Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामदेव बाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, IMAचं पंतप्रधानांना पत्र

Webdunia
बुधवार, 26 मे 2021 (21:27 IST)
रामदेव लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत कारवाई करा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
 
त्यामुळे आता रामदेव आणि डॉक्टरांमधील वाद अधिकच चिघळत चाललाय. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. ए. जयालाल म्हणतात, "लशीचे दोन डोस घेऊनही डॉक्टरांचा मृत्यू झाला असं खोटं सांगितलं जातंय. लसीकरण मोहीम जाणूनबूजून रोखण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचू न देण्याचा हा प्रयत्न आहे. हे तात्काळ थांबवलं पाहिजे."
 
रामदेव यांचा सोशल मीडियात एक व्हीडिओ व्हायरल झालाय. ज्यात त्यांनी लस घेतल्यानंतरही डॉक्टरांचा मृत्यू झाला. एवढंच नाही, तर अलोपॅथी औषधामुळे देशभरात लाखो लोक मृत्यूमुखी पडले असं वक्तव्य केलं होतं. त्यावर डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केलीये.
 
डॅाक्टर कोव्हिड विरोधात लढत असताना रामदेव खोटी विधानं करून अफवा पसरवत आहेत. यामुळे सामान्यांच्या मनात लशीबाबत चुकीचे प्रश्न निर्माण होत आहेत.
 
इंडियन मेडिकल असोसिएशनचे मानद सचिव डॉ. जयेश लेले म्हणतात, "आमच्यामते हे प्रकरण देशद्रोहाचं आहे. अशी वक्तव्य करणाऱ्यांवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. "
 
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रामदेव अशी वक्तव्य करून आरोग्य मंत्रालयाला आव्हान देत आहेत.
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 753 आणि दुसऱ्या लाटेत 513 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती IMA ने पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात दिली आहे.
 
रामदेव यांची माणसं कोरोनावर एम्समध्ये उपचार का घेतात मग?
"रामदेव MBBS, BAMS डॉक्टर नाहीत. ते योगगुरू आहेत. ते कोण आहेत प्रश्न विचारणारे? ज्यांची उत्तरं आम्ही परिक्षेसारखी द्यायची? ते काय परिक्षक आहेत का?" हे सवाल आहेत डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) मानद सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांचे.
 
बीबीसी प्रतिनिधी मयांक भागवत यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी रामदेव यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
"आम्ही सर्व प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीने उत्तरं लोकांना देऊ," असं डॉ. लेले म्हणालेत.
 
'अॅलोपॅथी मुर्खांचं शास्त्र' आहे असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं होतं. यावरून वाद सुरू झाला. डॉक्टरांनी रामदेव यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, रामदेव यांना नोटीस बजावली होती.
रामदेव आणि डॉक्टरांमधील वाद शांत करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी त्यांना वक्तव्य मागे घ्यावं अशी सूचना केली होती. आता, पुढे जात रामदेव यांनी डॉक्टरांना 25 प्रश्न विचारल्यामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची चिन्ह दिसून येत आहेत.
 
वाद कसा सुरू झाला?
शनिवारी (22 मे) रामदेव यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला. ज्यात त्यांनी 'अॅलोपॅथी मुर्खांचं शास्त्र' आहे. अॅलोपॅथीमुळे रुग्णांचा मृत्यू झाला, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
डॉक्टरांनी यावर आपेक्ष घेत रामदेव यांनी वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी केली. IMA चे डॉ. जयेश लेले म्हणतात, "रामदेव यांच्या वक्तव्यामुळे देशभरातील आठ लाख डॉक्टरांचं मनोबल खच्ची झालंय."
 
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, कोरोना महामारी सुरू असताना, लोकांना चुकीची माहिती देणारं विधान केलं तर हा अजामीनपात्र गुन्हा ठरतो. "खरंतर, सरकारने रामदेवांवर कारवाई करायला हवी होती. पण, सरकारने कारावाई न केल्याने आम्ही कायदेशीर नोटीस बजावली."
 
'रामदेव यांनी माफी मागितली नाही'
 
रामदेव यांच्या वक्तव्यावर देशभरातील डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव यांना "तुम्ही कोरोना योद्ध्यांचा अनादर केलात. अॅलोपॅथीमुळे रुग्णांचा मृत्यू झाला हे तुमचं वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे," असं सूनावलं.
 
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर रामदेव यांनी रविवारी आपलं वक्तव्य मागे घेतल्याचं जाहीर केलं.
 
डॉ. लेले पुढे म्हणतात, "रामदेव यांनी माफी मागितली नाही. थातूरमातूर उत्तर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या वक्तव्यावर समाधानी नाही. काही झालं तरी "तंगडी उपर" असं ते वागतात."
 
रामदेव यांच्यावर डॉक्टरांनी गुन्हा दाखल केलाय. कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून रामदेव यांच्यावर पुढील कारवाई करण्याचा विचार सुरू आहे.
 
'रामदेव यांचं शिक्षण काय?'
रामदेव यांच्या एका वक्तव्याने या वादात आणखी तेल ओतलं गेलं. रामदेव यांनी लस घेऊनही 1000 डॉक्टरांचा मृत्यू झाला. डॉक्टर स्वत:लाच वाचवू शकले नाहीत, असं ते एका धार्मिक वाहिनीच्या कार्यक्रमात म्हणाले.
त्यावर डॉ. जयेश लेले प्रश्न विचारताना म्हणतात, "रामदेव यांचं शिक्षण काय? ते डॉक्टर नाहीत. मग, निष्णात डॉक्टर, जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला प्रश्न कसे विचारू शकतात? योग शिकल्याने आणि शिकवल्याने कोणी डॉक्टर होत नाही."
 
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 400 च्यावर डॉक्टरांचा मृत्यू झालाय. तर, पहिल्या लाटेत 700 च्या वर डॉक्टरांनी प्राण गमावले आहेत.
 
"रामदेव खोटं बोलतात. त्यांच्या पोकळ विधानात काही अर्थ नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे डॉक्टर बदनाम होत आहे," असं लेले पुढे म्हणाले.
 
'तुम्ही सुरू करा कोव्हिड रुग्णालयं'
रामदेव यांनी अॅलोपॅथीला मुर्खांचं सायन्स म्हणतच अनेक रुग्णांवर उपचार केला असल्याचा दावा केलाय. या दाव्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
डॉ. जयेश लेले सांगतात, "रामदेव दावा करतात की त्यांनी एक कोटी रुग्णांवर उपचार केले. मग त्यांनी हा डेटा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये छापावा. कोव्हिडची रुग्णालयं सुरू करावीत. आपल्याकडे रुग्णालयं कमी आहेत."
 
हॉस्पिटल सुरू करण्यासाठी ते पुढे का आले नाहीत? त्यांची स्वतःची माणसं एम्समध्ये उपचार घेतात. मग, त्यांच्यावर उपचार का केले नाहीत, असा सवालही डॉक्टरांनी उपस्थित केलाय.
 
रामदेव यांच्या 25 प्रश्नांना IMA उत्तर देणार?
रामदेव यांनी डॉक्टर आणि औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांना 25 प्रश्न विचारले आहेत. याची उत्तरं देणार का? यावर डॉ. जयेश लेले सांगतात, "रामदेव बाबांना आजार आणि डिफोर्मिटी याच्यातील फरक कळत नाही."
"तरी, आम्ही बाबा रामदेव यांच्या सर्व प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं देणार आहोत. एक-दोन वाक्यात देणार नाही. आम्ही त्यांचं आव्हान मान्य केलंय."
 
डॉक्टरांच्या टीमला या प्रश्नांची उत्तरं बनवण्यासाठी सांगण्यात आलंय. त्यानंतर योग्यवेळी उत्तर दिलं जाईल असं डॉ. लेले म्हणाले.
 
कोरोनिलला मान्यता नाही?
बाबा रामदेव यांनी काही महिन्यांपूर्वी कोरोनावर "कोरोनिल" औषध तयार केल्याचा दावा केला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी औषधाचं लोकार्पण केलं होतं.
 
डॉ. जयेश लेले सांगतात, "रामदेव बाबांच्या कोरोनिलला औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली नाही."
 
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोनिलचं लोकार्पण केल्यानंतर विरोध दर्शवला होता.
 
पण, MBBS डॉक्टर आयुर्वेदला सूडो-सायन्स म्हणतात, या रामदेव यांच्या आरोपावर तुमचं म्हणणं काय? यावर डॉ. लेले म्हणतात, आयुर्वेदाबाबत आम्ही चुकीचं बोललो तर, त्यांनी नोटीस पाठवायला होती.
 
"औषधं विकली जात नाहीत म्हणून हे वक्तव्य केल्याचा," आरोप त्यांनी केलाय.
 
'रामदेव यांना सरकारचा पाठिंबा'
 
डॉ. लेले पुढे सांगतात, "रामदेव बाबांना सरकारचा पाठिंबा आहे. राजकीय पाठिंबा फार महत्त्वाचा आहे. ज्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी वक्तव्य मागे घ्या अशी सूचना केली. त्यावेळी त्यांनी आपलं वक्तव्य बदललं."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

तुमचे सिम बंद झाले आहे… कॉल आला, OTP सांगितला आणि साडेचार लाख गमावले

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरांना मंजुरी दिली, मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

LIVE: राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments