Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रोटिन शेक पिणं आरोग्यासाठी किती चांगलं, किती वाईट? जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 10 जुलै 2023 (21:07 IST)
ब्रिटनमध्ये प्रोटिन शेक प्यायल्याने एका भारतीय वंशाच्या किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यावरून आता नवीन वादाला जन्म मिळाला आहे.
प्रश्न असा आहे की प्रोटिन (प्रथिनं) सप्लिमेंटच्या लेबलवर आरोग्याच्या दृष्टीने इशारा लिहायला हवा की नको.
15 ऑगस्ट 2020 ला 16 वर्षांच्या रोहनची तब्येत अचानक बिघडली आणि तीन दिवसांनी त्याच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
 
जवळपास पावणेतीन वर्षं त्याच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी केल्यानंतर तपासअधिकारी या निष्कर्षापर्यंत आले की, वजन वाढवण्यासाठी त्याच्या वडिलांनी जो प्रोटिन शेक त्याला दिला होता, त्यामुळेच रोहनचा मृत्यू झाला.
 
तपासकर्त्यांच्या मते रोहनला ऑर्निथिन ट्रान्सकार्बामिलेज (OTC) हा आनुवंशिक आजार होता त्यामुळे प्रोटिन घेतल्यानंतर त्याच्या शरीरातील अमोनिया वाढून जीवघेण्या पातळीपर्यंत पोचला.
 
तपासकर्त्यांनी कोर्टात म्हटलं की प्रोटिन शेकच्या लेबलवर हा इशारा छापायला हवा.
 
त्यांच्यामते, "OTC भले सर्वसामान्य आजार नाहीये पण ज्यांना हा आजार आहे त्यांनी प्रोटिन घेणं जीवघेणं आहे.
 
यानंतर आता ब्रिटनच नाही तर पूर्ण जगात प्रोटिन सप्लिमेंटबद्दल चिंता व्यक्त केली जातेय.
 
लोकांचं असं म्हणणं आज की या प्रोटिन सप्लिमेंट्सवर वैधानिक इशारा द्यायला हवा कारण तरुणांमध्ये विशेषतः जिम जाणाऱ्यांमध्ये प्रोटिन सप्लिमेंट्स लोकप्रिय आहेत.
 
प्रोटिन का गरजेचं आहे?
प्रोटिन किंवा प्रथिनं एक आवश्यक पोषणमूल्य आहेत. शरीरात स्नायू तयार करणं आणि आधीपासून तयार असलेले स्नायू बळकट करणं यात प्रोटिनची महत्वाची भूमिका असते.
 
प्रोटिन हाडं मजबूत ठेवतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तसंच हृदय, मेंदू आणि त्वचेचं आरोग्य राखतात.
 
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार भारतीयांसाठी आपल्या वजनानुसार रोज 0.8 ते 1 ग्रॅम प्रतिकिलो पुरेसं आहे.
 
तुमच्या जेवणाचा एक चतुर्थांश भाग प्रोटिन असलं पाहिजे.
 
अर्थात हे सरासरी मानक आहे. पण वय, आरोग्य, शारीरिक श्रम आणि व्यायामानुसार प्रत्येकाची प्रोटिनची गरज वेगवगेळी असते.
अंडी, दूध, दही, मासे, मांस, सोया, डाळी, कडधान्ये अशा अन्नपदार्थांमध्ये प्रोटिन भरपूर प्रमाणात असतं.
 
श्रीमंत देशातल्या लोकांच्या मुख्य अन्नात या पदार्थांचा समावेश असतो, त्यामुळे त्यांना आवश्यक ते प्रोटीन जेवणातून मिळतं.
 
रोजच्या अन्नातून प्रोटिन मिळत नसेल तर प्रोटिन सप्लिमेंट घेतले जातात.
 
बहुतांश प्रोटिन सप्लिमेंट पावडरच्या स्वरूपात उपलब्ध असतात. या पावडरचा शेक बनवून त्यांचं सेवन केलं जातं.
 
प्रोटिन पावडर वेगवेगळ्या स्रोतांमधून घेतलेल्या प्रोटिनपासून बनते. यात बटाटा, सोया, तांदूळ, मटारसारख्या वनस्पतींजन्य पदार्थांपासून प्रोटिन घेतलं जातं तसंच दूध आणि अंडी यासारख्या प्राणिजन्य पदार्थांपासूनही.
 
प्रोटिन सप्लिमेंट घेणं किती धोकादायक?
हिमाचल प्रदेशमधल्या कांगडास्थित डॉ राजेंद्रप्रसाद मेडिकल कॉलेजमध्ये काम करणारे डॉ समीर जमवाल म्हणतात, "जर तुमचं वजन 50 किलो असेल तर रोज 50 ग्रॅम प्रोटिन घ्यायला हरकत नाही."
 
ते म्हणतात की प्रोटिन पचल्यानंतर शरीरात बनणारा अतिरिक्त अमोनियाचं रूपांतर शरीर युरियात करतं. हा युरिया लघवीवाटे बाहेर पडतो.
 
पण अनेक लोकांच्या शरीरात अमोनियाला युरियात बदलणारे एन्झाईम नसतात. म्हणजेच त्यांना युरिया सायकल डिसऑर्डर असतो.
डॉ. समीर म्हणतात की, "अशी डिसऑर्डर असलेल्या लोकांच्या शरीरात अमोनियाचा स्तर वाढतो. मेंदूसाठी हे फारच हानिकारक असतं."
 
ते म्हणतात की युरिया डिसऑर्डर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्या लोकांना असा त्रास असतो त्यांनी प्रोटिन घेणं हानिकारक असतं.
 
तरुणांमध्ये प्रोटिन सप्लिमेंटची वाढती क्रेझ
तरुणांमध्ये बॉडीबिल्डिंगच्या नावाखाली सप्लिमेंट घायची क्रेझ दिसून येते.
 
त्यातलाच एक आहे नोएडातल्या एका खाजगी संस्थेत काम करणारा उदय. तो लहानपणापासून बारीक होता. कॉलेजमध्ये असताना त्याला आपल्या कमी वजनामुळे न्यूनगंड वाटायचा.
 
म्हणून त्याने वजन वाढवण्यासाठी प्रोटिन सप्लिमेंट घ्यायला सुरुवात केली. यामुळे त्याचं वजन तर वाढलं पण त्याला अनेक त्रासही सुरू झाले.
 
दिल्लीच्या पुष्पांजली मेडिकल सेंटरचे वरिष्ठ डॉक्टर मनीष सिंह म्हणतात की त्यांच्याकडे असा अनेक केसेस येतात ज्यात तरुणांनी न विचार करता प्रोटिन सप्लिमेंट घ्यायला सुरुवात केली आणि मग आजारी पडले.
 
ते म्हणतात, "आम्ही प्रोटिन शेक घेऊ नका असं सांगतो, कारण यामुळे अनेकदा पेशींमधली प्रक्रिया बिघडते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते."
 
ते पुढे म्हणतात, "मी अनेक तरुणांच्या यकृतात पू भरलेला पाहिला आहे. त्यांची शरीरयष्टी मजबूत असते तरी त्यांना न्यूमोनिया होतो. मग ते सांगतात की बॉडीबिल्डिंगसाठी आम्ही प्रोटीन शेक घेतो आहोत."
 
डॉ मनीष म्हणतात, "असे अनेक लोक आहे जे फायदे-तोट्याचा विचार न करता सप्लिमेंट्स घ्यायला लागतात. त्यांना याची गरजही नसते."
 
"जर तुमचं आरोग्य धड नसेल तर, बॉडीबिल्डिंगचा काय फायदा? जिमला जाणाऱ्या अनेकांना हार्ट अटॅक आलेले आहेत, हे तुम्ही पाहिलं असेल. नुसती बॉडी म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं आहे असं नसतं. संतुलित आहार सर्वात महत्वाचा."
 
डॉ जमवालही प्रोटिन सप्लिमेंटच्या बाबतीतला मोठा धोका विशद करतात. हा धोका म्हणजे प्रोटिन सप्लिमेंट्स मध्ये असणाऱ्या जड धातूंचे अवशेष.
 
ते म्हणतात, "जिम जाणारे लोक 'व्हे प्रोटिन' वापरतात. हे दुधापासून तयार होतं. पण हे प्रोटिन तयार करताना कारखान्यात सावधगिरी बाळगली नाही तर मुख्य स्रोतांपासून प्रोटिन वेगळं करताना त्यात शिसं, आर्सेनिक, पारासारखे धोकादायक धातू मिसळण्याची शक्यता असते. यांना हेवी मेटल्स म्हणतात आणि शरीर त्यांना बाहेर काढू शकत नाही. यामुळे किडनी आणि यकृताला धोका असतो."
 
प्रोटिन सप्लिमेंटचा बाजार
भारतात प्रोटिन आणि अन्य सप्लिमेंटची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढतेय.
 
आयएमआरसीनुसार 2022 मध्ये भारतात डायटरी सप्लिमेंटची उलाढाल जवळपास 436 अब्ज एवढी होती. 2028 पर्यंत ही उलाढाल 958 अब्ज एवढी होईल.
 
यातला मोठा भाग प्रोटिन सप्लिमेंट्सचा आहे. सध्या पैसे कमवायच्या नादात नकली आणि भेसळयुक्त प्रोटिन सप्लिमेंट्सही बाजारात आले आहेत.
 
दिल्लीत सप्लिमेंट्स आणि हेल्थ केअर उत्पादनांच शोरूम चालवणारे अमन चौहान म्हणतात की, चुकून आपण भेसळयुक्त उत्पादनं खरेदी करत नाही ना? हे पाहायला हवं.
 
ते म्हणतात, "प्रमुख कंपन्यांच्या अधिकृत दुकानातूनच सप्लिमेंट घ्यायला हवेत. प्रॉडक्टवर हॉलमार्क, इम्पोर्टर टॅग चेक केल्याशिवाय विकत घेऊ नका. जीएसटी बिल जरूर घ्या."
 
वैधानिक इशारा लावला तर काही बदलेल?
 
याबद्दल ब्रिटनमध्ये अजून काही निर्णय झालेला नाही.
 
पण फक्त इशारा देऊन प्रश्न सुटेल का?
अजून एक मुख्य प्रश्न हा की भारतात अजूनही जेनेटिक मॅपिंग करण्याची पद्धत नाहीये. यामुळे कळतं की आपल्याला कोणता आनुवंशिक आजार आहे की नाही.
 
मुळात भारतीयांना आपल्या आनुवंशिक आजाराविषयी माहिती नसेल तर ते पुढे निर्णय घेऊ शकतील का?
 
डॉक्टरांकडे सध्या ज्या केसेस येतात त्या गंभीर स्वरूपाच्या झाल्यावर येतात.
 
त्यामुळे प्रोटीनच्या लेबलवर नुसता वैधानिक इशारा देणं कदाचित तेवढं उपयुक्त ठरणार नाही.
 
डॉक्टर म्हणतात की लोकांनी सप्लिमेंट घेण्याऐवजी आपल्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. संतुलित आहार घेतला पाहिजे.



Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मसालेदार भरली वांगी रेसिपी

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

तुम्हालाही आहे का किडनी स्टोनची समस्या चुकूनही हे पदार्थ खाऊ नका

Career in PGDM Business Analytics : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन बिझनेस अॅनालिटिक्स

पुढील लेख
Show comments