Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधारवड

अरुणा सबाने
NDND
' मम्मी, कागदं, पुस्तकं, फायली आणि बाकीचा सटरफटर पसारा या सार्‍या कचर्‍यांनी आता हे घर अगदी भरून गेलंय बघ. एवढा मोठा बंगला. पण जागा कमी पडायला लागली चक्क.'

श्रावणी दिवानखान्यात बसलेल्या आपल्या आईला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात बोलत होती. त्यामुळे हातातलं पुस्तक बाजूला सारून आँफिसमध्ये गेल्याशिवाय आता पर्याय नाही, हे तिच्या लक्षात आलं आणि ती उठलीच. ' बेटा, या पसार्‍याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं आहेच काय? या पसार्‍याकडे बघत, त्याला आवरत-सावरत आणि मुख्य म्हणजे वाढवतच तर आयुष्य काढायचं, श्रावणी.' तिच्याजवळ येत ती म्हणाली.

' व्वा, म्हणजे तुझ्या आयुष्यात आमच्यापेक्षा या कचर्‍यालाच जास्त महत्व.'

' अजिबात नाही वेडाबाई. तू आणि धवलच्यापुढे मला काहीच महत्त्वाचं नाही. पण माझं काम मात्र तुमच्याच बरोबरीनं तेवढंच महत्त्वाचं आहे. श्रावणी, तुम्ही दोघं सोबत होतात, म्हणूनच मी त्यावेळी जिवंत राहिले आणि माझं काम माझ्यासोबत आहे म्हणून मी जगते. श्रावणी, खूप लोक काम पोटासाठी करतात. पण मी काम माझ्या समाधानासाठी करते. मानसिक समाधानासाठी. लोक पैसे मिळविण्यासाठी काम करतात. पैसे मिळविण्यासाठी कोणतंही काम चालू शकतं. पण पैसे मिळण्याच्या कामातून मानसिक समाधान मिळेलच, असं नसतं. माणसानं पैशाचा हव्यास कधीच धरू नये. मनाला ज्या गोष्टींनी समाधान मिळते, जे काम करण्यात आनंद मिळतो, तेच करावं. पैसाच कमयावचा असेल तर तो कोणत्याही मार्गाने माणूस मिळवू शकतो. मात्र समाधान देणारं काम मिळवायला त्यागही बराच करावा लागतो.'

' खरं आहे ममा तुझं. तू जेव्हा हे काम स्वीकारलंस, ही संस्था स्थापन केलीस, या अडाणी, घाणेरड्या बायका, त्यांचे एकमेकांसोबत कचकचा भांडणं, ती लहान लहान मुलं, गुंड प्रवृत्तीची, आक्रस्ताळी. केवढा राग यायचा आम्हाला सुरूवातीला तुझा. पण त्यांच्यासाठी तुझ्या डोळ्यात एक दिवस अश्रू बघितले आणि धवलनं आणि मी ठरविलं, 'यानंतर कधीच तुला तुझ्या कामाबद्दल बोलायचं नाही.' तसाही तो तुला टोकत नाहीच. मलाच आपलं तुझ्याशी प्रत्येक गोष्टीत चर्चा केल्याशिवाय, लुडबुड केल्याशिवाय होतच नाही. अर्थात लहानपणापासून तूच ही सवय लावलीस मला. ममा, तू प्रत्येक गोष्टी आमच्याशी कशा ग शेअर करू शकतेस?'

NDND
' तुम्ही दोघंही माझे खास मित्र आहात म्हणून. श्रावणी, आपल्या मित्रांसोबतच ना आपण आपलं सुखदु:ख शेअर करीत असतो. तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणून तर आज मी आहे. बरं, ते जाऊ दे. कुठल्या कुठे विषय गेला काचेच्या गोळीसारखा घरंगळत. तू या कचर्‍याबद्दल काय बोलत होतीस?' ' साँरी मम्मी. कचरा नव्हता म्हणायचा मला. पण आपण आता एक दिवस हे सारं साँर्टिग करायचं काय? खूप ढीग वाढलेत म्हणून म्हणतेय.'

' श्रावणी, फारतर आपल्याला या जुन्या फाईल्स वरच्या खोलीत नेऊन ठेवता येतील. बेटा, या केवळ फाईल्स नाहीत ग. ही एकएक फाईल म्हणजे एकएका स्त्रीच्या आयुष्याची, तिनं भोगलेल्या दु:खाची तिच्या शब्दातली कहाणी आहे. या फाईलच्या रूपात एकएका स्त्रीचं आयुष्यच आहे माझ्यासमोर. ही केस नं.1, 2, 3 नाही ग, त्यात शांताची, राधाची, सायलीची, माईची, जान्हवीची कर्मकहाणी आहे. बेटा दु:खी, कष्टी, अनाथ स्त्रिया आहेत या सार्‍या. या माझ्याकडे परत केव्हाही येऊ शकतात. यातल्या कोणत्याही फाईलचं मला केव्हाही काम पडू शकतं. रामाला सांगून आपण हे सारं वरच्या खोलीत ठेवायला सांगू.
' मम्मी, अशी प्रत्येक गोष्ट जपून ठेवायची तुझी ही सवय बघितली की वाटतं, 'ते' घर सोडतांना तुला किती वेदना झाल्या असतील ग?'

' श्रावणी, तू आता या असल्या गोष्टींकडे लक्ष देणं बंद कर बरं. सारखा काय त्याच गोष्टींचा विचार करतेस? घर सोडतांना मला कशाला त्रास होणार आहे? तुम्ही दोघं माझ्यासोबत म्हणजे माझं घर माझ्या सोबत. चल जा पळ आता वाचनालयात. एखादं छानसं पुस्तक घेऊन ये. जा.'

' आता वाचनालयात नाही, माझा क्लास आहे. चल मी निघतेच.'

श्रावणी क्लासला गेली आणि ती बाहेर बगिच्यात झुल्यावर येऊन बसली. उर्मिला पवारचं 'आयदान' हातात. डोळे पुस्तकात पण मन मात्र भलतीकडेच. पुस्तक वाचण्यात लक्ष लागेचना. सारखं श्रावणीचं वाक्य डोक्यात थयथयतं. 'ते' घर सोडताना तुला किती वेदना झाल्या असतील! वेदना! नाही झाल्यात वेदना. सगळ्या भावनाच जिथे जळून खाक झाल्या होत्या, तिथे वेदना काय उरणार? वेदना तिथे होतात, जिथे भावना असतात. भावनांची तर राखच झाली होती. ज्या घरासाठी आयुष्यभर आपण कष्टच घेतले होते. पूर्ण समर्पित होऊन संसार केला होता, प्रत्येक क्षण ज्या नवर्‍यासाठी आपण जगलो होतो, घराची एकएक भिंत बांधतांना केवळ सोनं, पैसेच नाही तर खराखुरा घामही गाळला होता, नवर्‍याला आवडत नाही, म्हणून आपल्याला आवडणार्‍या अनेक गोष्टींचा आपण त्यागच केला होता. पण शेवटी काय मिळालं आपल्याला? मनस्ताप, संताप, अपमान, शिव्या व लाथाही. होय चक्क लाथा.

आज एका सामाजिक संस्थेची अध्यक्ष म्हणून शंभर बायकांच्या केसेस मार्गी लावणार्‍या मँडमनं कधी नवर्‍याच्या लाथाही खाल्ल्या असतील, हे कुणाला आज खरंही वाटणार नाही. पण सत्य आहे हे. पण प्रेमाचा, समर्पणाचाच जिथे वारंवार अपमान व्हायला लागला आणि आपल्या अस्मितेलाही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न झाला. कष्टानं मिळविलेल्या, वरून एक संपन्न संसार वाटणार्‍या, लोकांच्या दृष्टीनं का होईना, पण सुरक्षित असलेल्या घराला लाथ मारताना मग मात्र काहीच वाटलं नाही. नाहीतर एक एक गोष्ट जमवताना काय मौज असायची!

तिच्या डोळ्यासमोर 'त्या' घरातली किचन रॅक आली. आपल्या छोट्याशा किचनमध्ये छानशी किचन रँक असावी, अशी किती दिवसांपासूनची तिची इच्छा. पण बेताचा पगार आणि अफाट खर्च, खाण्या-पिण्याच्या शौकात नेमक्या अशाच संसारिक गोष्टींना पैसा कमी पडायचा. पण काटकसरीत संसार करण्याचा वसुधाचा जणू हातखंडाच. स्वत: अनेक घरगुती गोष्टींची बचत करून, मुलांच्या खाऊच्या पैशाची भर टाकूनही सातशे बत्तीस रूपयांच्या किचनरँकसाठी एकशे साठ रू. कमी पडत होते. पाडव्याला रँक तर घरात यायलाच हवी, तिनं जणू ध्यासच घेतला. कोणत्या गोष्टीत आणखी बचत करावी? का उरलेले पैसे पुढच्या महिन्यात द्यावेत दुकानदाराला? ती सारखा विचार करायची. पण दुकानदाराचे पैसे उधार ठेवणं तिला काही पटेना. विचाराविचारात रात्री कधी झोप लागली, कळलंही नाही. नकळत झोप लागल्यामुळे पांघरूण घ्यायचंच राहिलं होत. शिवाय खिडकीही तशीच उघडी राहिली होती.

NDND
आँक्टोबरचे दिवसभराचे वारे जरी गरम असले तरी पहाटे पहाटे छान हलकीशी हवीहवीशी कापसासारखी मुलायम थंडी पडतेच. खिडकीतून येणार्‍या थंड वार्‍यानंच तिला जाग आली. उठून खरं तर खिडकी लावण्याचाच काय ब्लँकेट अंगावर घेण्याचाही कंटाळा आला होता तिला. पण गारवा जास्तच जाणवायला लागल्यामुळे जवळच ठेवलेलं ब्लँकेट तिनं हात लावून अंगावर ओढलं. दहा-वीस सेकंदातच ब्लँकेटची गरमी तिच्या शरीरात भिनली आणि तिला एकदम बरं वाटलं. क्षणात बटन दाबताच लाईट लागावा, तशी उब तिच्या शरीरात पसरली आणि एक विचार तिच्या मनात चमकून गेला. ' आपण स्वेटर्स करून विकले तर.....' आपले स्वटर्स यांना, मुलांना, शेजार्‍यांना सार्‍यांना किती आवडतात. आणि तेवढ्या पहाटे तिनं क्षणात निर्णय घेतला. कमान तीन तरी स्वेटर्स करायचे असं ठरवलं. आपल्याला सध्या एकशे साठ रू. तर हवे आहेत. नाहीतर खूप दिवसांचे भुयार अण्णांसाठी, एक मोहरीलला आणि एक मारायचा महेशदाच्या माथी.

दुसर्‍या दिवशी वसुनं बाजारात जाऊन सुंदर रंग निवडून लोकर आणली. दहा दिवसात दिवसरात्र एक करून तिनं स्वेटर्स विणलेत. दरम्यान तिघांनाही ' तुम्ही एवढ्या दिवसाचे म्हणताच आहात, तर घेतला हं मी आता स्वेटर करायलातुमच्यासाठी. अगदी चार दिवसात करून देते.' म्हणून प्रस्तावनाही करून ठेवली आणि वसुधानं दुकानात जाऊन जेव्हा स्वेटरच्या पैशातून किचन रँक आणली तेव्हाच तिचा जीव भांड्यात पडला. किती धडपडायचो आपण या असल्या गोष्टींसाठी. वीस हात मारून खोल विहहिरीतून पाणी काढून घराच्या भितींना पाणी द्यायचो. पाणी नव्हतं ते केवळ. श्रमाचा घामही होता त्यात माझा. कशासाठी? घराच्या भिंती मजबूत व्हाव्यात म्हणून? रोज भावनांची एक एक वीट खाली घसरत होती आणि आपण आपल्या परी सारं घरकूल मजबूत करण्याचा, धरून ठेवण्याचा प्रयत्न करीतच होतो. काय झालं शेवटी? संसार एकटीच्या प्रयत्नानं नाही उभा राहू शकत. आणि जिथे मनच फाटले तिथे तुम्ही ते कसे सांधणार?

पण बरंच झालं. जे झालयं ते चांगलच झालय. घर सोडलं की अनेक स्त्रियांच्या भोगाला पारावार राहात नाही. माझ्यासाठी मात्र घटस्फोट ही इष्टापत्तीच ठरली. 'दोनशे रूपये कमवण्याची लायकी नाही' म्हणून ऊठसूठ हिणवणार्‍या माझ्या नवर्‍यानं मानसिकदृष्ट्या मला खच्ची करून टाकलं होतं. माझा आत्मविश्वासच नष्ट व्हायला लागला होता. मला नोकरी किंवा व्यवसाय असं काही करू द्यायचं नाही आणि पैसे कमवत नाही म्हणून हिणवायचं. मला डाँमिनेट करून स्वत: एक क्रूर आनंद मिळवायचा. काय मिळत असेल या माणसांना असं वागून? कां वागतात ही माणसं अशी? स्वत: मोकाट सुटलेल्या सांडासारखं वागायचं आणि बायकोच्या चारित्र्यावर मात्र शिंतोडे उडवायचे. बायकोचं चारित्र्य हे मोरीतून वाहत जाणारं पाणी वाटतं की काय?

त्या क्षणांची ती नेहमीच फार आभारी होती. ज्या क्षणी तिला घर सोडून जाण्याची बुध्दी सुचली आणि तिचा निर्धार ठाम झाला, 'कुत्ता भोंकता है, हाथी चलता है' असं जगायचं तिनं ठरविलं त्यावेळी नव्यानं जगण्याची उर्मी तिच्यात निर्माण झाली. जग काहीही म्हणो पण तिला लोकांच्या प्रमाणपत्रांची गरज नव्हती. आपण कसं जगायचं, हे ठरविण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे, हे तिला उमजलं होतं. किती वर्ष ती तिच्या क्रिएशन दाबून जगणार होती आणि का म्हणून? श्वास घ्यायचा तोही नवर्‍याला विचारून. हे काय जगणं झालं? त्यापेक्षा मेलेलं काय वाईट? पण तिला करायचं नव्हंत. त्यानं तिला इतकं बदनाम केलं, मानसिक अधू केलं, तिच्यात काही शक्तीच नाही, काही गुणच नाही, हेच तो वारंवार तिला पटवून देत होता. तिला य:कश्चित सिध्द करून, तिला चारित्र्यहीन ठरवून त्याला काय सिध्द करायचं होतं? काझ्यापासून स्वत:च्या सोयीसाठी सुटका करवून घ्यायला, खरसच तिची एवढी बदनामी करणे, आवश्यक होते काय?

आणि शेवटी चारित्र्यहीन म्हणजे तरी नेमकं काय बरं? अंकूशच्या नावानं त्यानं जो गदारोळ उठवला त्याच्याशी तिचे नसलेले शरीरसंबंध प्रस्थापित केलेत. का? त्याची आणि तिची वैचारिक शलाका जुळली. त्याच्यासोबत तिच्या गप्पा रंगल्यात. ते एकमेकांच्या सुखदु:खात सामील झालेत, एकमेकांचे अत्यंत जवळचे मित्र बनलेत, प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करायला लागलेत. खरं तर मनानं ते इतके जवळ होते, इतके निर्व्याज प्रेम करायचे ते एकमेकांवर की त्यांना जवळ यायला आणखी वेगळ्या शारीरपातळीची गरजच नव्हती. बरं माणसानं संशय तरी किती घ्यावा? सहवासात येणारा एकही पुरूष सुटू नये? आणि ज्याचा आपल्यावर विश्वासच नाही, पतीपत्नीच्या नात्यावर विश्वास नाही, स्वत:च्या पत्नीवर विश्वास नाही, त्या माणसाला खरंच आपल्या पत्नीसोबत तरी संग करण्याचा अधिकार आहे काय? असावा काय?

वाट्टेल त्या पुरूषांवरून संशय घ्यायचा आणि रात्र होत नाही तोच जवळही घ्यायंच? छी. अंगावर पाल पडल्यागत वाटायचं. त्यांचा हात जरी अंगावर पडला, तरी शिसारी यायची. खरं तर तोच तिला व्यभिचार वाटायचा. तो तिच्यावर बलात्कारच होता. ज्या माणसाच्या मनात तिच्याबद्दल केवळ विकार आणि विकारच आहेत, त्याला ती रात्रीची कशी चालू शकत असेल? काय असावी ही मानसिकता? जी स्त्री परपुरूषासोबत संग करते, अशी शंका घेणारा नवरा जर पत्नीला रात्रीचा जवळ करतच असेल, तिचं शरीर ओरबडत असेल, हीच व्यभिचार नव्हे काय? नामर्दपणा नव्हे काय? ज्या पत्नीवर आपला संशय आहे, तिचा उपभोग घेणं, यात कसला पुरूषार्थ? ' बापरे, मम्मी मी केव्हाची आवाज देचे आहे? अग क्लासहून आले आणि तू अजूनही अशीच बसली आहेस लाईटही न लावता? मम्मी.... कुठे गेलीस मम्मी तू....'

तिच्या आता लक्षात आलंय, श्रावणी आलीय. आपल्यावर ओरडते आहे. श्रावणीनं आईचा नूर ओळखला आणि तिच्याजवळ बसून तिच्या मांडीवर आपलं डोकं ठेवलं. काहीही न बोलता ती तशीच पडून राहिली. कारण तिला माहीत होत, आता केवळ आपला सहवासच मम्मीला आश्र्वस्त करू शकतो.

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

आरोग्यवर्धक खजुराचे लाडू रेसिपी

फ्रोझन शोल्डर म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि कारणे जाणून घ्या

या DIY व्हिटॅमिन सी सीरमने पिगमेंटेशन आणि डाग निघून जातील, वापरून बघा

तुम्हीही जास्त वेळ उपाशी राहिल्यास तुमच्या शरीराला या 5 समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर भांडत असाल तर हे 3 रिलेशनशिप नियम वापरून पहा

Show comments