Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"स्त्रीचं जीवन - दूध ते तूप"

Webdunia
मंगळवार, 26 मार्च 2019 (11:02 IST)
दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा  होतो. तिथे एकेच ठिकाणी दूध, दही, ताक, लोणी, तूप बघून वाटलं की अरेच्या, ह्या सगळ्या स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था ! 
बघू या कसं ? 
दूध - दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन. कुमारिका. दूध म्हणजे माहेर. दूध म्हणजे आईवडिलांशी नातं. सकस, शुभ्र, निर्भेळ, स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही, लगेच बेचव होतं. त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ, सुंदर, निरागस दिसतं.
 
दही- कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं कि कुमारिकेची वधू होते. दुधाचं बदलून दही होतं. दही म्हणजे त्याच अवस्थेत थिजून घट्ट होणं. लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते. दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. कितीही मारहाण करणारा, व्यसनी, व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी स्त्री त्याच्याप्रती एवढी निष्ठा का दाखवते ? नवरा 'पती परमेश्वर' म्हणून ? नव्हे - याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.
 
ताक - सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवशीपासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात. त्यांची आता सून होते. म्हणजे  ताक होतं.
 
दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी. बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती) किंवा खवळलेला नवरा असो  (पित्त प्रकृती) ताक दोघांनाही शांत करतं. यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.
 
ताक म्हणजे सुनेचं सासरशी नातं. सासरी स्त्री ताकासारखी बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाही. दूध पाणी घालून बेचव होतं पण ताक मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष संसारातल्या सगळ्या प्रश्नावर  कामी येतं.
 
लोणी - अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं. मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं  तेव्हा मऊ, रेशमी, मुलायम, नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो. हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं. रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण कण लोणी होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही .कानावरच्या चंदेरी बटा खर तर रोज आरशात लाजून तिला सांगत असतात. पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही. तरुण दिसण्यासाठी ती त्यांचं तोंड काळं करते. ताकाला पुन्हा दूध व्हायचं असतं. वेडेपणा नाही का ?
 
तूप- लोणी ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही. ते आपलं रूप बदलतं. नवर्याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते. त्याच लोण्याचं आता कढवलेलं साजूक तूप होतं. वरणभात असो शिरा असो किंवा बेसन लाडू. घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर  साजूक तूप पडतं आणि जादू घडते. देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते. घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे तूप संपून जातं. हीच स्त्रीची अंतिम उच्च अवस्था .
 
असा अनोखा "दूध ते तूप" हा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास. तिला नमस्कार !!

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments