तुमचा फिटनेस आणि आरोग्य अधिक सुधारण्यासाठी बीट हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.
हे कंदमूळ तुम्हाला अधिक सुदृढ तर बनवतंच, पण त्याचबरोबर वेगानं धावण्यासाठीही ते फायदेशीर असतं.
तसंच याचे अनेक फायदे आहेत. वाढत्या वयामध्ये ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच मेंदूलाही निरोगी राहण्यास मदत करतं.
प्राचीन ग्रीक काळापासूनच बीट आपल्या शरीरासाठी फायदेशीर असल्याचं माहिती आहे.
पण आता याचे नवे पुरावे समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे याचे असाधारण असे फायदेही लक्षात येत आहेत. म्हणूनच नियमित आहारामध्ये याचा समावेश करायला हवा.
बीटरूटचे फायदे सांगणाऱ्या अशाच पाच अत्यंत परिणामकारक अशा कारणांची आपण आज माहिती घेणार आहोत.
1. अँटिऑक्सिडंट बीटालेन्स
बीटरूटला त्याचा गडद लाल रंग मिळतो तो बीटालेन्समुळे. त्यामुळंच त्याला अँटिऑक्सिडंट बनण्याची शक्तीही मिळते.
इटलीमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या संशोधनात हे समोर आलं होतं की, बीट हे कोलन कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यामध्ये सक्षम आहे.
पण फक्त बीटालेन्स एवढीच याची जादुई शक्ती आहे असंही नाही.
अधिक प्रमाणात नायट्रेटचं सेवनही चांगलं नसतं. पण जेव्हा बीटसारख्या भाज्यांमधून नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या नायट्रेटचं सेवन केलं जातं, तेव्हा ते शरीरासाठी आरोग्यवर्धक ठरतं.
बीटरूटचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात नायट्रेट्सचं प्रमाण भरपूर असतं. आपण बीट खातो तेव्हा आपल्या तोंडात राहणारे बॅक्टेरिया नायट्रेटला नायट्रिक ऑक्साइडमध्ये रुपांतरीत करतात. हा एवढा शक्तिशाली घटक आहे की, त्यामुळं आपल्या शरीरावर अनेक लाभदायक परिणाम पाहायला मिळतात.
ब्रिटनच्या एक्सेटर युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाइड फिजियोलॉजीचे प्राध्यापक अँडी जोन्स यांनी अॅथलिट्सच्या कामगिरीवर 10 वर्षे संशोधन केलं आहे.
त्यांच्या मते, "नायट्रिक ऑक्साइड वॅसोडिटेलटर असतं. ते रक्त वाहिन्या रुंद करतं. त्यामुळं रक्ताचा प्रवाह सहजपणे होतो. ते शरीराच्या कोशिकांमध्ये योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं."
कामोत्तेजनेसाठीही नायट्रिक ऑक्साइडचं पुरेसं प्रमाण गरजेचं असतं. रोमन लोकांकडून बीटरूटच्या रसाचा वापर करण्याचा संबंध याच्याशी जोडला जातो. पण या रसाचा प्रभाव व्हायग्रा सारखा होतो, असं अद्याप संशोधनातून समोर आलेलं नाही.
2. हृदय आणि रक्तदाबावर परिणाम
बीटरूटच्या रसाचं सेवन रोज केलं तर त्याचा रक्तदाबावर परिणाम पाहायला मिळू शकतो.
एका संशोधनानुसार जर काही आठवडे दिवसातून दोन बीट खाल्ले तर ब्लड प्रेशरमध्ये सरासरी पाच मिलिमीटरपर्यंत घसरण होऊ शकते.
जोन्स यांच्या मते, "बीट खाल्ल्यानं रक्तदाब नक्कीच कमी होतो. सिस्टोलिक ब्लड प्रेशर (ब्लड प्रेशरमध्ये वर दिसणारं रेटिंग) च्या बाबतीत ते तीन ते नऊ मिलीमीटरपर्यंतही कमी होऊ शकतं."
त्यांच्या मते, जर ही घसरण कायम राहिली तर स्ट्रोक, हार्ट अटॅक यांचा धोका 10 टक्क्यांपर्यंत कमी होण्यासाठी ते पुरेसं ठरू शकतं.
तज्ज्ञांच्या मते, "जर अशा प्रकारचा बदल सगळ्यांमध्येच घडून आला तर स्ट्रोक आणि हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये प्रचंड घसरण होऊ शकते."
संशोधनावरून हेही स्पष्ट होतं की, बीट खाल्ल्याच्या काही तासांनंतरच रक्तदाबावर परिणाम पाहाया मिळू शकतो.
3. मेंदूसाठी सर्वोत्तम आहारांपैकी एक
बीट आपल्या मेंदूमध्ये रक्तप्रवाह वाढवण्यासाठीही फायद्याचं ठरू शकतं.
एका संशोधनानुसार, जर आपण व्यायाम करण्याबरोबरच बीटरूटचा रस सेवन केला तर आपल्या शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूच्या भागातील कनेक्टिव्हिटी वाढू शकते. असं केल्यानं मेंदूचा तो भाग तरुण प्रौढांप्रमाणं होऊ शकतो.
इतर शब्दांत सांगायचं झाल्यास बीटरूटचा रस आपला मेंदू तरुण राहण्यासाठी मदत करू शकतो.
मग असं नेमकं काय घडतं? कदाचित हे रक्तदाबातील सुधारणेमुळं घडू शकतो.
संशोधनानुसार बीटरूटचा रस प्यायल्यानं प्रिफ्रंटल कोर्टेक्स (मेंदूचा सर्वात विकसित भाग) मध्ये रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळं मेंदूची क्षमता वाढते.
4. तोंडातील माइक्रोबायोमचं संतुलन वाढणे
संशोधनानुसार बीटरूटचा रस जर दिवसातून दोन वेळा 10 दिवस सेवन केला तर तोंडातील बॅक्टेरियाचं संतुलन उत्तम होऊ शकतं.
संशोधनात सहभागी असलेले जे लोक या प्रक्रियेत सहभागी होते, त्यांच्यात बॅक्टेरियाच्या संतुलनात आश्चर्यकारक बदल पाहायला मिळाला.
ज्या बॅक्टेरियांमुळं आजार आणि सूज येण्याचे प्रकार घडत होते, त्या बॅक्टेरियाचं प्रमाण कमी करण्यात ते फायद्याचं ठरलं होतं.
5. शारीरिक क्षमताही वाढली
जोन्स यांच्या मते, "नायट्रिक ऑक्साइडच्या परिणामामुळं स्नायूंना ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळतो आणि त्यामुळं शरीर अधिक चांगल्याप्रकारे काम करतं, याची शक्यताही पाहायला मिळाली आहे."
2009 च्या एका संशोधनातून समोर आलं की, ज्या अॅथलिटने बीटचा रस प्यायला होता त्यांना व्यायामादरम्यान शारीरिक सहनशक्ती 16 टक्क्यांपर्यंत वाढण्यात मदत मिळाली होती.
संशोधनानुसार नायट्रिक ऑक्साइड व्यायामादरम्यान ऑक्सिजनचा वापर कमी करायलाही मदत करतं. त्यामुळं थकण्याचं प्रमाण कमी होत जातं.
खेळाडूंच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे एक मोठं यश होतं.
2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिक्स आणि पॅरालिम्पिक खेळांच्या आधी लंडनमध्ये बीटचा रस सहजपणे मिळत नव्हता. कारण सर्वच खेळाडू त्याचा शोध घेत होते.
शरीरावर परिणाम दिसण्यासाठी किती वेळ आधी खावं
2012 मध्ये झालेल्या एका संशोधनात सहभागी असलेल्या ज्या लोकांनी बीटचं सेवन केलं होतं ते पाच हजार मीटरच्या शर्यतीत अखेरच्या 1.8 किलोमीटरमध्ये इतरांच्या म्हणजे बीट न खाल्लेल्यांच्या तुलनेत 5 टक्के अधिक वेगानं धावले होते.
त्यामुळं कामगिरीत सुधारणा करण्याचा उद्देश असेल तर अशा कोणत्याही स्पर्धेच्या किती वेळ आधी बीट खायला हवं.
या प्रश्नाचं उत्तर देताना जोन्स म्हणाले की, "जवळपास दोन ते तीन तास आधी बीट खावं. कारण नायट्रेट रक्तामध्ये मिसळण्यासाठी जरा वेळ लागत असतो."
बीटमधील पोषक तत्वे नष्ट होऊ नये म्हणून काय करावं?
जोन्स यांनी आणखी एक सल्ला दिला. बीट शिजवताना सावधानी बाळगावी. बीट उकळलेलं पाणी फेकू नये. कारण नायट्रेट पाण्यात मिसळलं जात असतं.
त्यामुळं पाणी फेकून दिलं तर बहुतांश नायट्रेट नष्ट होईल किंवा फेकण्यात जाईल आणि त्याचा लाभ मिळणार नाही.
त्यामुळं बीटापासून आरोग्याला जास्तीत जास्त लाभ हवे असतील तर ते कच्चं किंवा भाजून खावं किंवा ज्यूस प्याल्यास ते सर्वाधिक उत्तम.