Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मारबर्ग व्हायरस काय आहे, तो किती धोकादायक आहे?

Webdunia
सोमवार, 10 एप्रिल 2023 (18:16 IST)
जग कोरोना विषाणूच्या विळख्यातून सावरत असतानाच मारबर्ग नावाच्या व्हायरसने मानवी जातीला आपलं लक्ष्य बनवलं आहे.आफ्रिकेच्या जंगलात या व्हायरसचा उगम असल्याचं म्हटलं जातंय आणि या मारबर्ग व्हायरसमुळे टांझानियात आत्तापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.
अतिशय वेगानी संक्रमित होणारा हा विषाणू एबोलाशी साधर्म्य साधणारा आहे. याची लक्षणं ताप, अंगदुखी, जुलाब, उलट्या आणि रक्तस्राव आहेत. काहीही केसेसमध्ये तीव्र रक्तस्राव झाल्याने लोकांचा मृत्यू झालेला आहे.
 
गेल्या काही वर्षांत एकट्या आफ्रिका खंडात या व्हायरसमुळे शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत.
मारबर्ग काय आहे?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार मारबर्ग विषाणू त्याने संक्रमित केलेल्या लोकांपैकी 50 टक्के लोकांना ठार करतो. या विषाणूच्या आधी आलेल्या साथीत प्रत्येकी 24 टक्के आणि 88 टक्के संक्रमित लोकांचे जीव गेले होते.
 
त्या अर्थाने हा अतिशय धोकादायक विषाणू आहे.
 
हा विषाणू सर्वप्रथम 1967 साली आढळला होता. जर्मनीतल्या फ्रँकफर्ट आणि सर्बियातल्या बेलग्रेड इथे एकाच वेळेस या विषाणूची साथ आली आणि 31 लोकांना याची लागण झाली. त्यावेळी 7 लोकांचा मृत्यू झाला होता.
 
या विषाणूचा उगम युगांडातून या यूरोपियन देशात आणलेल्या आफ्रिकन ग्रीन मंकी या माकडांच्या जातीत झाला.
 
पण या विषाणूमुळे इतर प्राण्याचाही मृत्यू झाल्याची उदाहरणं आहेत.
माणसांमध्ये हा विषाणू त्या लोकांमध्ये आढळला आहे ज्यांनी वटवाघळांनी भरलेल्या गुहेत किंवा खाणींमध्ये खूप काळ व्यतीत केला आहे.
 
गेल्या काही काळात अनेक ठिकाणी या विषाणूच्या साथीचा उद्रेक झाला. त्यातली प्रमुख उदाहरणं म्हणजे इक्वेटोरियल गिनी, घाना, डेमोक्रॅटिक रिपल्बिक ऑफ कांगो, केनिया, दक्षिण आफ्रिका, युगांडा, झिंब्बावे आणि अंगोला.
 
2005 साली अंगोलात आलेल्या साथीत 300 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.
 
या विषाणूची लक्षणं काय?
या विषाणू शरीरात शिरल्यानंतर अचानक तुम्हाला ताप, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, पातळ जुलाब, पोटदुखी, मळमळणे, उलट्या अशी लक्षणं दिसायला लागतात. जसं जसं विषाणू शरीर पोखरतो तशी लक्षणं अधिकच तीव्र होतात.
 
विषाणूने शरीराचा ताबा घेतल्यानंतर माणूस ‘भुतासारखा दिसायला लागतो. डोळे खोल जातात, चेहऱ्यावर काहीच भाव उमटत नाहीत आणि माणूस पूर्ण सुस्त होऊन पडतो, हलताही येत नाही’ असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
 
या स्टेजला पोचल्यानंतर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधून रक्तस्राव सुरू होतो. या रक्तस्रावामुळेच शेवटी रूग्णाचा मृत्यू होतो. विषाणूची लागण झाल्यानंतर 8-10 दिवसात रूग्णाचा मृत्यू होतो.
 
या विषाणूचा प्रसार कसा होतो?
आफ्रिकन ग्रीन मंकी या जातीची माकडं आणि इथल्या डुकरांच्या शरीरात हा विषाणू असतो. इजिप्शियन वटवाघळातही या विषाणूचा वास असतो.
 
माणसांमध्ये हा विषाणू शरीराचे स्राव (रक्त, थुंकी, लाळ, वीर्य) तसंच संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या अंथरूणाला स्पर्श केला तर पसरतो.
 
या आजारातून लोक बरे झाले तरी त्यांचे रक्त किंवा वीर्यात हा विषाणू अनेक महिने असू शकतो, व दुसऱ्याला संक्रमित करू शकतो.
 
या विषाणूवर उपचार काय?
मारबर्ग विषाणूवर अजून तरी कोणते विशिष्ट उपचार किंवा लस आलेली नाही.
 
पण आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की यावर उपचार म्हणून इम्युन थेरेपी आणि औषधं निर्माण केली जात आहेत.
तसंच डॉक्टर्स याची लागण झालेल्या विषाणूला भरपूर पाणी पाजतात, तसंच रक्त चढवतात.
 
यापासून बचाव कसा करता येईल?
जागतिक आरोग्य संघटनेने काही गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. त्यात असं म्हटलंय की आफ्रिकेतल्या लोकांनी बुशमीट (वटवाघूळ, माकडं, हरिण, रानउंदीर किंवा तत्सम प्राण्यांचे मांस) खाणं टाळावं.
 
तसंच डुकराचं मांस खाणंही टाळण्यासंबधी सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारच्या मांसाला स्पर्श करू नये असाही सल्ला दिला आहे.
 
ज्या पुरुषांना या विषाणूची लागण होऊन गेली आहे त्यांनी पहिल्यांदा लक्षणं दिसली तेव्हापासून पुढे वर्षंभर सेक्स करताना कॉन्डोम वापरावा. यादरम्यान त्यांनी आपल्या वीर्याची चाचणी करून घ्यावी. जर वीर्य चाचणी दोनदा निगेटिव्ह आली तरच वीर्यातून विषाणू पूर्णपणे गेला आहे असं समजावं.
 
मारबर्गच्या सर्वाधिक केसेस कुठे समोर आल्या आहेत?
काही दिवसांपूर्वी टांझानियाचा कागेरा प्रदेशात या विषाणूची साथ आली. या साथीत आत्तापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झालाय तर 3 लोकांवर उपचार सुरू आहेत.
 
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून आणखी 161 लोकांचा शोध सुरू आहे.
 
याआधी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात इक्वेटोरियल गिनी या देशात मारबर्ग विषाणूची साथ आली होती. त्यात 9 लोकांना या विषाणूची लागण होऊन 7 लोकांचा मृत्यू झाला होता.
 
अजून 20 लोकांना यावेळी लागण झाली का? त्यांचं पुढे काय झालं याचा तपास जागतिक आरोग्य संघटना करत आहे.
 
1998 साली डेमोक्रॅटिक रिपल्बिक ऑफ काँगोमध्ये आलेल्या साथीत 154 जणांना मारबर्ग विषाणूची लागण झाली होती तर 128 जणांचा मृत्यू झाला होता.
 
ज्या लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे त्यांचे अंत्यसंस्कार करताना इतरांनी त्यांच्या शरीराला हात लागणार नाही याची काळजी घ्यावी.
 
भारताला घाबरण्याची किती गरज?
मारबर्ग विषाणू धोकादायक आहे हे खरंच, पण भारताला सध्यातरी त्यामुळे घाबरून जायची गरज नाही.
 
कारण गेल्या 40 वर्षांत आफ्रिका वगळता इतर ठिकाणी संपूर्ण जगभरात फक्त दोन लोकांचा मारबर्गमुळे मृत्यू झाला आहे. यापैकी एकाच मृत्यू यूरोपात झालाय तर एकाचा अमेरिकेत.
 
हे दोन्हीही लोक युगांडामधल्या गुहांमध्ये संशोधन करत होते.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

हृदयविकाराच्या झटक्याची 5 विचित्र चिन्हे, वेळीच सावध व्हा

घरी अचानक पाहुणे आले तर लगेचच बनवा झटपट बटाटा वेफर्स

चटणी बनवतांना या टिप्स अवलंबवा, अगदी आवडीने खातील सर्वजण

Natural Tonar वापरा नॅचरल टोनर

गूळ - नाराळाचे मोदक

पुढील लेख