Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Narasimha Jayanti story नृसिंह जयंती कथा मराठीत

Webdunia
बुधवार, 3 मे 2023 (10:45 IST)
नृसिंह अवतार हा विष्णूंच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. 
 
हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू हे दोघे दानव भाऊ होते. त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते. पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा वराह अवतार घेऊन वध केला. आपल्या प्रिय लहान भावाचा वध झालेला पाहून हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला. त्याने सर्व दानवांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीवर जा आणि दान, तप, यज्ञ यांद्वारे विष्णूची आराधना करणार्‍यांचा नाश करा. यज्ञ व अनुष्ठान करत असणार्‍यांच्या कामात विघ्न घाला. त्याने शपथ घेतली की जोपर्यंत आपल्या शुळाने विष्णूचा कंठ फोडून त्याच्या रक्ताने माझ्या प्रिय बंधूचे तर्पण करत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. त्याची आज्ञा मानून सर्व दानवांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला. 
 
इकडे हिरण्यकश्यपूने अमरत्व मिळविण्यासाठी मंदार पर्वतावर खडतर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केली. एका निर्जन दरीमध्ये एकाच पायाच्या अंगठ्यावर उभे राहून हात वर करून व दृष्टी आकाशाकडे लावून त्याची तपश्चर्या सुरू झाली. त्याला मिळणाऱ्या तपोबलामुळे त्याच्या मस्तकातून धूर निघू लागला. नद्या आटल्या, भूमीला थरकाप सुटला, नक्षत्रे गळाली व त्यामुळे सर्व देव संकटात सापडले. सर्व देवांनी ब्रह्मदेवांकडे धाव घेतली व त्यांची विनवणी करू लागले. तेव्हा ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूकडे गेले व म्हणाले, "हे हिरण्यकश्यपू, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे, मी तुला वर देण्यासाठीच येथे आलो आहे." त्याने ब्रह्मदेवांना नमस्कार केला, व म्हणाला, ‘ हे भगवन, तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे." ब्रह्मदेवांनी त्याला हे सर्व प्रदान केले.
 
या वराच्या सामर्थ्याने हिरण्यकश्यपूने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला, राजे, गंधर्व, गरुड, नाग, ऋषी, भुते-प्रेते, या सर्वाना पराजयी करून अधिपती पद प्राप्त केले. स्वर्गावरही त्याने स्वतःचे अधिपत्य स्थापन केले; अप्सरांना त्याची स्तुती करण्यास त्याने भाग पाडले. त्याच्या या हाहाकारामुळे सर्व देव त्रस्त झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेस उत्तर म्हणून विष्णू म्हणाले की, मीच त्याचा वध करणार आहे.
 
इकडे हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा अत्यंत तेजस्वी, शांत व शीलसंपन्न असा सर्वगुणसंपन्न पुत्र झाला. प्रल्हाद परम विष्णुभक्त होता. एकदा हिरण्यकश्यपू प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसला होता, त्याने प्रल्हादाला प्रेमाने विचारले, तुला या जगात प्रिय काय आहे? प्रल्हाद त्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, हे तात, मला विष्णूचे नामस्मरण करणे सर्वात प्रिय आहे. तुम्हीसुद्धा त्या परम कृपाळू नारायणांना शरण जा. त्याचे हे उत्तर ऐकून हिरण्यकश्यपू संतापला. त्याने प्रल्हादाला त्याच्या मांडीवरून ढकलून दिले. तुझ्या चुलत्याचा वध करणाऱ्या माझ्या परम शत्रूची तू स्तुती करतोस तुला जगण्याचा अधिकार नाही, मग तू माझा स्वतःचा पुत्र असला तरी तुला मृत्यूदंडच असेल. असे म्हणत त्याने सेवकांना आज्ञा केली की प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून द्या. आज्ञेचे पालन करीत सेवकांनी प्रल्हादाला कड्यावरून फेकून दिले. पण विष्णूंनी प्रल्हादाला आपल्या कुशीत झेलले. कडेलोट करून देखील प्रल्हाद अजून जिवंत आहे, आणि आनंदाने भगवान विष्णूंचे नामस्मरण करत आहे हे पाहून हिरण्यकश्यपूच्या रागाचा उद्रेक झाला. क्रोधित होऊन त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्‍न केले. त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले, मोठमोठ्या सर्पांच्या कोठडीत कोंडले, भोजनामध्ये विषप्रयोग केला, पण या सर्वांचा काही उपयोग झाला नाही. 
 
स्वतःच्या भावाला हिरण्यकश्यपूला अत्यंत क्रोधात पाहून होलिकाने एक युक्ती शोधली, होलिकाला ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाला होता की अग्नी तिचे काही नुकसान करू शकणार नाही. तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसविले व सर्व बाजूनी अग्नी लावण्यास सांगितले. तिने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादाचे अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला अग्नीमुळे होलिका जळून तिची राख झाली. जेव्हा अग्नी पूर्ण शांत झाला तेव्हा हिरण्यकश्यपूला प्रल्हाद सुरक्षितपणे भगवंताचे नामस्मरण करत दिसला. 
 
हिरण्यकश्यपूच्या क्रोध अधिक वाढला आणि त्याने सेवकांना आज्ञा केली की, प्रल्हादाला अन्नपाण्याशिवाय कारागृहात डांबण्यात यावे. सेवकांनी या आज्ञेचेही तंतोतंत पालन केले, पण यामुळेसुद्धा प्रल्हादाची भगवान नारायणावरील भक्ती थोडीसुद्धा कमी झाली नाही. सर्व प्रयत्‍न निष्फळ झालेले पाहून हिरण्यकश्यपू क्रोधाने पेटून उठला व त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी प्रल्हादाला भर सभेत घेऊन येण्याची आज्ञा सेवकांना दिली. श्रीविष्णूचे नामस्मरण करत आलेला प्रल्हाद पाहून हिरण्यकश्यपू संतापून उठला आणि प्रल्हादाला उद्देशून म्हणाला, सांग, तो विष्णू कोठे आहे ? तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला की, हे ताता, हे सर्व जगच माझ्या नारायणाने व्यापले आहे, जळी स्थळी माझे विष्णू वास करत आहे. प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकश्यपू गरजला मग ह्या खांबामध्ये आहे का तुझा नारायण? प्रल्हाद म्हणाला, हो तर ह्या खांबातदेखील आहेत माझे नारायण, माझे श्री हरी. हे ऐकताच हिरण्यकशिपूने त्या खांबाजवळ उडी मारली त्याने आपली गदा उचलली आणि त्या खांबावर प्रहार करत म्हणाला, थांब आज तुझा आणि तुझ्या श्री हरीचा मी वध करतो. जसे त्याने गदेने खांबावर प्रहार केला तोच त्या खांबातून अति भयंकर आवाज उत्पन्न झाला व त्या आवाजाने ब्रह्मांड फुटले की काय असा सर्वाना भास झाला. तो नाद कोठून आला हे हिरण्यकश्यपूसुद्धा समजले नाही. इतक्यात सर्व भूतमात्रामध्ये असलेली आपली व्याप्ती खरी करण्याकरिता व आपल्या भक्ताने केलेले वचन खरे करण्यासाठी, ब्रह्मदेवांच्या वराचा मान राखत मनुष्याकार नव्हे व मृगाकार नव्हे, असे अत्यंत अद्‌भुत रूप धारण करणारे श्री हरी खांबातून प्रकट झाले. 
 
श्री हरी विष्णूंनी घेतलेले हे रूप फारच भयानक होते, त्यांचे धड मनुष्याचे व तोंड सिहाचे होते. हिरण्यकश्यपूने त्या नरसिंहाकडे धाव घेतली; नरसिहांनी त्याला गदेसह वर उचलले व संध्याकाळच्या वेळी दारामध्ये उंबऱ्यावर बसून त्याला आपल्या मांडीवर उताणा पाडून नखांनी त्याचे हृदय विदीर्ण केले. हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नृसिंहांनी त्याचे शरीर मांडीवरून फेकून दिले व आयुधे उचलणाऱ्या राक्षसांनाही त्यांनी ठार केले व ते स्वतःच सिंहासनावर जाऊन बसले. 
 
देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या व गंधर्व गायन करू लागले. क्रोधामुळे नरसिंहांच्या मुखातून आग बाहेर पडू लागली, तेव्हा प्रल्हाद नरसिंहांकडे गेला व त्याने देवाला साष्टांग नमस्कार केला, तेव्हा प्रत्यक्ष प्रभूने शांतपणे प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. प्रल्हाद नरसिंहांची विनवणी करीत होता, हे प्रभू आता शांत व्हा. हे नृसिंहा, भयनिवृत्तीकरिता सर्व लोक ह्या नरसिंह अवताराचे स्मरण करतील. भक्त प्रल्हादाच्या प्रेमरूपी भक्तीने भगवान प्रसन्न झाले व देवी लक्ष्मी आणि डोक्यावर शेषनागासह त्यांनी त्यांच्या नरसिंह अवताराचे दर्शन दिले.

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments