भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उघडपणे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे समर्थन केले आहे. केवळ आरोप केल्यामुळे तेजस्वी यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. यापूर्वीही असे अनेकवेळा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या या भूमिकेचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण बिहार सरकारला अडचणीत आणण्याचा प्रदेश भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असताना शत्रुघ्न सिन्हा सातत्याने त्याविरोधात आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. तेजस्वी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची मागणी करत त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, जर आरोपांच्या आधारे कोणाचा राजीनामा घेणार असेल तर यापूर्वीही अनेक वेळा असे प्रकार झाले आहेत. अनेक पक्षांत असे होत आहे. काही ठिकाणी तर फक्त एफआयआर नव्हे तर चार्जशीट दाखल झाल्यानंतरही पदावर राहिलेले अनेक लोक आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.