Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संक्रांतीचं वाण

वेबदुनिया
मकर संक्रांतीच्या दिवशी धनुर्मास (धुंधुरमास) संपतो. म्हणजे त्या दिवसापर्यंत तांदूळ आणि मुगडाळ यांच्या खिचडीचा नैवेद्य दाखवून सकाळी लवकर जेवण करण्याचा प्रघात आहे. संक्रांतीच्या दिवसात तीळ व गूळ यांना फार महत्त्व आहे कारण या काळात थंडी असते. त्यामुळे गूळ व तीळ यासारख्या उष्ण पदार्थाचे सेवन या काळात आरोग्यवर्धकच आहे. 

  WD
गुळाची पोळी हे सणांचे वैशिष्ट्य. तिळाचे लाडू किंवा वड्या याही या सणांच्या निमित्तानेच बनतात. या काळात वाटाणे, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा बोर हे शेतातले नवीन उत्पन्न याच काळात होते त्यामुळे याच पदार्थाचे वाण देण्याचाही प्रघात आहे.

वर उल्लेखलेले सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगड असेही म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. ही वाणं सवाष्णीला दिली जातात. एक देवाजवळ, एक तुळशीजवळ व तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलवून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. त्याला 'सुगड' म्हणतात. बहुतेक कोकणस्थ ब्राह्मणांकडे सुगड देण्याची प्रथा आहे.

लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला ' पाटावरची वाणं' देतात. म्हणजे वरचे सर्व पदार्थ, तिळगूळ, हळदकुंकू या वस्तू तीन सवाष्णींच्या घरी जाऊन देवासमोर पाट मांडून त्यावर ठेवल्या जातात. या काळात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात. त्यावेळी एककेकींना वस्तू दिल्या जातात. या वस्तू 'लुटल्या' जातात. पूर्वी काही ठिकाणी सोरट करत असत. 'सोरट'मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मांडून ठेवतात व समोरच्या वाडग्यातील चिठ्ठयांमधून एक चिठ्ठी निवडून त्यात असलेली वस्तू त्या सवाष्णीला कुंकू लावून देतात.

  WD
लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू (कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर इ.) देतात व नंतरच्या वर्षी आपणाला हव्या असलेल्या इतर वस्तू देतात. लग्नानंतर येणारी संक्रांत नवीन सुनेच्या कोडकौतुकाची असते. तशीच बाळाच्याही कौतुकाची असते. काही घरात तर पहिल्या संक्रांतसणाला हळद कुंकवाच्या राशी टेबलावर मांडतात. त्यातून प्रत्येकी आपल्याला हवे तेवढे घ्यायला सांगतात. (अक्षरश: लूटच की!) नवीन सुनेला काळी साडी, हलव्याचे दागिने घातले जातात. गळ्यात हार, मंगळसूत्र, बिंदी, कानातले, कंमरपट्टा, बाजूबंद या अन् अशा अनेक प्रकारचे हलव्याचे दागिने कित्येक हौशी बायका करतात. ते बनवणे ही एक कलाच आहे. हल्ली हे दागिने बनवण्याच्या स्पर्धा ही काही ठिकाणी आयोजित केल्या जातात. अनेकदा महिलेच्या नवर्‍यालाही गळ्यात मोठा हार व हातात हलव्यांनी सजवलेला नारळ दिला जातो.

  WD
नवीन बाळाला (वर्षाच्या आतील) 'बोरन्हाण' केलं जातं लहान मुलांना भोवताली बसवून मध्ये पाटावर बाळाला बसवतात. त्याला काळं झबलं, अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, मुरली या अन् अशा अनेक प्रकारच्या हलव्याच्या दागिन्यांची बाळाला सजवतात त्याच्या डोक्यावरून कुरमुरे, बोरं, चॉकलेट, गोळ्या या सारख्या मुलांना आवडणार्‍या वस्तू घालतात व इतर मुलेही त्याचा आनंद घेतात. या अन् अशा अनेक पद्धती आपल्यात आहेत. या मागे रूढी नसून नव्याचे स्वागत करणे त्यातून आनंद घेणे हा आहे. आपल्या शेतातल्या पेरणीतून उगवलेला हा वानोळा एकमेकींना देणे ही सामाजिक परिस्थितीतून निर्माण झालेली रूढी आहे. पूर्वी एकत्र येण्याची संधी बायकांना दुर्मिळ होती. त्यामुळेच ही प्रथा निर्माण झाली असणार. या वस्तू लुटण्याच्या निमित्ताने संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत एकमेकींकडे जाता येतं. भेटण्याचा आनंद, संधी आजच्या काळातही हवीच. त्या निमित्ताने पुन्हा नातलग, मैत्रिणी एकत्र येतात. हाच खरा या मागचा अर्थ.

  WD
पूर्वी नवीन येणारी सून वयाने फार लहान असे. त्यामुळे या सारख्या कौतुकसोहळ्यातून तिचे कौतुक तर व्हायचेच पण ती तिच्या नवथर वयाप्रमाणे आवडणार्‍या वस्तूही एकमेकांना दिल्या जायच्या. त्यातून तिला लागणार्‍या गरजेच्या वस्तूही मिळतात आणि मैत्रिणींना भेटल्याचा आनंदही. त्याच काळात तिच्या बाळाच्या बोरन्हाणातून तीही आनंद मिळवत असे. म्हणूनच ही पहिली पाच वर्ष खर्‍या अर्थाने तिच्या आयुष्यात आनंदाची ठरत असावीत.

यातली रूढी सोडली तर काही चांगल्या गोष्टी, पुस्तके, संकल्प या सारख्या प्रकारांनी आपणही एकमेकींना ज्ञानांनी समृद्ध करूया.

समाजाभिमुख होऊया आणि आपली सामाजिक जबाबदारीही पेलूया. संक्रांतीचा हा नवा अर्थ मनी बाळगायला हरकत नाही? तुम्हाला काय वाटतं?

उत्पत्ति एकादशी कथा मराठी Utpanna Ekadashi Katha

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

आरती सोमवारची

सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

Show comments