Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोण आहेत पावेल ड्युरोव्ह? त्यांच्या अटकेनंतर भारतात टेलिग्राम बंदीची शक्यता का व्यक्त केली जातेय?

Webdunia
बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (13:25 IST)
टेलिग्राम या सोशल मीडिया मेसेजिंग अ‍ॅपचे सीईओ पावेल ड्युरोव्ह यांना शनिवारी (24 ऑगस्ट) फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी कृत्ये केली जात असल्याचा आरोप असून त्यासंदर्भातील चौकशीसाठी त्यांना ही अटक झालीये.

या सगळ्या घडामोडींनंतर भारतातही टेलिग्रामवर बंदी लादली जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचं 'मनीकंट्रोल'ने आपल्या बातमीत म्हटलंय. 'मनीकंट्रोल'ने आपल्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, खंडणी आणि जुगार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांसाठी कथितपणे टेलिग्रामचा वापर केला जात असल्याच्या टीकेनंतर भारतीय तपास यंत्रणांकडून टेलिग्रामचा तपास केला जात आहे.
 
या तपासातील शोधांच्या आधारे टेलिग्रामवर बंदी लादली जाण्याची शक्यताही सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भारतात अलीकडेच घडलेल्या पेपरफुटीच्या घटना, चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि खंडणीच्या घटनांसाठी टेलिग्रामचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे, अशा गुन्हेगारी कृत्यांसाठी सर्रास वापरण्यात येणारे टेलिग्राम आता बंद होईल का, अशी चर्चा सुरू झाली आहे. अटकेनंतर टेलिग्रामचे संस्थापक पावेल ड्युरोव्ह यांची फ्रान्सच्या नॅशनल सायबर क्राईम युनिट आणि नॅशनल फ्रॉड ऑफिसकडून चौकशी केली जात असल्याची माहिती फ्रेंच पोलिसांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे.
मात्र, या अ‍ॅपचा गैरवापर केला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मला अथवा त्याच्या मालकाला जबाबदार ठरवणं हे फारच हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया टेलिग्रामने आपल्या निवेदनातून दिली आहे.
 
कोण आहेत पावेल ड्युरोव्ह?
39 वर्षीय पावेल ड्युरोव्ह हे मूळचे रशियन असून ते अब्जाधीश आहेत. त्यांनी रशियामध्ये लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप असलेल्या 'व्ही कंताक्ते' (व्हीके) ची स्थापनाही केली आहे.
रशियन सरकारने 'व्हीके' या प्लॅटफॉर्मवरील विरोधकांची खाती बंद करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. ही बंदी झुगारल्यानंतर 2014 मध्ये त्यांना रशिया सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

रशिया सोडण्याच्या एक वर्ष आधी म्हणजेच 2013 मध्ये त्यांनी टेलिग्राम या प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती.
सध्या ते दुबईमध्येच राहत असून या कंपनीचे कामकाजही तिथूनच चालवले जाते. त्यांच्याकडे यूएई आणि फ्रान्सचे नागरिकत्व आहे.
मात्र, रशिया त्यांना आजही आपल्या देशाचा नागरिक मानतं. ड्युरोव्ह युरोपमध्ये सातत्याने प्रवास करतात, असे टेलिग्रामने म्हटलंय.
 
त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन सत्ताधाऱ्यांकडून विशिष्ट प्रकारचा मजकूर काढून टाकण्याच्या मागण्या झाल्या तर ते झिडकारून लावतील, असे पावेल ड्युरोव्ह यांनी अमेरिकेतील माध्यमकर्मी टकर कार्लसन यांना एप्रिलमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते.
 
ते म्हणाले होते की, "जिथे जिथे आम्हाला असं वाटेल की, आता मर्यादा पार होतेय म्हणजेच ही बाब आमच्या मूल्यांशी फारकत घेणारी आहे वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकांच्या गोपनीयतेचा भंग करणारी आहे, तिथे तिथे आम्ही त्यांना दुर्लक्ष करू."
 
टेलिग्राम काय आहे?
फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, आयमेसेज आणि वुईचॅट यांच्या प्रमाणेच टेलिग्राम हेदेखील जगभरात प्रसिद्ध असलेले मोठे मेसेजिंग अ‍ॅप आहे. गेल्या जुलै महिन्यामध्ये पावेल ड्युरोव्ह यांनी असा दावा केला होता की, टेलिग्रामने महिन्याला 950 दशलक्ष सक्रिय युजर्सचा टप्पा पार केला आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये हे अ‍ॅप लोकप्रिय असून इराण आणि हाँग-काँगमधील लोकशाही-समर्थक गटांकडूनही त्याचा वापर केला जातो.
 
टेलिग्राममध्ये 'इनक्रिप्शन'ची सुविधा आहे. याचा अर्थ या अ‍ॅपचा मेसेज ज्या डिव्हाईसवरुन पाठवण्यात आले आहेत त्या आणि ज्या डिव्हाईसला पाठवण्यात आले आहेत त्याच युजर्सना वाचता येतात. मात्र, ही सेटिंग 'डिफॉल्ट' नाही म्हणजेच यामध्ये बदल करता येऊ शकतात.

टेलिग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या तत्सम मेसेजिंग अ‍ॅप्लीकेशनमधील मुख्य फरक म्हणजे 'ग्रुप'च्या आकारातील तफावत होय. टेलिग्रामवरील ग्रुपच्या सदस्यसंख्येची मर्यादा इतर मेसेजींग अ‍ॅप्लीकेशनच्या तुलनेत अवाढव्य आहे. एकीकडे व्हॉट्सअपमध्ये एकावेळी एका ग्रुपमध्ये 1 हजार सदस्य असू शकतात तर दुसरीकडे टेलिग्रामवर ही मर्यादा 2 लाखांपर्यंत आहे. त्यामुळेच, प्रचंड सदस्यसंख्या असलेल्या या ग्रुप्समधूनच दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याची टीका टेलिग्रामवर वारंवार होते.
 
दुसऱ्या बाजूला पावेल ड्युरोव्ह यांच्या अटकेनंतर टेलिग्रामने म्हटलंय की, टेलिग्रामवरील बेकायदा मजकुराची छाननी करण्याची क्षमता ही या क्षेत्रातील मानकांची पूर्तता करणारी असून त्यामध्ये सातत्याने सुधारणा केली जात आहे. टेलिग्राम सुरक्षित आणि जबाबदार ऑनलाईन वातावरण प्रदान करण्यासाठी लागू असलेल्या डिजीटल सर्व्हीस अ‍ॅक्टसहित युरोपियन युनियनच्या सर्व कायद्यांना धरुनच काम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
पुढे टेलिग्रामने म्हटलंय की, "संवाद आणि अत्यावश्यक माहितीच्या आदान-प्रदानासाठी जगभरातील जवळपास एक अब्ज लोक टेलिग्रामचा वापर करतात. सद्यपरिस्थितीतून ठोस उपाय काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून टेलिग्राम तुम्हा सर्वांबरोबर आहे."
 
टेलिग्रामवरील वादग्रस्त फीचर्स कोणते?
टेलिग्रामची धाटणी बऱ्यापैकी इतर मेसेजींग अ‍ॅप्लीकेशनसारखीच असली तरीही काही सुविधांमुळे ते इतरांपासून फारच वेगळे ठरते.सध्या याच कारणास्ताव ते वादातही अडकले आहे. टेलिग्रामचे संस्थापक आपल्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वोच्च असल्याचे म्हणतात.

या प्लॅटफॉर्मवरुन लोक सहजपणे एकमेकांशी संवाद साधू शकतात, एखाद्या आंदोलनाचे नियोजन करु शकतात आणि विशेष म्हणजे ते आपली ओळख लपवून या सगळ्या कृती करु शकतात.
दुसऱ्या बाजूला टेलिग्रामवरील युझर्स आणि त्यांच्याकडून प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकूरावरील छाननीही फार कठोरपणे केली जात नाही. तसेच, या अ‍ॅप्लीकेशनवरील काही फीचर्स असे आहेत जे कायद्याच्या कक्षेत आणून त्यावरील युझर्सचा आणि मजकूराचा तपास करणे अत्यंत अवघड जाते.

टेलिग्रामवर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर गोपनिय ठेवू शकता तसेच सीम कार्ड नसतानाही साइन अप करु शकता. युझर्सना टेलिग्रामवरील ग्रुप्स आणि चॅनेल्सवरील इतर सदस्यांचे मोबाइल नंबर्स दिसू शकत नाहीत.
 
टेलिग्रामवरील युझर्स त्यांच्या चॅट्ससाठी ऑटो-डिलीट या फीचरचाही वापर करु शकतात. तसेच पाठवलेले आणि प्राप्त झालेले असे दोन्हीकडचेही मेसेजेस युझर्सना डिलीट करता येऊ शकतात. आपल्याकडचे मेसेजींग अधिक सुरक्षित असून व्हॉट्सअपपेक्षाही अधिक चांगली 'इन्क्रीप्शन' सुविधा असल्याचा टेलिग्रामचा दावा आहे.
टेलिग्राम लोकप्रिय असण्यामागचे सर्वांत लोकप्रिय कारण म्हणजे अवाढव्य ग्रुप्स तयार करण्याची सुविधा होय. ही सुविधा टेलिग्रामचे शक्तिस्थान असले तरीही तीच वादग्रस्त बाजूही आहे.

एकीकडे व्हॉट्सअपसारखे मेसेजींग अ‍ॅप्लीकेशन्स, फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या प्रसारणाला आळा घालण्यासाठी सदस्यसंख्येवर मर्यादा आणत आहे तर दुसरीकडे टेलिग्रामवर ही सुविधा जशीच्या तशी असल्याने टेलिग्रामवरुन फेक न्यूजचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो, असे टीकाकारांचे म्हणणे आहे.
टेलिग्राम अ‍ॅप्लीकेशनवरुन मोठ्या प्रमाणावर कट-कारस्थानांची चर्चा, नव-नाझी विचार, बाल-लैंगिक शोषण आणि अतिरेकी विचारांच्या मजकूराचा प्रसार होत असल्याचे टीकाकारांचे म्हणणं आहे.
 
विशेष म्हणजे टेलिग्रामची इतर मेसेजींग अ‍ॅप्लीकेशनच्या तुलनेत अतिरेकी आणि बेकायदा मजकूराची छाननी अथवा तपासणी करण्याची क्षमता कमकुवत असल्याचं सायबर-सिक्योरिटी तज्ज्ञांचं मत आहे.
 
उदाहरणार्थ, युकेमधील अनेक शहरांमध्ये नुकताच मोठा हिंसाचार पहायला मिळाला होता. या हिंसाचारानंतरही टेलिग्राम वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. टेलिग्रामवर अति-उजव्या विचारसरणीचे ग्रुप्स आणि चॅनेल्स असून त्या माध्यमातूनच या हिंसाचाराला चिथावणी देण्यात आली असल्याचा आरोप झाला होता.टीकाकारांच्या मते, एक्स अथवा फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर बंदी असलेला मजकूर सहजगत्या टेलिग्रामवर पाठवला अथवा स्वीकारला जाऊ शकतो.
 
या अ‍ॅप्लीकेशनच्या ढिसाळ छाननीमुळेच बेकायदा मजकूराचा प्रसार सहज शक्य होतोय. दुसऱ्या बाजूला, टेलिग्रामवर मोठ्या आकाराच्या फाइल्सही अगदी सहजपणे शेअर केल्या जाऊ शकतात. तसेच बाहेरील लिंक्स आणि बॉट्सचा वापरही या अ‍ॅप्लीकेशनवर केला जाऊ शकतो.
जाहिरात, विक्री, सबस्क्रीप्शन्स आणि इतर अनेक माध्यमातून या प्लॅटफॉर्मला महसूल प्राप्त होतो.
(मूळ बातमी ग्रॅहम फ्रेजर आणि बीबीसी उर्दू तसेच इतर अपडेटसह)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

CNG Price Hike in Mumbai : मतदान संपताच मुंबईत CNG महाग,जाणून घ्या नवीन किंमत

LIVE: मतदान संपताच मुंबईत CNG महाग,जाणून घ्या नवीन किंमत

भारतीय नौदलाला मासेमारी जहाजाची धडक

Sukma: सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 10 नक्षलवादी ठार

सांगली जिल्ह्यात कंपनीत गॅस गळतीमुळे 3 जणांचा मृत्यू, 9 जखमी

पुढील लेख
Show comments