सर्व साधारणपणे कौटुंबिक झगडे व स्त्रियांना मारहाणीचे प्रकार गरीब, कामगार व झोपडपट्टीत राहणार्या समाजातच होतात, असा गैरसमज आहे. परंतु श्रीमंत व मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्रियांनाही मारहाणीचे शारीरिक व मानसिक परिणाम भोगावे लागतात. फरक एवढाच आहे की मध्यमवर्गीय व श्रीमंत कुटुंबात स्त्रियांना होणारी मारहाण खोट्या आत्मप्रतिष्ठेच्या व तथाकथीत सामाजिक प्रतिष्ठेच्या रेशमी कोशात कोंडल्या गेली असल्यामुळे ही स्त्री संकोच व खोट्या सुखी वैवाहीक जीवनाचा मुखवटा घेऊन जगत असते. त्यामुळे त्याची बाहेर वाच्यता करायला कचरते. याउलट गरीब, श्रमिक स्त्रिया पतीकडून होणार्या जाचाला लपवून ठेवत नाहीत. कारण या प्रकाराला त्या स्वत:च्या व्यक्तिमत्वाशी व आत्मप्रतिष्ठेशी जोडत नसल्यामुळे त्यांची भांडणे व मारहाणीच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्यासमोर येतात.
नोकरी करणार्या स्त्रियांकडे आपण त्या आत्मनिर्भर व कुटुंबात पुरूषांच्या बरोबरीने स्वतंत्र आहेत या दृष्टीने बघतो. परंतु वस्तुस्थिती वेगळीच असते. नोकरी करणार्या व न करणार्या स्त्रियांमधील वस्तुस्थितीवर गप्पातून प्रकाश पडतो.
ND
ND
नोकरी न करणारी '' तुमची काय बाई मजाच आहे. छान सर्व्हिस करता. पुरूषासारख्या 10 वाजता घराबाहेर पडता व सहाला घरी येता. मिळवत्या असल्यामुळे नवरा उलट सुलट बोलू शकत नाही आणि बोललाच तर स्वत:च्या पायावर उभ्या आहात. काहीही निर्णय घेऊ शकता.'' त्यावर नोकरी करणारी उत्तरते,'' दूरून डोंगर साजरा ग बाई' जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. आमचे हाल काही तुमच्यापेक्षा वेगळे नाहीत. आम्हालाही घर/पतीची मर्जी सांभाळावीच लागते आणि हे न सांभाळलं तर मिळवती असो वा नसो शेवटी पत्नी ती पत्नीच.''
तात्पर्य स्त्री आर्थिकरीत्या स्वयंभू झाली तर तिचे सर्व प्रश्न निकालात निघतील हा विचार आपल्या समाजाच्या सामाजिक व परंपरागत सांस्कृतिक रचनेकडे पाहून फसवा वाटतो. कारण श्रीमंत, गरीब या मध्यमवर्गीय समाजाचा स्त्रीचा एकच वर्ग आहे. शोषितांचा. भारतीय स्त्री ही आमच्या समाजातील सर्वात शेवटची 'सर्वहारा' आहे. मूक जनावराला चाबकाने फटकारावे व त्याने मुकाटपणे गाडा ओढीत राहावे. हीच पाशवी संकल्पना संसार रथाला जुंपलेल्या स्त्रीच्या बाबतीत समाजात रूजली आहे. फोफावली आहे. '' पती-पत्नी म्हणजे संसाररूपी रथाची दोन चक्रे आहेत.'' हा विचार आदर्श म्हणून बरा वाटला तरी तो खरा मात्र नाही. भ्रामक आहे. माझ्या मते प्रत्यक्षात कुटुंबात स्त्री या रथाला उंपलेली असते. व पुरूष सामाजिक नीती-नियमांचा लगाम खेचून व अधिकाराच्या चाबूक उगारून आणि परंपरागत रूढी रिवाजांची झापड तिच्या डोळ्याला लावून त्याला वाटेल त्या दिशेने व पध्दतीने हा रथ हाकत असतो.
ND
ND
स्त्रिया सुध्दा स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास न करता या सर्व प्रकाराला जीवनाचं अपरिहार्य संचित म्हणून स्वीकारतात. यावर मी आतापर्यंत नुसती चर्चा ऐकलीय. स्त्रियांच्या सामूहीक गप्पांचा सूरही इकडेच जाताना दिसायचा. थोडे बहुत डोळसपणे आजूबाजूला डोकावल्यामुळे अनुभवायलाही मिळाले. त्यामुळे ठरवलंच की, आता प्रत्यक्षात वैयक्तिकरित्या यावर चर्चा करायला सुरूवात केलीय. पण सुरूवातीला त्याही दाद लागू देईना. पण त्यांच्या अंतरंगात शिरल्यावर आणि अगदी आपुलकीनी आपण ओठाआड दडवून ठेवलेल्या दुख:बद्दल ही आपली विचारपूस करतेय. त्या दु:खाचं कारण काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्या बोलायला लागल्या. 10-12 मैत्रिणींशी मी चर्चा केली. सगळ्याच 5000रू. च्या वर पगार कमावणार्या सुशिक्षित मुलांसोबत लग्न करून सुखानी संसार करणार्या. पण वरून आनंदी आणि सुखी जोडप्यात सुध्दा काहीतरी कारणावरून सतत कुरबुर. याचा मन:स्ताप पत्नीला सगळ्याच्याच नवर्याची वागणूक एकाच बाबतीत सारखी दिसतेय ती म्हणजे प्रत्येकाला वाटतंय, मी म्हणतोय, मला वाटतं तसंच माझ्या पत्नीची राहायला, वागायला हवं. यावर विरोध केल्यास मार खाण्याची तयारी ठेवा. मारण्याचे नवर्यांचे प्रकार मात्र फार वेगवेगळे ऐकायला मिळालेत.
ND
ND
कुणी आपल्या पत्नीचे केस धरून भिंतीवर आपटतो, कुणी काठीनी बदडतो, कुणी हातात येईल ती वस्तू घेऊन तिच्या अंगावर फेकून मारतो तर कोणी चक्क चिमटे घेतो. पूर्वीच्या काळातले शिक्षक विद्यार्थ्याला पोटाला चिमटा घेऊन त्याला उभं करत. आजचे आधुनिक नवरे पत्नीला चमट्याच्या रूपात मारतात म्हणजे मारण्याचा आवाज बाहेर जायला नको. मार खाण्याची वेळ कां येते? तर कुणा सुनेचे सासूसोबत पटत नाही, कुणाकडून दिराची हाजीहाजी करणे होत नाही, आणि यातले अनेक नवरे फॅशन म्हणून चेन्ज म्हणून किंवा मित्रांना कंपनी म्हणून ड्रिंक घेतात. (दारू पितात म्हणांयचं नाही कारण रोज दारू पीत नाहीत) याला पत्नीनी विरोध केला किंवा त्याला बंदी केली की, प्रसाद म्हणून मार आहेच.
ही आजच्या सुशिक्षित, सुविद्य, स्वयंसिध्दा स्त्रीची कहाणी. स्त्री मुक्तीच्या जगात आजही कित्येक स्त्रियांची हीच परवड आहे. घरातील अशा वातावरणाचा मुलांवर फार विपरीत परिणाम होतो. असं एकमुखानी सगळ्यांनीच सांगून पुढे त्या म्हणाल्यात की, ''याची काळजी मात्र आम्हालाच असते. पती या गोष्टीची फारशी दखल घेत नाही. एकदा लग्न झाल्यानंतर कुटुंब व्यवस्थेसारखी दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे पतीचा जाच सहन करीत जगण्यापलीकडे उपाय नसतो. कारण आर्थिक समस्या सुटलेली असली तरी बाहेर असुरक्षित जगात आगीतून निघून फुफाट्यात भाजण्याचीच शक्यता जास्त असल्यामुळे घर सहजासहजी सुटत नाही. शिवाय मुलांशी व कुटुंबाशी निर्माण झालेले ऋणानुबंध तोडवत नाही त. ''पत्नीचा धर्म'' वगैरे संस्कार तिच्यात कायमचे रूजलेले असतातच आणि म्हणूनच पुरूषी समाजानेच (निदान सुशिक्षित समजल्या जाणार्या) सहानुभावाने व समतेच्या न्यायाने स्त्रीच्या या अवस्थेचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या मानसिक आघाताचा बळी आपली पत्नी ठरू नये यासाठी मनाचा मेरू व विवेकाचा तो सतत उंचावत ठेवला पाहिजे आणि स्त्रियांनाही स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा विकास केला पाहिजे.
ND
ND
पुष्कळदा पुरूषवर्ग बाहेरचा राग घरात काढताना दिसतात. कारखाने, उद्योगधंदे, दुकान, ऑफिस, बँक इथे नोकरी करीत असताना वरिष्ठांकडून (बॉस) शिव्या मानहानी सहन करावी लागते. तिथे जर स्पष्टपणा आपला राग व्यक्त केला तर नोकरी जायची भीती किंवा साहेबांचा रोख पत्करणे, यामुळे या मानसिक भीतीचा स्फोट घरी गेल्यावर क्रुध्द होण्यात होतो. पण या मनोवैज्ञानिक कारणाने पती जर पत्नीला मारत असतील आणि हे बंद व्हावे असे खरोखरीच पतीला वाटत असेल तर... आज अनेक स्त्रिया घराबाहेर काम करताहेत. त्यांनाही त्यांच्या वरिष्ठांपडून नेहमीच अपमान सहन करावा लागतो. शिव्याही खाव्या लागत असतील मग त्या त्यांना आलेला राग कुठे शांत करीत असतील? असा प्रश्न पुरूषांनी मनाला विचारावा. कारण पत्नीने पतीला मारल्याची घटना ऐकिवात येत नाहीत. (येऊही नये) स्त्रियांना मानहानीच्या मध्ययुगातील अत्याचाराच्या प्रकारातून मुक्तता करणे जोवर संभवत नाही. तोपर्यंत या अनिष्ठ प्रथेत बंद रेशमी कोशातील हुंदके गुदमरतच राहील.