Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे सुरांनो चंद्र व्हा.

अभिनय कुलकर्णी
PRPR
झी टिव्हीवरील सारेगमप या संगीतमय कार्यक्रमातील लिटिल चॅम्प्स हे पर्व आता भैरवीकडे वाटचाल करते आहे. विविध वाहिन्यांवर संगीतमय कार्यक्रमांची वानवा नाही. महागायकापासून, आयडॉल, महाविजेता अन् असे बरेच किताब या कार्यक्रमांमधून दिले जातात. पण या सगळ्यांहून मराठीतील लिटिल चॅम्प्सचा हा कार्यक्रम वेगळा ठरला आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर राज्याबाहेरील आणि अगदी परदेशातील मराठी मंडळीही सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसातील रात्री साडेनऊ ते अकराची वेळ या कार्यक्रमासाठी राखून ठेवत आहेत, यातच या कार्यक्रमाचे यश सामावले आहे. या कार्यक्रमासंदर्भात विविध वर्तमानपत्रात येणारे लेख, पत्रे यावरून प्रेक्षक त्याच्याशी किती जोडले गेले आहेत हे समजते.

अवघ्या महाराष्ट्रातून झी मराठीने पन्नास हिरे शोधून ते लोकांपुढे सादर केले. पन्नासापासून सुरू झालेला हा प्रवास पाच लखलखत्या हिऱ्यांपर्यंत येऊन ठेपला आहे. या मुलांची पार्श्वभूमीही लक्षात घेण्यासारखी आहे. यातला शास्त्रीय संगीताचा मजबूत आधार असलेला प्रथमेश लघाटे सावंतवाडीजवळच्या आरवली नावाच्या एका छोट्याशा गावात रहातो. त्याला शिक्षणासाठीच रोज २५ किलोमीटर बसचा प्रवास करावा लागतो. कार्तिकी गायकवाड हीही विलक्षण आवाज लाभलेली चिमुरडी आळंदीसारख्या छोट्या गावातून पुढे आलीय. कोकणातल्या मुग्धा वैशंपायन या चिमुकलीबद्दल तर काय बोलावे. ही धिटुकली ज्या सहजतेने गाते ते पहाता हे देणे इश्वराचे एवढेच म्हणावेसे वाटते. आर्या आंबेकर आशाताईंची गाणी ज्या सहजतेने गाते ते पाहिल्यावर आशाताईंच्या सूरांची परंपरा पुढे सांभाळणारा वारसदार पुढे आल्याची खात्री पटते. लातूरचा रोहित राऊत हा नव्या पिढीचा गायक नवे संगीत गाऊन तेही किती श्रवणीय आहे, हे दाखवून देतो.

ही सर्व मुले लहान असूनही त्यांची गाण्याची विलक्षण समज पाहून थक्क व्हायला होते. लतादीदी, आशाताई यांच्यासह अनेक मान्यवरांनी गायलेली आणि तितक्याच तोडीच्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी मुले अगदी सहजपणे गातात. त्यातल्या जागा, ताना, हरकती मुरक्या या मुलांच्या गळ्यातून सहजपणे निघतात. ते ऐकताना लहान मुलेच गाताहेत यावर डोळे आणि कानांचा विश्वास बसणे कठीण जाते. एरवी लहान मुलांनी एखादी गोष्ट केली की कौतुक करण्याची प्रथा आहे. पण ही मुले जे काही करतात त्याचे कौतुक हे अगदी आतून येते. त्यामुळेच चांगले गाणे झाल्यानंतर त्यांचे कौतुक करताना शब्द सापडत नाहीत, ही अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत या परिक्षकद्वयांची तक्रार रास्त आहे. मुलांचे कौतुक करताना त्यांच्या पालकांचे कौतुक करायला हवे. एवढ्या लहान वयात त्यांनी आपल्या पाल्याची आवड ओळखून त्याला त्या गानमार्गावर नेले ही बाब महत्त्वाची आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्टही दुर्लक्षिता येणार नाहीत.

या स्पर्धेसाठी आलेल्या मान्यवर परीक्षकांनीही छोट्या गानगुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले. अगदी अलीकडच्या स्वप्नील बांदोडकरसारख्या नव्या गायकापासून ते थेट ह्रदयनाथ मंगेशकरांसारख्या दिग्गज संगीतकार-गायकापर्यंत अशी ही मोठी रेंज आहे. यात आशा खाडीलकर, देवकी पंडीत यांच्यासारखे शास्त्रीय गायक गायिकाही होते. हिंदीतले प्रख्यात गायक हरिहरन, शंकर महादेवन, श्रेया घोशाल, महालक्ष्मी अय्यर यांचेही शब्द या छोट्या गंधर्वांचे कौतुक करताना थकत नव्हते. या सगळ्यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेल्या टिप्स या छोट्या गायकांना यापुढच्या आयुष्यासाठीही उपयोगी पडतील.

हे पाहिल्यानंतर अभिजात संगीताची परंपरा चालविणारे छोटे गंधर्व महाराष्ट्रात आजही आहेत आणि हेच ही परंपरा पुढे चालविणार आहेत, या अभिमाने मान उंचावते. आक्रोशी संगीताच्या कलकलाटातही मराठी संगीताविषयी आवड जपून ती नेटाने पुढे नेणाऱ्या या नव्या सूरांचा अभिमान दाटून येतो. आता या लिटिल चॅम्प्सने यश आणि कौतुक डोक्यात जाऊ न देता पुढे वाटचाल केली पाहिजे.

मुळात हा कार्यक्रम टॅलेंट हंट असला तरी आता ती केवळ स्पर्धा राहिलेली नाही. त्याच्याशी महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या भावना निगडीत आहेत. म्हणूनच शेवटचे सात स्पर्धक राहिले त्यातून कुणालाही बाद केल्यानंतर नाराजीच्या पत्रांचा पाऊस वर्तमानपत्रांवर पडत होता. प्रेक्षकांचे भावनात्मक नाते या कार्यक्रमाशी किती आहे हे यावरून कळून येते. म्हणूनच पाच स्पर्धकांनंतर आता कुणालाही निरोप दिला जाणार नाही हे निवेदिका पल्लवी जोशी यांनी जाहीर केल्यानंतर प्रेक्षकांना हायसे वाटले. हा निर्णय प्रेक्षकांच्या दबावामुळे घेतला गेला हे महत्त्वाचे. आणखी एक चागंली बाब म्हणजे महागायक निवडण्यासाठी पूर्णपणे प्रेक्षकांच्या एसएमएसचा आधार न घेता त्यासाठी या क्षेत्रातील मान्यवरांचे एक पॅनल नेमले आहे ही चांगली बाब आहे. ही स्पर्धा इतरांपेक्षा वेगळी ठरण्यात हा निर्णयही महत्त्वाचा आहे. मात्र, आता मान्यवर ज्युरींनी याही पुढे जाऊन एक गोष्ट करायला हवी, ती म्हणजे या पाचही स्पर्धकांमध्ये डावे-उजवे न करता या पाचही जणांना महागायक म्हणून घोषित केले पाहिजे. या पाचही जणांची गायकी वेगळ्या पद्धतीची आहे. त्याची एकमेकांशी तुलना करता येणार नाही. लता, आशा, उषा, ह्रदयनाथ यांची तुलना करता येईल काय? म्हणूनच प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून हे सगळेच महागायक आहेत. त्यामुळे झी मराठीने याचा विचार करून या सगळ्यांनाच महागायक म्हणून गौरवून प्रेक्षकांच्या भावनेचा सन्मान केला पाहिजे.

महाराष्ट्रातील गानपरंपरा पुढे नेणाऱ्या छोट्या गंधर्वांच्या गानकर्तृत्वाला वेबदुनियाचा सलाम आणि शुभेच्छा.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments