तिथे +ALT चा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केलं की तुम्ही तुमच्या फोटोच्या संदर्भातला कोणताही मजकूर तिथे प्रविष्ट करू शकता. त्यानंतर हा मजकूर तुमच्या फोटोसोबत जोडला जाईल.
हा फोटो पोस्ट केल्यानंतर जर वापरकर्त्याने ALT या शब्दावर क्लिक केलं तरच त्याला तो मजकूर किंवा संदेश वाचता येईल.
 
तज्ज्ञांच्या मते ज्या भागात इंटरनेटचा वेग कमी असतो तिथे ऑल्ट टेक्स्ट उपयोगी ठरतो.
राजकीय पक्षांनीही वापरला 'क्लिक हिअर' चा ट्रेंड
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षदेखील सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. त्यामुळे इंटरनेटवर चालणाऱ्या ट्रेंड्सचा फायदा घेण्यासाठी सगळ्याच पक्षांच्या सोशल मीडिया टीम्स काम करतायत. 'क्लिक हिअर'चा ट्रेंडही त्यांनी सोडला नाही.
 
जवळपास सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांनी क्लिक हिअरचा फोटो पोस्ट केला आणि त्यातून प्रचाराचा संदेश नेटकऱ्यांपर्यंत पोहोचवला.
 
म्हणजे भाजपने पोस्ट केलेल्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं की तिथे लिहिलं होतं "फिर एक बार मोदी सरकार(पुन्हा एकदा मोदी सरकार)".
आम आदमी पक्षाच्या 'क्लिक हिअर' क्लिक केलं तर तिथे लिहिलं होतं "देश बचाने के लिए 31 मार्च को रामलीला मैदान में आएं (देश वाचवण्यासाठी 31 मार्चला रामलीला मैदानात या)."
दिल्लीच्या रामलीला मैदानात 31 मार्चला इंडिया आघाडीचं आंदोलन आहे. या आंदोलनात महागाई, बेरोजगारी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या अटकेविरोधात प्रश्न विचारले जाणार आहेत.
 
माहिती तंत्रज्ञानाची माहिती असणाऱ्यांना हा ट्रेंड वापरून स्वतःच्या किंवा पक्षाच्या अकाउंटची पोहोच वाढवता आली पण काही नेत्यांना ही भानगड नेमकी काय आहे तेच समजलं नाही.
 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी याबाबत ही पोस्ट केली.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, महाराष्ट्रातले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा बऱ्याच नेत्यांनी क्लिक हिअरचा वापर करून एक्सवर फोटो शेअर केले.
 
तुमच्यासाठी हा विनोद असला तरी आमच्यासाठी तो जगण्याचा भाग आहे
अनेकांना हा ट्रेंड मजेशीर वाटत असला तरी 'क्लिक हिअर' ट्रेंड होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. मे २०२३ मध्येही जगभरात हाच ट्रेंड पाहायला मिळाला होता. त्यावेळी बीबीसीने ऑल्ट टेक्स्ट का महत्त्वाचा आहे हे काही अंध व्यक्तींना विचारलं होतं.
 
कॉनर स्कॉट-गार्डनर हे त्यापैकीच एक होते. त्यांचं असं म्हणणं होतं की ऑल्ट टेक्स्ट त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे कारण, कोणत्याही ऑनलाईन माध्यमांवर ज्या गोष्टी किंवा माहिती पोस्ट केली जाते त्यात बहुतांश वेळा फोटो वापरलेले असतात. अनेकदा त्या फोटोमध्ये नेमकं काय आहे हे कळल्याशिवाय पुढे जात येत नाही आणि त्यावेळी अंध व्यक्तींना या ऑल्ट टेक्स्टची खूपच मदत होते.

कॉनर यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "इंस्टाग्रामसारखी समाजमाध्यमं ही प्रामुख्याने फोटोचा वापर करतात. बऱ्याचवेळा अनेक गमतीशीर गोष्टीही मिम्स किंवा इतर फोटोचा वापर करून पोस्ट केल्या जातात. ऑल्ट टेक्स्टमुळे या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतात. ज्यांना डोळे आहेत किंवा जे बघू शकतात अशा व्यक्तींना इंटरनेटचा उपयोग जसा होतो अगदी तसाच उपयोग मलाही करता येतो."
 
त्यामुळे 30 वर्षांच्या कॉनर यांना असं वाटतं की इतरांसाठी ही केवळ गमतीची बाब असली तरी ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी हा विनोद नाहीये. ऑल्ट टेक्स्ट हा त्यांच्या जगण्याचा भाग आहे.

Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

Lal Bahadur Shastri Death Anniversary:लाल बहादुर शास्त्री पुण्यतिथी

Ram Mandir 2025 Anniversary Wishes अयोध्यात श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा संदेश मराठी

रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

सततच्या विमान अपघातांमुळे नागपूर विमानतळ झाले सतर्क, पक्षी आणि पाळीव प्राण्यांना प्रवेश बंदी!

LIVE: मुंबईतील जुहू परिसरात चार बांगलादेशी नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments