Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्धा लोकसभा : पुन्हा तडस की काळेंना मिळणार पसंती? पवारांच्या उमेदवारानं वाढवली रंगत

Webdunia
मंगळवार, 2 एप्रिल 2024 (14:49 IST)
महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून ओळखला जाणारा आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला मतदारसंघ म्हणजे विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघ. मतदानाच्या चौथ्या टप्प्यामध्ये म्हणजे 13 मे रोजी वर्ध्यात पुढचा खासदार कोण असेल यासाठी मतदार मतदान करणार आहेत.वर्ध्यात लोकसभेच्या यावेळच्या लढाईत भाजपकडून पुन्हा एकदा रामदास तडस तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमर काळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
भाजपकडून रामदास तडस यांना खासदारकीची हॅटट्रिक करण्याची संधी पक्षाकडून उमेदवारी देत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर शरद पवारांनी काँग्रेसमधील अमर काळे यांना पक्षात घेत त्यांना उमेदवारी जाहीर करून नवा डाव टाकलाय.वर्धा लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तर काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाचा एक एक आमदार आहे.
शरद पवारांनी विदर्भातील पक्षाचं अस्तित्व कायम राहावं म्हणून काँग्रेसकडून हा मतदारसंघ मागून घेत खेळलेल्या डावाचा भविष्यातील राजकारणात कसा परिणाम होणार हेही लवकरच स्पष्ट होईल.
 
 
रामदास तडस विरुद्ध अमर काळे
विदर्भात पैलवान म्हणून प्रसिद्धी मिळवल्यानंतर विरोधकांना धोबीपछाड देण्याची परंपरा रामदास तडस यांनी राजकारणाच्या आखाड्यातही कायम ठेवली.कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर परिषदेपासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुढं काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.भाजपकडून विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण 2014 मध्ये त्यांना खासदारकीची संधी मिळाली आणि त्यांनी विजय मिळवला. 
2019 मध्येही तडस यांच्या माध्यमातून भाजपचाच झेंडा इथं फडकला. त्यामुळं भाजपनं पुन्हा एकदा तडस यांनाच संधी दिली आहे.आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडं गेला. त्यामुळं तडस यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अमर काळे यांना पक्षात प्रवेश देत वर्ध्यातून उमेदवारी जाहीर केली आहे.अमर काळे यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत होतं, पण ते काँग्रेसकडून. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत उतरावं लागणार असल्यानं आता त्यांना तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.
 
शरद पवारांचा डाव
रामदास तडस यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला तर याठिकाणी महाविकास आघाडीला एक जागा जिंकण्यात यश येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात होता. शरद पवारांचा मतदारसंघात काही प्रमाणात प्रभाव आहे. त्यामुळं त्यांनी हा मतदारसंघ स्वतःकडं घेतला.मतदारसंघ आला असला तरी काँग्रेसचाच उमेदवार आपल्या पक्षातर्फे रणांगणात उतरवत त्यांनी अर्ध्याहून अधिक नाराजी जागेवर थांबवली आहे. त्याचबरोबर जातीय समीकरणांचा विचार करून पवारांनी उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे.वर्ध्याचा विचार करता सर्व समुदायाचं संमिश्र प्रतिनिधित्व इथं पाहायला मिळतं. पण प्रामुख्यानं तेली आणि कुणबी या दोन समाजाचं प्राबल्य आणि मतदार मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये आहेत.तडस तेली समाजाचे मोठे नेते असल्यानं पवारांनी कुणबी उमेदवार देत ही लढत बरोबरीची होईल यासाठी डाव टाकला आहे. दलित, आदिवासी आणि मुस्लीम लोकसंख्याही याठिकाणी निर्णयाक ठरू शकते.अमर काळे यांची पक्षातील आणि मतदारांमध्ये असलेली प्रतिमा आणि त्यांच्या मागे असलेला जनसंपर्क याबरोबर मविआच्या शक्तीचा वापर करून ही जागा मिळण्याच्या प्रयत्नात शरद पवार गट आहे.
 
 
मतदारसंघाचा इतिहास
वर्धा मतदारसंघाचे पहिले खासदार होते श्रीमान अग्रवाल. त्यांच्यानंतर काँग्रेसच्याच कमलनयन बजाज यांनी सलग तीन टर्म म्हणजे 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतनिधित्व लोकसभेत केलं.
त्यानंतरही जगजीवनराव कदम, संतोषराव गाडे आणि वसंत साठे हे काँग्रेसचे खासदार राहिले. साठे हे देखील तीन टर्म खासदार होते. त्यानंतर माकप आणि भाजपनं एक एक टर्म अशा 10 वर्ष मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात नव्हता.पण जिल्ह्यातील मोठे नेते दत्ता मेघे यांनी पुन्हा काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळवून दिला. त्यानंतर काँग्रेसच्या प्रभा राव इथून खासदार बनल्या. 2004 मध्ये पुन्हा भाजपनं इथं विजय मिळवला. तर 2009 मध्ये दत्ता मेघे यांनी पुन्हा भाजपकडून हा मतदारसंघ घेत काँग्रेसचा झेंडा फडकवला. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये रामदास तडस यांनी इथं भाजपला विजय मिळवून दिला आहे.
 
 
2019 मध्येही भाजपचाच बोलबाला
दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना पराभूत करत 2014 मध्ये विजय मिळवणाऱ्या रामदास तडस यांची भाजपनं 2019 मध्येही या मतदारसंघातून उमेदवारी कायम ठेवली होती.काँग्रेसनं चारुलता टोकस यांना उमेदवारी देत तडस यांच्यासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसनं इथं चांगला जोरही लावला होता.पण रामदास तडस यांनी 1.75 लाख अधिक मताधिक्यानं टोकस यांचा पराभव करत या मतदारसंघात भाजपचा दबदबा कायम असल्याचं दाखवून दिलं.
 
मतदारसंघात 2019 नंतरची समीकरणे
मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजपनं वर्चस्व मिळवल्याचं लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांवरून आणखी अधोरेखित झालं.
अमरावती जिल्ह्यातील दोन आणि वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपला 4 तर काँग्रेसला अवघ्या एका मतदारसंघात विजय मिळवण्यात यश आलं. तर एका ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे आमदार विजयी झाले.
त्यामुळं 2019 नंतर काँग्रेसनं पुन्हा या विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं. याठिकाणी पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी संबंधित मतदारसंघातील नेते कामाला लागले.पण त्यामुळं लोकसभा मतदारसंघाकडं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं. परिणामी यावेळी उमेदवाराच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा काँग्रेसचं कोणतंही ठोस नाव पुढं येत नसल्याचं चित्र पाहायला मिळत होतं.
 
शेतीसह बेरोजगारीचा मोठा प्रश्न
वर्धा जिल्ह्याचा विचार करता याठिकाणी शेतकरी वर्गाचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हमीभाव, कृषीपूरक उद्योग आणि पाण्यासारख्या समस्या नक्कीच महत्त्वाच्या म्हणून समोर येतात. रस्त्यासारख्या पायाभूत समस्येच्या मुद्द्यावरही मतदारांची नाराजी पाहायला मिळते. पण सर्वात मोठा प्रश्न याठिकाणी बेरोजगारीचा असल्याचं दिसून येतं. जिल्ह्यात पुरेसे उद्योग नसल्यानं तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांकडं वळावं लागत आहे. शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये अमर काळे यांना तडस यांच्या विरोधात भाजप आणि तडस यांच्यासमोर डाव टाकला आहे. आता हा डाव कामी येतो की पहिलवान असलेले तडस तो डाव उधळत काळे यांच्या माध्यमातून पवारांना चितपट करतात हे लवकरच स्पष्ट होईल.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

आश्चर्यकारक! माणसाने गिळली जिवंत कोंबडी, जीव गुदमरुन मृत्यु

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण, गुन्हा दाखल

अमित शहांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर संतापले, म्हणाले- भाजपची जुनी मानसिकता समोर आली

LIVE: मुंबईत सीबीआयची धाड,भ्रष्टाचार प्रकरणी दोन आयआरएससह 7 जणांना अटक

मुंबई बोट दुर्घटना: बचाव कार्यात हेलिकॉप्टर गुंतले, 77 प्रवाशांची सुटका, 2 ठार

पुढील लेख
Show comments