जय देवी तुळसी माते बहु पुण्यपावनी ।
तुज करितो आरती ही लीन पदी होउनी ॥ धृ. ॥
त्रिभुवन हें लघु आहे तव पत्राहुनि अति ।
मुळिं ब्रह्मा मध्यें शौरी राहे तो बहु प्रीतीं ॥
अग्री शंकर तीर्थे शाखापरिवारीं शोभती ।
दर्शनें तुझ्या पापे हरती गे मुळिहुनी ॥ जय. ॥ १ ॥
तव छाया शीतल दे व्यापक तूं भूतळी ।
बहु प्रीती मंजिरीची विधिजनका लागली ॥
तव दलावीण होते बहु त्यांते काहिली ।
कार्तिकी बहु आहे तव महिमा या जनीं ॥ जय. ॥ २ ॥
अच्युता माधवा हे मधुसूदना जगत्पती ।
तव पूजनीं बहु प्रेमें ऎसें जे गर्जती ।
देशी त्यां संततीही सुख सारें बहु प्रीती ।
विठ्ठलात्मज विनवि भावें मज तारी स्वामिनी ॥ जय. ॥ ३ ॥