Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किल्ले अर्नाळा

- प्रमोद मांडे

Webdunia
MHNEWS
वसईच्या किल्ल्याइतकाच महत्त्वाचा अर्नाळ्याचा जलदुर्ग आहे. अर्नाळा येथे जाण्यासाठी वसईतून गाडीमार्ग आहे. वसई-नालासोपारा-निर्मळमार्गे आगाशी-अर्नाळा असे गाडीमार्गाने जाता येते. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरसाड फाटय़ावरुन विरार-अर्नाळा असेही येता येते. मुंबई-सूरत या पश्चिम रेल्वे मार्गावर विरार स्टेशन आहे. विरारला रेल्वेने पोहोचून तेथून आगाशी अर्नाळा गाठता येईल. विरार ते अर्नाळा हे साधारण पंधरा कि.मी चे अंतर पार करण्यासाठी बसेसची उत्तम सोय आहे.

बस स्टॉप पासून आपण कोळीवाडय़ातून सागर किनार्‍याला दहा मिनिटांमधे पोहोचतो. सागरात विस्तृत पसरलेले आणि झाडीने नटलेले अर्नाळ्याचे बेट आपल्याला उत्साहित करते. मात्र या बेटावर जाण्यासाठी बोटीची आवश्यता आहे. बेट आणि मुख्यभुभाग या मधे येण्याजाण्यासाठी फेरीबोटीची येथे सोय केलेली आहे. या फेरीबोटी ठरलेल्या वेळेनुसारच येजा करीत आसतात. त्यामुळे त्यांच्या वेळा पाहून आपले नियोजन केल्यास वेळ वाया जात नाही.

पंधरा मिनिटांचा जलप्रवास करुन आपण अर्नाळ्याच्या बेटावर पोहोचतो. या बेटावर होडीसाठी धक्का नाही त्यामुळे सागराच्या पाण्यातच उतरुन चालत किनार्‍यावर यावे लागते. अर्नाळ्याच्या बेटावर किल्ल्याव्यतिरीक्त इतर भूभागावर कोळीबांधवांची वस्ती असून काही भागात शेतीही केल्या जाते. या कोळीबांधवांनी किनार्‍यावर कालीका मातेचे मंदीर उभे केलेले आहे.

कालीकामातेला नमन करुन पुढे निघाल्यावर घरांच्या मधून जाणार्‍या वाटेने आपण दहा-पंधरा मिनिटांमध्ये अर्नाळा किल्ल्याच्या भल्याभक्कम दरवाजा समोर येवून थडकतो. दरवाजासमोरच्या वाळूच्या पुळणीवर दोनचार होडकीही विसावलेली असतात.

साधारण चौकोनी आकाराच्या अर्नाळ्रयाचा किल्ला आहे. याचा मुख्यदरवाजा उतराभिमुख आहे. या महादरवाजा शिवाय गडाला अजून दोन प्रवेशद्वारेही आहेत. महादारावर वाघ, हत्तींची शिल्पे तसेच फुलांची वेलबुट्टी काढलेली असून दरवाजाच्या माथ्यावर मराठी शिलालेख लावलेला आहे.

हा देवनागरी लिपीतील शिलालेख वाचता येतो. बाजीराव पेशवे यांनी हा किल्ला बांधून पुर्ण केल्याचा उल्लेख यात आहे. प्रवेशव्दाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. वरचा घुमट भव्य असून देखणा आहे.

या दरवाजाच्या आत दुसरा दरवाजा असून तेथून तटबंदीवर जाणार्‍या पायर्‍यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन गडाला फेरी मारता येते. पस्तिस-चाळीस फुट उंचीची भक्कम तटबंदी असून जागोजाग बुरुजांची गुंफण केलेली आहे. या बुरुजांमधे खोल्याही केलेल्या आहेत. त्यात जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्गही केलेला आहे. तटबंदीवरुन दूरपर्यंतचा प्रदेश पाहायला मिळतो. मजबूत आणि उंच तटबंदी असल्यामुळेच बहुदा किल्ल्याभोवती खंदक केलेला नसावा. तटबंदीमधे जागोजाग मारगिरीसाठी बग्या केलेल्या आहेत.

अर्नाळ्याच्या तटबंदीच्या आत पाणी मुबलक आहे. त्यामुळे आतमधेही व्यवस्थीत शेती केल्या जाते. त्रंबकेश्वराचे मंदिर आणि हाजीअली आणि शहाअली यांची थडगी मधल्या भागामधे आहेत. किल्ल्यामधील वाडय़ांच्या जोत्यावरही शेती केली जाते हे पाहून आश्चर्य वाटते.

पश्चिमेकडील दरवाजा, चोर दरवाजा, भवानी मंदिर पाण्याची विहीर इत्यादी पहाण्यासाठी आणि गडफेरी साठी साधारण तास सव्वातासाचा अवधी पुरेसा होतो.

किल्ल्यापासून कि.मी अंतरावर टेहाळणीसाठी ३६ फूट उंचीचा बुरुज बांधलेला आह. या एकांडय़ा बुरुजावरुन बेटाच्या परिसरावर तसेच सागरावर लक्ष ठेवणे सोयीचे होते. बुरुजावर जाणारा मार्ग झाडीझाडोप्यामुळे बंद झाला आहे.

गुजरातच्या सुलतानांनी अर्नाळा बांधला पुढे यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला. मराठय़ांनी यावर अधिकार मिळवला त्यावेळी याची पुर्नबांधंणीही करण्यात आली. पुढे इंग्रजांनी हा किल्ला इतर किल्ल्याप्रमाणे जिंकूण घेतला.

अर्नाळा किल्ल्याचा भक्कमपणा आणि निसर्गसानिध्या बरोबरच सुखावणारे सागर दर्शन याचा मोह आवरीतच आपण पुन्हा जलप्रवासासाठी परतीच्या मार्गावर निघतो.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments