Dharma Sangrah

सरडा

अमोल कपोले

Webdunia
NDND
टिंगलवाडीच्या रामराव पाटलांना फिटनेसचा भलता नाद. त्यामुळे रोज सकाळी हणम्यासोब त 'मार्निंग वाक' ला जाणे हा त्यांचा नित्यक्रम. आजही ते फिरायला निघाले, सकाळी सातची वेळ म्हणजे गावाची जाग येण्याची वेळ. त्यामुळे गावाचे सगळे व्यवहार अगदी शांततेत चाललेले असण्याची वेळ. पण, आज त्या शांततेवर चरे उमटले. चावडी क्रॉस करून जात असतानाच हणम्या आणि पाटलांच्या कानावर एकच कल्लोळ आला,
'' हाणा, मारा त्या कुत्र्याला, मायला चावून पळतंय''
आवाजाच्या दिशेने वळून पाहता दोघांनाही एक मजेशीर दृश्य दिसलं. एक छोटं कुत्र्याचं पिल्लू केकाटत पळत होतं आणि सात-आठ जण त्याच्या मागे धावत होते, त्याला मारण्यासाठी. अखेर या शर्यतीत ते बिचारं जनावर हरलं आणि त्या लोकांनी त्याला पकडलंच. आपली एंट्री मारायची वेळ आताच आहे, हे जाणून पाटलांनी गर्दीच्या दिशेनं कूच केली. हणम्या पण बाह्या सरसावत पुढे सरकला.
का रं, काय गोंधळ हाये
पाटलांना बघून गर्दी चपापली आणि त्यांनी पाटलांना वाट करून दिली.
NDND
घोळक्याच्या मध्यभागी जनू न्हावी एक हात वर करून तावातावाने त्या कुत्र्याला शिव्या घालत होता.
पाटलांना पाहताच त्याचा स्वर खाली आला, विस्कटलेले केस आणि कपडे सावरत तो म्हणाला,
हे बेणं कुत्र्याचं पिल्लू. चावलं की हो पाटील माझ्या हाताला. आता माझा कामाचा हात मी धरून बसलो आठ दिवस तर खानार काय?
जन्याच्या उजव्या हाताची तीन बोटं रक्ताळली होती. कुत्र्यानं चांगलाच कडाडून चावा घेतला होता.
हं.. पाटलांनी मिशीवरून हात फिरवत आधी जन्याची बोटं बघितली आणि मग त्या कुत्र्याकडे नजर टाकली.
झाल्या प्रकाराने भेदरलेलं ते पिल्लू थरथर कापत जागीच उभं होतं, त्याच्या भेदरलेल्या नजरेत एकाच वेळी भीती आणि याचना असे भाव भरलेले होते.
च्या मायला. कोनाचं पिल्लू हाय हे. कुत्री पाळतात तर सांभाळता येत नाही का लोकांना.. याचा बंदोबस्त आता केलाच पायजे.
होय होय.. गर्दीनेही पाटलांच्या स्वरात आपला स्वर मिसळला.
पाटील पुढे काहीतरी बोलणार एवढात हणम्या म्हणाला, पण पाटील, मला वाटतंय, ह्ये कुत्रं आपल्या आमदार सायबाचं हाये. त्यांच्याकडे आसं एक कुत्रं हाये आसं मी आइकलं होतं.
पाटलांची फुगलेली छाती एकदम दोन इंच कमी झाली, काय सांगतूस, आमदार गुलाबरावाचं कुत्रं हाये हे..
व्हय..माला बी तसंच वाटतंय.. गर्दीतून एक स्वर बोलला.
पाटलाच्या चेहर्‍यावरचा रूबाब नाहिसा झाला. मिशांचे पीळ लुळे पडले. नजरेतले कुत्र्याविषयीचे तुच्छतेचे भाव आणि जन्याविषयीचे सहानुभूतीचे भाव यांची अदलाबदल झाली. कुत्र्याकडे दयार्द्र नजरेनं पाहत पाटील म्हणाले,
जन्या लेका, सायबाचं कुत्रं असं उगा कुनाच्या वाटाला जानार न्हाय. तूच कायतरी खोड काडली असशील..
आता मी काय खोड काडनार त्याची पाटील.. आन हे कुत्रं आमदाराचं न्हाय..त्येच्याकडं असं कुत्रच न्हाय.. जन्या उत्तरला.
एवढात हणम्या कसलीशी आठवण झाल्यागत म्हणाला, पाटील, माला बी जरा डाउट वाटतोय. परवा मी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो नव्हं का, तवा तं काय दिसलं नाय बा मला.
व्हय व्हय, आमदाराकडं आसं कुत्रं नाय हाय, गर्दीतला आणखी एक स्वर बोलला.
पाटलाच्या चेहर्‍यावरचे भाव पुन्हा बदलले, हानम्या खरं बोलतूस?
हणम्यानंही मान हलवली, एकदम खरं पाटील.
पाटलाच्या चेहर्‍यावरचे लाचार भाव एकदम नाहीसे झाले, मुद्रेवर पुन्हा रूबाब झळकायला लागला. पुन्हा एकदा कुत्रा आणि जन्याविषयीच्या भावनांची अदला बदल झाली.
या कुत्र्याचा मालक कोन हाय, त्याचा शोध घेउन त्याला ताबडतोब दम द्यायला पायजे.
व्हय व्हय.. गर्दीने नेहमीप्रमाणे री ओढली.

NDND
हनमंतराव.. कुत्र्याच्या मालकाचा शोध घेवून संध्याकाळी चावडीवर बोलवा.. पाटील मिशांना पीळ भरत बोलले.
नाय नाय पाटील.. हे आमदारांचंच कुत्रं हाय.. गर्दीतून आणखी एक स्वर पचकला.
मिशीला पीळ भरता भरता पाटील पुन्हा दचकले,
हनम्या काय म्हनतोय तो.
पण हणम्यानं उत्तर देण्याआधीच आणखी एक स्वर उत्तरला, आवं पाटील, हे आमदाराचंच कुत्र हाये. या जन्याला खोड काडायची लय खाज... म्हनून त्यानं पेटती विडी कुत्र्याच्या तोंडात दिली, मग चावनार नाय तर काय?
पाटलाच्या मिशा पुन्हा लुळ्या पडल्या.. पुन्हा कुत्रा आणि जन्याविषयीचे भाव बदलले.
तरी मी म्हनत होतो हनम्या.. कुत्रं खानदानी दिसतंय, आसं एकदम कुनाला चावनार्‍यातलं वाटत नाही. काय रं जन्या.. हे आसले उद्योग करतूस आन त्या बिचार्‍या मुक्या प्रान्याला दोष देतोस व्हय रं.. आता लेका तुझाच बंदोबस्त करायला पायजे...
व्हय व्हय.. गर्दीने आपला धर्म पाळला.
थांबा पाटील.. छगन सुताराचा पोरगा पुढे होत बोलला.
नाय म्हन्जे मला वाटतं हे कुत्रं आमदाराचं न्हाई. म्या तरी कदी त्याला पाह्यलं नाही..
व्हय व्हय.. आणखी एक दोघांनी या नव्या माहितीला दुजोरा दिला.
पाटलांची मुद्रा पुन्हा बदलली. पुन्हा मिशा ताठ. कुत्रा आणि जन्याविषयीच्या भूमिकांत बदल.
आता ते काही बोलणार इतक्यात हणम्या म्हणाला, माला वाटतं पाटील आपन माहितगार मानसाकडूनच खात्री करून घेऊ. तो समोरून नाम्या येतोय, आमदारांचा हरकाम्या. त्यालाच इचारू.
ह्ये कुत्रं आमदाराचं नाय, आमदाराकडे आसं कोन्चबी कुत्रं न्हाय.. नाम्यानं सगळ्या संशयांना पूर्णविराम दिला.
पाटलांची मुद्रा.. मिशा... जन्या.. पिल्लू.. अदलाबदल.
तरी मी म्हनत होतो, ह्ये कुत्रं मोकाट कुत्रं असनार, कुठं तो आमदाराचा खानदानी आब आन कुठं ह्ये मरतुकडं कुत्रं.. त्याला आता मुन्शिपाल्टीच्या मान्सांच्याच ताब्यात द्यायला पायजे, इति पाटील.
नाय पन.. जन्या बोलला, ह्ये कुत्रं आमदाराचं न्हाई आसं मी म्हनालो, पन ते आमदाराच्या भावाचं हाये. परवाच त्यांनी शहरातून आन्लं त्येला..
पाटलांची मुद्रा.. मिशा... जन्या.. पिल्लू.. अदलाबदल.
तरी मी म्हनतच होतो हनम्याला.. हे पिल्लू अगदी शहरी वळनाचं हाये, आसं एकदम कोनाला चावनारं न्हाय, ह्या जन्यानंच त्येची खोड काडली. कारं ए जन्या आता काय करावं तुला, बिचार्‍या मुक्या प्रान्याला तरास दिला.. चल आन आता ते पिल्लू इकडं.., इति पाटील.

आता गर्दीतूनही जन्याविषयी कुचेष्टेचा स्वर उमटला. त्याची चेष्टा करत सारे पांगले. नाम्यानं पिल्लू उचललं आणि तो आमदाराच्या बंगल्याकडे रवाना झाला.

मिशांवर ताव देत, ताठ मानेनं पाटील हणम्यासोबत वाडाच्या दिशेने चालू लागले..

( अंतोन चेकॉव्हच्या 'दी शॅमेलिऑन'चे स्वैर रूपांतर)

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश All the best wishes in Marathi

New Born Baby Girl Wishes in Marathi मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

peas raita recipe मटार पासून बनवा स्वादिष्ट रायता रेसिपी

Dates Benefites खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Career Tips: 12 वी नंतर तुम्ही गेमिंग इंडस्ट्रीमध्ये उत्तम करिअर करून लाखो कमवा

Show comments