साहित्य : ४ ते ६ मध्यम आकाराचे बांगडे. अर्ध्यापेक्षा थोडा कमी नारळ किसून, ६ ते ८ पाकळ्या लसूण, १" आले, १०-१२ कढीलिंबाची पाने, १० - १२ काश्मिरी मिरच्या, एक मध्यम आकाराचा कांदा, बारीक चिरून, एक मध्यम आकाराचा लालबुंद टोमॅटो, बारीक चिरून, अर्धा चमचा हळद, एक टी स्पून कसूरी मेथी पावडर, लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ, अर्धा टी स्पून गरम मसाला पावडर, मुठभर कोथिंबीर. १०-१२ तिरफळे, मिठ चवीनुसार, अर्धी वाटी तेल.
बांगडे साफ करून, स्वच्छ धूवून आणि पूर्णपणे निथळून घ्यावेत. प्रत्येक बांगडा दोन्ही पंजांमध्ये धरून किंचीत दाबून पाणी काढून टाकावे. बांगड्यांचे डोके काढून टाकून फेकून द्यावे. उरलेल्या बांगड्याला हलक्या हाताने, दोन्ही बाजूंनी तिरप्या चिरा देऊन, आकारानुसार प्रत्येकी २ ते ३ तुकडे करावेत. या सर्व तुकड्यांना हळद आणि थोडे मीठ लावून ठेवावे.
काश्मिरी मिरच्यांची मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यावी. मिक्सरच्याच मोठ्या भांड्यात नारळ, आलं-लसूण, काश्मिरी मिरच्यांचे तिखट, कांदा, टोमॅटो, कसूरी मेथी पावडर, चिंचेचा कोळ, गरम मसाला पावडर, कोथिंबीर एकत्र घालून, कमी पाण्यात, गंधासारखे मऊ वाटावे. सर्वात शेवटी तिरफळे घालून दोन-चार फेरे फिरवावेत.
एखाद्या पसरट पातेल्यात अर्धी वाटी तेल घालून गरम करावे. त्यात कढीलिंबाची पाने टाकावीत. ती तडतडली की मिक्सरमधील, गंधा सारखा, वाटून ठेवलेला मसाला टाकावा. गॅस मध्यम आंचेवर ठेवून मसाला परतत राहावे. सुरूवातीला मसाला सर्व तेल शोषून घेईल. शेवटी मसाला शिजून त्याला चारीकडून तेल सूटू लागेल. रंग लाल भडक आणि चमकदार होईल. मग त्यात गरजे इतके पाणी आणि चवीप्रमाणे मीठ टाकावे. मसाला नीट मिसळून घ्यावा. झाकण ठेवून करीला उकळी आणावी. उकळी आल्यावर हळद आणि मीठ लावून ठेवलेले बांगड्याचे तुकडे त्यात सोडावे. गॅस पुन्हा मध्यम आंचेवर करून करीला चांगली १ -२ उकळी आणावी. बांगडे शिजले की गॅस बंद करावा. करीचे तपमान जरा उतरले की कोथिंबीर भुरभुरून बांगडा करी जेवणात घ्यावी.