वेस्ट इंडीजविरुद्ध वन-डे मालिकासुरू होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. जलदगती गोलंदाज भुवनेश्वरकुमार दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. मात्र, सध्या त्याला झालेली दुखापत पाहता तो भारतीय संघाचा 2020 वर्षातला न्यूझीलंड दौर्यालाही मुकण्याची शक्यता आहे. भुवनेश्वरकुमार सध्या स्पोर्टस् हर्निाया या आजाराने त्रस्त आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांना त्याच्या या त्रासाबद्दल आधी समजलेच नव्हते. मात्र, त्रास वाढल्यानंतर त्याला संघातून विश्रांती देण्यात आली आहे.
तो न्यूझीलंड दौर्याला मुकणार हे नक्की आहे. कदाचीत आयपीएलच्या हंगामापर्यंत तो पुनरागमन करू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीलाही भुवनेश्वरच्या या दुखापतीबद्दल नीट माहिती नसल्याचे समोर आले आहे. नुकतेच पार पडलेल्या विंडीजविरुध्दच्या टी-20 मालिकेत तो खेळला होता. ह्या हंगामात त्याची दुखापत बळावल्याचे बोलले जात आहे. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर, भुवनेश्वर कुमारने 14 ऑगस्ट रोजी विंडीजविरुद्ध कॅरेबिन बेटांवर अखेरचा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना खेळला होता.