Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सम्राट अशोक : इंग्रजांच्याही हजारो वर्षे आधी भारताच्या सर्वात मोठ्या भूभागावर राज्य करणारा महान सम्राट

Webdunia
रविवार, 1 सप्टेंबर 2024 (11:25 IST)
सम्राट अशोकांबद्दल असं म्हटलं जातं की, त्यांच्या साम्राज्याचा विस्तार एवढा प्रचंड होता की जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड एकाच साम्राज्याखाली आला होता.भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासावर अमिट छाप उमटवणाऱ्या सम्राट अशोकांचा कार्यकाळ 40 वर्षांचा होता.
 
तामिळनाडू आणि केरळ ही दक्षिणेतील दोन राज्ये सोडली तर आजचा संपूर्ण भारत, पूर्ण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा किमान पूर्वेकडील भाग सम्राट अशोकांच्या अधिपत्याखाली होता.
इतकंच नाही तर बौद्ध धर्माला वैश्विक धर्माच्या पातळीवर पोहोचवण्यात देखील अशोक यांना यश आलं. प्रत्यक्षात त्या काळात बौद्ध धर्माचे फार कमी अनुयायी होते.

त्यांच्या राजवटीत समाजात निर्माण करण्यात आलेल्या मूल्यांचा प्रभाव आजही पाहायला मिळतो.
चार्ल्स अ‍ॅलन यांनी 'अशोका द सर्च फॉर इंडियाज लॉस्ट एम्परर' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात चार्ल्स लिहितात की, "अशोक यांना खऱ्या अर्थानं भारताचे संस्थापक किंवा पितामह म्हटलं जाऊ शकतं."
अशोकच्याच काळात पहिल्यांदा भारताची एक राष्ट्र म्हणून उभारणी झाली. आधुनिक काळात महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मूल्याचा विस्तार केला. मात्र त्याच्या कितीतरी आधी, प्राचीन काळात सम्राट अशोक यांनीच अहिंसा मूल्याचा अंगिकार करत ती मूल्ये संपूर्ण भारतात रुजवली होती.
कल्याणकारी राज्याची स्थापना करणारा जगाच्या इतिहासातील पहिला राजा म्हणजे सम्राट अशोक.
अनेकजण सम्राट अशोक यांच्याकडं अनेक अंगांनी पाहतात. त्यांना अशोकची विविध रुपं दिसतात.
 
ती रुपं म्हणजे, एक विजेता ज्यानं युद्धाचे भयंकर परिणाम पाहून विजयाचा, आक्रमक वृत्तीचा त्याग केला. जणू त्याचं व्यक्तिमत्व नंतर संतासारखं झालं होतं. किंबहुना संत आणि सम्राटाचा अद्भूत संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात निर्माण झाला होता.
 
एक अद्वितीय राजकारणी ज्याला मानवी मूल्यांचं सखोल आकलन आणि जाणीव होती. रोमिला थापर यांनी 'अशोक अँड द डिक्लाइन ऑफ मौर्याज' हे पुस्तक लिहिलं आहे.
 
या पुस्तकात त्या लिहितात की, अशोक अनेक अंगांनी त्या काळाचं प्रतिनिधित्व करत होते. त्यांचं सर्वात मोठं यश म्हणजे त्यांनी तो काळ लक्षात घेतला आणि त्या काळानुरुप भारतासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी केल्या.
 
मौर्य वंशाचा तिसरा राजा
सम्राट अशोकांची कहाणी त्यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य आणि चंद्रगुप्त यांना मगधचा सम्राट बनवणाऱ्या चाणक्यांपासून सुरू होते.
 
अशोक हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक असलेल्या चंद्रगुप्त मौर्यांचे नातू होते. इसवीसन पूर्व 323 मध्ये अनेक अलेक्झांडरच्या (सिकंदर) मृत्यूनंतर एक-दोन वर्षाच्या आतच सिंधू नदीच्या पूर्वेकडील भागातून ग्रीकांचं राज्य संपुष्टात येऊ लागलं होतं.
 
चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त मौर्यांना सुरुवातीला धना नंदा विरोधात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, नंतर चंद्रगुप्तांनी धना नंदाचा पराभव करत उत्तर भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला.
चंद्रगुप्त मौर्याचा कार्यकाळ 24 वर्षांचा होता. या कालावधीत त्यांचं सैन्य अजिंक्यच राहिलं.
 
अलेक्झांडरच्या साम्राज्याचा गमावलेला भूभाग पुन्हा आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा प्रयत्न सेल्युकसनं इसवीसन पूर्व 305 मध्ये केला. त्यावेळी तो बॅबिलॉन आणि पर्शियाचा राज्यकर्ता होता.
 
पण, चंद्रगुप्त मौर्यांनी सेल्युकसचा पराभव केला. चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसार मगधे सम्राट बनले. चाणक्य बिंदुसाराचेही मार्गदर्शक होते.
 
अशोक मगधचे राजे बनण्यामागे, चाणक्यचे नातू आणि शिष्य राधागुप्त यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
ए एल बाशम यांनी त्यांच्या 'द वंडर दॅट वॉज इंडिया' या पुस्तकात याबाबत लिहिलं आहे. "बिंदुसारचा मुलगा सुसिमा त्याच्या साम्राज्याचा वारसदार होता. बिंदुसारानंतर तोच मगधचा राजा होईल, असं मानलं जात होतं."
 
"बिंदुसारच्या वारसदारांमध्ये अशोकचा क्रमांक खूप मागे होता. अशोकांची शरीरयष्टीही प्रभावी नव्हती. उंची बेताची होती आणि स्थूलही होते. त्यांना त्वचारोगही होता, त्यामुळं ते कुरूप दिसायचे."
 
"कदाचित यामुळंच बिंदुसार त्यांच्यावर नाराज असायचे, चिडचिड करायचे. संभाव्य वारसदारांच्या यादीतून त्यांनी अशोकांचं नाव काढून टाकलं होतं."
 
विदिशात व्यापाऱ्याच्या मुलीशी प्रेम आणि लग्न
या कारणांमुळे पाटलीपुत्र या राजधानीच्या शहरापासून दूर असलेल्या तक्षशिलेत जेव्हा बंड झालं तेव्हा राजा बिंदुसार यांनी बंड मोडून काढण्यासाठी अशोक यांना पाठवलं.
 
त्यानंतर अशोक यांना मध्य भारतात उज्जैनमध्ये सम्राटांचे राजप्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यावेळी अशोक विदिशामध्ये एक स्थानिक व्यापारी महादेवी साक्या कुमारी या सुंदर मुलीच्या प्रेमात पडले.
 
'अशोक अँड द डिक्लाइन ऑफ मौर्याज' या पुस्तकात रोमिला थापर लिहितात की, "दीपावामसामध्ये या लग्नाचा कोणताही उल्लेख नाही. मात्र, या लग्नानंतर अशोक यांना दोन मुलं झाली, महिंदा आणि संघमित्रा. याच मुलांना पुढं अशोक यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवलं होतं."
"अशोक मौर्य साम्राज्याचे सम्राट झाल्यानंतर महादेवीनं पाटलीपुत्रला जाण्याऐवजी विदिशामध्येच राहणं पसंत केलं. महादेवी बौद्ध होत्या असंही म्हटलं जातं. त्याकाळी विदिशा बौद्ध धर्माचं एक केंद्र होतं."
 
"आणखी एक कारण म्हणजे महादेवी व्यापाऱ्याची मुलगी होती. त्यामुळं त्यांचं समाजातील स्थान शाही कुटुंबाच्या बरोबरीचं नव्हतं."
 
भावांची हत्या करून मिळवले राज्य
अशोका यांचा मोठा भाऊ सुसिमा याची बिंदुसारनं वारसदार म्हणून निवड केली होती.
 
मात्र, इसवीसनपूर्व 274 मध्ये मौर्य साम्राज्यात आणखी एक बंड झालं. ते बंड मोडून काढण्यासाठी युवराज सुसीमाला पाठवण्यात आलं.
 
पण आधीपेक्षा बंड अधिक गंभीर स्वरुपाचं होतं. त्यामुळं युवराज सुसिमाला तक्षशिलात बराच काळ थांबावं लागलं.
 
त्याच दरम्यान राजा बिंदुसार फारच आजारी पडले. त्यांनी सुसीमाला परत येण्याचा आणि त्याजागी अशोक यांना तक्षशिलेला जाण्याचा आदेश दिला. राधागुप्त हा बिंदुसारचा एक मंत्री अशोक यांचा समर्थक होता.
राधागुप्तनं हस्तक्षेप करत बिंदुसारांनी दिलेला आदेश थांबवण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात चार्ल्स अ‍ॅलन लिहितात की, "अशोकनं आजारी पडल्याचं नाटक केलं. त्याचबरोबर त्यानं वडिलांनी त्याला तात्पुरता राजा म्हणून घोषित करावं, अशी मागणीही केली."
 
हे ऐकताच बिंदुसार यांना धक्का बसला आणि अपस्माराचा झटका (फिट येणं) आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
 
सुसिमा जेव्हा पाटलीपुत्रमध्ये परत आले तेव्हा त्यांना वडिलांच्या पश्चात अशोकनं पाटलीपुत्रवर वर्चस्व मिळवलं आहे, हे समजलं. पाटलीपुत्रच्या मुख्य प्रवेशद्वाराचं संरक्षण ग्रीसहून भाडेतत्वावर आणण्यात आलेले सैनिक करत होते.
यानंतर मौर्य साम्राज्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी मोठा संघर्ष झाला. हा संघर्ष चार वर्षे चालला. पाटलीपुत्रच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर सुसीमाची हत्या हा या संघर्षाचा पहिला टप्पा होता.
 
या संघर्षात अशोकांनी इतर 99 सावत्र भावांचीही हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:ला मगधचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा राजा घोषित केलं.
 
सुनील खिलनानी यांनी 'इनकार्नेशंस इंडिया इन फिफ्टी लाइव्हज' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात, "प्रत्यक्षात सहा भाऊ मारले गेले होते."
 
"मात्र राज्य मिळवण्यासाठी रक्तपात आणि संघर्ष झाला आणि तो अनेक वर्षे चालला यात कोणतीही शंका नाही. त्यावेळी अशोक यांचं वय 34 वर्षे होतं."
 
अशोकांच्या सहा पत्नी
राज्याभिषेकाचा आनंद साजरा करताना अशोकांनी आणखी एका राजकुमारीशी विवाह केला.
 
अशोकांच्या जनानखान्यात अनेक महिला होत्या. मात्र त्यातील अनेकांना अशोक आवडत नसे. अशोकांनी त्या महिलांना जिवंत जाळलं होतं, असं म्हटलं जातं.
 
त्यामुळंच अशोकांना 'कंडाशोका' देखील म्हटलं जायचं. पाटलीपुत्रच्या गादीवर बसल्यानंतर त्यांनी विदिशातील पत्नी आणि दोन्ही मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतलं.
सम्राट अशोक यांना किमान सहा पत्नी होत्या. प्रयागराज (अलाहाबाद) मध्ये असलेल्या एका शिलालेखात कारुवकी ही अशोक यांची दुसरी पत्नी असल्याचं म्हटलं आहे.
 
या सहा पत्न्यांमध्ये असंधीमित्र ही अशोक यांची मुख्य पत्नी होती. अशोक मौर्य साम्राज्याचे सम्राट झाल्यानंतर 13 व्या वर्षी तिचं निधन झालं होतं.
 
इसवीसनपूर्व 265 मध्ये अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अर्थात, स्वत: अशोकांनीच मान्य केलं आहे की, सुरुवातीच्या दीड वर्षात त्यांनी बौद्ध धर्म फार गांभीर्यानं घेतला नव्हता.
 
अशोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर दोन वर्षांच्या आत त्याची मुलं, महिंदा आणि संघमित्रा हे दोघेही बौद्ध भिक्खू आणि साध्वी झाले.
 
कलिंगचं रक्तरंजित युद्ध
असं मानलं जातं की, इंग्रजांआधी भारताच्या सर्वात मोठ्या भूभागावर राज्य करणारा राजा म्हणजे सम्राट अशोक होते.
 
ते राजा बनले तेव्हा रोम आणि कार्थेज यांच्यात पहिलं प्युनिक युद्ध सुरू होतं. फारसमध्ये भयंकर संघर्ष सुरू होता. चीनचा सम्राट द ग्रेट वॉल बांधत होता.
 
इसवीसनपूर्व 362 मध्ये अशोकांनी कलिंग विरुद्ध युद्ध केलं होतं.
 
या युद्धात प्रचंड नरसंहार झाला. या युद्धात जवळपास एक लाख लोक मारले गेले. इतकंच नाही तर या युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटामुळेही जवळपास तेवढेच लोक मेले होते.
या युद्धानंतर दीड लाखांपेक्षा अधिक लोकांना कैद करण्यात आलं होतं किंवा तिथून हकलण्यात आलं. मारले गेले त्यातील बहुतांश लोक सामान्य नागरिक होते.
 
पॅट्रिक ओलिवेल यांचं 'अशोका पोर्ट्रेट ऑफ अ फिलॉसॉफर किंग' हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं आहे. त्यात ते म्हणतात, "त्यावेळी कलिंगची लोकसंख्या 9 लाख 75 हजार होती, असं सुमित गुहा सांगतात."
 
"समजा कलिंगची लोकसंख्या 10 लाख होती, असं मानलं तरी मरणाऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 20 टक्के होती. शिवाय त्यात कैद्यांची संख्या जोडली तर एकूण लोकसंख्येच्या 35 टक्के लोकांवर या युद्धाचा परिणाम झाला होता."
 
"या दृष्टीकोनातून या युद्धाला नरसंहार म्हटलं, तर ते चुकीचं ठरणार नाही."
 
बुद्धांचे अनुयायी कसे बनले?
कलिंग युद्धातील विजयामुळे अशोकच्या साम्राज्याचा विस्तार बंगालच्या खाडीपर्यंत झाला होता. पुढची 37 वर्षे हा प्रदेश अशोकच्या अधिपत्याखाली होता. मात्र, हे युद्ध इतकं रक्तरंजित होतं की, या युद्धामुळे अशोकवर प्रचंड परिणाम झाला. त्याचं अंतर्मन ढवळून निघालं आणि विवेकबुद्धी जागी झाली.
 
त्याने सार्वजनिकरित्या या युद्धाबाबत दु:ख व्यक्त केलं. या युद्धानंतर अशोकच्या जीवनात मोठा बदल झाला. या युद्धानंतर अशोकनं भारतात नवीनच असलेल्या बौद्ध धर्माच्या विचारांचा अंगिकार केला.
 
अशोकच्या राजवटीत भारतीय समाजात जितकं वैविध्य होतं, तितकं त्यापूर्वी कधीच नव्हतं. विविधतेनं नटलेल्या या समाजाला एकत्र ठेवण्यासाठी एका अत्यंत लवचिक अशा वैश्विक दृष्टीकोनाची आवश्यकता होती.
चार्ल्स अ‍ॅलन लिहितात की, "कलिंगच्या युद्धामुळे नावाला बौद्ध असलेले सम्राट अशोक पूर्णपणे बौद्ध धर्माचे अनुयायी बनले. त्यानंतर सम्राट अशोक यांनी आपल्या साम्राज्याची जडणघडण गौतम बुद्धाच्या शिकवणीनुसार असलेल्या नैतिक मूल्यांच्या आधारे केली."
 
"चांगल्या शासकाप्रमाणे अशोक जनतेसाठी उपलब्ध झाले. रयतेचा विचार करू लागले. मात्र अशोकांनी मांडलेली मतं फक्त काही मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचू शकत होती."
 
"अशोक यांची अशी इच्छा होती, की त्यांचे विचार सर्व जगापर्यंत पोहोचावे. यासाठी त्यांने लेखनाद्वारे विचार पोहोचवण्यासाठी पावलं उचलली."
 
यासाठीच अशोकांनी अनेक शिलालेख लिहून घेतले होते.
 
लोकभाषेतून संदेश देणारा सम्राट
अशोक यांनी त्यांचे संदेश प्राकृत भाषेत लिहिले. त्याकाळी संपूर्ण मौर्य साम्राज्यात प्राकृत बोलली जायची. सुनील खिलनानी लिहितात की, "सर्व मौर्य सम्राटांमध्ये अशोकांची संवाद शैली सर्वात वेगळी होती."
 
"सातव्या शिलालेखात अशोकांनी म्हटलं होतं की, जिथे जिथे शिळा असतील किंवा दगडी स्तंभ असतील तिथे त्यांचे शब्द कोरण्यात यावेत. जेणेकरून ते दीर्घकाळ टिकतील."
 
"जोपर्यंत माझे वंशच राज्य करतील किंवा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात तळपत राहतील तोपर्यंत लोकांपर्यंत हे शब्द पोहोचले पाहिजेत, त्यांना वाचता आले पाहिजेत. बहुतांश शिलालेखांमध्ये अशोकांचा उल्लेख तृतीय पुरुषी म्हणजे 'ते' असा करण्यात आला आहे."
"मात्र काही शिलालेखांमध्ये प्रथम पुरुषी म्हणजे 'मी' अशा स्वरुपात देखील कोरण्यात आलं आहे. यातून आपल्याला त्या शिलालेखांमधील व्यक्तीच्या संवेदनशीलतेची झलक पाहायला मिळते."
 
अशोकांचे बहुतांश शिलालेख प्राकृत भाषेत असून ते ब्राह्मी लिपित कोरण्यात आले आहेत. तर काही शिलालेख ग्रीक आणि अरमाइकी लिपिमध्ये देखील कोरण्यात आले आहेत.
 
सहिष्णुता आणि अंहिसेवर भर
सम्राट अशोकांनी बुद्धाच्या 'धम्मा'ची शिकवण अंमलात आणली.
 
अध्यात्मिक पावित्र्य आणि चालीरितींवर 'धम्म' आधारलेला नव्हता. तर जगण्यातील आचार, व्यवहारांवर 'धम्म' आधारलेला होता.
 
या विचारांमध्ये सहिष्णूतेवर भर देण्यात आला होता तर हिंसेला धारा नव्हता. रोमिला थापर लिहितात की, "अशोकनं ज्या मूल्यांना सर्वाधिक महत्त्व दिलं त्यातील पहिलं म्हणजे विविध मतांचं, मतांतरांचं सहअस्तित्व."
 
"अशोक यांना वाटतं होतं की, सर्वांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. एकमेकांच्या मतांचा, विचारांचा आदर केला पाहिजे. सहजीवनाच्या भावनेनं राहण्यास शिकलं पाहिजे."
 
"इतरांच्या संप्रदायाचा आदर केला पाहिजे. कारण इतरांच्या संप्रदायांचा आदर करूनच तुम्हाला स्वत:च्या संप्रदायाचा आदर करता येईल."
"धम्माचं हे मुख्य मूल्य किंवा सूत्र आहे. मला ही गोष्ट लक्षवेधी वाटते की या मूल्यावर किती भर दिला गेला आहे. बहुधा त्याकाळी विविध संप्रदायांमध्ये खूपच शत्रूत्वाची भावना असावी."
 
धम्मानुसार जनतेचं कल्याण, त्यांचं आरोग्य आणि सुखाबद्दल विचार करणं आणि त्यासाठी काम करणं हे राजाचं किंवा शासकाचं कर्तव्य आहे.
 
रस्त्याच्या कडेला वडाची किंवा आंब्याची झाडं लावणं आणि प्रवाशांच्या जेवणाची आणि विश्रांतीची व्यवस्था करणं हे देखील राजाचं कर्तव्यं आहे.
 
अशोकांचा सर्वात प्रभावी विचार आणि संदेश 12 व्या शिलालेखात कोरण्यात आला आहे. यात धार्मिक सहिष्णुतेवर भर देण्यात आला आहे. अशोक याला बोलण्यातील संयम म्हणजे वाक संयम म्हणतात.
 
शिलालेखात लिहिलं आहे की, "आपल्या धर्माबद्दल असणाऱ्या प्रचंड भक्तीमुळे त्याची स्तुती किंवा गुणगान करतो आणि त्याचवेळी इतर धर्मांची निंदानालस्ती करतो. ते आपल्याच धर्माचं नुकसान करत असते."
 
"त्यामुळे निरनिराळ्या धर्मांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. त्यांच्यात संवाद असला पाहिजे. सर्वांनीच इतरांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत, ऐकले पाहिजेत आणि त्यांचा आदर केला पाहिजे."
 
अशोकांचं देहावसान
अशोकांच्या मृत्यूनंतर विशाल आणि शक्तिशाली मौर्य साम्राज्यं उतरणीला लागलं. अखेरच्या काळात मौर्य साम्राज्याची धार्मिक आस्था शिखरावर पोहोचली होती.
 
धार्मिक समर्पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं की त्यांनी सर्व खजिनाच त्यासाठी रिता केला होता. बौद्ध कथांनुसार आपल्याकडं असलेलं सर्वकाही त्यांनी दान केलं होतं.
ली रौंगजी त्यांच्या 'द ग्रेट तांग डायनेस्टी रेकॉर्ड ऑफ द वेस्टर्न रीजन' या पुस्तकात लिहितात की "अशोक जेव्हा आजारी आणि मृत्युशय्येवर होते, तेव्हा त्यांना माहिती होतं की आता त्याचं जीवनकार्य संपलं आहे. या आजारातून आपण बरे होणार नाही."
 
"आपले सर्व मौल्यवान रत्न, दागिने चांगल्या कामासाठी दान करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र तोपर्यंत त्यांच्या मंत्र्यांनी सत्ता ताब्यात घेतली होती. त्यामुळं अशोक यांनी त्यांनी काहीही करू दिलं नाही."
 
इसवीसनपूर्व 232 मध्ये सम्राट अशोकांचं देहावसान झालं.
 
मौर्य वंशाचा अंत
बृहद्रथ मौर्य हा मौर्य वंशाचा शेवटचा राजा होता. इसवीसनपूर्व 181-180 मध्ये पुष्यामित्र या त्याच्याच सेनापतीनं त्याची हत्या केली होती.
 
त्यानंतर पुष्यामित्रानं शुंग वंशाची स्थापना केली. मौर्य वंशाची राजवट एकूण 137 वर्षे होती.
 
रोमिला थापर लिहितात की, "हान आणि रोमन राजवंशांच्या तुलनेत मौर्य वंशाची राजवट कमी काळ होती. मौर्य साम्राज्याची सुरुवात चंद्रगुप्त मौर्याच्या विजयानंतर झाली होती. त्यानंतर चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोकच्या काळात मौर्य साम्राज्य शिखरावर पोचलं होतं, त्याला प्रचंड वैभव प्राप्त झालं होतं."
"मात्र सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याची घसरण वेगाने झाली. अशोक यांचा मुलगा आणि नातू आपल्या आजोबा आणि पणजोबांइतक्या क्षमतेचे आणि त्यांच्या इतके कर्तबगार नव्हते. त्यांची राजवट देखील कमी काळ होती."
 
"त्यामुळं नंतरच्या काळात अशोकांच्या अनेक वारसांमध्ये मौर्य साम्राज्य विखुरलं गेलं. त्याची वाताहात झाली आणि साम्राज्याचे अनेक तुकडे झाले."
 
पूर्वजांप्रमाणे अशोकांच्या वंशजांमध्ये लेखन क्षमताही नव्हती. त्यामुळं सम्राट अशोकाप्रमाणे त्यांनी कोणतेही शिलालेख देखील कोरले नाहीत.
 
स्वतंत्र भारताने अंगिकारला अशोकचा वारसा
अशोकांच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्य लयाला जावू लागलं. अखेर सम्राट अशोकांना भारतीय लोक एकप्रकारे विसरूनच गेले. हळूहळू प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपी मागे पडत गेली आणि त्यांचा वापरही बंद झाला. शिलालेखांवर लिहिलेले अशोकचे संदेश लोकांना वाचता येईना झाले.
 
पण, नियतीचा खेळ पाहा. भारताच्या या वैभवशाली आणि विस्मृतीत गेलेल्या इतिहासाचा शोध 19 व्या शतकात लागला.
 
विशेष म्हणजे हा शोध लावला भारताला गुलाम बनवणाऱ्या इंग्रजांनीच. सम्राट अशोक आणि त्यांच्या इतिहासाचा शोध विलियम जोन्स आणि जेम्स प्रिंसेप या दोन ब्रिटिश इतिहासकरांनी लावला.
 
त्यांनी विस्मृतीत गेलेल्या ब्राह्मी लिपिचा शोध लावला आणि ती लोकांना उलगडून दाखवली. त्यामुळे सम्राट अशोकांच्या शिलालेखांचं वाचन करता येणं शक्य झालं.
 
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या फक्त एक महिना आधीच जुलै, 1947 मध्ये राज्यघटना सभेत बोलताना जवाहरलाल नेहरू यांनी एक प्रस्ताव सादर केला.
भारताच्या राष्ट्रीय झेंड्याची रचना कशी असावी यासाठी तो प्रस्ताव होता. यात अशोक चक्राला भारताच्या तिरंग्याच्या मध्यभागी स्थान देण्यात आलं.
 
त्यावेळी जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, या झेंड्याशी आपण फक्त अशोकांचं प्रतिकचं जोडलेलं नाही तर भारत आणि जगाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती असलेल्या सम्राट अशोक यांनाही आपण जोडून घेतलं आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे.
 
भारतीयांसाठी अशोक इतके प्रेरणादायी व्यक्तिमत्वं आहे की, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अशोकांना राष्ट्र संरक्षक संताचा दर्जा दिला.
 
अशोकांचे चार सिंह फक्त भारताच्या पोस्ट ऑफिस तिकिटांवरच नाहीत तर ते भारताचं राष्ट्रीय चिन्हंही आहे. संपूर्ण भारतीय जीवनाचं ते एक अभिन्न प्रतिक बनलं आहे.
 
हे चिन्ह शांततापूर्ण सहअस्तित्वांचं, सहिष्णुतेचंही प्रतिक आहे. सम्राट अशोकांचा सार्वजनिक जीवनातही संयम ठेवण्याचा आणि स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचा संदेश आजच्या भारतीयांसाठी इशारा देखील आहे आणि प्रेरणादेखील.
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

आश्चर्यकारक! माणसाने गिळली जिवंत कोंबडी, जीव गुदमरुन मृत्यु

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण, गुन्हा दाखल

अमित शहांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर संतापले, म्हणाले- भाजपची जुनी मानसिकता समोर आली

LIVE: मुंबईत सीबीआयची धाड,भ्रष्टाचार प्रकरणी दोन आयआरएससह 7 जणांना अटक

मुंबई बोट दुर्घटना: बचाव कार्यात हेलिकॉप्टर गुंतले, 77 प्रवाशांची सुटका, 2 ठार

पुढील लेख
Show comments