Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकसभा निवडणूक 2024ः महायुतीचं जागावाटप का रखडलंय? 'या' 4 मतदारसंघांवरुन सुरू आहे रस्सीखेच

Webdunia
बुधवार, 6 मार्च 2024 (10:52 IST)
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीत भाजपच्या महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये.
 
महाराष्ट्रात सध्यस्थितीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. महायुतीतल्या या पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाहीये.
 
अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व आहे.
 
या दौऱ्यात अमित शहा राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे.
 
सोबतच महायुतीत लोकसभेच्या ज्या जागांवरुन रस्सीखेच सुरू आहे, त्या जागांवरही शहांच्या दौऱ्यानंतर तोडगा निघेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
 
या बातमीत आपण, महायुतीमधील लोकसभा मतदारसंघांचं जागावाटप नेमकं कशामुळे रखडलंय?
 
यासोबतच असे कोणते मतदारसंघ आहेत, ज्यावरुन महायुतीत रस्सीखेच सुरू आहे? त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
 
सुरुवातीला महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचं आणि महायुतीकडून मागणी केल्या जाणाऱ्या जागांचं गणित समजून घेऊया.
 
जागांचं गणित
महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण 48 मतदारसंघ आहेत. 2019 च्या निवडणुकीत या 48 मतदारसंघांपैकी 23 जागांवर भाजप, 18 जागांवर शिवसेना आणि 4 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता.
 
उर्वरित तीनपैकी एका जागेवर काँग्रेसचा, एका जागेवर एआयएमआयएमचा आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता.
 
त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आणि दोन्ही पक्षांचे दोन-दोन गट पडले.
 
मूळ शिवसेनेच्या निवडून आलेल्या 18 खासदारांपैकी 13 खासदार एकनाथ शिंदेंच्या बाजूनं गेले. तर मूळ राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या 5 खासदारांपैकी 1 खासदार अजित पवारांच्या बाजूनं गेले.
 
आता 2024 च्या निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना 22 जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे.
 
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "2019 मध्ये शिवसेनेला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या, तेवढ्याचा जागा 2024 मध्ये मिळायला हव्यात. पक्षानं 22 मतदारसंघांचा आढावा घेतला आणि त्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंना देण्यात आली आहे."
 
असं असलं तरी, ही मागणी म्हणजे एकनाथ शिंदे गटाचं दबावतंत्र असून या माध्यमातून अधिकाअधिक जागा मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न असू शकतो, असं बोललं जात आहे.
 
दुसरीकडे, अजित पवार यांच्या गटाकडूनही काही जागांसाठी आग्रह धरला जात आहे. बारामतीसह 12 जागांवर अजित पवार गटाकडून दावा सांगितल्याच्या बातम्या आहेत.
 
अशास्थितीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं समाधान होईल अशाप्रकारे जागावाटप करणं आणि त्यातून राजकीय उद्दिष्टही साधता येईल हे बघणं भाजपसमोरचं आव्हान असणार आहे.
 
राज्यातील असे 4 लोकसभा मतदारसंघ आहेत, जिथं महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू आहेत.
 
1. संभाजीनगरच्या उमेदवारीवरुन दावे, प्रतिदावे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 5 मार्च रोजी जळगाव, अकोला या जिल्ह्यांसहित छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली. संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागावरुन शिंदे गट आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. सध्या इथं एआयएमआयएमचे इम्तियाज जलील हे खासदार आहेत.
 
अमित शहांच्या दौऱ्यावेळी संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी त्यांची भेट घेतली आणि दोघांनी चर्चा केली.
 
त्यानंतर माध्यमांशी बोलताना भुमरे म्हणाले की, "ही जागा आतापर्यंत आम्हीच म्हणजे शिवसेना लढवत आलेलो आहे. याहीवेळीस ही जागा आम्हीच लढवणार आहोत. ही जागा आमची आहे आणि आमचाच उमेदवार इथं राहिल आणि युतीचा उमेदवार निवडून येईल."
 
जागा वाटपासंदर्भात अमित शहांसोबत काही चर्चा झाली का, या प्रश्नावर ते म्हणाले की, "जागेच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. पण ही जागा आमचीच आहे आणि आम्हीच ती लढवणार. एकनाथ शिंदेंनी संधी दिल्यास मी जागा लढवणार."
 
दुसरीकडे भाजपनंही संभाजीनगरच्या जागेवर दावा सांगितला आहे. भाजपच्या वतीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड इथून लढण्यास इच्छूक आहेत. 
 
अमित शहांच्या दौऱ्यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ. भागवत कराड म्हणाले की, "संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी मी दावेदार आहे. मी मागच्या 3 ते 4 वर्षांपासून ही जागा मिळावी म्हणून काम करतोय. पण शेवटी महायुती म्हणेल तो उमेदवार."
 
अमित शहा यांनी संभाजीनगरमधील त्यांच्या सभेचा शेवट करताना म्हटलं की, "क्या आप लोग आज यहां से तय कर कर जायेंगे, की मजलिस को उखाडकर फेकेंगे और मोदीजी को एक कमल यहा से भेजेंगे."
 
त्यामुळे आता संभाजीनगरची जागा भाजपला सुटणार की शिंदेंना मिळणार, हे पाहावं लागेल.
 
2. बुलढाणा
संभाजीनगरशिवाय राज्यातील जवळपास 3 मतदारसंघांमध्ये महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. यापैकी एक जागा आहे बुलढाणा.
 
प्रतापराव जाधव हे बुलढाण्याचे विद्यमान खासदार असून ते शिंदेंसोबत आहेत. त्यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी शिंदे गट आग्रही आहे.
 
पण, यंदाची निवडणूक प्रतापरावांना जड जाईल, असं भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजप बुलढाण्यात आपला उमेदवार उभा करण्यासाठी चाचपणी करत आहे. 
 
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पाचवेळा बुलढाण्याचा दौरा केला आहे. या दौऱ्यात भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले त्यांच्यासोबत दिसल्या आहेत. 
 
श्वेता महाले यांच्याशिवाय भाजपकडून लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजयराज शिंदे यांच्या नावाचीही चर्चा आहे.
 
3. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार की एकनाथ शिंदे गट ही जागा लढणार, यावरुन रंगत वाढली आहे. 
 
नारायण राणेंना भाजपनं पुन्हा राज्यसभेत न पाठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा अर्थ त्यांना पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरवेल, असाच काढला जातोय.
 
ही जागा शिवसेना-भाजप युतीवेळी शिवसेनेच्या वाट्याला येत असे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या जागेवर दावा करू शकते आणि तसं अनेकदा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलूनही दाखवलं आहे.
 
उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या जागेवरून लोकसभा लढण्यासाठी इच्छूक असल्याचं त्यांनी जाहीरपणे प्रकटही केलं आहे. त्यामुळे जागावाटपात ही जागा शिवसेनेकडून ठेवून किरण सामंतांना उमेदवारी देण्यात उदय सामंत यशस्वी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
 
4. शिरूर
शिरूर लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार कोण असेल, याबाबत रोज नव्या चर्चा होत आहेत. महायुतीतील प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर आपला दावा सांगत आहे.
 
27 फेब्रुवारीला रात्री ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, शिवाजी आढळराव पाटील, प्रदीप कंद इत्यादींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळाल्याचा दावा केला जातोय.
 
मात्र शिरूरची जागा शिवसेनेला मिळेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं आढळरावांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा महायुती कसा सोडवते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
 
 सध्या इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहेत.
 
शिंदे-पवारांमुळे भाजपचं गणित बिघडलं?
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भाजपचं लोकसभेचं गणित बिघडलं आहे हे निश्चित आहे. राज्य पातळीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचं दिसत आहे. अशात अमित शहा त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातून भाजपला जास्तीत जास्त जागा मिळवून द्यायचा प्रयत्न करतील, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात.
 
देसाईंच्या मते, "राम मंदिराच्या कार्यक्रमापासून भाजपमध्ये चांगलाच आत्मविश्वास आला आहे. महाराष्ट्रात भाजप लोकसभेच्या 32 जागा भाजप लढवण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. एकनाथ शिंदेंना समृद्धी महामार्ग असो की इतर प्रकल्पांच्या उद्घाटनांसाठी मोंदीचीच गरज पडत असल्याची भाजपच्या वर्तुळात चर्चा आहे.
 
"याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार आता मागे जाऊ शकत नाही, हेही भाजपला ठाऊक आहे. त्यामुळे सध्या तरी महायुतीत जागावाटपाच्या बाबतीत भाजप डिमांडिंग पोझिशिनला असल्याचं दिसून येत आहे."
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांच्या मते, "महायुतीत जागावाटप रखडण्याचं कारण म्हणजे भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात एकमत होत नाहीये. एकनाथ शिंदेंकडून 22 जागांची मागणी सुरू आहे. दुसरीकडे, अजित पवार 10 ते 12 जागा मागत आहेत. भाजपसाठी हे अडचणीचं ठरत आहे. कारण, समजा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्यांच्या मागणीप्रमाणे जागा दिल्या आणि ते उमेदवार पडले, तर यात नुकसान भाजपचं होणार आहे. हे भाजपला ठाऊक आहे."
 
"दुसऱ्या बाजूनं विचार केला आणि समजा हे उमेदवार निवडून आले, तर ते भाजपबरोबरच राहतील याची काय गॅरंटी? असाही प्रश्न भाजपसमोर असू शकतो," असंही उन्हाळे सांगतात.
 
दरम्यान, भाजपनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिलेला आहे आणि महाराष्ट्रात 45 उमेदवार निवडून आणण्याचं महायुतीचं ध्येय आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार, काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 26 वी अटक, शूटर्सना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणाऱ्याला अकोल्यातून अटक

महाराष्ट्र बोर्डाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून, दहावीचा पेपर 21 फेब्रुवारीपासून तर बारावीचा पेपर 11 फेब्रुवारीपासून होणार

भाजप जिंकल्यास फडणवीस मुख्यमंत्री होणार ! या बैठकीनंतर गोंधळ वाढला

'महाराष्ट्रात एमव्हीए बहुमताने जिंकेल', निवडणूक निकालापूर्वी रमेश चेन्निथला यांचा दावा, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हे बोलले

पुढील लेख
Show comments