Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातले चेरापुंजी : पालघर जिल्ह्यातील जव्हार

Webdunia
शुक्रवार, 12 जून 2015 (12:37 IST)
मुंबई शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला पालघर जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे. नागरी, डोंगरी आणि सागरी अशा तिनही प्रकारची भौगोलिक परिस्थिती असलेला हा जिल्हा आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्याचे वरदान या जिल्ह्याला लाभलेले आहे.
 
जव्हार हा खरं तर महाराष्ट्रातला काहीसा दुर्लक्षित, दुर्गम असा भाग. पण, पावसाळ्याच्या दिवसात इथलं वातावरण मनाला अक्षरश: वेड लावतं. दाट धुकं, थंड हवा, तुफान कोसळणारा पाऊस असं धुंद करणार वातावरण इथं पावसाळ्याच्या दिवसात अनुभवायला मिळतं. पालघर जिल्ह्यातील आदिवासी वस्ती असणाऱ्या, पर्यटनस्थळांमध्ये जव्हारचे स्थान अव्वल दर्जाचे आहे. सह्याद्रीलाच संलग्न असलेल्या लहानमोठ्या डोंगर, टेकड्या आणि दऱ्याखोऱ्यांनी जव्हारचा परिसर व्यापलेला असून जव्हार हे समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० मीटरपेक्षाही अधिक उंच आहे. 
 
जव्हारला लागूनच जवळपास मोखाडा, सूर्यमाळ, खोडाळा यासारखी लहान लहान हिल स्टेशन्स पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात मात्र हा सारा परिसर हिरवागार व डोंगरातून कोसळणाऱ्या झऱ्यांनी व लहानमोठ्या धबधब्यांनी ओलाचिंब असतो. यामुळे या ठिकाणाला महाराष्रारहतील चेरापुंजी म्हटलं तर वावगं ठरू नये.
 
जयविलास पॅलेस:
जव्हार आणि आसपासच्या परिसरात बरीच प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. यापैकी मुख्य म्हणजे जयविलास पॅलेस हा राजवाडा. हा राजवाडा खाजगी मालमत्ता असला तरी भव्यतेवरून त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते. राजवाड्यात मुकणे घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत. याशिवाय जुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही येथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. जव्हार हे वारली पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय शांत वातावरणात अरण्यांनी वेढलेले वैशिष्ट्यपूर्ण हवामानाचे ठिकाण होय. आदिवासींचे दैवत असलेले जयविलास आणि भूपतगडचे भग्नावशेष पाहण्यासारखे आहेत.
 
बाणगंगा:
जव्हारमध्ये जुन्या राजवाड्याजवळ असलेले श्री मुक्तेश्वर महादेव मदिर. या मंदिराजवळ असणाऱ्या एका जिवंत झऱ्याला बाणगंगा म्हणून ओळखले जाते. म्हणून या मंदिराला बाणेश्वर महादेव मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. संस्थान काळात स्वत: राजे दर शिवरात्रीस महादेवाची महापूजा बांधत असत. या मंदिरातील पूजा-अर्चा राजघराण्याकडून होत असे. कालांतराने इतर मंदिरांसह देवस्थान समितीकडे हे महादेव मंदिर जव्हार नरेशांनी सुपूर्त केले. त्यानंतर २००१ साली या मंदिराचा जीर्णोद्धार जव्हारच्या नागरिकांच्या सहकार्यातून करण्यात आला.
 
महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा, होळी हे उत्सव या मंदिरात आजही भक्तीभावाने साजरे होतात. श्रावण महिन्यात याठिकाणी दर्शनासाठी अलोट गर्दी होत असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरात होणाऱ्या शिव भक्तीच्या भजनाचे सूर जुन्या राजवाड्यापर्यंत घुमतात आणि या राजवाड्याचा प्रत्येक चिरा शिव महिमा ऐकायला जणू जिवंत होतो. या मंदिरासमोर असलेल्या वृक्षाच्या ढोलीतील खोडला गणपतीच्या सोंडेचा आकार आल्याने या वृक्षासमोर जाताना निसर्गाची ही किमया पाहावयाला पावले आपोआपच थबकतात.
 
हनुमान पॉईंट:
खळाळणारं पाणी, फेसाळत्या पाण्याचे धबधबे, हिरवीगार वनराई हे अनुभवायचं असेल तर इथे येण्याला पर्याय नाही. जव्हारमध्ये प्रवेश करताच अंदाजे ४०० मीटर्स खोली असलेली नारळीदरा ही दरी पहायला मिळते. त्यात अनेक छोटे-मोठे धबधबे वाहत असतात. जव्हारचा हनुमान पॉईंट तर प्रसिद्धच आहे. तिथे उभं राहून सभोवताली नजर टाकल्यास निसर्ग सौंदर्याचा नजराणाच तुमच्यासमोर खुला होतो. अतिशय उत्कृष्ट असा हा पॉईंट आहे. याशिवाय सूर्यास्त पाहण्यासाठी इथला सनसेट पॉईंट प्रसिद्ध आहे.
 
दाभोसा धबधबा:
जव्हारचं मुख्य आकर्षण म्हणजे दाभोसा धबधबा. तुफान वेगाने कोसळणारं पाणी. या धबधब्यातल्या पाण्याचे तुषारच सुमारे १०० फूट उंचीपर्यंत उडतात. या धबधब्याशिवाय इथे हिरडपाडा धबधबाही आहे. अलीकडेच बांधण्यात आलेलं खडखड धरण लोणावळ्यातल्या प्रसिद्ध भुशी डॅमची आठवण करून देतं. जोरदार पावसाने हे धरण भरुन वाहू लागलं की त्या पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटता येतो. पाण्यात भिजण्यासाठी तिथे खास पायऱ्याही बांधण्यात आल्या आहेत. जव्हारपासून सुमारे सहा ते सात किलोमीटरवर हे धरण आहे. इथली आदिवासी आणि वारली संस्कृती प्रसिद्ध आहे.
 
कसे जाल ?
नजीकचे रेल्वे स्टेशन : इगतपुरी किंवा नाशिक (मध्य रेल्वे.), डहाणू (पश्चिम रेल्वे)
इगतपुरी- जव्हार : ६१ कि.मी.
नाशिक- जव्हार : ८० कि.मी.
डहाणू-जव्हार : ६५ कि.मी.
मुंबई-जव्हार (कसारा मार्गे) : १८० कि.मी.
 
संकलन: मनीषा पिंगळे
जिल्हा माहिती अधिकारी, पालघर.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments