Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पर्यटनाचे तीर्थक्षेत्र - कास पुष्प पठार

वेबदुनिया
कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून पर्यटकांची रिघ कास पठाराच्या दिशेने सुरु झाली आहे. या पठाराची माहिती देणारे www.kas.ind.in हे संकेतस्थळ आहे.

कास पठार हे वर्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेलया पश्चिम घाटातील 39 ठिकाणापैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदासमोर पश्चिम घाटाला जागतीक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले आहे. त्यातील कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. कास पुष्प पठाराचे नैसर्गिक आणि निसर्गदत्त देणगीची जोपासना करून या पठाराचा विकास करण्यात वन विभागाने पुढाकार घेतला आहे. कास पुष्प पठाराची जैव विविधता जोपासून ती वाढविण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्थाचा मोठा वाटा आहे. कास पठाराची समुद्रसपाटी पासूनच उंची 1213 मिटर असून पर्जन्यमान अंदाजे अडीच ते तीन हजार मि.मी. इतके आहे. कास पठार हे 1792 हेक्टरवर पसरले असून यामध्ये वनखात्याची 1142 हेक्टर तर खाजगी 650 हेक्टर जमीनीचा समावेश आहे.

कास पुष्प पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे 850 पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचा अधिक समावेश आहे. तसेच किटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या 32 प्रजाती आढळतात. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 19 प्रजाती, सस्तन प्राण्याच्या 10 प्रजाती आणि पक्षांच्या 30 प्रजाती येथे आढळून येतात. कास पठार व परिसरात प्रदेशनिष्ठ, दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती आहेत. रेड डाटा बुकमध्ये जवळपास 40 फुले असणाऱ्या प्रजाती कास पठारावर आढळतात. कास पठरावरुन सुक्ष्म हवामान हे जैविक घडामोंडीना उत्क्रांतीला पोषक आहे. कास पठारावर जाणारा प्रत्येकजण येथील विविधांगी फुले आणि वनस्पतीकडे आपोआपच आकर्षिला जातो. कास पुष्प पठारावर पुष्प आणि वनस्पतीमुळे येथील वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरा शुभ्र, कधी लाल, निळा, जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे फुले पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडतात. या फुलांवर पसरणा-या इंद्रधनुष्यीछटा पाहण्यास मिळत असून हा परिसर जणु स्वप्नसृष्टीत पोहोचविणाराच ठरतो.

कास पठाराला जाताना नागमोडी वळणे आणि घाट संपताच विस्तीर्ण असे पठार डोळयात भरते, हेच ते ऐतिहासिक प्रसिध्द कास पठार आहे. निसर्गाची देणगी लाभलेल्या कास पुष्प पठाराला डोळयांचे पारणे फिटाव्या अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरले आहे. या पठारावर बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सरी, गर्द धुके आणि हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणु धरतीवरचाच स्वर्ग असल्याचा भास येथे येणा-या प्रत्येकालाच होतो. या पुष्प पठारावरील क्षणात सुर्यकिरणांतील इंद्रधनुष्यीछटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवे-हवेसेपणा प्रत्येकालाच मोहात पाडत असून जणू धुक्यात न्हाऊन जावे अशीच मनोमन इच्छा या परिसराच्या आकर्षणाने होत आहे.

महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगर रांगा म्हणजे सह्याद्री, सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसगिर्क खजिनाच महाराष्ट्राला बहाल केला आहे. सह्याद्री म्हणजे जैवविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. जगातील महत्वाच्या अठरा ठिकाणांमध्ये सह्याद्रीचा समावेश होतो. कास पठार हा त्याचाच एक भाग असून त्यास कास पुष्प पठार असेही म्हणतात. कास पठाराला सडाही संबोधिले जाते. या सड्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे 1213 मीटर एवढी आहे. कास पठार हे कातळ खडकाचे कमी प्रमाणात माती व अन्य द्रव्य असलेले पठार आहे. या ठिकाणी झाडे उगवत नाहीत. मात्र पावसाळ्यात रानफुले व पुष्पवैभव सर्वांनाच जादूमय भुरळ घालतात. कास पठारावरील लक्षावधी फुले विविध रंगांनी विविध ढंगांनी उगवतात. निसर्गाचे हे देखणं रुप आता सर्वांनाच मोहात पाडते.

कास पठारावर पावसाळा संपता संपता ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात रानफुले येतात. ही रानफुले विविध प्रकारची असतात. हिरव्यागार गालीच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वा-याची झुळुक आली की डोलणारी पांढरी अशी नानाविध रंगाची फुले अक्षरश: मनमोहून टाकतात. यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे दर पंधरा दिवसांनी त्यांचे रंग बदलत असतात. काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात. तर दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी हे तर कास पठाराचे वेगळे वैशिष्ट आहे. हा दैवदुर्लभ योग पाहणारा तसा भाग्यवंत म्हणावा लागेल. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या पठारावर सुमारे 850 पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार आढळून येतात. यामध्ये फॅमिली, जिनेरा जाती आणि औषधी वनस्पती नोंदविल्या आहेत.

जून महिना संपताच कास पठारावर सड्यावरचा चमत्कार दिसू लागतो. बालकवींच्या शब्दात सांगायचे झाल्यास हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे असं हे देखणं रुप म्हणजे कास पठारावरील पुष्पवैभवच आहे. या पठारावर हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग मात्र आठ-पंधरा दिवसांनी बदलतो. पांढरा शुभ्र, लाल, निळा, जांभळा, पिवळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे हे पुष्पवैभव डोळ्यांचे पारणे फेडते. या पठारावर जून महिना संपतानाच पांढरे हबे आमरीचे कोंब उगवतात. तसेच दोन तु-याची वायतुरा ही वनस्पती दिसते. हीच ती ऍ़पोनोजेटोन सातारन्सीस म्हणजे सातारा कास स्पेशल फूल. लगेचच पिवळी सोनकी आणि कवळयाची मिकीमाऊस सारखी स्मिथियाची फुले उगवतात. मिकीमाऊस फुले ही पिवळया रंगाची असून ही फुले मिकीमाऊससारखी सतत हातात घेऊन मिरवण्याचा मोह येथे येणा-या प्रत्येकालाच आवरता येत नाही. पण पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनीच मोह टाळून या निसर्गदत्त पुष्प पठाराचे नजरेत संकलन करावे.
श्रावणात निळी सीतेची आसवे आणि लाल रंगाची तेरड्याची फुले, मध्ये-मध्ये पांढऱ्या गेंदांच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले दिसतात. हे नयनरम्य दृष्य पाहताना प्रत्येकाचे मन हेलावून जाते. या फुलांचा बहर कमी होईपर्यंत पांढरे तुरेवाली आमरी वर येते. मोठ्या तळ्यामध्ये पांढरी छोटी-छोटी कुमुदिनीची कमळे संपूर्ण तलाव झाकून टाकतात. तळयामध्ये जणू साठा करून ठेवल्यासारखी कमळांची फुले असून अलगद एखादा स्नॅप घेऊन तो संग्रही ठेवण्याचा मोह प्रत्येकालाच पडतो. या पठारावर कंदी पुष्पांचे विविध प्रकार निचुर्डी, अबोलिमा, ब्युगोनिया, दीपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, ड्रॉसेरा इत्यादी नाना प्रकारची फुले उगवतात.

कास पुष्प पठारातील जैव विविधा जोपासण्यासाठी पयर्टकांबरोबरच सर्वांनीच स्वत:वर बंधने घालून घेणे गरजेचे आहे. कास पठारावरील विविध जैव विविधतेचे रक्षण करण्यासाठी या परिसरात तार कुंपन उभारण्यात आले असून या पुष्प पठारावर प्रवेश शुल्कही आकारलाही जात आहे. कास संरक्ष्ण समितीच्या वतीने प्रति माणसी 10 रुपये प्रमाणे प्रवेश शुल्क (12 वर्षावरील )आकारले जाते. प्रवेश शुल्क आता ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून यासाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर माहिती मिळेल तसेच forst.satara68@gmail.com या ई-मेल आरक्षणाबाबत संपर्क साधावा. याबरोबरच वाहनांमुळे वाहुक व्यवस्था कोलमोडूनये म्हणून ऑगस्ट ते ऑक्टोंबर या कालावधीत सातारा ते बामणोली रस्त्यावरील कास पठार 15 ते 21 किलोमिटर व राजमार्ग फाटा 0 ते 6 किलो मिटर अंतरात सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत वाहनांना थांबण्यास रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या परिसरात सर्व वाहनांना बंदी केली आहे.

काविर्च्या फुलांची झुडपे कास पठारावर मोठ्या प्रमाणावर दर सात वर्षांनी येतात. या फुलांपासून काविर्चा मध मिळतो. काविर्चा मध आयुर्वेदिक म्हणून वापरण्यात येतो. लहान मुले तसेच वयोवृध्द व्यक्ती यांच्यामध्ये कॅल्शियम वाढण्यासाठी काविर्चा मध अत्यंत उपयुक्त आहे. येथील काही वनस्पती दुमिर्ळ असून काही कीटक भक्षी तर काही वनौैषधी आहेत. दरवर्षी येथे देशी - विदेशी शास्त्रज्ञ दुर्मिळ फुलांचा अभ्यास करण्यासाठी तर अलीकडील काही वर्षात मोठया प्रमाणावर पर्यटक नियमितपणे कास पठारला भेट देतात. एकंदरीत सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्प पठाराचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून आज देशवासियाबरोबरच परदेशी पर्यटकांना भुरळ घालणाने पुष्पसौदर्य नजरेत साठवून ठेवण्यासारखे आहे. त्यामुळेच कास पुष्प पठार हे प्रत्येकाच्याच जीवनातील एक अपूर्व पर्वणीच ठरत आहे.

- एस.आर. माने,
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

येथे स्त्री रुपात हनुमान, जाणून घ्या कुठे आणि का प्रसिद्ध आहे हे मंदिर

आता वंदे भारत ट्रेन चित्रपटात दिसणार, शूटिंगला मिळाली परवानगी

प्रसिद्ध गायक जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

पुढील लेख
Show comments