डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि प्रसिद्ध मराठी साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे आज पुण्यात निधन झाले.
डॉ. कोत्तापल्ले हे 74 वर्षांचे होते. पुण्यातील डॉ. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एक सामाजिक भान असलेले लेखक-समीक्षक अशी त्यांची साहित्य विश्वाला ओळख होती.
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी झाले.
शिक्षणानंतर ते बीड येथील बंकटस्वामी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झाले.
अध्ययन-अध्यापन करत असताना त्यांनी आपली लिखाणाची आवड जोपासली.
2005 साली ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नियुक्त झाले, 2010 पर्यंत त्यांनी कुलगुरू पद भूषवले.
डॉ. कोत्तापल्लेंची ग्रंथसंपदा
कोत्तापल्लेंनी कविता, कथा, कादंबरी, समीक्षण असे सर्व साहित्य प्रकार हाताळले.
मूड्स, दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू हे त्यांचे कविता संग्रह आहेत.
कर्फ्यू आणि इतर कथा, रक्त आणि पाऊस, संदर्भ, कवीची गोष्ट, सावित्रीचा निर्णय, काळोखाचे पडघम, देवाचे डोळे, राजधानी हे त्यांचे कथासंग्रह आहेत.
गांधारीचे डोळे, अस्तित्वाची शुभ्र शिडे या त्यांच्या कादंबऱ्या आहेत.
उद्याच्या सुंदर दिवसासाठी ललित लेख संग्रह देखील त्यांच्या नावे आहे.
ग्रामीण साहित्य स्वरूप, मराठी कविता आकलन, साहित्याचे समकालीन संदर्भ, साहित्याचा अवकाश, नवकथाकार शंकर पाटील इत्यादी साहित्य समीक्षणात्मक पुस्तकं त्यांनी लिहिली.
महात्मा फुलेंवर त्यांचे विशेष प्रेम होते. जोतिपर्व, शेतकऱ्यांच्या आसूडवरील प्रस्तावना आणि संपादन, महात्मा फुलेंचे चरित्र ही ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.
2012 मध्ये झालेल्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.