Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पृथ्वीचा गाभा विरुद्ध दिशेने फिरतोय का? त्याचे काय परिणाम होतील?

Webdunia
मंगळवार, 16 जुलै 2024 (09:05 IST)
पृथ्वीचा पृष्ठभाग आणि बाह्यभागाबद्दल बरंच संशोधन झालं आहे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात चंद्र आणि मंगळावर वस्त्या उभारण्याची चर्चा होत आहे. तरीही पृथ्वीचा गाभा हे अजूनही न उलगडलेलं कोडं आहे.
 
याचं मुख्य कारण असं आहे की पृथ्वीचा केंद्रबिंदू साधारण 5000 किमी खोल आहे. त्यापैकी 12 किमी खोल भागाबद्दलच माहिती मिळाली आहे.
 
कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसने शोध लावला आहे की, पृथ्वीचा गाभा हा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत विरुद्ध दिशेला फिरतो.
वैज्ञानिकांच्या एका टीमच्या असं लक्षात आलं आहे की, पृथ्वीच्या गाभ्याचा परिवलनाचा वेग 2010 पासून म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून कमी झाला आहे. मात्र 5000 किमी खाली न जाता त्यांनी हा शोध कसा लावला? पृथ्वीचा गाभा भूकवचाच्या विरुद्ध दिशेने फिरला तर त्याचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय परिणाम होतो?
पृथ्वीचे तीन थर
पृथ्वीचे बाह्यकवच, प्रावरण आणि गाभा असे तीन भाग असतात. गाभ्याबद्दल अनेक समज आहेत. त्याच्याबद्दल अनेक काल्पनिक कथा अस्तित्वात आहेत.
 
‘जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ’ ही कादंबरी 1864 मध्ये प्रकाशित झाली आणि त्यावरून तयार झालेले चित्रपट अतिशय लोकप्रिय आहेत. हे आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण पृथ्वीची तुलना अंड्याशी करू शकतो. प्रावरण म्हणजे पांढरा भाग आणि गाभा म्हणजे योक.
पृथ्वीचा आतला भाग हा लोखंड आणि निकेलने तयार झाला असून तो वर्तुळाकार आहे. त्याची त्रिज्या 1221 किमी असून त्याचं तापमान 5400 डिग्री सेल्सिअस आहे. हे सूर्याइतकंच तापमान आहे हे इथे उल्लेखनीय आहे.
 
आधी झालेल्या अभ्यासानुसार, गाभा हा पृथ्वीच्या इतर भागापासून वेगळा आहे. तो पृथ्वीपासून एका द्रवामुळे वेगळा झाला आहे आणि त्याचं स्वतंत्र काम आहे. याचा अर्थ असा की, तो स्वतंत्रपणे पृथ्वीच्या आतल्या भागात फिरतो आणि पृथ्वीच्या इतर भागाशी त्याचा काहीही संबंध नाही.
 
मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार गेल्या 40 वर्षांत पहिल्यांदाच गाभा पृथ्वीच्या बाह्य कवचाच्या विरुद्ध बाजूला फिरत आहे आणि गाभा प्रावरणापेक्षा कमी वेगाने फिरत आहे.
 
पृथ्वीचं उत्खनन न करता हे शोध कसे लावले जात आहेत?
भूकंपाच्या वेळी जे तरंग उठतात त्यांच्या आधारे पृथ्वीच्या गाभ्याबद्दल माहिती मिळू शकते.
 
जेव्हा पृथ्वीवर मोठा भूकंप येतो तेव्हा या धक्क्याची ऊर्जा पृथ्वीच्या आतल्या भागाकडे जाते आणि पुन्हा पृथ्वीच्या भूभागावर येते.
वैज्ञानिकांच्या एका टीमने या धक्क्यापासून येणाऱ्या उर्जेचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी भूकंपाच्या 121 सलग धक्क्यांचा अभ्यास साऊथ सँडविच आयलँड मध्ये केला.
 
1991 ते 2023 या काळात हा अभ्यास करण्यात आला. इतकंच नाही तर सोव्हिएत मधील 1971 ते 1974 या काळातील अणूचाचण्यांचा अभ्यास करण्यात आला. त्याचबरोबर फ्रान्स आणि अमेरिकेतील अणू चाचण्यांचीही माहिती घेण्यात आली.
 
असं खरंच होतं का?
पृथ्वीचा गाभा खरंच विरुद्ध बाजूने फिरतो का याबदद्ल अधिक जाणून घेण्यासाठी बीबीसी तामिळने IISER मोहाली येथील प्राध्यापक टी.व्ही. वेंकटेश्वरन यांच्याशी संवाद साधला.
 
ते म्हणाले, “गाभा खरंच विरुद्ध दिशेने फिरतो हे नेमकं सांगता येणार नाही. त्यासाठी एक उदाहरण पाहूया.”
“तुम्ही 100 किमी प्रति तास वेगाने तुमच्या कारमधून जाता आहात, तुमचा मित्र त्याच वेगाने त्याच्या कारमध्ये जात आहे. दोघंही सोबत प्रवास करताहेत असं दिसतंय. आता अचानक त्या मित्राने वेग कमी करून 80 च्या स्पीडने गाडी नेली. आता इथून तो तुमच्या मागे जाणार. कारण तुम्ही 100 च्या स्पीडने जात आहात. तसंच गाभ्याचा वेगसुद्धा पृथ्वीच्या कक्षेपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे असं वाटतं की ते विरुद्ध दिशेने जात आहे,” असं टी.व्ही वेंकटेश्वरन म्हणाले.
 
या संशोधनाचे निकालसुद्धा काल्पनिक आहेत असं ते म्हणाले.
 
“आम्हाला अजूनही पृथ्वीच्या गाभ्याची पूर्ण माहिती मिळालेली नाही. संशोधन अद्यापही सुरू आहे. या माहितीत गाभ्याचा आकारही वेगळा असल्याचं सांगितलं आहे. कारण आपण 5000 किमी इतक्या खोलीवर जाऊच शकत नाही. भूकंपलहरीच्या माहितीवरून वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला आहे की हा वेग कमी झाला आहे. हे पुढच्या काळात बदलू शकतं,” ते पुढे म्हणाले.
 
याचे परिणाम काय होऊ शकतात?
प्राध्यापक डी.व्ही. वेंकटेश्वरन म्हणतात की पृथ्वीच्या गाभ्याचा वेग कमी झाल्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो.
 
“गाभा लोखंड आणि निकेल पासून तयार झालेला असतो. त्यामुळे परिभ्रमाणाच्या वेगावर परिणाम झाला तर, पृथ्वीच्या बाह्य कवचावर परिणाम होऊ शकतो,” असं ते म्हणाले.
 
“या बदलाच्या पार्श्वभूमीवर चुंबकीय क्षेत्राचं महत्त्व आहे. जेव्हा पृथ्वीचं परिभ्रमण होतं तेव्हा गाभ्याच्या आत असलेल्या धातूंचंही परिभ्रमण होतं. यामुळे पृथ्वीच्या आजूबाजूला चुंबकीय दाब तयार होतो त्यालाच चुंबकीय क्षेत्र म्हणतात,” ते पुढे म्हणतात.
चुंबकीय क्षेत्रातील लहरीमुळे पृथ्वीचे सूर्यापासून रक्षण होतं. पण त्याचवेळी पृथ्वीच्या कक्षेतील बदलामुळे चुंबकीय क्षेत्रातही बदल होऊ शकतो. त्यामुळे दिवसाची लांबी ठरवण्यात चुंबकीय क्षेत्राचाही महत्त्वाचा वाटा आहे.
 
“पण हा फार मोठा परिणाम नाही. एक हजारावा परिणाम आहे, असं म्हणता येईल. त्यामुळे दिवसात एक मायक्रोसेकंदाचा परिणाम होईल. हे सगळं आपल्याकडे आत्ता उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर मी सांगतोय. गाभ्यातील परिभ्रमाणाच्या वेगाची भूमिका महत्त्वाची आहे. भविष्यात आपल्याला आणखी संशोधन करावं लागेल,” असं प्राध्यापक डी.व्ही वेंकटेश्वरन पुढे म्हणाले.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

चेहऱ्यावर कोणते सिरम कोणत्या वेळी लावावे, जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खा, आरोग्यासाठी फायदे मिळतील

ऑफिसमध्ये चांगली इमेज बनवायची असेल तर चुकूनही या चुका करू नका

पौराणिक कथा : श्री कृष्ण आणि कालिया नागाची गोष्ट

बाजरीची इडली रेसिपी

पुढील लेख
Show comments