इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या यशस्वी प्रयोगाची आजकाल वैद्यकीय जगतात बरीच चर्चा आहे.
सात वर्षांच्या संशोधनानंतर विकसित केलेल्या रिव्हर्सिबल इंजेक्टेबल मेल काँट्रासेप्टिव्ह इंजेक्शनची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे. म्हणजेच आता या इंजेक्शनच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे.
आयसीएमआरने दावा केला आहे की, या इंजेक्शनचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत आणि ते खूप प्रभावी आहे.
त्याच्या तिसर्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल गेल्या महिन्यात एंड्रोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म (आरआयएसयूजी) नावाच्या या इंजेक्शनला मंजुरी मिळण्यापूर्वी तीन टप्प्यांतून जावं लागलं आहे.
या चाचणीसाठी नवी दिल्ली, उधमपूर, लुधियाना, जयपूर आणि खरगपूर या पाच वेगवेगळ्या शहरांतील लोकांचा समावेश करण्यात आला होता.
या चाचणीमध्ये 25 ते 40 वर्ष वयोगटातील 303 निरोगी, लैंगिकदृष्ट्या सक्रिय विवाहित पुरुष आणि त्यांच्या लैंगिकदृष्ट्या सक्रिय पत्नींचाही समावेश करण्यात आला होता.
कुटुंब नियोजन आणि यूरोलॉजी विभागाच्या संपर्कात आल्यावरच या जोडप्यांना चाचणीत समाविष्ट करण्यात आलं.
या जोडप्यांना वॅसेक्टमी, नो स्कॅल्पल वॅसेक्टमी म्हणजेच कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय गर्भनिरोधक हवं होतं. या चाचण्यांदरम्यान पुरुषांना 60 मिलीग्राम रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म इंजेक्शन दिले गेले.
चाचणीचे परिणाम
आयसीएमआरला त्यांच्या संशोधन आणि चाचण्यांमध्ये आढळून आलं की आरआयएसयूजी हे आतापर्यंतच्या सर्व (पुरुष आणि स्त्रियांसाठी) गर्भनिरोधकांपैकी सर्वात प्रभावी आहे आणि त्याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत.
संशोधनात आढळून आलं की, आरआयएसयूजी, एझोस्पर्मियाचे लक्ष्य साध्य करण्यात 97.3% यशस्वी ठरले, तर गर्भधारणा रोखण्यात 99.02% प्रभावी ठरले.
एझोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंच्या उत्सर्जनात अडथळा निर्माण करणे. एकदा इंजेक्शन दिल्यानंतर सुमारे 13 वर्ष पुरुषांवर त्याचा प्रभाव राहतो. यामुळे गर्भधारणा टाळण्यास मदत होईल.
कंडोम आणि कंबाइंड ओरल काँट्रासेप्टिव्ह पिल (ओसीपी) मर्यादित कालावधीसाठी गर्भनिरोधक म्हणून काम करतात. तर कॉपर टी दीर्घ कालावधीसाठी काम करते. वॅसेक्टमी ही कायमस्वरूपी नसबंदीची एक शस्त्रक्रिया पद्धत आहे.
बदलाची सुरुवात?
कुटुंब नियोजनाचा दबाव नेहमीच समाजातील महिलांवर राहिला आहे.
तज्ञांच्या मते, गर्भनिरोधक औषधांमुळे महिलांना कुटुंब नियोजनाचे स्वातंत्र्य मिळाले. पण नंतर ही जबाबदारीही त्यांच्यावर पडू लागली. आजही बहुतांश महिला ही जबाबदारी पेलत आहेत.
पुरुषांसाठी गर्भनिरोधकांची साधनं नाहीत असं नाही. गोळ्या सोडल्या तर कंडोम आहेत. पण आकडेवारी पाहिली तर ते वापराचं प्रमाण कमी आहे.
2019-21 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस-5) नुसार, 10 पैकी 0.5% पेक्षा कमी पुरुष कंडोम वापरतात. तरीही समाजात महिलांच्या नसबंदीचं प्रमाण जास्त आहे. पुरुष नसबंदी सुरक्षित आणि सोपी असून देखील त्याचं प्रमाण कमी आहे
सर्वेक्षणात पुरुषांची मानसिकता देखील उघड झाली. यात उत्तरप्रदेश, तेलंगणा आणि बिहारमधील 50% पुरुषांनी सांगितलं की, नसबंदी करणं महिलांचं काम आहे आणि पुरुषांनी या सर्व गोष्टींबद्दल काळजी करू नये.
डॉक्टरांच्या मते, पुरुषांमध्ये गर्भनिरोधकाशी संबंधित अनेक समज प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, कंडोममुळे लैंगिक आनंद कमी होतो असा एक समज आहे. तसंच नसबंदीबाबत आहे, त्यांना शरीरातील पुरुषी ताकद कमी होईल अशी भीती वाटते.
फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडियाच्या अध्यक्षा डॉ. एस. शांता कुमारी म्हणतात की, भारतीय समाजात पुरुष नसबंदीबद्दल अनेक समज आणि गैरसमज प्रचलित आहेत. मुलं जन्माला घालता न येणं भारतीय पुरुषांसाठी कमीपणाचं आहे. याचा दबाव महिलांवर येऊन पडतो.
'इन्स्टिट्यूट फॉर व्हॉट वर्क्स टू अॅडव्हान्स जेंडर इक्वॅलिटी' (आयडब्ल्यूडब्ल्यूएजीई) मधील रिसर्च फेलो बिदिशा मोंडल बीबीसीशी बोलताना सांगतात की, भारतात सर्वाधिक नसबंदी महिलांची होते.
सरकारी संस्था असलेल्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमच्या आकडेवारीचा हवाला देत बिदिशा सांगतात की, पुरुषांच्या तुलनेत महिलांची नसबंदी करण्याचं प्रमाण 93% आहे.
त्याच वेळी, पुरुषांच्या मनात भीती उत्पन्न होण्यासाठी गर्भनिरोधकांचा इतिहास देखील तितकाच जबाबदार आहे.
1975 मध्ये सक्तीने नसबंदी केल्याने पुरुषांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे हा सोशल टॅबू बनला. तेच पुरुष नसबंदीला त्यांच्या पौरुषत्वाशी म्हणजेच मॅनहूडशी जोडून पाहण्यात आलं.
नसबंदीमुळे त्यांचे पौरुषत्व संपून जाईल, असं पुरुषांना वाटतं.
बीबीसीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेसचे प्रमुख एस. पी. सिंग यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की, आमच्याकडे या संशोधनाविषयी आणि आयसीएमआरच्या क्लिनिकल ट्रायलविषयी कोणतीही माहिती नाहीये.
त्यामुळे भारताच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी गर्भनिरोधक इंजेक्शन्स कितपत प्रभावी ठरतील हे येणारा काळच सांगेल. कारण आता हे प्रकरण नियंत्रणाबाहेर गेलं आहे.
पुरुष यासाठी तयार आहेत का?
पुरुषांसाठी असलेल्या गर्भनिरोधक इंजेक्शन्स समोर सर्वात महत्वाचं आव्हान असेल ते व्यापक स्वीकृती मिळविण्याचं.
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पुरुष यासाठी तयार आहेत का? किंवा तयार असतील तर असे किती आहेत?
बीबीसीने दिल्लीच्या एम्समधून एमबीबीएसचं शिक्षण घेतलेल्या आणि प्रशिक्षण घेत असलेल्या श्वेतांगशी चर्चा केली तेव्हा त्याने सांगितलं की, पुरुषांमध्ये अजूनही पितृसत्ताक विचार आहेत. ते कोणत्याही नसबंदीला त्यांच्या पुरुषी मानसिकतेशी जोडतात.
पुरुषांना नसबंदीबाबत जागरुक आणि शिक्षित करणं सरकारचं काम आहे. सरकारने त्याचा रचनात्मक पद्धतीने प्रचार व प्रसार केला पाहिजे.
जेव्हा मी दिल्लीच्या बेगमपुरा भागातील एका तरुणाला या इंजेक्शनबद्दल माहिती दिली तेव्हा तो म्हणाला, "मुलं हवीत की नकोत या निर्णयावर ठाम राहण्यासाठी 13 वर्षांचा कालावधी खूप मोठा आहे."
दुसरीकडे, लखनऊच्या तरुणांना हे इंजेक्शन सुरक्षित वाटत नाही.
साहजिकच आगामी काळात भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला या इंजेक्शनबाबत जनजागृती मोहीम राबवावी लागणार आहे. कारण पुरुषांमध्ये नसबंदीबाबत जे गैरसमज आहेत ते तोडण्याची गरज आहे.
कुटुंब नियोजनात स्त्री-पुरुष दोघांचाही सहभाग असावा याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे.
पुरुष नसबंदी करणं सोपं आणि सुरक्षित आहे. पण स्त्रियांच्या नसबंदीमध्ये अनेक समस्या आहेत आणि त्यांच्या आरोग्यासाठी ते धोकादायक आहे.
नसबंदीमुळे त्यांना अंतर्गत रक्तस्राव आणि अनेक प्रकारच्या वेदनांना सामोरं जावं लागतं. त्यांचं वजन देखील वाढतं.
या इंजेक्शनमुळे महिलांना या सर्व समस्यांपासून दिलासा मिळेल एवढं मात्र नक्की.