Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंशुमन गायकवाड : हेल्मेट न वापरण्याच्या काळात फास्ट बोलर्सना सहजपणे खेळणारे फलंदाज

Webdunia
गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (09:03 IST)
माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं बुधवारी (31 जुलै) संध्याकाळी निधन झालं. ते 71 वर्षांचे होते.मागील अनेक दिवसांपासून अंशुमन गायकवाड यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना ब्लड कॅन्सरचं निदान झालं होतं.
 
अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. या सोबतच त्यांनी दोनवेळा भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले होते.
अंशुमन गायकवाड यांची कॅन्सरविरुद्धची झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी बडोदा येथे अखेरचा श्वास घेतला.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर पोस्ट करून अंशुमन गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अंशुमन गायकवाड यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं की, "क्रिकेटविश्वाला दिलेल्या योगदानासाठी अंशुमन गायकवाड कायम स्मरणात राहतील. ते एक उत्कृष्ट खेळाडू आणि उत्तम प्रशिक्षक होते. त्यांच्या जाण्याने मला दुःख झालं आहे. त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसकांच्या दुःखात मी सहभागी आहे."
बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अंशुमन गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
उपचारांसाठी माजी क्रिकेटपटू, बीसीसीआयने मदत केली होती
ब्लड कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावर लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये उपचार सुरु होते मात्र मागच्याच महिन्यात ते भारतात परतले होते.
 
अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून भारताचे माजी कर्णधार कपिल देव, संदीप पाटील, मदन लाल, कीर्ती आझाद या खेळाडूंनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आवाहन केलं होतं.
 
कपिल देव यांनी त्यांची पेन्शन अंशुमन गायकवाड यांना दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बीसीसीआयने देखील अंशुमन गायकवाड यांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.
माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी या वर्षी 2024 च्या सुरुवातीला 71 वर्षीय अंशुमन गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत ते कॅन्सरशी झुंज देत असल्याचं सांगितलं होतं.
 
संदीप पाटील यांनी अंशुमन गायकवाड मागील एक वर्षाहून अधिक काळ आपल्या कॅन्सरशी लढा देत असून ते लंडनमध्ये उपचार घेत असल्याचं सांगितलं होतं. अंशुमन गायकवाड यांनी स्वत: संदीप पाटील यांना त्यांच्या आर्थिक समस्यांबाबत वैयक्तिकरित्या सांगितलं होतं.
वेगवान गोलंदाजीचा बेदरकारपणे सामना करणारे अंशुमन गायकवाड
ज्या काळात फलंदाज हेल्मेट वापरत नव्हते, ज्या काळात एका ओव्हरमध्ये किती बाउन्सर टाकायचे याची मर्यादा नव्हती त्या काळात अंशुमन गायकवाड जगभरातील तेजतर्रार गोलंदाजांचा अतिशय निडर होऊन सामना करायचे.
 
ऐंशीच्या दशकात भारतात वेगवान गोलंदाजीचा अगदी सहज सामना करणाऱ्या काही मोजक्या फलंदाजांमध्ये अंशुमन गायकवाड यांचा समावेश केला जायचा.
 
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध 27 डिसेंबर 1974 रोजी अंशुमन गायकवाड पहिला कसोटी सामना खेळले आणि त्यानंतर त्यांनी सुमारे 12 वर्षे भारताचं प्रतिनिधित्व केलं. या 12 वर्षांमध्ये ते 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले
अंशुमन गायकवाड यांनी खेळलेल्या 40 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी 30.07च्या सरासरीसह एकूण 1985 धावा केल्या. अंशुमन यांनी कसोटीमध्ये 2 शतकं आणि 10 अर्धशतकं झळकावली. त्यांनी खेळलेल्या 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांना एक अर्धशतक करता आलं.
 
1982-83मध्ये जालंधर येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अंशुमन गायकवाड यांनी 201 धावा केल्या होत्या. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसमोर तब्बल 671 मिनिटं फलंदाजी करत अंशुमन गायकवाड यांनी त्यांच्या कसोटी क्रिकेटमधली सर्वोत्तम धावसंख्या उभारली होती. त्यावेळी प्रथमश्रेणी क्रिकेटमधलं ते सगळ्यात संथ द्विशतक ठरलं होतं.
 
अखेरच्या प्रथमश्रेणी सामन्यात शतक झळकावणारे अंशुमन गायकवाड पुढे भारतीय संघाच्या निवड समितीत होते आणि क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांना दोनवेळा संधी मिळाली. 2000साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपविजेता ठरलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे ते प्रशिक्षक होते.
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

हारिस रऊफने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही

IND vs SA: पहिल्या T20 मध्ये नजरा अभिषेक-संजूवर, संभाव्य प्लेइंग11 जाणून घ्या

आयपीएल 2025 मेगा लिलाव 24-25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये आयोजित

ICC ची महिला क्रिकेटसाठी मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments