Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रख्यात तालवादक शिवमणी यांच्या तालवादनाने सजला

Webdunia
सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (08:52 IST)
हर हर महादेव चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा !
झी स्टुडियोजच्या आगामी 'हर हर महादेव' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास तेवढ्याच भव्य दिव्य पद्धतीने या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘हर हर महादेव’ सर्वार्थाने मराठीत भव्यतेचा एक नवा पायंडा पाडणारा चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे या लौकिकाला साजेसा असाच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळाही मोठ्या दिमाखदार पद्धतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तालवादक शिवमणी यांचं तालवाद्यांचं सादरीकरण. दमडीवर ताल धरत रंगमंचावर अवतरलेल्या शिवमणी यांनी पुढचे काही मिनिटे ड्रम्स, तबला, ढोल आणि इतर वाद्यांच्या वादनाची अशी काही मैफल रंगवली की उपस्थित प्रत्येक प्रेक्षक त्या नादाने भारावून गेला. या चित्रपटाच्या निमित्ताने शिवमणी पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील गाण्यासाठी तालवादन करणार आहेत हे विशेष.
 
'हर हर महादेव' या चित्रपटाला हितेश मोडक यांचं संगीत असून यातील यातील ‘बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं’ हे गाणं गीतकार मंदार चोळकरने लिहिलं असून ते मनिष राजगिरेने गायलं आहे. तर शीर्षक गीत ‘हर हर महादेव’ हे मंगेश कांगणेने लिहिलं असून ते गाणं सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायलं आहे. हे गाणं तालवादक शिवमणी यांच्या तालवादनाने सजलं आहे. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गायनाच्या दुनियेतला आजच्या घडीचा लखलखता तारा सिद श्रीराम या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटात गाणं गात आहे. हर हर महादेवमधील ‘वाह रे वाह शिवा’ हे गाणं त्याने गायलं असून या गाण्याचे शब्द आहेत मंगेश कांगणे यांचे. या तीनही गाण्यांविषयी बोलताना संगीतकार हितेश मोडक म्हणाले की,”अशा प्रकारच्या भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपटाला आधूनिक वाद्यांचा वापर करून संगीत देणं हे खरंच खूप आव्हानात्मक काम होतं. या चित्रपटाच्या संगीतावर मी तब्बल अडीच वर्षे मेहनत घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच आपल्यामध्ये जी उर्जा संचारते, जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर ज्याप्रमाणे रक्त सळसळतं तोच अनुभव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या आधूनिक संगीताचा वापर या चित्रपटासाठी केला आहे आणि हा मिलाफ सुंदरपणे जुळून आला आहे जो रसिकांना नक्कीच आवडेल.”
 
'हर हर महादेव' या चित्रपटाची कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाची आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करता धिरोदात्तपणे लढणा-या झुंजार योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांची. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे साकारत आहे तर हिंदी आणि मराठी चित्रपटांत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता शरद केळकर बाजीप्रभुंच्या करारी भूमिकेत दिसणार आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाले की, “आपण जेव्हा एखाद्या खूप प्रसिद्ध अशा देवळामध्ये जातो तेव्हा आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. ते दर्शन प्रत्येकालाच हवं तसं मिळत नाही कारण ही भक्ताची नाही तर परमेश्वराची इच्छा असते आणि त्या इच्छेनुसारच तो प्रत्येकाला दर्शन देतो असं मला वाटतं. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भूमिकेबाबतही मला असंच वाटतं. माझी इच्छा होती म्हणून मला ती भूमिका मिळाली असं नसून मी ती भूमिका करावी ही कुठेतरी महाराजांची इच्छा असेल आणि त्या इच्छेतूनच ती मला मिळाली असं मी मानतो. महाराजांच्या या इच्छेला आणि या भूमिकेलाही पूर्णपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न केलाय तो प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे.
 
तर चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे शरद केळकर म्हणाले की, “यापूर्वी एका लोकप्रिय हिंदी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर लोकांमध्ये महाराजांविषयी असलेल्या आदर आणि प्रेमाची जाणिव झाली होती. खरं तर अभिजीत देशपांडे 'हर हर महादेव' चित्रपटाची गोष्ट घेऊन जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा मला वाटलं होतं ते महाराजांच्या भूमिकेबद्दल विचारणा करतील परंतू त्यांनी बाजीप्रभूंच्या भूमिकेसाठी विचारून मला आश्चर्याचा धक्का दिला. या भूमिकेबद्दलचं त्यांचं व्हिजन आणि मी ही भूमिका करु शकेल याबद्दलची त्यांना असलेली खात्री हे बघूनच मी या भूमिकेसाठी होकार दिला. जे प्रेम मला शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळं मिळालं त्याहूनही अधिक बाजीप्रभुंच्या भूमिकेमुळे अशी मला आशा आहे. आजवर मराठीत अनेक भूमिका केल्यानंतरही हवी तशी ओळख निर्माण करता आली नाही याची मला नेहमीच खंत होती. परंतू आता बाजीप्रभूंची ही भूमिका ‘मराठी अभिनेता’ म्हणून मला एक नवी ओळख मिळवून देईल याची मला पूर्णपणे खात्री आहे.”
 
तर चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अभिजीत देशपांडे आपल्या मनोगतात म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर एक भव्य दिव्य चित्रपट करण्याचं स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून मी उराशी बाळगून होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. हे तोरण बांधण्यासाठी आपल्या तळहातावर प्राण घेऊन मावळे कसे लढले याची गोष्ट मला सांगायची होती. शिवाय स्वराज्याच्या तोरणासोबतच त्यामागचं महाराजांचं नेमकं धोरण काय होतं हे तेवढ्याच भव्य दिव्य स्वरुपात सांगायचं होतं त्यासाठीच या चित्रपटाचा घाट घातला.”
 
हर हर महादेव हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरला झी स्टुडियोजच्या माध्यमातून मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड अशा पाच भारतीय भाषांमधून भारतभर प्रदर्शित होणार आहे. याबद्दल बोलताना झी स्टुडियोजचे व्यवसायप्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, “आपल्या महाराष्ट्राच्या मातीत एवढा कर्तृत्वान राजा होऊन गेला ज्याच्याबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रचंड आदराची भावना आहे. तो आदर असाच राखला जावा किंबहूना तो वाढावा आणि महाराष्ट्राबाहेरही इतर भाषिकांपर्यंत महाराजांच्या कर्तृत्वाची ही महती पोहचावी याच उद्देशाने आम्ही हा चित्रपट एवढ्या सा-या भाषांमध्ये भारतभरात प्रदर्शित करतोय. चोखंदळ मराठी रसिक प्रेक्षकांना तो आवडला तर भारतभरातील प्रेक्षकांनाही तो आवडेल याची खात्री आम्हाला आहे. आमच्या या नव्या प्रयत्नांना प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देतील असा विश्वास आहे.”  
‘हर हर महादेव’ या चित्रपटात सुबोध भावे आणि शरद केळकर यांच्यासह अभिनेत्री अमृता खानविलकरही एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग एन्ड फिल्म्स तसेच झी स्टुडियोजची निर्मिती असलेला हा चित्रपट २५ ऑक्टोबरला भारतभरात प्रदर्शित होणार आहे.

Edited by : Yogita Raut

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदी पाहतील विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट

विक्रांत मॅसी यांनी अभिनयक्षेत्रातून घेतली निवृत्ती, वयाच्या 37 व्या वर्षी इंडस्ट्री सोडली

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले

कश्मिरा शाह आणि कृष्णा अभिषेकची प्रेमकहाणी वन नाईट स्टँडपासून सुरू झाली

पुढील लेख
Show comments