दिवाळी हा दिपवून टाकणारा सण आहे. जिकडं तिकडं ज्योतिर्गमय. प्रत्येक प्रहर प्रकाशाचा! लहानमोठे उजळून निघतात, त्या त्या आनंदानं. मुलांची मनं, मोठ्यांची मनं, मुलीबाळींची-बायकांची मनं, गरिबांची-श्रीमंतांची मनं. त्यांच्या आपल्या आवडीत रमून जातात. आनंद तोच असतो पण प्रत्येकाचं मन, मनात हे खण दुसर्याहून निराळे. वय बदललं की आवडीच्या आकर्षणाच्या जागा बदलतात. ओढ मात्र तीच असते. भारतीय मनाला सणांची ती ओढ असते.
माझं बालपण, शालेय जीवन बरंचसं एकटेपणात गेलं. घरापासून दूर, जवळच्याच अंतरावर. पण एकलकोंडा मात्र कधीच मी नव्हतो. बाहेरून बारमाही बहरलेला. एखाद्या सणासारखा. पण सणांची ओढ फार नसायची; असायची ती प्रसंगाला पुरेल एवढीच. दिवाळीतले दिवे लागले की मन तिथं दिसायचं; पणतीचं खापर आपणच आहोत असं वाटायचं. ऐपत नसल्यानं फार उडवाउडवी नाही. दोन चार महताब डब्या; रंगीत प्रकाश पाडणारी आगपेटी. टिकल्यांच्या चारदोन डब्या, त्या उडवायला खटक्याचा तोटा.
काहींना तेही परवडायचं नाही; टिकली मग दगडावर फोडायची. छोटा उखळ्या असायच्या. गंधक भरून बार करायचे. उखळीत टिकली टाकून फोडणं चालायचं. असं थोडसंच असायचं पण इतरांना तेही पुष्कळ वाटायचं. ज्यांच्याजवळ तेही नसायचं त्यांना टिकल्या द्यायच्या, त्यांनी त्या फोडायच्या. महताब डबीतल्या एकदोन काड्या ओढून द्यायच्या. आपलेपणाचा प्रकाश झाकायचा नाही. अशावेळी अभावाला सूर फुटून त्या मनात गाणं उमटत असणार ` देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप जला.`
सर्वतोपरी रसायनांची दिवाळी. हादरे देणारे फटाक्यांचे आवाज. पाय टाकणं कठीण इतक्या लडीच्या लडी. मनात जणू एक युद्ध दडलेलं आहे. स्वतःची स्फोटकं ओळख करून देण्याची कोण चढाओढ. भयभीत इमारतीला दिवाळीचे स्फोट कसे परवडणार. ध्वनीच्या दहशतीनं कोणता आनंद मिळतो?
लहान वयात हे असं अवतीभवती. नित्य क्रमाहून जरासं वेगळं वातावरण असायचं. गोडधोड पण मोजकं. काही तळणं व्हायचं. तोंडभर मीठ असलेले लाडू मला आवडायचे. आजही ती आवड आहे. लाडू म्हणजे गव्हाच्या पिठाचे तळलेले. इकडं जे लाडू आमच्याकडं ते गोळे असतात.
दिवाळीत पहिलं पाणी म्हणजे पहिल्या दिवसाची भल्या पहाटेची आंघोळ. घरी वाटून केलेली उटणी. आयत्या पुड्या सहसा नव्हत्या. उटण्याची आंघोळ, दिव्यांनी ओवाळणं, वळवटाचा किंवा बोटण्याचा भात, असेल त्यानुसार तूप अथवा दूध साखर; तेही नसलंच तर मग नुस्ताच कोरडा भात. असं संगळं पहाटे पहाटे. आईचा उत्साह, वडिलांचा उत्साह. गरिबी-श्रीमतींला ओलांडून जाणारी गोष्ट म्हणजे उत्साह. ही खेड्यातही दिवाळी. का कुणास ठाऊक मन रमायचं नाही माझं. सर्वांसोबत असायचो; त्यांच्या आनंदात वावरायचो. सरसकट सणात मात्र, नाही. उसनंपासनं करून सणाचा दिवस निभावून न्यायचा याला माझंही घर अपवाद नव्हतं. नापिकीपुढं काही चालत नाही.
लहानाचा मोठा होऊन आज मी या सवंत्सरात उभा आहे. दिवाळी तीच आहे. पण तशी राह्यलेली नाही. आज मी शहरात आहे. इतरांची दिवाळी पाहाणं हीच जणू आपली दिवाळी. सर्वतोपरी रसायनांची दिवाळी. हादरे देणारे फटाक्यांचे आवाज. पाय टाकणं कठीण इतक्या लडीच्या लडी. मनात जणू एक युद्ध दडलेलं आहे. स्वतःची स्फोटकं ओळख करून देण्याची कोण चढाओढ. भयभीत इमारतीला दिवाळीचे स्फोट कसे परवडणार. ध्वनीच्या दहशतीनं कोणता आनंद मिळतो हे रसायनालाही कळत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याच मनाला सांगण्याचा हा काळ आहे. बाजारात हे समुदाय घरी परतले की जो तो फक्त स्वतःचा !
दीपोत्सवाला ते आवडत नाही. प्रकाश दृष्टीचा कारक आहे. दृष्टी जाईल की काय इतका रासायनिक प्रकाश ठार आंधळेपणाचं लक्षण. दिवाळी दृष्टीची असावी लागते. सहवासाची असावी लागते; सहजीवनाची असावी लागते. समाधानाच्या, संपन्नतेची असावी लागते! आराशीतून आनंद अवतरल्याशिवाय आयुष्य धन्य होत नाही. धन्यतेच्या क्षणालाही सण हीच संज्ञा आहे, ती माझी दिवाळी. तो प्रकाश माझा; ते पदार्थ माझे. दिवाळीचं खरं अंतःकरण खापराचे दिवे. नित्य मातीचं स्मरण. रंगालाही अंतरंगाचा लळा असला की मन रमून जातं, मग. ही माझ्या मनाची गोष्ट आहे. ( शब्दांकनः महेश जोशी)