Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोन्यात झोपली सतार, सरला रंग

Webdunia
गुरूवार, 11 एप्रिल 2024 (06:30 IST)
कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली
 
झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिले पाठी
 
हळुवार नखलिशी पुन: मुलायम पान
निरखीशी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसि काय ते? गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.
 
साधता विड्याचा घाट उमटली तान
वर लवंग ठसता होसि कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"
 
त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंगवेडी गाथा
 
मी देह विकुनिया मागून घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल'
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा
 
शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान... तो निघून गेला खाली
 
अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'
 
नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हासुनी म्हणाले, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या... निघून गेला वेडा!
 
राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाहि मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येइल भलत्या व्यापाराला?
 
तो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला
 
हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे
 
कवी : ग. दि. माडगूळकर

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

पायांना सूज येत असल्यास, अवलंबवा हे घरगुती ऊपाय

केसांना एलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

सतत कंबर दुखत असेल तर करा हे योगासन

झोपण्यापूर्वी दुधात या 2 गोष्टी मिसळा, सकाळी सहज साफ होईल पोट!

उन्हाळ्यात वॅक्सिंग केल्यानंतर पुरळ आणि खाज येण्याच्या समस्येपासून या उपायांमुळे आराम मिळतो

पुढील लेख
Show comments