Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरस्वती : खरंच अशी नदी होती, ती कुठून कुठे वाहायची? भारताच्या 'पवित्र नदी'ची गूढकथा

Webdunia
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (23:17 IST)
हिंदू धर्मात धार्मिक विधी करताना पवित्र नद्यांचं पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे. या नद्यांमध्ये गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि सरस्वती या नद्यांना आवाहन केलं जातं.
जे लोक सरस्वती नदीचं अस्तित्व मान्य करतात, त्यांच्या मते, ही नदी लुप्त झाली आहे.
 
प्राचीन काळी ही नदी हरियाणामध्ये उगम पावून गुजरातमध्ये प्रवेश करून समुद्रात विलीन व्हायची असा तर्क दिला जातो.
 
सोबतच अलिकडच्या वर्षांत सापडलेले भूवैज्ञानिक आणि पुरातत्वीय पुरावे सरस्वती नदीचे पुरातन काळातील अस्तित्व मान्य करतात. पण सरस्वती नदीशी आर्यांचा देखील संबंध आहे आणि त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो.
 
प्रश्न असा आहे की, आर्य हे मूळचे भारतीय होते की बाहेरून येऊन स्थायिक झाले होते? म्हणजे जवळपास शतकानुशतके जुन्या वेद आणि धर्मग्रंथांमध्ये सरस्वती नदीच्या अस्तित्वाचं उत्तर मिळतं.
 
केंद्रातील भाजप सरकार एका विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी पौराणिक सरस्वती नदी खरी असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
सरस्वती : वैदिक नदी
हिंदूंमध्ये चार वेद पवित्र मानले जातात. त्यापैकी ऋग्वेद हा सर्वात जुना
 
ग्रंथ असून तो प्राचीन संस्कृत भाषेत आहे. त्याची निर्मिती भारत-पाकिस्तान मधील पंजाबमध्ये सुमारे 3500 वर्षांपूर्वी झाली होती. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात त्याला लिखित स्वरूप प्राप्त झालं. नाहीतर तोपर्यंत हा ग्रंथ 'श्रुती आणि स्मृती' परंपरेनुसार पुढच्या पिढीकडे यायचा.
ऋग्वेदातील 45 व्या ऋचेमध्ये सरस्वती नदीची स्तुती करण्यात आली असून तिचा 72 वेळा तिचा उल्लेख करण्यात आला आहे. तिच्या स्तुतीसाठी 'जड प्रवाही', 'सर्वश्रेष्ठ', 'वेग आणि प्रवाहात इतर नद्यांना मागे सोडणारी' 'असीम, निरंतर आणि वेगवान' असे शब्द वापरले गेले आहेत.
 
ऋग्वेदातील 10 व्या मंडलातील 75 व्या ऋचेच्या 5 व्या श्लोकात 'नादिस्तुती सूक्तम' मध्ये यमुना आणि सतलज नद्यांच्या दरम्यानचे वर्णन केले आहे. याशिवाय ऋग्वेदातील सातव्या मंडलातील 95 व्या श्लोकाच्या दुसऱ्या श्लोकात 'पर्वतापासून समुद्रापर्यंतचा शुद्ध प्रवाह' असं वर्णन करण्यात आलं आहे.
 
सरस्वती नदीला 'सिंधुमाता' म्हणजे नद्यांची जननी असे संबोधन वापरलं जातं. ती गुप्त रुपात वाहते म्हणून तिला 'अंतरवाणी' असेही म्हणतात. त्रुत्सु-भारत नावाची जमात सरस्वती नदीच्या काठी राहत होती, म्हणून तिला 'भारती' असेही म्हणतात.
 
ऋग्वेदातील सरस्वती नदीच्या उल्लेखाबाबत वरील माहिती भारताच्या पंतप्रधानांच्या 'आर्थिक सल्लागार समिती'चे सदस्य आणि नवी दिल्लीतील 'इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र' येथील लेखक डॉ. संजीव सान्याल यांनी दिली आहे. त्यांनी कपिला वातसायन स्मृती व्याख्यानमालेत यासंबंधी भाषण दिले होते.
 
'महाभारत'च्या शल्य पर्वाच्या वर्णनानुसार, कृष्णाचा मोठा भाऊ बलराम कुरुक्षेत्रातील कौरव आणि पांडवांच्या युद्धात सहभागी झाला नव्हता. ते त्यावेळी तीर्थयात्रेला गेले होते. बलरामाने द्वारकेपासून प्रवास सुरू केला आणि 'विनाशन' नावाच्या ठिकाणी त्यांना सरस्वती नदी वाळूत लुप्त झालेली दिसली. हे ठिकाण सध्याच्या थारच्या वाळवंटात वसलेलं आहे असं मानलं जातं.
 
कुरुक्षेत्रात ही नदी ओघावती नावाने वाहत असे. असं म्हटलं जातं की या नदीत सात नद्यांचा संगम होत असे.
 
सरस्वतीमध्येच दडली आहेत प्रश्नांची उत्तरं
सरस्वती नदीच्या अस्तित्वावर इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञांमध्ये एक शतकाहून अधिक काळ वाद सुरू आहे. परस्परविरोधी दावे, पुरावे आणि संशोधनामुळे या विषयात असलेली गुंतागुंत आणखीन वाढते.
 
सरस्वती नदीच्या अस्तित्वावरून पडदा दूर केला तर आपल्याला हडप्पा आणि वैदिक संस्कृतीच्या सीमांची माहिती मिळू शकेल. सध्या ही सीमा पूर्व अफगाणिस्तानपासून सिंधू आणि गंगा-यमुना प्रदेशात पसरली असल्याचं मानलं जातं.
 
इरफान हबीब, रोमिला थापर आणि राजेश कोचर या विद्वानांच्या मते, सरस्वती नदी ही खरंतर पूर्व अफगाणिस्तानची 'हरकस्वती' नदी असू शकते. त्यावरून सरस्वती हे नाव पडलं असावं. सुरुवातीचे ऋग्वेद लेखक सिंधू संस्कृतीमध्ये येण्यापूर्वी हरकस्वती नदीच्या काठी वास्तव्य करत असावेत.
 
ज्येष्ठ पत्रकार टोनी जोसेफ यांनी दुय्यम स्रोतांवर आधारित 'अर्ली इंडियन्स' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, 'भारत हा स्थलांतरितांचा देश आहे आणि हडप्पा संस्कृती नंतरच्या स्थलांतराच्या तिसऱ्या लाटेत वैदिक लोक भारतात आले आणि स्थायिक झाले.'
भारत-केंद्रित सिद्धांतानुसार, वैदिक काळातील आर्य भारतीय होते आणि नंतरच्या टप्प्यात ते पूर्व आणि उत्तरेकडे स्थलांतरित झाले. सिंधू नदीसारखी मोठी आणि विस्तीर्ण नदी आजच्या भारताच्या हद्दीत अस्तित्वात होती हे सिद्ध झाल्यास त्यांच्या सिद्धांताला बळकटी मिळू शकते.
 
इतिहासकार इरफान हबीब यांच्या मते, 1995 च्या सुमारास पुण्यातील डेक्कन कॉलेजचे तत्कालीन संचालक प्रा. व्ही. एन. मिश्रा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'मंथन' नियतकालिकात 'विलुप्त सरस्वती, हडप्पा संस्कृतीचे उगमस्थान' या शीर्षकाचा लेख लिहिला होता. पुढील वर्षी भारतीय पुरातत्व संस्थेचे एस. पी. गुप्ता यांनी 'द सिंधू-सरस्वती सभ्यता' नावाचे पुस्तक लिहिले.
 
सरस्वती नदीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संघ परिवारातील विचारवंत ऋग्वेदातील श्लोकांचा हवाला देतात असं हबीब सांगतात. वर्णनानुसार, सरस्वती ही एक अतिशय भव्य नदी होती, जी पर्वतातून उगम पावून समुद्राला मिळायची.
 
त्यांच्या मते, सरस्वतीला नदीऐवजी देवतेचं रूप दिलं आहे. इतर काही तज्ज्ञांच्या मते, सरस्वती नदी ही खरं तर सध्याची सिंधू नदी असू शकते.
 
सध्याच्या हरियाणामध्ये सरस्वती नावाची नदी आहे, परंतु तिचा उगम पर्वतांमध्ये नाही आणि ती समुद्रापर्यंत पोहोचत नाही. 'घग्गर' नदीशी तिचा संबंध नाही. वाळवंटात वाहणाऱ्या 'हकरा' नदीशी जरी तिचा संबंध जोडला तरी ती सरस्वती नदी असू शकत नाही.
 
जशी सरकारं बदलली, तसं सरस्वतीचं रूप बदललं
हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील आदिबदरी येथे सरस्वती नदीचा उगम होतो. शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या या ठिकाणाहून सरस्वती नदी (सध्याच्या) हरियाणा, राजस्थान, पाकिस्तानच्या काही भागांतून वाहत जाऊन कच्छच्या समुद्राला मिळते, असं स्थानिकांचं मत आहे.
 
1999 ते 2004 या काळात केंद्रात एनडीएचं सरकार होतं. या सरकारचं नेतृत्व भाजपने केलं होतं. तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री जगमोहन यांनी सरस्वती नदीचा शोध घेण्याचा प्रकल्प सुरू केला.
 
2004 मध्ये केंद्रात यूपीए सरकार आल्यानंतर तत्कालीन सांस्कृतिक मंत्री जयपाल रेड्डी यांनी संसदेत सांगितलं की, सरस्वती नदीच्या अस्तित्वाबाबत कोणताही पुरावा नसल्यामुळे हा प्रकल्प पुढे नेता येणार नाही.
 
2006 मध्ये, सीपीआय-एमचे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी) सीताराम येचुरी संसदेच्या सांस्कृतिक कार्य समितीचे प्रमुख झाले. त्यानंतर पौराणिक सरस्वती नदीचा शोध घेण्याचा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल आणि प्रक्रियेचं पालन न केल्याबद्दल त्यांनी एएसआयला फटकारलं.
 
2009 मध्ये यूपीए-2 चं सरकार सत्तेवर आलं तेव्हा भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, जलसंपदा मंत्रालयाने उत्तर दिलं होतं की, इस्रोला भूगर्भातील प्राचीन जलकुंभाच्या अस्तित्वाचा पुरावा सापडला असून ती वैदिक सरस्वती नदी असण्याची शक्यता आहे.
 
जून 2014 मध्ये केंद्रात एनडीएचं सरकार सत्तेवर आलं आणि यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत होतं. हिंदू नेत्याची छाप असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. इस्रोने त्यांना नोव्हेंबर 2014 मध्ये 76 पानांचा अहवाल सादर केला होता. यात रिमोट सेन्सिंग आणि भौगोलिक माहितीच्या आधारे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थानमधून जाणारी सरस्वती नदी कच्छच्या वाळवंटात वाहत असल्याची माहिती मिळाली. ती नऊ हजार वर्षांपूर्वीपासून चार हजार वर्षांपूर्वीपर्यंत वाहत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. (पान क्र. 13)
 
हरियाणाच्या भाजप सरकारने 2015 मध्ये सरस्वती हेरिटेज डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना केली. हे बोर्ड 'सरस्वती नदी वाहती ठेवण्याच्या' मिशनवर काम करत होतं. सरस्वतीच्या नदीकाठी पर्यटन, संस्कृती आणि आवश्यक बांधकाम करण्याचं काम या बोर्डकडे सोपविण्यात आलं होतं. सोबतच सरस्वती नदीवरील संशोधनात मदत व्हावी आणि केलेल्या संशोधनाचा प्रसार व्हावा यासाठी परिषदा आणि चर्चासत्रे आयोजित करण्याचं काम केलं जातं.
 
हिंदू मान्यतेनुसार, 'वसंत पंचमी' हा देवी सरस्वतीचा दिवस आहे. या दिवसापासून मुलांच्या अभ्यासाची सुरूवात होते. या बोर्डच्या माध्यमातून दरवर्षी वसंत पंचमीनिमित्त 'सरस्वती मोहोत्सव' आयोजित केला जातो.
 
हरियाणा सरकारने 2017 मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठात सरस्वती नदीसाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन केले. हे केंद्र सरस्वती नदीच्या प्राचीन जलप्रवाह आणि संस्कृतीबद्दल संशोधन करते. जवळपास दोन दशकांपासून नामशेष झालेल्या सरस्वती नदीचा शोध घेण्यासाठी डॉ. ए.आर. चौधरी काम करत आहेत.
 
'श्रद्धेला देखील पुराव्याची गरज असते'
ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन प्रमुख हिंदू देव अनुक्रमे सरस्वती, यमुना आणि गंगा या नद्यांशी संबंधित आहेत. विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाने यमुना नदीच्या काठी हिरवळीची निर्मिती केली. राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा नदीला पृथ्वीवर येण्यास प्रसन्न केलं तेव्हा मोठा प्रवाह असलेल्या गंगेला शिवाने आपल्या जटांमध्ये पकडलं आणि ती पृथ्वीवर वाहू लागली.
 
डॉ. चौधरी यांनी एएसआयच्या 'पुरातत्व' या मासिकात असं म्हटलंय की, हरिद्वार जवळ असूनही हरियाणातील काही गावांमधून वाहत जाणाऱ्या सरस्वती नदीवर पूर्वजांचे अंत्यसंस्कार केले जायचे. आदिबदरीपासून पुढे गेल्यावर अनेक ठिकाणी लहान-मोठी तीर्थक्षेत्र होती. याठिकाणी स्नानाला महत्त्व होतं आणि याचा संबंध महाभारताशी होता.(पृष्ठ क्रमांक 51, 2021, 124-140)
 
हरियाणातील राखीगढी येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने संशोधन केलं असून याच्याशी निगडीत अनिका मान यांच्या म्हणण्यानुसार, "हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील राखीगढी हे गाव डोंगर माथ्यावर वसलं असून दाट लोकवस्तीचं गाव आहे. इथे इसवी सन पूर्व 10,000 ते 1,000 वर्षांपूर्वी वस्ती होती. कालांतराने प्रत्येक वस्ती मातीखाली गाडली गेली. सिंधू संस्कृतीतील रहिवाशांचे आंतरखंडीय संबंध होते हे आपल्याला माहीत आहे. मात्र, त्यांची लिपी वाचता येत नसल्यामुळे, ते कोणत्या संस्कृतीशी संबंधित होते आणि त्यावेळच्या परिस्थितीबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही."
 
इस्रोने आपल्या अहवालात (पृष्ठ 38) असं म्हटलंय की, राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात 14 ठिकाणी 120 ते 151 मीटर खोल बोअर ड्रिल करण्यात आले. ज्यामध्ये भूगर्भातील पाण्याच्या प्रवाहाचे अस्तित्व आढळून आले.
 
इस्रोच्या अहवालानुसार (पृष्ठ 43), राजस्थानच्या जैसलमेरमधील विविध ठिकाणांहून घेतलेल्या सुमारे 10 भूजल नमुन्यांचे भाभा अणुसंशोधन केंद्रात विश्लेषण करण्यात आले. आणि हे नमुने 1900 ते 18800 वर्ष जुने असल्याचा अंदाज आहे.
 
इस्रोच्या अहवालानुसार, एएसआयला पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील 'दुष्द्वती' नदीच्या भूमिगत किनाऱ्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या कालखंडातील शेकडो प्राचीन वसाहतींचे पुरावे सापडले आहेत. यावरून असं दिसून येतं की बारमाही वाहणाऱ्या या नदीभोवती वसाहती अस्तित्वात होत्या.
 
राजस्थानमधील अनुपगढ नंतर सध्याच्या पाकिस्तान मधून वाहत ही नदी थारच्या वाळवंटात यायची आणि नंतर कच्छमध्ये समुद्रात विलीन व्हायची. अशा प्रकारे त्यांचा 'पर्वत ते समुद्र' हा प्रवास पूर्ण झाला. नामशेष झालेल्या नदीच्या काठावरील पिके, झाडं आणि वनस्पती यांची एकसमानता संशोधकांना यावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करते.
 
हिंदूंचा पवित्र ग्रंथ 'श्रीमद भागवत पुराण' मध्ये नमूद केल्याप्रमाणे, मानसरोवर, बिंदू, नारायण, पंपा आणि पुष्कर ही पाच सरोवरे हिंदूंसाठी पवित्र आहेत. कच्छमधील नारायण तलाव भगवान विष्णूशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं.
 
असं म्हणतात की वैदिक सरस्वती नदी या नारायण तलावाजवळून वाहत जायची. तिच्या प्रवाहाने हा तलाव भरायचा. आजही अरवलीतून निघणाऱ्या बना, सरस्वती आणि रुपेन या प्रमुख नद्या कच्छच्या छोट्या वाळवंटात विलीन होतात. त्या समुद्रापर्यंत पोहोचतच नाहीत म्हणून त्यांना 'कुमारी नद्या' म्हणतात.
 
महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाने कच्छमधील धोर्डो येथील सपदारन मधील नमुन्याचा अभ्यास केला. त्याचा अहवाल 'नेचर' या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
 
संशोधक एल. एस. चम्याल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, सरस्वती नदी 17 हजार वर्षांपूर्वी कच्छमध्ये वाहत होती आणि तिचा प्रवाह 10 हजार वर्षांपूर्वीपर्यंत कायम होता.
 
संशोधकांनी रेडिओकार्बन डेटिंग केले असता त्यांना आढळलं की, हिमालयातील गाळ सरस्वती नदीद्वारे कच्छपर्यंत पोहोचला. सरस्वती नदी ही पावसावर आधारित असण्यासोबतच हिमनदी देखील आहे हे सिद्ध होतं. कालांतराने सिंधू आणि सरस्वती नद्यांचा प्रवाह पश्चिमेकडे सरकला, त्यामुळे सरस्वती नदीसोबत सिंधू नदीचा गाळही सापडला.
 
संशोधकांच्या मते, थार वाळवंटाच्या प्रगतीमुळे सरस्वती नदीचा प्रवाह लुप्त झाला. याशिवाय हवामानातील बदलही त्यासाठी जबाबदार होते. नद्या कोरड्या पडल्याने मानवी वस्ती हळूहळू कमी होऊ लागली असेल. ही प्रक्रिया अनेक दशके किंवा शतके सुरू असावी असा अंदाज आहे.
 
इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ पी. एस. ठक्कर यांनी 'वैदिक सरस्वती नदी' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. ठक्कर यांच्या मते, सध्याच्या नर्मदा, सुखी, सोमा, वात्रक, साबरमती आणि भादर नद्या सरस्वतीमध्ये विलीन व्हायच्या.
 
भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाचे संजीव कुमार यांनी 'फौना ऑफ नल सरोवर गुजरात' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. यात ते लिहितात, (पृष्ठ 11-12) पुरातन कालखंडाच्या उत्तरार्धात कच्छच्या खाडीपासून खंबातच्या आखातापर्यंतचा भाग उथळ समुद्राच्या पाण्याने भरला होता. त्यांच्यामध्ये एक तलाव होता. हजारो वर्षांपूर्वी समुद्र मागे सरकून इथे जमीन तयार झाली.
 
सरस्वतीचा अर्थ काय?
सरस्वती नदी हरियाणातून कच्छच्या वाळवंटात वाहत होती तर मग प्रयागराजच्या सरस्वती नदीचं काय?
 
हिंदू मान्यतेनुसार गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या प्रयागराज येथे एकत्र येतात. इथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो.
 
तपकिरी आणि हिरव्या पाण्यामुळे गंगा यमुनेचा संगम दिसून येतो. परंतु स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, सरस्वती नदी गुप्तपणे
 
यात सामील होते. याबाबत बीबीसीशी बोलताना डॉ. ए.आर. चौधरी म्हणाले, "सरस्वती नदीचा प्रवाह एकसमान राहिलेला नाही. भूगर्भीय उलथापालथींमुळे तिचा प्रवाह नेहमीच बदलत गेला. जी नदी कच्छमध्ये प्रवाही होती ती वैदिक सरस्वती आहे."
 
"पूर्वी, आदिबदरीतून सरस्वती नदीचा प्रवाह दोन भागात विभागला गेला. एक प्रवाह कुरुक्षेत्र ते राजस्थान, उत्तरप्रदेश आणि खाली प्रयागराजपर्यंत पोहोचला. तर दुसरा प्रवाह सध्याच्या कर्नालपासून रोहतकमधील महमजवळून, राजस्थानमधील चुरू ते उत्तरात मैनपुरीजवळ दुश्वतीच्या रुपात वाहत गेला."
 
डॉ. चौधरी यांनी त्यांच्या संशोधनासाठी उपग्रह रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस प्रतिमांवर आधारित प्राचीन सरस्वती नदीच्या भूगर्भातील पाण्याच्या प्रवाहाचा दाखला दिला. यासाठी किनारपट्टीच्या प्रदेशात काम करून पुरातत्व अवशेष शोधण्याची आवश्यकता आहे.
 
2021 मध्ये, सीएसआयआर-एनजीआरआयने केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित झाले. त्यानुसार प्रयागराजच्या संगमापूर्वी 45 किमी लांबीचा प्राचीन भूमिगत जलकुंभ अस्तित्वात आहे. ही सरस्वती नदी असल्याचं मानलं जातं. त्याची पाणी साठवण क्षमता एक हजार दशलक्ष घनमीटर आहे.
 
केंद्र आणि हरियाणातील भाजप सरकार सरस्वती नदीचं 'पुनरुज्जीवन' करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे धार्मिक-सांस्कृतिक पर्यटन वाढेल, पण आजूबाजूच्या भागात सिंचनाचा काही फायदा होईल की नाही, हे सांगता येत नाही.
 
मात्र, हिंदू प्रथा परंपरा, श्लोक आणि धार्मिक विधींमध्ये सरस्वती नदीचं अस्तित्व आजही आहे आणि भविष्यातही कायम राहील.
 






Published By- Priya Dixit
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

तुमचे सिम बंद झाले आहे… कॉल आला, OTP सांगितला आणि साडेचार लाख गमावले

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरांना मंजुरी दिली, मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

LIVE: राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments