लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे संबंधीत उमेदवारांकडून मागविण्यात येणार असून तक्रारींचे स्वरुप पाहून कारवाई केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली. राज्यातील दुष्काळ, लोकसभा निवडणुकीचा आढावा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी टिळक भवन येथे प्रमुख काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिलेले राधाकृष्ण विखे वगळता माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, माणिकराव ठाकरे, नसिम खान, विजय वडेट्टीवार, काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी सोनल पटेल आदी नेते उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या पदावर आता कोणाची पक्ष निवड करणार असे विचारले असता चव्हाण म्हणाले, लोकसभेचे निकाल लागल्यानंतर लगेचच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होईल. त्यात निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.