' प्रेमा तुझा रंग कसा', या वाक्याचा अर्थ आपल्याला सभोवताली हातात हात घेऊन हिंडणार्या...किंवा एकमेकांच्या बाहूपाशात हरवलेल्या...किंवा एखाद्या समुद्रकिनारी एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या 'कपल्स'कडे पाहिल्यानंतर कळतो. प्रेमाचा रंग तसा गुलाबी! पण, तो अचानक कसा बदलेल, याचा मात्र काही नेम नाही. तो रंग बदलवणारे आपणच असतो. प्रेमामध्ये आपल्या मनाविरूध्द होत असेल तर एकदम 'नाही' कसं म्हणायचं? म्हणून...मन इथे कच खाते.
' त्याला' किंवा 'तिला' वाईट वाटले तर... 'तो' किंवा 'ती' दुखावेल... अशा अनेक गोष्टीचा आपण विचार करत असतो. त्यामुळे 'त्याने' किंवा 'तिने' म्हटल्यानुसार आपण वागत असतो. 'तो' किंवा 'ती' आपल्यावर आपल्या मनाविरूध्द असणार्या गोष्टीही आपल्यावर लादून 'हक्क' सांगत असतो आणि आपण इच्छा नसताही ते स्वीकारत असतो. परंतु, यात आपली चूक म्हणजे आपल्याला 'नाही' म्हणता येत नाही. अर्थात 'नकार' देता येत नाही. परंतु, प्रेमात मनाविरूध्द होणार्या गोष्टीना नकार दिलाच पाहिजे.
' तो' म्हणतो, तू इतर मुलींसारखी मेकअप करत जा... मोजकेच कपडे परिधान करत जा... केस कशाला वाढवतेस.... केस तू कापलेच पाहिजे. असा 'त्याचा' हट्टाहास असतो. एवढेच नव्हेच लग्नाअगोदर 'एकत्र' आलो तर बिघडतंय कुठे? असे म्हणून तो हळूहळू पाय पसरवत असतो. अन् 'ती' मात्र मन मारत त्याच्या भावनामध्ये अडकतच जाते. तिला 'तो' सांगतो, तसं करावंच लागतं....
ND
ND
महाविद्यालयीन जीवनात प्रेमाची उधळण करणार्या तरूण-तरूणीमध्ये 'न'ची बाराखडी त्यांच्याच होणार्या वादाचे कारण बनत असते. त्यामुळे वाद होऊ नये म्हणून तरूण- तरूणी मन मारत एकमेकांचा शब्द खाली पडू देत नाही. त्यामुळे 'त्या' दोघांतील 'प्रेम' अधिक दृढ होण्याऐवजी गुंतागुंतच वाढत जात असते. त्यांना 'नाही' म्हणायची सवय नसते किंवा 'नाही' ऐकायचीही सयव नसते. त्यामुळे कमी वेळातच त्यांच्यातील नात्याला तडे पडतात व प्रेमाला कधी न सुटणारं 'ब्रेकअप'चं ग्रहण लागतं.
यातील महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला 'नकार' देता येत नाही. प्रेमातच काय तर कुठल्याच नात्यामध्ये 'नाही' म्हणण्यासाठी आपली जीभ रेटत नाही. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, याच विचारात आपण सगळा वेळ घालवतो आणि 'नाही' म्हणण्याची संधी गमावून आपल्या पायावर धोंडा मारून बसतो. मन मारत आपण 'होकार' देत आपल्या मनातल्या मनात झुरत असतो. परंतु, आपल्या या भूमिकेमुळेच नको ते घडते. पाणी डोक्यावर गेल्यावर हात पाय हलवण्याशिवाय पर्याय उरत नाही. मग, एकदाचा वैतागून नकार दिला जातो नि गाडी कायमची रूळावरून खाली उतरते. प्रेमात पडतानाच 'नाही' म्हणणे शिकणे महत्त्वाचं आहे.
ND
ND
' प्रेम' जुळते तेव्हा चांगला, वाईट असा भेद आपण करत नसतो. तर मग समोरच्याने आपण सांगितलं तसंच केलं पाहिजे हा आग्रह कशासाठी? प्रेमात आपण एकमेंकांना गुणदोषांसहित स्वीकारले असते. एकमेकांनी चांगल्या समन्वयाने आपल्यातील दोषांचे रूपांतर गुणांमध्ये केले पाहिजे. दोघांनी आपला स्वाभिमान शाबूत ठेवला पाहिजे.
प्रेमात मनाने आपण एकमेकांच्या जवळ आलो असतो तशी शरीराने ही जवळ येण्याची अपेक्षा असतेच. स्पर्शाची भाषा समजलेली असते. नको म्हणता म्हणता थोडं पुढे... थोडं मागे पाहत आपली प्रेमाची गाडी पुढे सरकत असते. अशा वेळा 'त्याला' किंवा 'तिला' नाही म्हणणं थोडं अवघडच जात असतं. 'नाही' म्हटलं तर 'तो' किंवा 'ती' आपल्याला सोडून तर जाणार नाही ना! अशा भीतीमुळे 'तो' किंवा 'ती' मन मानत नसतांना ही आग्रहाला बळी पडत असतात. भविष्यात त्याच्याकडून तिच्या व तिच्याकडून त्याच्या अपेक्षा वाढतच जातात. त्यामुळे 'नाही' म्हणण्याची आपल्याला संधीच मिळत नाही. म्हणून रामायण घडण्याच्या आधीच 'नाही' म्हणणेच 'त्याच्या' किंवा 'तिच्या'साठी गरजेचे असते.