Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समृद्ध वन्यजीवांचा अनमोल ठेवा ‘नागझिरा’

Webdunia
शनिवार, 11 मे 2024 (06:45 IST)
संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असा आहे. फार पूर्वी या जंगलात असलेल्या हत्तींच्या जास्त वास्तव्यामुळे या अभयारण्याला नागझिरा हे नाव पडले असावे असे म्हटले जाते. तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य १५२.८१० चौ. कि.मी परिसरात वसले आहे. वन्यजीव प्रेमींसाठी नंदनवन असलेल्या या अभयारण्याने मारूती चितमपल्ली सारख्या निसर्ग लेखकालाही भूरळ पाडली आणि त्यांच्या लेखणीतून या अभयारण्याला आणखीनच शब्दसौंदर्य प्राप्त झाले.
 
या अभयारण्याची घोषणा ३ जून १९७० साली करण्यात आली. यात जवळपास २०० पक्षांची नोंद आहे. शिवाय ढाण्या वाघासमवेत बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, ऊदमांजर, ताडमांजर, उडणखार, सर्पगरूड, मत्स्यगरूड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग कोतवाल अशा अनेक प्राणी आणि पक्षांचा निवास येथे आहे. या अभयारण्याच्या जवळच कोसमतोंडी, चोरखमारा, अंधारबन, नागदेव पहाडी सारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत.
 
नागझिरा वन्यजीव अभयारण्यात जाण्यासाठी ‘पिटेझरी आणि चोखमारा’ असे दोन गेट आहेत. अभयारण्यात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा अनेक हरणं शांतपणे गवत खाताना दिसतात. पावलागणिक दिसणारी हरणं आणि त्यांच्या आजुबाजूला हुंदडणारी माकडे हे दृष्य पाहण्यासारखं असतं. अभयारण्यात गवताळ कुरणं मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने निलगाय तसेच सांबर, चितळ, भेकर आणि गव्यासारखे शेकडो तृणभक्षी येथे आढळतात.
 
नागझिरा हे महाराष्ट्रातील जुनं आणि भारतातील एक उत्कृष्ट अभयारण्य. येथील घनदाट वनराईत कमालीचे वैविध्य आहे. यामध्ये साग, ऐन, बांबू, आवळा, बिब्बा, सप्तपर्णी, बीजा, साजा, तिवस, धावडा हलदू, अर्जुन, बेहडा, तेंदू, सेमल, जांभूळ, चारोळी, आवळा, कुसूम अशी उंचच-उंच वाढणारी आणि घनदाट पांगोरा असलेली झाडं आहेत. गुळवेल, पळसवेल, कांचनवेल, काचकरी, चिलाटी अशा वेलींच्या प्रजाती झाडाला लगडून मोठ्या प्रमाणात फोफावल्या आहेत. जंगलाच्या मध्यावर एक विस्तीर्ण जलाशय आहे.
 
संपूर्णत: नैसर्गिक वातावरणात भटकंती करण्याचा आनंद देणारं हे वन आहे. रात्रीच्यावेळी झाडांच्या फांद्यामधून जमिनीवर अलगद झिरपणारा चंद्र प्रकाश आणि पाण्यातली चांदण्यांची शिंपडण पाहणं, त्याचा आनंद घेणं अवर्णनीय.
 
समृद्ध वनसृष्टीचे दर्शन या अभयारण्यात घडते. जैव-विविधतेने नटलेले हे अभयारण्य उष्म पानगळीचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. ताडोबानंतर नागझिरात वाघांचे दर्शन होऊ लागल्याने पर्यटकांचा ओढा इकडे वळला आहे. येथे आढळतो महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’. याशिवाय हळद्या, नीलपंखी, स्वर्गिय नर्तक, नवरंगी, तुरेवाला सर्पगरूड, मत्स्यगरूड, व्हाईट आईड बझार्डही येथे आहे. या अभयारण्यात मलबार हॉर्न बिल, हिरवा सुतार, चेस्टनट नावाची फुलपाखरं आणि निरनिराळ्या प्रकारचे कोळी ही आढळतात. उन्हाळ्याचे दिवस आणि संध्याकाळची वेळ म्हणजे वन्य प्राणी बघण्याची अतिशय उत्तम स्थिती.
 
जंगलावर आधारित तेंदूपत्ता गोळा करणे हा इथला महत्वाचा व्यवसाय आहे. तेंदू वृक्ष ४० फुट उंचीपर्यंत वाढतो. पण तेंदू पानाकरिता त्याची जमिनीलगतच छाटणी करण्यात येते. एप्रिल आणि मे महिन्यात या झाडांना चांगली पालवी फुटते. जास्त जुनं ही नाही आणि कोवळीही नाही अशी पानं तोडली जातात. 10-15 दिवस कडक उन्हात वाळवल्यानंतर या पानांची रवानगी गोदामात होते आणि मग आवश्यकतेनुसार पानं जराशी ओली करून ती वापरली जातात.
 
पानगळीमुळे सागासारखे सगळे वृक्ष अंग झटकून पुन्हा फुलण्यासाठी मोकळे झालेले असतात. त्यामुळे दूरवरची वेध घेणारी नजर आपल्याला अनेकदा खूप चांगले दृष्य टिपण्याचीही संधी देते. नागझिरा अभयारण्यात अंधारबन, बंदरचुवा, काटेथुवा अशा विचित्र नावाच्या बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण जागा आहेत. सर्वसामान्य पर्यटकांना त्या सहसा माहित नसतात, त्यामुळे तिथे जाताना स्थानिक माहितगाराची मदत घ्यावी लागते. हे याच परिसरातील गोंड आदिवासी आहेत.
 
अभयारण्य म्हणजे घाईघाईने बघायची गोष्ट नाही. कुठल्याही जंगल भ्रमंतीत आवश्यक असते ती शिस्त आणि संयम... ते इथेही आवश्यक आहे. रानवाटांवरून फिरणं हा केवळ छंदाचा भाग नाही तर तो अनुभव आहे... जो जगायला शिकवतो, आपल्या अनुभवाची शिदोरी अधिक संपन्न करतो. चिकाटी, चौकसदृष्टी ठेऊन मिळेल ते पाहण्याचा आणि येईल तो अनुभव स्वीकारण्याची तयारी ठेवल्यास नागझिरा हा आनंदाचा ठेवाच ठरतो.
 
दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पर्णगळीच्या वनात मोडणाऱ्या निसर्गरम्य नागझिऱ्यात सरपटणारे प्राणीही अनेक आहेत. अजगर, नाग, धामण, पट्टेरी मण्यार, घोरपड याठिकाणी दिसून येतात. ऑक्टोबरची हिरवळ मनाला जशी मोहून टाकणारी असते तशीच मे महिन्याची पानगळही आपल्याला बरंच काही सांगून जाते. 
 
महाराष्ट्रातील सर्वात जास्त वन्यजीवांचे दर्शन या अभयारण्यात होते. डिसेंबर ते जून हा या अभयारण्यात फिरण्यास जाण्यास उत्तम कालावधी असून या अभयारण्याशेजारीच पॅनोरमा पाँईट आहे.
 
शिवाय कपड्यादेव मचाण आणि बंदरचूहा मचाण आहे. जिथून वन्यजीव प्राण्यांचे दर्शन आणि निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण पाहता येते. नागझिरा वन्यजीव अभयारण्यात जाण्यासाठी पिटेझरी आणि चोखमारा असे दोन गेट आहेत. 
 
साकोली गावापासून अंदाजे २२ कि.मी अंतरावर नागझिरा अभयारण्य आहे तर दुसरीकडे ३० कि.मी अंतरावर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. जंगल सफारीसाठी खाजगी वाहनांबरोबरच वन विभागाच्या मिनी बसेस आणि इतर वाहने उपलब्ध आहेत. गोंदिया व साकोली येथे वन विभागाचे विश्रामगृह आहेच शिवाय नागपूर, गोंदिया शहरात खासगी निवास व्यवस्था ही आहे.
 
जवळचे गाव- साकोली- २२ कि.मी
जवळचे रेल्वेस्थानक- गोंदिया- ६० कि.मी
रस्तेमार्ग- नागपूर ते नागझिरा १२२ कि.मी
जवळचे विमानतळ- नागपूर १२२ कि.मी
 
-डॉ. सुरेखा म. मुळे.
(संदर्भ : वन विभाग)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

भारतातील चार प्रसिद्ध स्कुबा डायव्हिंग स्थळे

पुढील लेख
Show comments