Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भागिया : आजारी पशूधनावर मोफत उपचार करणारे हे लोक कोण? त्यांचं वैशिष्ट्य काय?

Webdunia
बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (15:14 IST)
कच्छच्या बन्नीमधील एरंडावाडीमध्ये राहणारे गुल मोहम्मद होलेपात्रा यांचा दुधाचा व्यवसाय आहे. पण बहुतांश वेळा ते बन्नीमधील गवताच्या मैदानात फिरत असतात. तिथून झुडपांमधून ते विविध रोपं गोळा करत असतात.
 
"मला बन्नीमधील 56 प्रकारच्या गवतांची नावं माहिती आहेत. मी त्या गवतांच्या नमुन्याची मालधारिंसाठी (पशूपालन व्यवसाय असणारे म्हणजे मालधारी) काम करणाऱ्या भुजमधील सिम्बियोट इन्स्टिट्यूटमध्ये नोंदणीही केली आहे," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
 
गुल मोहम्मद यांना नाव माहिती नसेल, असं रोप बन्नीमध्ये सापडणं कठिण आहे. गावातील काही लोक तर प्रेमानं असंही म्हणात की, झाडाच्या एखाद्या पानाला बोलता आलं असतं तर त्यानंही गुल मोहम्मद यांचं नाव घेतलं असतं. यावरुनच ते पर्यावरणाच्या किती जवळ आहेत, हे लक्षात येतं.
 
मालधारींसाठी काम करणारी संस्था सहजीवन च्या वेबसाईटनुसार बन्नीमधील गवताची मैदानं 2497 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेली आहेत. बन्नी हे आशियामधील गवताचं दुसरं सर्वात मोठं मैदान आहे. तुम्ही मान्सूननंतर बन्नीला गेले तर कोणीतरी हिरवा गालिचा पसरवल्यासारखा अनुभव मिळतो.
 
एके दिवशी सकाळीच बीबीसीची टीम बन्नीच्या एरंडावाडीमध्ये पोहोचली. त्यावेळी गुल मोहम्मद अदेरी नावाची औषधी वनस्पती शिजवत होते. काही वेळानं त्यांनी हा उकळलेला हिरवा लेप एका म्हशीच्या पाठीवर लावला.
 
बीबीसीबरोबर बोलताना ते म्हणाले की, "म्हशीचे सांधे दुखतात. काही दिवस पाठीवर अदेरीचा लेप लावला तर तिच्या वेदना कमी होतील. आमचे पूर्वच पूर्वीच्या काळी असं करायचे, म्हणून मीही करतो."
 
एरंडावाडी आणि आसपासच्या काही गावांमध्ये म्हैस आजारी पडली, किंवा प्रसुतीनंतर गायीचं खाण्याचं प्रमाण कमी झालं असेल किंवा बकरीचे स्तन जड पडले असतील तर लोक लगेचच गुल मोहम्मद यांच्याकडं येतात, गुल त्यांना एक देशी उपचार सांगतात. अशा व्यक्तीला बन्नीमध्ये भागियो किंवा भागिया म्हटलं जातं.
 
गुल मोहम्मद भाई यांना 'भागिया' नावानं ओळखलं जातं.
 
"भागिया अशी सुदैवी व्यक्ती असते, जिच्या नशिबात प्राण्याचं आरोग्य आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचं काम असतं," असं गुल मोहम्मद यांचं मत आहे.
 
2001 च्या भूकंपानंतर कच्छमध्ये गुरं चारणाऱ्यांबरोबर काम करणारी संस्था सहजीवनमधील कार्यक्रम संचालक रमेश भट्टी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "भागियो असा व्यक्ती असतो, ज्याला जनावरांशी संबंधित सर्वकाही म्हणजे-पाऊस, वातावरण, गवत याची अगदी बारीक-सारीक माहिती असते. तसंच त्यांना जनावरांच्या प्रजनन आणि आरोग्याविषयीदेखिल माहिती असते.
 
'आरोग्य सुविधा वाढल्या तरी भागियाचं महत्त्वं कायम'
 
आजही कच्छमध्ये एखादी गाय आजारी पडली तर भागिया तिच्यावर उपचार करतो.
 
बन्नीमध्ये भागियाची प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. सध्या अनेक ठिकाणी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध आहे. पण पूर्वीच्या काळी भागियांनाच पशूंवर उपचारासाठी पहिली आणि एकमेव पसंती होती.
 
कच्छ जिल्ह्याचे पशू उपसंचालक हरेश ठक्कर यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "भागिया यांना बन्नीतील विविध रोपांची चांगली माहिती असते. तसंच त्यांना पशूंवरील उपचार आणि वासरांचं दूध सोडवताना होणाऱ्या अडचणी तसंच वासरू गाय किंवा म्हशीच्या पोटातून बाहेर येण्यात अडचणी येतात, तेव्हा काय करायचं हेही त्यांना माहिती असतं.
 
कोणत्या वेळी काय करायचं याचं चांगलं ज्ञान त्यांनी पारंपरिक पद्धतीनं मिळालेलं असतं. याच ज्ञानाच्या आधारे शेकडो वर्षांपासून ते जनावरांवर उपचार करत आहेत."
 
"जसा काळ पुढं सरकत आहे, तशी बन्नी परिसरात विकसित पशू उपचारही उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक पद्धतीबरोबरच लोक वैज्ञानिक पशुपालनही अवलंबत आहेत. सध्या भिरंडियाला, होडको आणि सर्वो या तीन गावांमध्ये मोबाइल पशू क्लिनिक आहेत. खावडामध्ये पशू आरोग्य केंद्र आहे. त्यामुळं आता त्यांना आधुनिक उपचाराच्या सुविधाही मिळत आहेत."
पण या आधुनिक उपचार सुविधा पुरेशा नसल्याचंही म्हटलं जातं.
 
"बन्नी येथील गवताच्या मैदानात अंदाजे एक लाख गुरं चरतात. त्यांच्यासाठी किमान 10 डॉक्टरांची गरज आहे. पण इथं एक डॉक्टरही मोठ्या प्रयत्नांनंतर मिळतात. त्यामुळं येथील शेतकऱ्यांना जनावरं आजारी पडल्यास नशिबावर अवलंबून राहावं लागतं. तसंच या उपचारांसाठी पैसा लागतो. तर भागिया पैसेही घेत नाही," असं रमेश भट्टी म्हणाले.
 
तरीही बन्नीमध्ये एखादं जनावर आजारी असेल तर आधी मदत मिळवण्याचा सल्ला दिला जातो, असं बन्नी कॅटल ब्रीडर्स मालधारी असोसिएशनचे कार्यक्रम समन्वयक आणि गोरेवाली गावातील मालधारी ईसाभाई मुतवा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
"म्हैस दूध कमी देत असेल, किंवा तिला दम लागत असेल किंवा नाकात घाम येत असेल, तर बन्नीमधील लोक भागियाला विचारून त्यावर उपचार करतात. पण जर काही गंभीर आजार झाला तर ते आधुनिक उपचारांची मदतही घेतात," असं ते म्हणाले.
 
भागियांना कसं तयार केलं जातं?
हाजी रहीम दाद यांना भागिया नावानंही ओळखलं जातं. ते बन्नीच्या सराडा गावात राहतात. त्यांचं वय 92 वर्ष आहे. ते अगदी हळू-हळू चालतात, पण त्यांनी उपचार केल्यानंतर आजारी म्हशी मात्र धावायला लागतात.
 
गावातील चौकामध्ये बसून त्यांनी आम्हाला माहिती दिली. "एखाद्याचं जनावर आजारी असेल तर आम्ही पाच किलोमीटर किंवा 50 किलोमीटरपर्यंतही जातो. आम्ही ऊंट किंवा घोड्यावर बसून जातो, पायीही जातो. पण आता वृद्धत्वामुळं बाहेर जाणं बंद झालं आहे," असं ते म्हणाले.
 
भागियांना कसं तयार केलं जातं? हा प्रश्न विचारल्यानंतर गुल मोहम्मद यांनी गमतीनं म्हटलं, " ज्या व्यक्तीला निसर्ग आणि प्राण्यांविषयी प्रेम असतं, ते आपोआपच तयार होत असतात. आम्ही जेव्हा मोठ्यांबरोबर गुरं चारण्यासाठी जायचो आणि सावलीत बसून गप्पा मारायचो, तेव्हा मी त्या गप्पा ऐकायचो. कोणती म्हैस कोणत्या प्रजातीची आहे, तिची वैशिष्ट्ये काय? यावर ते चर्चा करायचे."
 
"कोणतं गवत खाल्लं तर जनावरांना फायदा होईल? पावसाळ्यापूर्वी कोणतं गवत खाऊ घालायला हवं. प्राण्यांच्या उपचारात मीठ, खजूर, साखर याचा औषध म्हणून कशाप्रकारे वापर करता येऊ शकतो, हेही मी ऐकलं होतं. हे सर्व ऐकूण मला लक्षात येऊ लागलं होतं. एखादं जनावर आजारी पडलं तर पूर्वजांचं हे संचित ज्ञान कामी येतं. मी उपचाराची काही पद्धत ठरवलेली नाही. ही एक मौखिक परंपरा आहे. मुळात व्यक्तीला प्राणी आणि निसर्गाप्रती आपुलकी, लळा असायला हवा."
भागियांनी बन्नीमध्ये 39 पशू रोगांसाठी 339 पारंपरिक उपचार नोंदवले आहेत. सहजीवन संस्थेनं त्याबाबतचा अहवाल तयार केला आहे.
 
रमेश भट्टी यांनी या अहवालाबाबत माहिती दिली. "2010 मध्ये आम्ही ते दस्तऐवज तयार केले होते. त्यात कोणत्या आजारावर उपचारासाठी कोणत्या रोपाचा कोणता भाग वापरायला हवा, याचा उल्लेख होता."
 
भुजमधील गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजीचे संचालक डॉ. विजयकुमार म्हणाले की, "भागियाकडं जे ज्ञान असतं ते केवळ एकाच व्यक्तीकडं असतं. तोच व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील सदस्याला ते ज्ञान देत असतो. एखाद्याला हे ज्ञान मिळवणं आणि ते पुढ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दशकांचा कालावधी लागतो."
 
भागियांसाठी कोर्सही केला सुरू
बन्नी म्हशींच्या दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी पशुपालक त्याठिकाणी जनावरांच्या मेळ्याचं आयोजन करतात. त्या मेळ्याचं नेतृत्व भागिया करतात.
 
पशू आणि पर्यावरण अभ्यासकांना भागियांची संख्या घटत असल्याची चिंता आहे.
 
"सहजीवन संस्थेनं 2010 मध्ये एक यादी तयार केली होती. त्यात 22 भागियांची नोंदणी होती. आता जवळपास फक्त 12 भागिया शिल्लक आहेत. हेही एक प्रकारचं पर्यावरणाचं नुकसान आहे. जर नवे भागिया तयार झाले नाहीत तर रोपांचं महत्त्वं माहिती असणाऱ्यांची संख्या कमी होईल, आणि शेवटी ती रोपं निरुपयोगी बनतील," असं रमेश भट्टी म्हणाले.
 
सराडामध्ये राहणारे हुसैन जाट म्हणाले की, "आधी प्रत्येक गावामध्ये दोन किंवा तीन भागिया असायचे. आता त्यांची संख्या कमी झाली आहे. आता दोन तीन गावांतही फार शोधून एक भागिया सापडतात."
 
भारती नंजर सहजीवन संस्थेच्या प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर आहेत. त्या म्हणाल्या की, "कच्छ युनिव्हर्सिटी, बन्नी पशू उच्छेसरक मालधारी संघटना आणि सहजीवन संस्था मिळून एक कोर्स चालवतात. त्यात बन्नीतील विविध प्रकारच्या गवतांची ओळख, जनावरांच्या विविध प्रकारच्या प्रजातींची ओळख, बन्नीतील माती, मालधारी म्हणजे काय? बन्नीतील जैव विविधता हे सर्व या अभ्यासक्रमात शिकवलं जातं."
"प्राध्यापक म्हणून विषयातील तज्ज्ञांबरोबर आम्ही भागियांनाही व्याख्यानासाठी बोलावतो. कारण भागियांना कोणतं गवत कोणत्या ऋतूत उगवतं आणि आणि प्राण्यांसाठी त्याची उपयोगिता काय? याचं व्यवहारिक ज्ञान असतं. तज्ज्ञ गवताचं वैज्ञानिक नाव आणि महत्त्वं सांगतात आणि भागिया त्यांची उपयोगिता काय ते सांगतात. हा कोर्स 2019 पासून सुरू झाला आहे. यात सुमारे सत्तर तरुणांनी प्रशिक्षण घेतलं आहे. आता महिलांसाठीही हा कोर्स सुरू करण्यात आला आहे."
 
भारती म्हणाल्या की, "पशुपालनात केवळ पुरुषच असतात असं नाही. महिलांचाही समावेश असतो. त्यामुळं आम्ही त्यांनाही प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. महिलांना वर्गात येणं शक्य नसेल तर आम्ही त्यांच्या गावात जाऊन प्रशिक्षण देतो."
 
भारती स्वतःदेखील महिलांना शिकवण्यासाठी जातात.
 
काळाबरोबर भूमिका बदलली
बन्नीमध्ये पारंपरिक समूह पद्धतीनं पशुपालन केलं जातं. याठिकाणी मालधारी पारंपरिक पद्धतीनं फक्त पशुपालनाचंच काम करतात.
 
इसाभाई मुतवा म्हणाले की, आम्ही जनावरांना कुटुंबातील सदस्याप्रमाणं वाढवतो. एखाद्याच्या म्हशीचं निधन झालं तर लोक त्यांच्या घरी जाऊन बसतात. बन्नीमध्ये जोवर मालधारी परंपरा आहे तोवर भागिया परंपराही कायम राहील. भागियांची संख्या कमी झाली आहे, पण काळाबरोबर भागियांची भूमिकाही बदलली आहे, याचा विचार करायला हवा.
 
"भागिया स्वतः औषधी वनस्पतींपासून औषध तयार करत असेल तर ती गौण बाब आहे. महत्त्वची बाब म्हणजे, भागिया मालधारींना जनावरावर काय उपचार करावेत हा सल्ला देत असतात. प्रत्येकवेळी भागिया स्वतः जाऊन औषध देत नाही. ते औषध सूचवत असतात. एखाद्या वनस्पतीपासून लेप तयार करणं अशा प्रकारचे. आता मोबाइल असल्याने भागियांना सगळीकडे पळावं लागत नाही, हाही एक फायदा आहे. लोक फोनवरही विचारून उपचार करू शकतात."
 
"महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे अशी औषधी रोपं आहेत, जी आजारी जनावरांना लेप म्हणून लावता येतात किंवा त्यांना देता येतात. तसं केल्यानं जनावरांना आराम मिळतो."
 
गुल मोहम्मद म्हणतात की, "मला जनावरं आजारी असल्याचे अनेक फोन येतात. मी त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध औषधी आणि खाद्य सूचवतो. मला राजस्थानातूनही कॉल येतात."
 
हवामान बदलाने बन्नीतील गवत कसं बदललं?
हवामान बदलाचा परिणाम बन्नीमध्येही दिसू लागला आहे. डॉ. विजयकुमार म्हणाले की, "बन्नीमध्ये 900 पेक्षा अधिक रोपांचे नमूने नोंदवले आहेत. त्यापैकी सुमारे 400 रोपांचं औषधी महत्त्वं आहे."
 
हवामान बदलामुळं बन्नीमधील गवताची उंची हळू हळू कमी झाली आहे. पावसातील फरकामुळं गवतातही फरक पडत आहे.
 
"गेल्या काही वर्षामध्ये कच्छ आणि बन्नीमध्ये प्रचंड पाऊस झाला आहे. पाणी साचतं. काही ठिकाणी गवताचं उत्पादन वाढलं आहे, तर काही ठिकाणी कमी झालं आहे. गवताचा आकारही बदलला आहे. आधी बन्नीमध्ये दीर्घकाळ पाऊस असायचा. पण पाणी साचलेलं नसायचं. ते वाळवंटात निघून जायचं. त्यामुळं लगेचच गवत उगवायचं. आता पाणी साचलेलं असल्यामुळं धमोर, खेवई, काल अशा गोड गवताचं प्रमाण कमी झालं आहे," असं रमेश भट्टी सांगतात.
 
प्राण्यांवरील परिणामाबाबत बोलताना गुल मोहम्मद म्हणाले की, "जास्त गर्मीमुळं गायी-म्हशींचा कमी दिवसांत मृत्यू होत आहे. आधी असं होत नव्हतं."
 
जनावरांच्या वर्तनावरून पावसाचं भाकित
ज्योतिषी जनावरांच्या वर्तनावरून पावसाचं भाकित करत असतात. रमेश भट्टी यांच्या मते, "2012 मध्ये दीर्घ काळापर्यंत पाऊस झाला होता. कच्छमध्ये साधारणपणे जुलैमध्ये पाऊस होत असतो. पण त्यावर्षी 20 सप्टेंबरपर्यंत पाऊस झाला नाही. त्यामुळं गुरं चारणारे पशूधनासह इतर ठिकाणी निघून गेले होते."
 
"त्यावेळी माझी भेट भागिया सलीम नोड (ज्यांना आम्ही सलीममामा म्हणतो) यांच्याबरोबर झाली होती. त्यांनी म्हशींबरोबर गावातच राहणं पसंत केलं होतं. मी विचारलं तुम्ही जनावरं घेऊन का गेले नाही? ते म्हणाले-मी रोज जनावरांच्या वर्तनाचा अभ्यास करत असतो. त्यांनी मला पाऊस होणार आहे, असे संकेत दिले आहेत. त्या आठवड्यानंतर उगमनी बन्नी आणि कच्छच्या काही भागांत चांगला पाऊस झाला. मी जेव्हा परत सलीममामा यांना भेटलो तेव्हा ते म्हशींच्या वर्तनावरून अंदाज कसा लावतात, असं विचारलं? ते म्हणाले की, उन्हाळ्यानंतर बन्नीमध्ये गवत कमी होतं आणि जनावरंही प्रचंड उपाशी असतात."
 
"जर म्हशी सकाळच्या वेळी कळपात आरामानं बसलेल्या असतील, तसंच चरण्यासाठी जातानाही त्या कळपानं जात असतील आणि आरामात चरत असतील, तर म्हशींना पाऊस होणार असा विश्वास आहे, हे आमच्या लक्षात येतं. म्हशी जर धावत चरण्यासाठी जात असतील, तर पाऊस होणार नाही, असं समजून जावं."
 
अशाच एका घटनेबाबत भट्टी यांनी सांगितलं. "एकदा आम्ही चरीडांडला कार घेऊन गेलो. तिथं आमची भेट उंटाबरोबर असलेल्या एका व्यक्तीबरोबर झाली. तेही शरणार्थी होते. त्यांनी आम्हाला सांगितलं इथून लगेच जा पाऊस होणार आहे. पण आकाशात ढगाचं चिन्हंही नाही, तर पाऊस होणार असं तुम्हाला का वाटतं? असं आम्ही म्हणालो. त्यांनी आम्हाला सांगितलं की, उंटाच्या खांद्यावर घाम येत आहे."
 
"जेव्हा पाऊस पडणार असतो, तेव्हाच असं होत असतं. दुसरी बाब म्हणजे, उंट बसलेले असतात आणि आमच्या आदेशानंतरच चालू लागतात. आता ते कोणत्याही आदेशाविना चालू लागले आहेत. त्यांचं म्हणणं खरं निघालं. अर्ध्या तासानं पाऊस झाला आणि आमची कारही तिथं अडकली.''
 
" त्यामुळं भागिया अत्यंत सधन, संपन्न आहेत. पण हवामान बदलामुळं भागियांनाही अंदाज लावणं कठिण ठरत
 


















Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments