प्रवेशाची खोली अतिशय कलात्मकरित्या सजवलेली पाहिजे. या खोलीत एक्वेरीयम म्हणजे माशांचे भांडे ठेवले तरी छान किंवा छोटासा धबधबा ठेवला तर चांगले. पाण्यात सतत फिरणारे मासे हे चैतन्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे जीवनाला आलेला वेग, त्यातले चैतन्य पाहणाऱ्यालाही चैतन्य देते. धबधबा ही अविरत चालणारी प्रक्रिया असते. पाणी खाली पडून पुन्हा येते. हेही चैतन्याचेच एक रूप. ग्राहकाच्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यालाही प्रसन्न वाटते.
ऑफिसचे मुख्य दार शक्यतो मोठे असावे. ते छोटे असल्यास येणाऱ्याला मज्जाव केल्यासारखे वाटते. तेथे अडथळा ठेवल्यास व्यावसायिक अडथळेही येतात. अतिशय़ छान असलेले जुने मोठे दार बसविले तर उत्तम. त्यामुळे व्यावसायिकाला ग्राहकाविषयी आदर असल्याची भावना उत्पन्न होते. त्याचवेळी असे दार हे व्यवसायिक यशाचे स्थिरत्व अधोरेखित करते. शिवाय चांगल्या व्यावसायिक य़शाचेही ते प्रतीक आहे. जुने पण खराब दार नकारात्मक प्रभाव निर्माण करते. ते सहजगत्या उघडत नसल्यास, ते करकर करत असल्यास व्यावसायिक अडचणी येतात. त्यामुळे असे दार तातडीने दुरूस्त करावे.