Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वारसा जपणारा मालेगावचा किल्ला

Webdunia
शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (17:22 IST)
मालेगाव हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध गाव आहे. मालेगाव हे तालुक्याचे गाव असून ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिकच्या ईशान्य दिशेला मालेगाव असून मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ हा मालेगावातून जातो. नाशिक, धुळे, जळगाव, चाळीसगाव, औरंगाबाद येथून गाडीमार्गाने मालेगावला पोहोचता येते. या सर्व मार्गांवर एस.टी. बसेसची सोय आहे.
 
इतिहासाचा वारसा जपणार्‍या मालेगावात मोसम नदीच्या काठावर बलदंड असा किल्ला आहे. हा किल्ला मालेगावचा भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो
 
इ. स. १७४० मध्ये हा किल्ला नारोशंकर यांनी बांधला असल्याचे मत मराठ्यांचा इतिहास लिहणारे ग्रांट डफ यांनी नमूद केले आहे. एका उल्लेखानुसार १८२० मध्ये मालेगावाचा किल्ला साठ वर्षापूर्वी बांधला असा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार हा किल्ल १७६० मध्ये बांधला असावा, असे दिसते.
 
नारोशंकर हे सरदार होते. ते बराच काळ उत्तर भारतात होते. उदोजी पवार यांच्याकडे शिलेदार म्हणून असणारे नारोशंकर पुढे इंदोरचे सुभेदार झाले. त्यांनी ओरछा जिंकून घेतले. झाशीमध्ये १४ वर्षे त्यांचे वास्तव्य होते.
 
त्यावेळी मोगल बादशहा आलमगीर गाझी होता. आलमगीर गाझी शिकारीच्या मोहीमेवर असताना नारोशंकर ही सोबत होते. बादशहाने शिकारीच्या दरम्यान सिंहावर बंदुकीतून गोळी झाडली. ती गोळी हुकली. चवताळलेल्या सिंहाने बादशहावर झेप घेतली. नारोशंकर यांनी झेप घेणार्‍या सिंहाला तलवारीने मारले. त्यामुळे बादशहा बचावला. बादशहाने नारोशंकर यांची प्रशंसा करून त्यांना 'राव बहादूर' हा किताब देवून मालेगाव परिसरातील निंबायती आणि सात-आठ खेड्याचा परिसर जहागीर म्हणून दिला.
 
पुढे पेशव्यांनी नारोशंकर यांना महाराष्ट्रामध्ये बोलावून घेतले. पेशव्याबरोबर झालेला बेबनाव मिटवण्यात नारोशंकर यांना यश आले. नारोशंकर यांनी मालेगाव येथे वाडा बांधण्याची परवानगी पेशव्याकडून मिळवली. मोसम नदीच्या काठावरची जागा उत्तम असल्याची माहिती सल्लागारांनी नारोशंकर यांना दिली होती. मात्र नारोशंकर यांनी वाडा न बांधता किल्लाच बांधून काढला.
 
नारोशंकर यांनी किल्ला बांधण्यासाठी उत्तर भारतामधून कारागीर आणले. नारोशंकर यांच्यावरही उत्तर भारतातील किल्ल्यांचा प्रभाव असावा असे मालेगावच्या किल्ल्याच्या बांधकामावरून दिसते. मूळ चौरस आकाराचा भक्कम किल्ला आहे. त्याच्या भोवती साधारण ४० ते ४५ फूट अंतरावर बाहेरची तटबंदी उभी करण्यात आली आहे. या तटबंदीच्या बाहेर रुंद आणि खोल असा खंदक खंदून त्यात मोसम नदीचे पाणी खेळवून किल्ला अभेद्य करण्यात आला आहे.
 
उत्तराभिमुख असा किल्ल्याचा दरवाजा आहे. तो खंदकावरील पुलाने जोडला आहे. हा मुख्य दरवाजा सध्या मोडकळीला आला आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच मूळ किल्ल्याची तटबंदी आहे.
 
आतील आणि बाहेरील भिंतीमधून फेरी मारता येते. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीवर चढण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. बाहेरील खंदक माती आणि कचर्‍याने भरत आला आहे. त्यात काही भागात वस्तीही झाली आहे.
 
किल्ल्याच्या मधील भागामध्ये सध्या हायस्कूल आहे. त्याच्या दारामध्ये तोफा ठेवलेल्या आहेत. बाजूला रंगमहाल आहे. त्याचा देखणा दरवाजा आणि त्याच्या लाकडी फळ्या अजून शाबूत आहेत. रंगमहालात नक्षीकाम पहात येते. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. सर्वात वरच्या बाजुला सुबक बांधणीच्या दोन छत्र्या आहत. उत्तम नक्षीकामाच्या या छत्र्यांचा दगड उन्हापावसाने झिजून चालला आहे. येथून दूरपर्यंतचा मुलुख पहाता येतो.
 
मालेगाव किल्ल्याचे बलदंड बुरुज, खंदक, दरवाजाची लाकडे यांची वेळीच निगा राखली गेली नाही, तर ते काळाच्या पडद्याआड कधी निघून जातील हे कळणारच नाही.
 
मालेगावचा किल्ला इंग्रजांना लढून घेता आला नाही. तो त्यांनी फितूरीने घेतला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

Pushpa 2 OTT Release: पुष्पा 2'चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार नाही

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 'अल्लू अर्जुन'ला पाठवले समन्स

सर्व पहा

नवीन

अभिनेता अल्लू अर्जुन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार

New Year 2025 : नवीन वर्ष साजरे करा महाराष्ट्रातील या अद्भुत ठिकाणी

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Christmas 2024: सांताक्लॉजचे गाव लॅपलँड

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

पुढील लेख
Show comments