स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे. लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर गेली आहे. याव्यतिरिक्त रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा निकाल आज जाहीर होईल. या सर्व मतदारसंघात सोमवारी 21 मे रोजी मतदान झालं. सुरुवातीला नोटा आणि अवैध मतं बाजूला काढली जातील, त्यानंतर वैध मतांचा कोटा ठरवून मतमोजणीला सुरुवात होईल. नाशकात शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे अशी लढत पहायला मिळाली. इथं भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत 99.57 टक्के मतदानाची नोंद झाली. 940 पैकी 938 जणांनी मतदान केलं. कर्जत आणि पनवेलमधील प्रत्येकी एका मतदाराची मतदानासाठी अनुपस्थिती होती. दोन्ही शेकापचे लोकप्रतिनिधी आहेत. नाशिकमध्ये 644 जणांनी मतदानाचा हक्क बजवल्यामुळे 100 टक्के मतदान झालं. उस्मानाबाद बीड लातूर मतदारसंघात 99.9 % मतदान झालं. एक हजार पाच मतदारापैकी एक हजार चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उस्मानाबाद (291) आणि लातूर (353) मध्ये शंभर टक्के मतदान झालं असून बीडमध्ये (360) एका मतदाराने आपला हक्क बजावला नाही. परभणी हिंगोलीतील 501 पैकी 499 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदाराची आकडेवारी 99.60 टक्के झाली आहे. अमरावतीत 489 पैकी 488 सदस्यांनी मतदान केलं.
अमरावतीत मतदानाची आतापर्यंतची आकडेवारी 99.80 टक्के इतकी आहे. वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधील जागेसाठी 99.72 % मतदान झालं. 1059 मतदारांपैकी 1056 जणांनी मताधिकार बजावला.