Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंगेश पाडगावकर कविता : चिऊताई दार उघड

Webdunia
रविवार, 20 मार्च 2022 (10:44 IST)
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
 
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?
 
वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !
 
दार उघड,
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !
 
फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !
 
गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात .
 
कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .
 
तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .
 
दार उघड
दार उघड चिऊताई,
चिऊताई दार उघड !
 
सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !
 
मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
 
तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !
 
प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !
 
फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,
 
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
 
निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !
 
आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो
 
पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .
 
चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .
 
तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .
 
बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?
 
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड ! 
 
– मंगेश पाडगावकर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

व्यावसायिक पायलट होण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या

या फळात आहे पुरुषांच्या 5 समस्यांवर उपाय, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments