Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी पुरोगामी आहे की प्रतिगामी?

Webdunia
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 (12:08 IST)
दिनांक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत पान क्र. १ वर श्री. राजीव काळे यांचा "लढाई बिकट आहे..." हा लेख वाचला. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून किंबहुना, येणार आहे अशी धास्ती वाटू लागल्यापासून स्वतःला स्वतःच पुरोगामीत्वाचा मुकुट चढवणार्‍या मंडळींनी कंबर कसलेली आहे. हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही पुरोगामी आहात. परंतु शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महानतेस ठेच न पोहोचवता त्यांच्यासोबत सावरकर आदी महापुरुषांची नावे घेऊ लागलात तर तुम्ही प्रतिगामी आहात, असा अट्टाहास या स्वघोषित पुरोगामी मंडळींचा आहे. कोण पुरोगामी आणि कोण प्रतिगामी याची एक सीमा रेषा या स्वघोषित पुरोगाम्यांनी आखून ठेवली आहे. कदाचित यांच्याकडे एक वैचारिक(?) मोजपट्टी असेल, त्या मोजपट्टीने पुरोगामी आणि प्रतिगामींधला फरक ते मोजत असावेत. असो. इतकी वर्ष कॉंग्रेसचे सरकार असल्यामुळे हे पुरोगामी निश्चिंत होते. कॉंग्रेसचा भ्रष्टाचार ह्यांना आपलासा वाटत होता. आता अचानक एकाएकी देशात हाहाकार माजत आहे, देश आणीबाणीकडे जात आहे वगैरे अशी भिती पसरवली जात आहे. कारण हे जे सरकार आहे ते आपलं नाही, आपल्या विचारांच्या विरोधातलं आहे किंवा आपण त्यांचे विरोधक आहोत, म्हणूनच स्वघोषित पुरोगामी या सरकारला दुषणे देत आहेत. सरकारकडून चुका होत असतीलही, त्यावर कुणालाही टीका करण्याचा अधिकार आहेच. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात तर आहेच. पण सरकारवर टीका करत असताना ही पुरोगामी विरिद्ध प्रतिगामी अशी लढाई आहे, असं ठासून सांगितलं जात आहे. ज्या लोकशाहीत पुरोगाम्यांना टीका करण्याचा अधिकार आहे त्याच लोकशाहीने टीकाकारांचे खंडन करण्याचा अधिकारही दिला आहे, हे स्वघोषित पुरोगामी विसरतात. 
 
श्री. राजीव काळे यांच्या लेखाचा रोख सुद्धा असाच आहे. ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध आणि पुरोगामी विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी मडगाव येथे दक्षिणायन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमिवर श्री. काळे यांनी लेख लिहिला आहे. २२ नोव्हेंबरला कुबेर साहेबांनी याच विषयावर "पुरोगाम्यांचे प्राक्तन" या मथळ्याचा अग्रलेख लिहिला होता. श्री. कुबेर यांनी पुरोगाम्यांचा समाचार घेत पुरोगामी चळवळ का मागे पडत गेली, पुरोगामी लोक कसे चुकतात या मुद्द्यांचा उहापोह केला आहे. श्री. काळे सुद्धा साधारण तशाच प्रकारची कानउघडणी करतात. पण काळेंचा रोख अगदी स्पष्ट आहे. काळेंना कोण पुरोगामी आणि कोण प्रतिगामी हे माहित आहे. काळे लिहितात की "दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्येशी संबंध असल्याचा संशय ज्यांच्यावर आहे, वा ज्यांच्यावर त्या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत त्यांचे मडगावशी घनिष्ट नाते आहे. त्यामुळे मडगावला दक्षिणायन परिषदेचे आयोजन करण्यात आले असणार." हे त्यांचं म्हणणं योग्य असू शकतं. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी त्यांची निर्घृण हत्या करणारे लवकरात लवकर सापडावेत आणि त्यांना कठोर शासन व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. पण या दाभोलकर आदी मंडळींची हत्या करणारे प्रतिगामी आहेत, असं पुरोगाम्यांचं म्हणणं आहे आणि ते प्रतिगामी एका विशिष्ट समाजाचे आहेत, असं अनेक पुरोगाम्यांनी म्हटल्याचं आपण ऐकलं असेल. भगवा आतंकवाद हा शब्द आपल्याला आठवत असेलच. एरव्ही आतंकवादाला धर्म नसतो. काळे पुढे लिहितात, "जानेवारी २०१८ मध्ये याच दक्षिणायनने भव्य संमेलनासाठी नागपूरची निवड करण्यामागील कारण तर अगदीच स्पष्ट. सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपची मातृ-पितृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरमध्ये. केंद्रातील मोदी सरकार असो वा महाराष्ट्रसह अनेक राज्यांतील भाजपची सरकारे; त्यांची सूत्रे नागपूरमधून नियंत्रित होणार, ही सर्वज्ञात बाब. त्यासाठी नागपूरची निवड." म्हणजे पुरोगाम्यांची लढाई उघड उघड भाजपच्या विरोधात आहे. असे काळेंना सुचवायचे आहे. त्यांना खात्री आहे किंवा त्यांच्या विश्वसनीय सुत्रांनी त्यांना सांगितले आहे की भाजपची सूत्रे नागपूरातून हलतात. पण त्यांना असेही सुचवायचे आहे की ही बाब सर्वज्ञात आहे. सर्व म्हणजे कोण? कदाचित पुरोगामीच. नागपूरमध्ये संघाच्या कार्यालयात काय होते? हे एकदा स्वघोषित पुरोगाम्यांनी याची  देही याची डोळा पाहायला हरकत नाही. परंतु त्याची विशेष गरज नाही. कारण पुरोगाम्यांना जे वाटते ते सत्यच आहे असं मानण्याची सहिष्णू प्रथा आहे. मडगाव ते नागपूर असा जो पुरोगाम्यांचा प्रवास असणार आहे तो काही मला उमगला नाही. दोभोलकरांचे आरोपी मडगावशी सबंधीत आहेत, म्हणून मडगावला दाक्षिणायन परिषदेचे आयोजन केले हे कळते व त्यामागील गांभीर्य सुद्धा जाणवतं. पण काळेंना वाटतं की नागपूरमध्ये होणारी परिषद ही संघा विरुद्ध आहे किंवा भाजपविरुद्ध आहे, असं का? दाभोलकरांच्या हत्येचे आरोपी आणि बहुसंख्य मताने निवडून आलेला भाजप पक्ष यातील फरक काळेंना जाणवत नाही का? 
 
काळेंचा लेख मोठा आहे. त्यामुळे त्यांनी विस्तृतपणे मुद्दे मांडले आहेत. पण मी इथे पुरोगामी आणि प्रतिगामी याविषयीच चर्चा करणार आहे. श्री. काळे लिहितात की मोदी सरकार आल्यापासून देशाचं वातावरण बदलत गेलं आहे. दिवस बिकट आहेत, हा सध्याचा अनेक जाणकरांचा सूर असल्याचे ते लिहितात. इतर जाणत्यांप्रमाणे त्यांनाही देशात असहिष्णूता, हुकूमशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेप आणि एकाधिकारशाही असल्याचे जाणवत आहे. पण त्याच भारतात ते मोकळेपणाने बोलत आहेत, लिहित आहेत हे ते विसरतात. असो. नरेंद्रमोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सहज आणि अगदी पाशवी म्हणाव्या अशा बहुमतानिशी स्थापन झाले असे ते म्हणतात. बहुमतासाठी "पाशवी" हा शब्द काळेंना वापरावासा वाटतो. अर्थात आपण पाशवी हा शब्द साहित्यातील लिबर्टी आहे असं समजू. हे सर्व लिहित असताना ते पुरोगाम्यांच्या अतिशहाणपणाचा समाचारही घेतात. मोदी सरकारने लादलेल्या बंधनांची त्यांना आठवण होते, गोमांसबंदी, जेएनयू, भारत मात की जयची घोषणा, देशप्रेमाचे प्रशस्तीपत्रक देण्याची मक्तेदारी यामुळे सामाजिक अस्वस्थता दिसून येते असं त्यांना वाटतं. पण गोमांसबंदीचा कायदा वगळता माझ्यासारख्या नागरिकाला कोणतीही अडचण जाणवत नाही. मुळात देशप्रेम भाजपप्रेमाशी जोडलेले नाही. तसे कुणीही म्हटलेले नाही. परंतु हिंदी सिनेमातील सीनप्रमाणे स्वतःच स्वतःचे कपडे फाडायचे आणि इस कमीने ने मेरे कपडे फाडे, मेरी इज्जत लुटने की कोशिश कि असे ओरडायचे. ही सुद्धा स्वघोषित पुरोगाम्यांची जुनीच खोड आहे. सर्जिकल स्ट्राईकसारखी कारवाई त्यांना नाट्यमय वाटते. पुरोगामी चळवळीविषयी ते लिहितात की पुरोगामी चळवळ एकसंधपणे चालत नाही. आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी यांच्यातील न मिटणार्‍या मतभेदाविषयी त्यांना वाईट वाटते. पण श्री. काळेंमुळे मार्क्सवादी पुरोगामी असतात हे आपल्याला कळतं. गंमत म्हणजे त्याच पानावर काळेंच्या लेखाखाली "दक्षिणायनमधील मंथन..." नावाचा रिपोर्ट छापून आला आहे. त्यामध्ये दलित चळवळीसह नक्षली चलवळ असा उल्लेख आहे. अनेकांची निर्घृण हत्या करणारे नक्षलवादी हे सुद्धा या पुरोगामी चळवळीचे भाग आहेत याचा साक्षात्कार लोकसत्ताच्या कृपेने आपल्याला होतो. पुरोगामी चळवळीला पोथीनिष्ठेचा विकार चढला आहे असं त्यांना वाटतं. त्यांच्यात पोथीनिष्ठा असूनही त्यांना पुरोगामी म्हणायचे का? जाऊद्या, म्हणूया... आता पुढे ते या पुरोगाम्यांना मोदी सरकारच्या विरुद्ध, किंबहुना मोदींच्याच विरुद्ध उभं राहण्यास सज्ज करतात. त्यांचं म्हणणं आहे की पुरोगाम्यांची लढाई थेट मोदींशी आहे. त्यासाठी ते लिहितात की "ही लढाई लढताना कार्यशाळा, विचारपरिषदा, चित्रपट, विचारबैठका, पथनाट्य, एवढ्यापुरतेच त्यांना सीमित राहता येणार नाही. कारण या सगळ्या गोष्टी भोवतालच्या समाजाचाच एक हिस्सा असल्या, तरी केवळ तेवढाच हिस्सा म्हणजे समाज नव्हे. कारण मुळातच हा हिस्सा पुरोगामी. या पलीकडे अफाट जनसमुदाय आहे आणि तो मतदार आहे" त्यांना असं म्हणायचंय की सामन्य मतदाराला पुरोगाम्यांनी आपलेसे केले पाहिजे. पण हे म्हणताना ते सहज लिहितात की "मुळातच हा हिस्सा पुरोगामी". म्हणजे काय? या वाक्याचा अर्थ तरी काय? कार्यशाळा, विचारपरिषदा, विचारबैठका, पथनाट्य इ. पाहणारा समाज पुरोगामी आहे? सामान्य मतदार या गोष्टी पाहत नाही? की यांचं जे ऐकतात तेच पुरोगामी? हा सबंध लेख मनोरंजक आहे. कारण लेखकाच्या मते प्रचंड अराजकता आणि असहिष्णूता माजली असताना मी आणि तुम्ही, आपण सुरक्षित आहोत, आनंदी आहोत हे आश्चर्यजनक नव्हे का? 
 
पुरोगामी चळवळ म्हणजे नेमकं काय? भारतातील बहुसंख्य जनता हिंदू आहे. जे हिंदू आहेत ते पुरोगामी होऊ शकत नाही का? मुसलमान, ख्रिस्तींसारखे पोथीनिष्ठेच्या आहारी गेलेली मंडळी पुरोगामी असू शकतात. पण आधुनिकीकरणासोबत बदलणारा हिंदू हा पुरोगामी असू शकत नाही? आज काही अपवाद सोडला तर प्रत्येक हिंदू मॉडर्न कपड्यात वावरतो. पण मुसलमान अजूनही तिच दाढी, तिच टोपी आणि त्याच वेशात बहुसंख्येने वावरतात. असो तो त्यांचा धार्मिक प्रश्न आहे. पण ते जर इतके पराकोटीचे सनातनी असूनही पुरोगामी असू शकतात तर मग हिंदू पुरोगामी असू शकत नाही? का? कोण पुरोगामी आणि कोण प्रतिगामी हे ठरवण्याचा अधिकार यांना दिला कोणी? त्यांना जर स्वतःला पुरोगामी म्हणवून घ्यायचं असेल तर कुणाचीच काही हरकत नसावी. पण ज्या विचारांशी आपले पटत नाही, ते प्रतिगामी आहेत असा असहिष्णूपणा हे कसे काय करु शकतात? आज मी ३१ वर्षांचा आहे. वयाची १८ वर्षे ओलांडल्यानंतर अर्थात सुजाण झाल्यानंतर मी कधीच कुणाच्या मुस्कटात लगावलेली नाही आणि कुणी माझ्याही मुस्कटात लगावलेली नाही. अतिशय शांतचित्ताने मी माझे जीवन व्यतीत करीत आहे. मुंबईच्या लोकमध्ये सुद्धा माझे कधीच कुणाशी भांडण झालेले नाही. माझे अनेकांशी चांगले सबंध आहेत. वैयक्तीक शत्रुत्व तर कुणाशीच नाही. शत्रुत्वाची कधी गरजच भासली नाही. पण स्वघोषित ज्यांना प्रतिगामी म्हणतात त्या विचारांचा मी आहे. मी हिंदू आहे. माझ्या मनात सावरकरांबद्दल आदर आहे. मग मी पुरोगामी आहे की प्रतिगामी आहे? हा प्रश्न आज मला सतावत आहे आणि हा प्रश्न माझ्यासारख्या अनेक तरुणांना सतावत असणार. का आम्हाला प्रतिगामी म्हणून हिणवले जाते. हा वैचारिक आतंकवाद नाही का? ही असहिष्णूता नाही का? होय हा वैचारिक आतंकवाद आहे आणि ही अहिष्णूताच आहे. जी स्वघोषित पुरोगाम्यांनी आमच्यावर लादलेली आहे. जगात आतंकवादाने हैदोस घातला आहे आणि तो आतंकवाद एका विशिष्ट पंथाचे लोक घडवून आणत आहेत, अशी कबुली ते स्वतःच देतात आणि वर त्यांना त्याबद्दल अभिमान असल्याची ग्वाही सुद्धा देतात. पण त्यात अहिष्णूता कुणालाच दिसत नाही. त्या आतंकवादाची झळ भारतालाही बसत आहे. तुम्ही मालाड असो वा चर्चगेट कोणत्याही गार्डनमध्ये बसलेले असताना कुणीतरी एक माणूस पटकन येतो आणि तुम्हाला येशू ख्रिस्ताचे खोटे चमत्कार सांगून, अंधश्रद्धा पसरवून कन्वर्ट करु पाहतो. ही असहिष्णूता नाही का? हा वैचारिक ख्रिस्ती आतंकवाद नाही का? पण दाभोलकर आदींच्या हत्त्येचा तपास सुरु असताना मात्र भगवा आतंकवाद हा शब्द आठवतो. का? 
 
आज पुरोगामी वैतागलेले आहेत, चिडलेले आहेत, कारण केंद्रात आणि राज्यात हिंदू विचारप्रणालीवर विश्वास असणारे सरकार आहे. विशेषतः नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. मोदी बहुमताने निवडून आले तेव्हा सर्व पुरोगाम्यांची बाटे तोंडात (स्वतःच्या) गेली होती. कारण सर्व पुरोगाम्यांनी मोदींची जमेल तेवढी बदनामी केली असताना मोदी बहुमताने, राजीव काळेंच्या शब्दात सांगायचे तर पाशवी बहुमताने निवडून आले आहेत. याचे उत्तर पुरोगाम्यांनी स्वतःमध्ये झाकून पाहिल्यास नक्की मिळेल. भारतातील बहुसंख्य जनता या पुरोगाम्यांना वैतागली आहे. मुळात यांना नेमके काय साधायचे आहे हेच यांना कळलेले नाही. लादलेल्या प्रतिगामीत्वावर टीका करणे हा मुद्दा सोडल्यास यांच्याकडे कोणताच अजेंडा नाही. मुळात भारतात पुरोगामी हा शब्द अंधश्रद्धा या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणून वापरण्यास हरकत नसावी. इतका या स्वघोषित पुरोगाम्यांनी पुरोगामी या शब्दाची पिळवणूक केली आहे. सध्या मोदींच्या विरोधात पुरोगाम्यांनी आपली लढाई सुरु केली आहे. राजीव काळेंनी तर सरळ सरळ सांगूनच टाकले आहे. तर या सर्व पुरोगामी मंडळींनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की जर मोदी सरकार प्रतिगामी असेल तर मोदी सरकारला निवडून देणारी जनता सुद्धा प्रतिगामी आहे असेच यातून सूचित होते. म्हणून आता लढाई केवळ प्रतिगामी मोदी सरकारशी नसून बहुसंख्य प्रतिगामी जनतेशी सुद्धा असणार आहे. पण माझ्यासमोर वेगळाच पेच आहे, माझ्या लहान मुलाने जर मला कधी विचारलं की बाबा, मी पुरोगामी आहे की प्रतिगामी? तर मी त्याला काय उत्तर द्यावे? याचे उत्तर स्वघोषित पुरोगाम्यांकडे आहे का?

- जयेश शत्रुघ्न मेस्त्री 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments