Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिक्षकाने आधी आई असणं गरजेचं (मार्मिक कथा)

Webdunia
मिसेस साठे आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. साठे बाईंना वर्गात बोलणे सुरू करताना, “love you All” असं म्हणायची सवय होती. तसं त्या म्हणाल्याही. पण त्यांना जाणवलं की, खरंतर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत. त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता.
 
 
तो मुलगा अगदी अव्यवस्थित, गबाळा असा होता आणि साठे बाईंना त्याच्याबद्दल प्रेम किंवा आत्मीयता वाटेल असं, त्यांची दखल घ्यावी असं, काहीही नव्हतं !  त्या मुलाशी जरा अलिप्तपणेच त्या वागायच्या. कोणत्याही नकारात्मक गोष्टींसाठी बऱ्याचदा त्याचंच उदाहरण द्यायच्या. आणि कोणत्याही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या.
 
पहिली तिमाही झाली. प्रगतिपुस्तक लिहायचे दिवस आले. त्याही मुलाची ‘प्रगती’ त्यांनी लिहिली. शाळेची अशी पद्धत असते की, प्रगतिपुस्तकावर शेवटी मुख्याध्यापिकेची सही होते. त्याप्रमाणे प्रगतीपुस्तके सहीसाठी गेली.
मुख्याध्यापिकेने साठे बाईंना बोलावून घेतले. त्या म्हणाल्या, “अहो प्रगतिपुस्तकात ‘प्रगती’ लिहायची असते. पालकांना कळायला हवे, की त्यांच्या मुला-मुलींना काही भवितव्य आहे. या शैलेशबद्दल तुम्ही काहीच लिहिले नाहीये. असं कसं चालेल? त्याच्या पालकांना काय वाटेल ? अहो त्याला ते मारतीलसुद्धा एखादेवेळी !” 
 
साठे बाई म्हणाल्या, “मी त्या मुलाचं करू तरी काय ? अहो, सकारात्मक काहीच नसेल, काही प्रगती नसेलच तर मी तरी काय लिहू ?” “ ठीक आहे, तुम्ही वर्गावर जा,” मुख्याध्यापिका म्हणाल्या. मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्रे सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतले, आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके काढून आणायला सांगितले. आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके साठे बाईंकडे पाठवून दिली.
 
साठे बाईंनी प्रगतिपुस्तके चाळायला सुरुवात केली. तिसरीच्या प्रगतीपुस्तकावर शेरा होता,“शैलेश हा वर्गातील सगळ्यांत हुशार विद्यार्थी आहे!” त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी चवथीचे प्रगतिपुस्तक पाहिले, 
त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असे सुचवत होते की, त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू खाली येतो आहे.
 
त्याच्या आईला दुर्धर कॅन्सरने ग्रासले होते आणि रोग आता शेवटच्या स्थितीत पोचला होता. त्यांची आई त्याच्याकडे आता पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नव्हती. आणि ते हळूहळू त्या शेऱ्यांमधून ध्वनीत होत होते. सहावीत शेरा होता,“ शैलेशने त्याची आई गमविली आहे आणि तो स्वत:ही हरवल्यागत झाला आहे. आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नाहीतर आपण त्याला गमावू ! आतापर्यंत साठे बाईंच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या. म्हणाल्या, “मला कळले काय करायला पाहिजे ते !”
 
पुन्हा सोमवारी, त्या वर्गावर गेल्या आणि वर्गावर नजर फिरवून नेहमीप्रमाणे म्हणाल्या, “love you All”! पुन्हा त्यांना जाणवलं की आपण खरं बोलत नाही आहोत. कारण त्यांना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा कैक पटींनी जास्त माया आता शैलेशविषयी वाटत होती ! त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होतं. आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदलला होता. त्या शैलेशशी सकारात्मक वागत होत्या.

दिवस जात होते. शाळेचा शेवटचा दिवस उगवला. सगळ्या मुलांनी teacher साठी छान-छान गिफ्ट्स आणल्या होत्या. एकच ‘गिफ्ट’ एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेली होती. शिक्षिकेच्या अंत:प्रेरणेने त्यांनी ओळखले, ही कोणाची गिफ्ट आहे ते. एक अर्धी वापरलेली परफ्यूमची बाटली आणि दोन खड्यांच्या बांगड्या. एका बांगडीतले दोन खडे आधीच निखळलेले होते. सगळी मुले हसली. त्यांनी ती गिफ्ट शैलेशची आहे हे ओळखलं.काही न बोलता साठे बाईंनी तो परफ्यूम आपल्या साडीवर उडवला. त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या. 
 
आता शैलेशचा चेहरा खुलला. हलकेच हसून तो म्हणाला,“आता माझ्या आईसारखाच सुगंध तुमच्या साडीला येतोय!” “ती मला सोडून गेली त्या आधी, तिने वापरलेला हा शेवटचा परफ्यूम होता. आणि शेवटी तिच्या हातात ह्याच बांगड्या होत्या !” 
 
एक वर्षानंतर, म्हणजे शाळा संपली तेव्हा, साठे बाईंच्या टेबलावर एक पत्र होते. “मला जेव्हढे शिक्षक-शिक्षिका लाभल्या, त्यातल्या तुम्ही सर्वांत छान आहात.”- शैलेश. त्यानंतर बरीच वर्षे, शैलेशकडून याच आशयाचे पत्र त्यांना दर वर्षी मिळत असे. वर्षे निघून गेली. त्यांचा संपर्क राहिला नाही.

दरम्यान, त्या निवृत्तही झाल्या. अचानक त्यांना एक कुरिअर शोधत आला. त्याने एक पत्र त्यांना दिले. त्यावर प्रेषक म्हणून नाव होतं, डॉ. शैलेश, Ph.D. या दरम्यान, शैलेश मोठा झाला होता. शैलेशने खूप प्रगती केली होती. डॉक्टरेट मिळविली होती. पत्रात तीच ओळ पुन्हा होती. थोड्या फरकाने. “मला जगात खूप माणसे भेटली. पण तुम्ही सर्वांत छान आहात !” “मी लग्न करतोय. आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करण्याचा विचार मी स्वप्नातही  करू शकत नाही.” सोबत विमानाची दोन तिकिटे होती. जायचे आणि यायचे. 
 
साठे बाईंकडे आता तो परफ्यूम नव्हता. पण त्या बांगड्या मात्र अजूनही त्यांच्या हातात होत्या. साठे बाईंना राहवले नाही. त्या लग्नाला गेल्या. तिथे अपरिचितच जास्त होते. त्यामुळे त्या मागच्या एका रांगेत बसून चाललेला सोहळा पाहत होत्या. मात्र कुणीतरी त्यांना शोधत होते. त्यांनी त्यांना ओळखले आणि पहिल्या रांगेकडे नेले. तिथे एका खुर्चीवर चिठ्ठी लावलेली होती, “आई”.
 
त्यांना पाहताच, सोहळा थांबवून शैलेश त्यांच्यापाशी आला. त्याने त्यांना सन्मानाने खुर्चीवर बसविले. पाया पडला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही. आज मी जो काही आहे, तो केवळ तुमच्यामुळेच. लग्न पार पडले. जोड्याने पुन्हा पाया पडायला आला, तेव्हा नवपरिणित पत्नीला म्हणाला, “ह्या नसत्या, तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो !”
 
त्यावर साठे बाई उत्तरल्या, 'शैलेश जर माझ्या वर्गात नसता, तर मला कधीही कळलं नसतं, की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे, मग शिक्षक' !

- सोशल मीडिया

संबंधित माहिती

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

पुढील लेख
Show comments