आपल्याला तो किंवा ती आवडू लागली तरी त्याच्याविषयी किंवा तिच्याविषयी फारशी माहिती आपण मिळवत नाही. मग नाते फार पुढे गेल्यानंतर आपल्याला आपल्या जोडीदाराचे दुर्गुण दिसायला लागतात आणि मग ब्रेक अप व्हायला सुरवात होते. यासाठीच सुरवातीला मिळालेला एकांत कारणी लावावा. या एकांताच्या क्षणीच परस्परांविषयी जाणून घेतलं की मग पुढे पश्चाताप करायची वेळ येत नाह ी.
पण एकांतात असताना वेळ कसा घालवायचा हे प्रेमी युगलांना कळतच नाही. छानपैकी एखाद्या बागेत बसला आहात. आजूबाजूला फारसे कुणीही नाही. अशा वेळी रोमॅंटिक होऊन तुम्ही तिच्या गळ्यात हात घालून बसलात तरी पुढे काय करायचे हे कळत नाही. त्यासाठीच हा लेखप्रपंच.
प्रेमाच्या सुरवातीचा काळ हा एकमेकांना जाणून घेण्यासाठी चांगला असतो. त्यासाठीच त्याचा उपयोग करायला हवा. त्याच्याशी किंवा तिच्याशी बोलताना एकमेकांचे सूर कुठे नि कसे जुळतात हे जाणून घ्या. पण त्याचबरोबर आपले मतभेदाचे मुद्दे कोणते हेही लक्षात घ्या. हे अर्थातच जोडीदाराला जाणवू देऊ नका. कारण या भेटीतच प्रेमापेक्षा मतभेदांना सुरवात व्हायची.
स्वतःविषयी बोलताना आपल्या आवडीनिवडी निःसंकोचपणे मांडा. स्वतःविषयी बोलताना जोडीदारालाही अधिकाधिक बोलण्यासाठी उद्युक्त करा. चित्रपट, नाटक, साहित्य हे विषय चटकन बोलण्यात येतात. पण त्याहीपलीकडे जाऊनही काही विषय़ असतात तेही मांडा. आपल्याला चहा की कॉफी आवडते यावरूनही पुढे लग्न झाल्यानंतर भांडणे होतात.
परस्परांचे नातेवाईक कोण आहेत, त्यांचे स्वभाव कसे आहेत हेही जाणून घ्या. कारण पुढे लग्न झाल्यानंतर तुमचा संबंध त्यांच्याशीही येणार असतो. त्यामुळे त्यांच्याविषयीची माहिती आधीच मिळवून ठेवली तर तुम्हाला तुमची पुढची स्ट्रॅटेजी आखता येईल.
आपल्या जोडीदाराला चटकन एखादे आश्वासन देऊ नका. कारण शब्द देऊन तुम्ही ते पाळले नाही तर त्याचा दोष तुमच्या माथी येईल आणि पुढे आयुष्यभर तो ऐकावा लागेल. आश्वासन देण्यापूर्वी नीट विचार करा. ते पाळणे शक्य असेल तरच हो म्हणा. प्रेयसी एखादी भेटवस्तू मागत असेल तर एखाद-दुसऱ्या वेळेला द्या. पण ती नेहमीच तसे मागू लागली तर तिचा स्वभाव मागण्याचाच आहे का हे समजावून घ्या. अशी स्त्री पुढे बायको झाली तर तुमचा खिसा भराभर रिकामा होईल हे लक्षात घ्या.
ND
ND
परस्परांचे स्वभाव जाणून घेण्यासाठी आणि विचार करण्याची पद्धत समजावून घेण्यासाठी एक युक्ती सांगतो. आपल्या किंवा दुसऱ्याच्या जीवनातील एखादा प्रश्न घ्या. तो सोडविण्यासंदर्भात काय करता येईल यावर थोडी चर्चा करा. त्यावर आपला जोडीदार कसा विचार करतो ते तुम्हाला कळेल. यावरून आपले त्याच्याशी किती जुळते हे तुमच्या लक्षात येईल.
आणि हो, हे सगळे गंभीर गंभीर चालले असले तरी त्यात विनोदाचा शिडकावाही हवाच. उगाच काहीतरी जोक्स करत रहा. त्यामुळे वातावरण हसते खेळते रहाते. कुठलाही ताण निर्माण होत नाही. थोडक्यात काय तर एकांताचा वेळ परस्परांना समजावून घेण्यात घालवा.