Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ख्रिसमस: जॉर्डनमधील या शहरात मशिदीचं आणि चर्चचं दार एकच आहे

Webdunia
शनिवार, 25 डिसेंबर 2021 (16:44 IST)
मार्ता विदाल
खोऱ्यातले लोक अजून पूर्णपणे झोपेतून जागेही झालेले नव्हते, पण पहाटेची मुलायम, सोनेरी सूर्यकिरणं अवतरली होती. त्या तीन डोंगरांवरील चुनखडीच्या घरांच्या दारांवर सूर्यकिरणांची थाप पडली.
 
दरम्यान, प्रार्थनेसाठी एकत्र येण्याची घोषणा झाली. शहरातील सर्व उंच घुमटातून येणारा मुअज़्जिनचा आवाज अर्धवट झोपेत असणाऱ्या शहराला जागं करत होता. 'अल्लाह-हू-अकबर... अल्लाह-हू-अकबर...'
 
मिनारावर लावलेला लाउडस्पीकर रोजच्यासारखाच प्रामाणिकपणे प्रार्थनेसाठी लोकांना लवकरात लवकर एकत्र येण्याची सूचना करत होता.
 
थोडा वेळ गेला आणि शहरातील वळणदार रस्त्यांवर घंटांचा आवाज घुमू लागला. त्याच वेळी रात्रभर शांत राहिलेल्या चिमण्यांचाही आवाज सकाळचं वातावरण प्रसन्न करत होता.
 
या शहराचं सौंदर्य कधी लुप्त होऊ नये, त्याची परंपरा टिकून राहावी- असाच बहुधा विचार करून युनेस्कोने 'अस-सॉल्ट' या शहराचं नाव जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केलं असावं. इथल्या इमारतींपलीकडचं हे सौंदर्य या शहराला विशेष रूप प्राप्त करून देतं.
जॉर्डनमधील हे लहानसं शहर आहे. इथे मशिदींच्या मिनारांवरील लाउडस्पीकर दिसतात, तसेच चर्चमधील शांतताही अनुभवायला मिळते. मशिदींचे मिनार आणि चर्चचे टॉवर या दोन्हीची दिशा एकाच आभाळाकडे जाणारी असते. हे शहर सहिष्णूता व आदिरातिथ्य या गुणांसाठी ओळखलं जातं.
 
भूमध्य समुद्र व अरबी द्वीपकल्प यांच्यातील व्यापार आणि तीर्थयात्रा सुलभ व्हाव्यात यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला ओटोमान साम्राज्यातील आधुनिकीकरणाचा भाग म्हणून या संपन्न शहराची स्थापना झाली.
इथली चुनखडीची शेकडो घरं, हे या शहराची ऐतिहासिक खूण दाखवणारं आकर्षणाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. यातील काही घरं एकोणिसाव्या शतकाच्या अखेरची आहेत, तर काही विसाव्या शतकाच्या आरंभी उभी राहिली आहेत.
 
केवळ चुनखडी हे या घरांचं वैशिष्ट्य नाही, तर त्यांचे धनुष्याकृती दरवाजे, नक्षीदार खांब आणि उंच खिडक्या, याही गोष्टी लक्षवेधी ठरतात.
 
उन्हामध्ये या खिडक्या आणखी आकर्षक वाटतात. सूर्यप्रकाशात खिडक्यांची तावदानं चमकायला लागतात.
 
पिवळ्या दगडाने बनलेल्या इमारती वैशिष्ट्यपूर्ण
थायरा अराबियात या इथल्या एक स्थानिक दुकानदार आहेत. त्या शहरातील महिलांना पारंपरिक सोई-दोऱ्याच्या शिवणकामाचं प्रशिक्षण देतात.
 
थायरा म्हणतात, "पिवळ्या दगडाने बनलेल्या इमारती अतिशय महत्त्वाच्या आहेत, पण अस-सॉल्टला जगातील इतर शहरांहून वेगळं ठरवणारं मुख्य कारण ते नव्हे."
 
सिटी सेंटरमधील त्यांच्या छोट्या दुकानात भरतकाम केलेले पोशाख आणि स्कार्फ यांनी वेढलेल्या जागेत आम्ही बसलो होतो. त्यांनी मला एक कप कॉफीही दिली. त्यात वेलचीचा सुवास येत होता. थायरा तिथे बसून 'शेमाघ' ही जॉर्डनमधली पारंपरिक ओढणी तयार करत होत्या.
 
आपल्या शहराविषयी, आपल्या परिसराविषयी बोलण्यासाठी त्या मधे-मधे काम थांबवत होत्या.
 
मला त्या त्यांच्या शहराविषयी, शहरातील लोकांविषयी सांगत होत्या. त्या म्हणाल्या, "इथल्या लोकांमुळे हे शहर विशेष ठरलं आहे, त्यांच्या दयाळूपणामुळे हे शहर विशेष ठरतं."
गप्पा मारत असतानाच त्यांनी माझा कप दुसऱ्यांदा भरला. मग आपुलकीच्या भावनेने त्यांनी विचारलं, "तुमचा सकाळचा नाश्ता झाला का? चला, सोबतच खाऊ मग."
 
खरोखर थायरा म्हणाल्या तसंच हे शहर आहे. शहरातील वळणावळणांच्या सुंदर गल्ल्यांमधून जात असताना वेळोवेळी मला दुपारच्या जेवणासाठी, चरा आणि कॉफीसाठी बोलावणी मिळत होती.
 
शहरात येणाऱ्या पाहुण्यांबाबत स्थानिक लोकांच्या मनात औदार्य आणि अतिथ्य या भावना पुरेपूर असतात, हे मला इथल्या फेरफटक्यांमधून लक्षात आलं.
 
शतकानुशतकं यरूशलेम, दमिश्क, बघदाद किंवा मक्का इथे जाणारे व्यापारी वा यात्रेकरू यांच्यासाठी हे शहर हा एक महत्त्वाचा थांबा होता. इथे अचानक आलेले पाहुणे, व्यापारी व यात्रेकरू यांचं मोकळ्या मनाने स्वागत करणं, ही इथली परंपरा राहिली आहे. पाहुण्यांना जेवणखाण देणं, राहायची सोय करणं, हा इथल्या अतिथ्यशीलतेचा भाग आहे.
 
एकोणिसाव्या शतकात अस-सॉल्ट प्रशासकीय मुख्यालय झालं आणि धार्मिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीशी जवळीक असणाऱ्या व्यापाऱ्यांची इथली वर्दळ वाढली. अनेक व्यापारी या शहरात येऊन स्थायिक झाले आणि स्थानिक समूहांसोबत त्यांचे चांगले शेजारसंबंध निर्माण झाले.
 
वैविध्य
स्थानिक बाल्का गव्हर्नेटमध्ये (जॉर्डनमधील 12 गव्हर्नेटांपैकी एक) पर्यटन विभागाचे माजी संचालक राहिलेले अयमान अबू रुम्मन म्हणतात, "पूर्व आणि पश्चिम, वाळवंट आणि शहरी केंद्र यांच्यातील अस-सॉल्ट हा एक दुवा होता. या शहराचं वैविध्य इथल्या वास्तुकलेमध्ये स्पष्टपणे प्रतिबिंबित झालं आहे."
 
अबू ज़बर भवन हा इथल्या वैविध्याचा उत्कृष्ट नमुना आहे.
 
ओटोमान शैलीत बांधण्यात आलेल्या या इमारतीवर युरोपीय प्रभाव आहे, तशीच स्थानिक परंपरांचीही छाप स्पष्टपणे दिसते. अबू जबर भवनाचं बांधकाम चुनखडीचं आहे. छप्पर इटालियन शैलीतील आहे, तर खिडक्यांच्या काचांची चौकट आर्ट नव्यू धाटणीची आहे. तिथल्या सिरॅमिक फरश्यांमुळे इमारतीचं सौंदर्य आणि वैविध्य आणखी उठून दिसतं. अबू ज़बेर या मोठ्या उद्योगपतीचं हे घर होतं. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस तो इथे येऊ स्थायिक झाला होता. या इमारतीला 2009 साली संग्रहालयाचं रूप देण्यात आलं.
अम्मान शहराला 1928 साली ट्रान्सजॉर्डन अमिरातीची राजधानी म्हणून निवडण्यात आलं, तेव्हा अस-सॉल्टचं या प्रदेशातील महत्त्व कमी झालं. अम्मानमध्ये एका बाजूने वेगाने शहरीकरण झालं, तर अस-सॉल्टने मात्र आजही आपला वारसा टिकवून ठेवला आहे.
 
जॉर्डनमधील वास्तुरचनाकार रामी डाहेर यांनी हे शहर जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट व्हावं यासाठी नामांकनाची कागदपत्रं तयार केली होती. इथे ऐतिहासिक चुनखडीच्या इमारती आहेत, म्हणूनच केवळ हे शहर अद्वितीय ठरतं असं नाही; तर, या शहराने शतकानुशतकं जपलेली स्वतःची आदरातिथ्याची परंपरा आणि सहिष्णूता हे इथलं अनोखं वैशिष्ट्य आहे- जगात इतरत्र कुठेच ही वैशिष्ट्य सहजपणे सापडत नाहीत.
 
शहराचा सर्वांत विशेष पैलू
या शहराची भूरचना इथल्या समूहांमध्ये जवळीक निर्माण करण्याबाबत विशेष महत्त्वाची ठरली आहे.
परस्परांशी जोडलेले जिने, सामाईक अंगणं आणि सार्वजनिक चौक यांनी एकमेकांबद्दलची सहिष्णूता टिकवून ठेवली आहे. या रचनेमुळे वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांना एकमेकांसोबत मिळूनमिसळून जगण्याची प्रेरणा मिळते. पारंपरिक इमारतींमध्ये वेगवेगळ्या धर्मांचे लोक एकत्र स्वयंपाक करतात आणि एकत्र जेवतात.
 
वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमधील प्रेमभावना
अबू जबर संग्रहालयाजवळ बसलेले अबू रहमान म्हणतात, "चर्चचं दार मशिदीच्या दिशेने उघडतं आणि दोघांचंही दार एकच आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणं एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात. शेजाऱ्यांचे एकमेकांशी असतात तसेच त्यांचे संबंध आहेत."
ते पुढे म्हणतात, "आमच्या शहरातील सर्वांत जुन्या चर्चच्या संदर्भात ही बाब स्पष्ट होते. हे चर्च 1682 साली उभारण्यात आलं. एका गुहेच्या चार बाजूंनी हे चर्च उभारण्यात आलं. सेन्ट जॉर्ज इथल्या मेंढपाळांसमोर अवतरल्याचं मानलं जातं. अरबी भाषेत चर्चला अल-ख़ादेर म्हटलं जातं.
 
ख्रिस्ती नि मुस्लीम या दोन्ही धर्मांचे लोक तिथे प्रार्थनेसाठी जातात आणि सर्वाचं तिथे स्वागत केलं जातं."
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध प्राचीन जुने कॅथोलिक चर्च भोपाळ

श्री सूर्याची आरती

Bhanu Saptami 2024 भानु सप्तमीच्या दिवशी काय केले जाते?

आरती शनिवारची

श्री शनिदेव आरती Shri Shani Aarti

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments