Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार किल्ले धारूर

Webdunia
सोमवार, 10 जून 2019 (15:58 IST)
घाटावर वसलेलं हे शहर असल्यामुळे गावाचं आरोग्य चांगलं आहे. खवा आणि सीताफळाची ही महत्त्वाची बाजारपेठ असून मुंबई, पुणे, नाशिकपर्यंत या मालाची निर्यत केली जाते. या गावाच्या नावात त्याची भौगोलिक वैशिष्टे सामावली आहेत. धारेवरील स्थान म्हणून धारकर, धारौर, धारूर अशी नावे रूढ झाली असावीत. धार या शब्दाचे दोन अर्थ होतात. डोंगराच्या काठावर आणि अखंड वाहणार्‍या पाण्याच्या धारेवर हे गाव वसलेलं आहे. तसेच गावाजवळच धारेश्वराचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. मोगल राजवटीत अहमद नगरच्या निजामशाहीने या गावाचे नाव बदलून फतेहाबाद असे ठेवले. पण मध्ययुगीन कागदपत्रात किल्ले धारूर अशीच नोंद आढळते. मजबूत आणि प्रशस्त किल्ल्यामुळे मोगल काळात या शहराला विशेष महत्त्व होते. राजा धारसिंहामुळे या गावचे नाव धारूर पडले. अशी माहिती अनेक जण सांगतात. पण प्रत्यक्षात तशी नोंद कुठे सापडत नाही.
 
या स्थानाचा विकास काळाच्या ओघात होत गेला. आज मध्यम वाटणारे हे गाव मध्य युगामध्ये राजकीय दृष्टा स्वतःचे वेगळे अस्तित्त्व टिकवून होते. उत्तर मध्ययुगीन कालखंडात चंदीप्रसादजी मिश्रा, नगराध्यक्ष स्वरुपसिंह जहारी, रामचंद्र शंकर शेटे, प्रमोद माधवराव शेटे, सद्दिवाले यांचे पूर्वज इथे आले आणि त्यांनी स्वतंत्र वसाहती वसवल्या. धारूरच्या वाढत्या विस्ताराबरोबरच नगररचनेत आवश्यक त्या वास्तुंची निर्मिती होत होती. पाणी पुरवठ्यासाठी ज्या बारवाची निर्मिती करण्यात आली त्यात २ हरिणपीर बावडी, रंगारोनी बावडी यांचा उल्लेख करावा लागतो. यापैकी काही विहीरीवर शिलालेख कोरलेले आढळतात. उत्तर मध्ययुगामध्ये बांधण्यात आलेला एक महाल कलावंतिणीचा महाल म्हणून ओळखला जातो. गावाच्या बाहेर एक स्वतंत्र वास्तू चेकपोस्ट स्वरूपात उभारण्यात आली होती. आज गावात उभे असलेले प्रमुख प्रवेशद्वार आणि मशीद तत्कालिन कला वैभवाची साक्ष आहे. गावाला संपूर्ण दगडी तटबंदी होती. कधीकाळी हातमाग हा व्यवसाय इथे खूपच जोरात होता. धारूरचे शेले, साडा, धोतरजोडे प्रसिद्ध होते. पण आज हा व्यवसाय संपूष्टात आला आहे.
 
किश्वरखानने महादुर्गाची उभारणी केल्यानंतर त्यांनी धारूर शहराची अत्यंत योजनापूर्वक वसाहत केली. व्यापारी, उद्योगपती, विद्वान ब्राह्मण, सरदार आदींना निमंत्रित करून धारूर शहराचा नियोजनपूर्वक विकास केला. सन १६५८ साली सोनपेठ येथील प्रसिद्ध व्यापारी पापय्या शेटे यांना सन्मानाने निमंत्रित करून त्यांना रोअगिरी दिली. पापय्यांनी आपल्या बरोबर आणखी काही व्यापार्‍यांना बोलावून धारूरची बाजारपेठ वसवली, वाढवली. त्याकाळी या शहराचा लौकिक सर्वदूर पसरला होता. आजही मराठवाडातील एक महत्त्वाची विश्वसनीय बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दूरवरून सोनं, चांदी खरेदीसाठी लोक इथे येतात. सुवर्णकारांची संख्याही इथे फार मोठी आहे. आज कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, औरंगाबाद, अंबाजोगाई इत्यादी शहरात सुवर्ण काम करणारे कारागिर धारूर शहरातीलच आहेत.
 
धारूर ही एक श्रीमंत बाजारपेठ असल्यामुळे दातृत्व हा या गावचा धर्म आहे. अनेक मंदिराच्या उभारणीसाठी तलाव, विहिरीच्या बांधकामासाठी सढळ हाताने देणगी दिल्याच्या नोंदी कागदपत्रातून सापडतात. यादवांच्या काळात धारूर हे एक देश विभागाचे केंद्र म्हणून उदयास आले. या विषयी नोंद करणारा शिलालेख अंबाजोगाई येथे आहे. सकलेश्वर देवस्थानच्या निर्मितीसाठी दिलेल्या दानपत्रात या स्थानाची नोंद सिंघन यादवाचा सेनापती खोलेश्वर (शके ११३२ ते ११६९) हा करतो. या दान लेखात प्रासादह्न सकलेश्वरस्य रचितो धारो देश अशी नोंद आहे.
 
किल्ल्यामुळे धारूर शहराचे वैभव वाढले. लोकांचा राबता वाढला. अदिलशाहीचा सिपाह सालार किश्वरखान याने मूळ राष्ट्रकूट कालीन महादूर्ग असलेल्या जागेवर नव्याने अत्यंत मजबूत असा दूर्ग बांधला. सन १५६७-६८ साली हा दूर्ग बांधून पूर्ण केला. किल्ल्यावर शस्त्रसाठा भरपूर गोळा केला. किल्ल्याच्या तिन्ही बाजूला पाणी (खंदक) आणि चौथ्या बाजूला खोल दरी त्यामुळे शत्रूला किल्ला हस्तगत करणे सोपे नव्हते. धारूरच्या व्यवस्थित नियोजनाची नोंद जशी बुसा तीज-उस-सलातीन या ग्रंथात फकीर अहमद झुबेरी यांनी करून ठेवली आहे. तसेच अब्दुल हमीद लाहरी याने आपल्या बादशहानाम्यात केली आहे. हा किल्ला सहजा सहजी जिंकणे अशक्य असल्याचीही नोंद त्यांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात ज्यांनी किल्ला बांधला तोच किश्वरखान फितुरीमुळे मारला गेला. किल्ला बांधत असताना अंकुश खान याने किश्वर खानला अंधारात ठेऊन किल्ल्याचा काही भाग जाणीवपूर्वक पोकळ ठेवला व याच मार्गाने निजामशाही सैन्याने किल्ल्यात प्रवेश करून किश्वर खानचा वध केला. 
 
मुर्तजा निजामशहाला धारूर किल्ल्यात अलोट संपत्ती मिळाली. हत्ती, घोडे, जड जवाहिर, राहुटाचे सामान, शस्त्रास्त्रे, बंदूका मिळाल्या. या किल्ल्यात काही काळ अहमदनगरच्या निजामशहचा मुक्काम होता. त्यानेच विजयाचे प्रतीक म्हणून या गावाचे नाव बदलून फतेहाबाद ठेवले. हे नाव बदलण्यासाठी स्वातंत्र्यानंतर धारूरच्या जनतेनी खूप प्रयत्न केला व अखेर ५ मे १९७२ रोजी पुन्हा फतेहाबादचे धारूर असे नामकरण झाले. त्यांनतर याच किल्ल्यात काही काळ विठोजी राजे भोसले थांबले होते. तर राजे शिवबाचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा नेताजी पालकर याच किल्ल्यात मुक्कामास होता. शिवरायांबरोबर मतभेद झाल्यावर नेताजी पालकर आदिलशहीस जाऊन मिळाला. मोगलांनी नेताजीस आपल्याकडे वळवून घेतला. त्यास पाच हजाराची मनसब, पन्नास हजार रुपये रोख तसेच जहागिरी दिली. पण राजे शिवबा आग्रा किल्ल्यातून निसटताच औरंगजेबाने एका आदेशान्वये नेताजीस कैद करून दिल्लीस घेऊन या असा आदेश दिला.
 
त्यानुसार नेताजीस धारूर किल्ल्यात कैद करून दिल्लीस नेले. तिथे त्यांचे धर्मांतर करून अली कुलीखान हे नाव ठेवले. पुढे कालांतरणाने नेताजीस आपल चुक कळून आली. तो शिवरायांना शरण आला. त्याला पुन्हा त्यांना हिंदू धर्मात घेतले. यावेळी शिवराय जातीने हजर होते. कधीकाळी अत्यंत मजबूत असणारा हा किल्ला आता उद्ध्वस्त झाला आहे. शासनाचे पुरातत्त्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. पण आजही किल्ल्यात फेरफटका मारताच किल्ल्याची भव्यता आणि गत वैभव लक्षात येते. किल्ल्यात टाकसाळ होती. राजाने स्वतःचे असे स्वतंत्र असे नाणे काढले होते. सर्वच राज्यांचा हा किल्ला ताब्यात असावा असा जोरदार प्रयत्न होता.
 
सत्ता-संपत्ती बरोबरच नगरात फार मोठा संख्येत बुद्धीमान माणसं होती. ज्ञानी पंडित होते. तसेच संत महंतही होते, वेदोनारायण, कीर्तनकार होते. उद्धवचिद्पन असाच एक महान संत कीर्तनकार, चरित्रकार. उद्ध्वचिद्धनसचे चरित्र लेखन समोर ठेऊन अनेक संताचे चरित्र लेखन केले असे संत चरित्रकार महिपती निम्रपणे कबूल करतो. अशा महान संतांची समाधी धारूर शहरात आहे. पण आज ती दुर्लक्षीत अवस्थेत आहे. संत साहित्यात उद्धव चिद्धनाचे स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे.
 
भक्ती मार्गाने संत पदापर्यंत गेलेले शेख महंमद बाबा यांची समाधी (कबर) जरी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथे असली तरी त्यांची जन्मभूमी धारूर होती. शेख महंमद बाबा जरी मुसलमान असले तरी त्यांचे शिष्य हिंदूही होते. आजही श्रीगोंदा इथे त्यांच्या समाधीची पूजा हिंदू-मुसलमान एकत्र येऊन करतात. शेख महंमदच्या जीवन कार्यावर मोरोपंत, महिपती, हनुमंत स्वामी या व अशा अनेकांनी ग्रंथात गौरवाने उल्लेख केला आहे. शेख महंमदबाबाद अभंग लेखनही भरपूर केलं.
 
साधुवर्य देशिकानंदन महाराजांचे मूळ वंशात त्यांचा जन्म झाला. कृष्णाजीपंत हे धारूर सोडून अंबाजोगाईस गेले. गदाधरपंत, साळूबाई यांच्यापोटी बाळकृष्ण जन्माला आले. शुकानंद महाराजांनी दीक्षा दिल्यानंतर बाळकृष्णाचे देशिकानंदन झाले. उमरी इथे त्यांची समाधी आहे. अंबादास बुवा, विठ्ठलशास्त्री धारूरकर, भगवान शास्त्री धारूरकर, लिंबादेव वारेकर यांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर फार मोठा लौकिक होता. त्यांचा कघाशीपर्यंत शिष्यसंप्रदाय होता. वेदोनारायण म्हणून त्यांचा फार मोठा लौकिक होता. अनेक ग्रंथाचे या ज्ञानी पंडितांनी लेखन केले आहे. प्रभाकर शास्त्री पारेकर, बाबादेव पारेकर, दत्तात्रय पारेकर, नरहरी शास्त्री पारेकर हे उत्तम प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणून ओळखले जात. प्रभाकर पारेकरांना तर कीर्तन केसरी हा बहुमान मिळाला.
 
हैदराबाद मुक्ती आंदोलन आणि गोवा मुक्ती आंदोलन यात धारूरकरांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. हा एक स्वातंत्र लेखाचाच विषय आहे. दक्षिण भारतातील दुसरा आर्य समाज व नहले गुरुकुल धारूर इथे होते. तसेच वैदिक अध्ययन-अध्यापनासाठी धारूरला फार मोठी वैदिक शाळा होती. अनेक विद्यार्थी पाठशाळेत अध्ययन करीत. वेदाबरोबरच संस्कृत साहित्याचा, ज्योतिषाचा अभ्यास करीत पुढे पुढे वैदिक शाळा बंद झाली. त्यामुळे धारूरच महत्त्व थोडं कमी झालं. पंढरपुरला आजही धारूरकर पाठशाळा सुरू आहे. ही एक जमेची बाब आहे.
 
एकंदरीत धारूर ही एक प्राचीन, ऐतिहासिक, वैभव संपन्न नगरी होती व आजही आहे. साहित्य, संगीत, नाट-कला या क्षेत्रातही धारूरकरांनी महाराष्ट्रभर आपलं अस्तित्त्व सिद्ध केलं आहे. एक व्यापारी पेठ म्हणून सोन्या-चांदीची विश्वसनिय पेठ म्हणून सारा महाराष्ट्र या नगरीकडे पाहतोय. धारूर ही एक ऐतिहासीक सूवर्ण नगरी आहे. बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर एक तालुक्याचे ठिकाण, एक प्राचीन ऐतिहासिक शहर. आजही गत वैभवाची साक्ष म्हणून प्रचंउ मोठे चिरेबंदी वाडे तग धरून उभे आहेत. सोन्या चांदीची पेठ म्हणून महाराष्ट्रभर या शहराचा लौकीक आहे. राष्ट्रकूट, यादव, चालुक्य, मोगल या सर्व राजवटीशी या शहरांचा संबंध होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment 2024: गुगलवर जगभरात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली हिना खान

सलमान खान साऊथमध्ये खळबळ उडवणार,या सुपरस्टारच्या चित्रपटात दिसणार

हैदराबाद येथील घरातून अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक

रणबीर कपूरने 'ब्रह्मास्त्र' आणि 'ॲनिमल'च्या सिक्वेलचे अपडेट दिले

लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर...; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला

सर्व पहा

नवीन

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

Maha Kumbh 2025 त्रिवेणी संगमाजवळ भेट देण्यासाठी ही 3 ठिकाणे, महाकुंभाच्या वेळी नक्कीच बघा

ऋचा चढ्ढाला पत्रकार व्हायचं होतं, पण अभिनेत्री झाली

पुष्पा 2 च्या प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाची प्रकृती चिंताजनक,व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले

लापता लेडीज ऑस्करमधून बाहेर, चाहते संतापले दिल्या प्रतिक्रया

पुढील लेख
Show comments