Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आई म्हणायची 'श्री' लिहावे

Webdunia
आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.
 
आई म्हणायची संध्याकाळची, 
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.
 
आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.
 
आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.
 
आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.
 
आई म्हणायची निर्मळ मन तर 
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.
 
आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.
 
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.
 
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.
 
आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.
 
आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!
 
आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.
 
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
 
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ 
वाटून खायचे सात.
 
मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.
 
बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतात
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतात.
 
त्यांना  कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतात
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतात .
 
तुमचा शब्द ते कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.
 
तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
पेलत सगळी आव्हाने 
घडवतात तुमचा भविष्यकाळ..
 
तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबाही खचत असतात
आधार देता तरी
मन मारून हसत असतात..
 
तुमच्याकडूनं तसं त्यांना 
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्यांचं
अवघं पोट भरत असतं.
 
त्यांच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाहीत
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाहीत.”
 
त्यांच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.
 
एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल
 
तेव्हा म्हणाल, “ आपले बाबा
खरंच कधी चुकत नव्हते
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होते.”
 
तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.
 
आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा..

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments